सन १९९०. माझा दवाखाना "पडून "(खान्देशातील बोलीभाषेप्रमाणे सर्व नवीन व्यावसायिक ठिकाणे,जसे दवाखाने,दुकाने,हॉटेल्स ई. सुरू न होता "पडतातच!") जेमतेम सव्वा वर्ष झालेलं,उत्साह ऐन भरात,पण दवाखान्यात फारसं काम नसायचं,आणि रिकामा वेळ भरपूर असायचा.सकाळी तीन तास टेनिस,एखाद-दोन तास दवाखान्यातच माझ्या जया आणि शशी नावाच्या कम्पाउंडर्स सोबत व्यायाम,चहापान,दुपारी डॉ विजय भंगाळे पॅथॉलॉजिस्ट यांच्या लॅबमध्ये गप्पा आणि वसंत टॉकीज समोरच्या टपरीवाल्याची भजी,मग रात्रीचे जेवण झालं की गाठायचं मुन्सीपालटी हॉस्पिटल.आमचे मित्र डॉ.शरद पाटील तिथे मेडिकल ऑफिसर होते,तिथे अड्डा जमायचा गप्पांचा, मी,डॉ.मंगेश खानापूरकर,डॉ. विकास कोळंबे,डॉ.अनिल चौधरी आणि शरद! समोरच्या कल्पना रसवंती मधून कधी एक्सप्रेसो कॉफी तर कधी उसाचा रस! अशाच एका रात्री मी आणि शरद दोघेच बसलो होतो गप्पा करत,तेवढ्यात एक पेशन्ट आला.त्याला हनुवटीवर बरीच खोल आणि मोठी जखम झाली होती सायकलच्या अपघातात पडल्यामुळे.अशा केसेस मेडिको-लिगल आणि गंभीर स्वरूपाच्या असल्यामुळे जळगावला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवल्या जायच्या,तशीच यालाही पाठवण्याची त...