देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे! (कविवर्य विंदा करंदीकर) १७ जानेवारी १९८८. मी नुकताच एम.एस.जनरल सर्जरी,गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथून पास होऊन पुढे सुपर-स्पेशालिटी करण्यास मुंबईला आलो होतो आणि सांताक्रूझच्या आशा पारेख हॉस्पिटलमध्ये तात्पुरती रेसिडेन्सी घेतली होती.तिसराच दिवस होता माझ्या जॉबचा.संध्याकाळचा राउंड आटोपून जेवण करून मी जुहू बीचवर पायी फेरफटका मारून दवाखान्यातील रूमवर परतलो.आल्याआल्या मला टेलिफोन ऑपरेटरचा निरोप मिळाला की नागपूरहून ट्रँक-कॉल आला होता आणि अर्ध्या तासाने पुन्हा फोन येणार आहे,कुठे जाऊ नका.त्या काळी लँडलाईन फोन फक्त श्रीमंतांकडेच असायचे आणि दूरच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी ट्रँक-कॉल हे एकमेव साधन होते.एसटीडी सुविधा अजून सुरू व्हायची होती आणि मोबाईल फोन हे तर ऐकिवातही नव्हते! अर्ध्या तासांनी बरोबर फोन आला आमचे एक स्नेही कै.श्री.बंडूदादा काळे यांचा.(ते टेलिफोन डिपार्टमेंट मधेच कामाला होते) बातमी ऐकून मी हादरलोच! माझा भाऊ,जो कलकत्त्याला होता,त्याचा अपघात झालाय आणि मला ताबडतोब कलकत्त्याला बोलावलंय!...