Skip to main content

ईस्माईलभाई!



सन १९९०. माझा दवाखाना "पडून"(खान्देशातील बोलीभाषेप्रमाणे सर्व नवीन व्यावसायिक ठिकाणे,जसे दवाखाने,दुकाने,हॉटेल्स ई. सुरू न होता "पडतातच!") जेमतेम सव्वा वर्ष झालेलं,उत्साह ऐन भरात,पण दवाखान्यात फारसं काम नसायचं,आणि रिकामा वेळ भरपूर असायचा.सकाळी तीन तास टेनिस,एखाद-दोन तास दवाखान्यातच माझ्या जया आणि शशी नावाच्या कम्पाउंडर्स सोबत व्यायाम,चहापान,दुपारी डॉ विजय भंगाळे पॅथॉलॉजिस्ट यांच्या लॅबमध्ये गप्पा आणि वसंत टॉकीज समोरच्या टपरीवाल्याची भजी,मग रात्रीचे जेवण झालं की गाठायचं मुन्सीपालटी हॉस्पिटल.आमचे मित्र डॉ.शरद पाटील तिथे मेडिकल ऑफिसर होते,तिथे अड्डा जमायचा गप्पांचा, मी,डॉ.मंगेश खानापूरकर,डॉ. विकास कोळंबे,डॉ.अनिल चौधरी आणि शरद! समोरच्या कल्पना रसवंती मधून कधी एक्सप्रेसो कॉफी तर कधी उसाचा रस!

अशाच एका रात्री मी आणि शरद दोघेच बसलो होतो गप्पा करत,तेवढ्यात एक पेशन्ट आला.त्याला हनुवटीवर बरीच खोल आणि मोठी जखम झाली होती सायकलच्या अपघातात पडल्यामुळे.अशा केसेस मेडिको-लिगल आणि गंभीर स्वरूपाच्या असल्यामुळे जळगावला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवल्या जायच्या,तशीच यालाही पाठवण्याची तयारी सुरू झाली होती.मी पाहिलं,जखमेत खूप धूळ-माती होती आणि रक्तस्त्राव ही बराच झाला होता आणि होतही होता.मी विचारलं डॉ.शरदला,की आपण इथेच केलं तर चालेल का? चालेल की,पण असल्या जखमेसाठी लागतात ते बारीक शिवणाचे धागे आमच्याकडे नाहीत आणि बाहेरून मागवण्याची यांची ऐपत नाही.एवढेच ना,मी आणतो माझ्याजवळचे! मी तडक स्कुटरला किक मारून निघालो आणि माझ्या दवाखान्यातून "प्रोलीन" 5/0 आणि क्रोमिक कॅटगट 3/0 धागे घेऊन आलो. आल्यावर लोकल अनेस्थेशीया मध्ये ती जखम सॅवलॉन,हायड्रोजन पॅरॉक्साईडनी छान धुवून काढली,बिटाडीन ने स्वच्छ केली आणि मग तब्येतीत जवळजवळ प्लास्टिक सर्जन करतात तसे शिवणकाम करून शिवली.नागपूर मेडिकल मधील प्लास्टिक सर्जरी डिपार्टमेंट मध्ये दोन महिने केलेल्या कामाचा फायदा झाला!
मग पोलीस चौकशी,जबानी ई. सोपस्कार झाल्यावर तो इसम त्याच्या घरी गेला,आणि आम्ही कॉफी पिऊन काहीतरी चांगलं काम केल्याच्या आनंदात आमच्या घरी!
कालांतरानं आमच्या दवाखान्यातलं काम वाढलं,शरदनीही ती नोकरी सोडली आणि रात्रीच्या गप्पांचा शिरस्ता तुटला,आणि या माणसाची गोष्ट आम्ही विसरलो.

त्यानंतर सुमारे दोन वर्षांनी मी एकदा नागपूरहून आगगाडीने भुसावळला परतलो,आणि आपली एक छोटी बॅग हातात घेऊन जिना चढू लागलो.तेवढयात कुणीतरी माझ्या हातातली बॅग ओढतोय असे जाणवले, पाहतो तर लाल शर्ट घातलेला एक कुली होता तो."अरे नही भाईसाहब,मुझे कोई दिक्कत नही, हलकी है बॅग."एक ना दोन,त्यानी काहीएक ऐकले नाही आणि मी रिक्षा करेपर्यन्त माझी बॅग त्यानीच उचलली."कितना पैसा देना भाई?" मी विचारलं."साहब,पैसे के लिये थोडी उठायी मैने आपकी बॅग,आपने शायद मुझे पहचाना नही,ये देखो,"म्हणून त्यानी हनुवटीवरचा व्रण दाखवला,तेंव्हा आठवलं मला सर्व! ईस्माईल नाम है मेरा,बिल्ला नंबर तेहतीस,डबल तिर्री!आणि काही कळायच्या आतच आम्ही दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली!आता या तेहेत्तीस नंबराशी माझं काहीतरी वेगळंच नातं आहे बघा. मेडिकल कॉलेजमध्ये सर्जरीत पीजी करत असतांना,हॉस्टेल मधली रूम नंबर तेहेत्तीस,दोनहजार दोन साली स्टार क्रुज वर  मिळालेली रूम नऊशेतेहेत्तीस,मुलीची पुण्याच्या कमिन्स कॉलेज हॉस्टेल ची रूम तेहेत्तीस,माझ्या कारचा नंबर तेहेत्तीस अकरा,काही विचारू नका.
त्यानंतर आमच्या भेटीगाठी वाढल्या,कधीही गावाला जायचे असले,की ईस्माईल हवाच. बसवणार,उतरवायला येणार हे ठरलेलं. ओळख तर झाली,पण या माणसाची ओळख पटायला काही अवधी जावा लागला.

ईस्माईल अब्दुल गवळी,शिवाजी नगर भुसावळ. नावाप्रमाणेच घरी म्हशींचा गोठा, आईवडील,भाऊ एकत्र कुटुंब.हा सगळ्यात मोठा.सकाळी पाच वाजता उठणार,गायी-म्हशींना चारा घालणार,दूध काढणार,त्यांच्या आंघोळी झाल्या की मग वडील सर्व ढोरं चरायला न्यायचे शेतात,की हा चालला स्टेशनवर कामाला! नुसती हमालीच नाही करायचा,तर जेवढी शक्य होईल तेवढी मदत करायचा सर्व प्रवाशांना.कुठे जायचंय, गाडी कधी येईल,कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल,तिकीट कुठे काढायचे,रिझर्वेशन मिळेल का,इथपासून ते अपंग-म्हातारे यांना व्हीलचेयर उपलब्ध करून ते बाबूच्या हातापाया पडून त्यांना व्यवस्थित जागा मिळवून देण्यापर्यंत सर्व! पैशासाठी कधी कुणाची अडवणूक केली नाही,मिळेल त्यात समाधान.आठवणींचा एकदम पक्का,एकदा कुणाला पाहिलं की जन्मभर विसरणार नाही.माझ्या ओळखीचा कुणीही भेटला तर त्याचे तिकीट,रिझर्वेशन,त्याला माझ्याकडे नेणे-आणणे,त्याच्या चहापाणी-नास्ता-जेवणाची सोय करणे,त्याच्या गाडीबद्दल सर्व माहिती वेळोवेळी देणे,सर्व आपणहून ईस्माईलभाई करतो,तेही एक पैश्याची अपेक्षा न करता!
एक पैश्याचं व्यसन नाही,मुक्काम पोस्ट म्हणजे मेन स्टेशनसमोरचा दर्गा,आणि येताजाता पिणार आणि पाजणार समोरच्या  चिंतामणीचा चहा!माझ्यामुळे भुसावळातील बऱ्याच डॉक्टरांशी ओळखी झाल्या,त्यांचीही कामं आपोआपच हा करू लागला,आणि आयएमए भुसावळचा रेल्वे स्टेशनवरचा प्रतिनिधी अशी आम्ही त्याची गमंत करू लागलो! त्यांच्यामुळे अनेक कुली लोकांशी माझी ओळख झाली आणि ९७ साली माझ्या लहान भावाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये लायनीनी वीस पंचवीस कुली बांधव आले होते आशीर्वाद द्यायला याचा मला अभिमान आहे!आमच्या सगळ्या पाव्हण्यांना नेण्या-आणण्याची जबाबदारी त्यांनी आपणहूनच उचलली होती,तेही,एक पैसाही न घेता!(औदार्य दाखवणं काय फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी आहे का?)

मग लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असतांना त्यांनी सर्व कुली मंडळींना रेल्वेच्या सेवेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी,गँगमन म्हणून सामावून घेण्याचे ठरवले,आणि आमचा ईस्माईल गँगमन झाला. जन्मभर फक्त पैजामा-कुर्ता घातलेला माझा मित्र माझ्या आग्रहाखातर पॅन्ट-शर्ट घालू लागला.
आज हा दहा वर्षे नोकरी करून रिटायर होतोय,पण अजूनही पंचवीशीच्या तरुणांना लाजवेल इतका तडफदार आहे,काळे केस, चष्मा नाही,अशिक्षित असूनही सर्व लिहिता-वाचता येणारा, फोन केला की पाच मिनिटात सायकलवर हजर होणारा ईस्माईल,केळकर कुटुंबातील एक सदस्यच झालाय.माझी बायपास सर्जरी अचानक ठरली पुण्याला,जसं कळलं याला हा मिळेल त्या वाहनानं हजर झाला पुण्याला, मला ऑपरेशन थिएटर मध्ये न्यायच्या आधी फक्त हात मिळवला माझ्याशी,पण त्याची नजर आणि स्पर्शच सर्व सांगून गेली! मी शुद्धीवर येईपर्यंत आयसीयू समोर बसून होता काही न खाता-पिता, मगच हलला तिथून!
माझ्या मुली आणि आमच्या बऱ्याच डॉक्टर मंडळींची मुले-मुली त्यांचे आणि त्यांच्या ईतरही मित्र-मैत्रिणींचे प्रवास ईस्माईलचाचाच्या सल्ल्याने आखले जातात आणि पारही पाडले जातात,इतका विश्वासू आहे तो!
दोन मुलं,तीन मुली,सर्वांची लग्ने झालीत,छान घर बांधून झालं,नातवंडं आलीत,सर्व दृष्टीनं समाधानी आहे हा,आणि या सर्वांचं श्रेय तो इमानदारीला आणि आई-वडिलांच्या केलेल्या सेवेला आणि त्यांच्या आशीर्वादांना देतो.
दरवर्षी ईदला मी मिठाई घेऊन त्याला भेटायला जातो,यावर्षी लॉकडाऊनमुळे इतक्या वर्षात पहिल्यांदाच जाऊ शकलो नाही, परंतु मी,आणि इस्माईलभाई,आमच्या दोघांच्या कल्पना एकच आहेत : आम्ही दोघेही माणसातच ईश्वर आणि अल्ला शोधतो,आणि ज्या दिवशी आनंद,तोच सण असे मानतो,आणि आनंदी तर आम्ही रोजच असतो!🙏

अशा या आमच्या अवलिया इस्माईलभाईला त्याच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने खूप शुभेच्छा आणि उदंड आयुष्यासाठी ईश्वर-अल्ला चरणी विनम्र प्रार्थना!

हा पवित्र सण आणि इस्माईलभाईच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं फक्त हेच म्हणावेसे वाटते :

 "इस्माईल खडा बाजारमे,मांगे सबकी खैर,
सबहीसे करे दोस्ती,न काहू से बैर।

नही धर्म अरु जात का,दिखा कभी संयोग,
मित्र सदा मन मे बसे,मन से मन का योग।



Comments

  1. Waa ! Eid Mubarak to both of you !

    ReplyDelete
  2. डॉ करंबेळकर : अप्रतिम लेख.
    व्यक्तिचित्रण आणि नातेसंबंध फार छान अधोरेखित झाले आहेत.

    ReplyDelete
  3. आमच्या दोघांच्या कल्पना एकच आहेत : आम्ही दोघेही माणसातच ईश्वर आणि अल्ला शोधतो,आणि ज्या दिवशी आनंद,तोच सण असे मानतो,आणि आनंदी तर आम्ही रोजच असतो! अतिशय सोपे पण आचरणात आणण्यासाठी तितकेच कठीण असे आनंदी जीवनाचे रहस्य जे आपण सहजतेने अंगिकारले आहे आणि प्रत्येकाच्या हृदयातील भगवंताला आपलेसे केलं आहे. ह्या पेक्षा मोठी भक्ती ईश्वर सेवा काय असू शकते, खूप सुंदर ओळी मला आठविल्या ह्या निमित्ताने :कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी:

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात,निव

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनकरराव ३ वर

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन*

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन* मित्रांनो, काल खूप दिवसानंतर रेल्वेचा भोंगा ऐकला ज्याला "सायरन"असे म्हणतात.आमच्या लहानपणी सर्व भुसावळकर जनतेच्या जीवनाचा हा भोंगा अविभाज्य अंग असायचा. डी.एस.ऑफिस(आताचे डी.आर.एम.ऑफिस) च्या छतावर हा बसविलेला आहे आणि आवाज इतका मोठा आहे की संपूर्ण शहरात सहज ऐकू यायचा,आता शहर खूप वाढल्यामुळं माहीत नाही सगळीकडे ऐकू येत असेल की नाही ते. सकाळी आठ,दुपारी चार आणि रात्री बारा अशा तीन वेळा हा भोंगा वाजत असे. रेल्वेच्या बहुतेक ड्युट्या सकाळी आठ ते दुपारी चार,दुपारी चार ते रात्री बारा आणि रात्री बारा ते सकाळी आठ अशा असायच्या. सकाळच्या ड्युटीला मॉर्निंग म्हणायचे पण दुपार आणि रात्रीचीला चार-बारा आणि बारा-आठ असेच प्रचलित  नाव होते. हे भोंगे अथवा सायरन्स या ठराविक वेळीच आणि एकदाच वाजायचे. एकावेळी एकापेक्षा जास्तीवेळा वाजले,तर त्याचा वेगळा अर्थ असायचा. तीन वेळा वाजले याचा अर्थ भुसावळ स्टेशन किंवा यार्ड परिसरात गाडी किंवा डब्बा रुळावरून घसरलाय,डिरेलमेंट झालीय किंवा अपघात झालाय,पाच वेळा वाजले म्हणजे भुसावळ डिव्हिजन मध्ये हा प्रकार घडलाय आणि सात वेळा वाजले म्हणजे भ