Skip to main content

देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे...........

देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस,
देणाऱ्याचे हात घ्यावे!
(कविवर्य विंदा करंदीकर)

१७ जानेवारी १९८८.
मी नुकताच एम.एस.जनरल सर्जरी,गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथून पास होऊन पुढे सुपर-स्पेशालिटी करण्यास मुंबईला आलो होतो आणि सांताक्रूझच्या आशा पारेख हॉस्पिटलमध्ये तात्पुरती रेसिडेन्सी घेतली होती.तिसराच दिवस होता माझ्या जॉबचा.संध्याकाळचा राउंड आटोपून जेवण करून मी जुहू बीचवर पायी फेरफटका मारून दवाखान्यातील रूमवर परतलो.आल्याआल्या मला टेलिफोन ऑपरेटरचा निरोप मिळाला की नागपूरहून ट्रँक-कॉल आला होता आणि अर्ध्या तासाने पुन्हा फोन येणार आहे,कुठे जाऊ नका.त्या काळी लँडलाईन फोन फक्त श्रीमंतांकडेच असायचे आणि दूरच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी ट्रँक-कॉल हे एकमेव साधन होते.एसटीडी सुविधा अजून सुरू व्हायची होती आणि मोबाईल फोन हे तर ऐकिवातही नव्हते!
अर्ध्या तासांनी बरोबर फोन आला आमचे एक स्नेही कै.श्री.बंडूदादा काळे यांचा.(ते टेलिफोन डिपार्टमेंट मधेच कामाला होते) बातमी ऐकून मी हादरलोच! माझा भाऊ,जो कलकत्त्याला होता,त्याचा अपघात झालाय आणि मला ताबडतोब कलकत्त्याला बोलावलंय!

आमच्या पूर्ण परिवारात फक्त माझे वडील आणि मी,आम्ही दोघेच डॉक्टर,पण ते होते भुसावळला,तेथून आगगाडीने कलकत्ता छत्तीस तास,मी मुंबईला,त्यामुळे लवकरात लवकर विमानांनी मीच पोहोचू शकणार होतो.
माझे काका मुंबईला होते,त्यांना फोन केला,त्यांनी चौकशी करून सांगितलं की पहिली फ्लाईट सकाळी सहा वाजता आहे आणि तिकीट १४०० रुपये आहे. माझ्या खिशात फक्त दीडशे रुपये,काकांकडे चारशे! त्याकाळी एटीएम,डेबिट-क्रेडिट कार्ड,नेट बँकिंग यासारख्या सुविधा नव्हत्या.आता काय करायचं,मग फोन केला जसलोक हॉस्पिटल मध्ये रेसिडेन्सी करत असलेल्या माझ्या मित्राला,डॉ.धनंजय मोडक याला,सर्व परिस्थिती सांगितली. महिनाअखेर जवळ आलेला,त्याच्याजवळही फार पैसे नव्हते,पण तो म्हणाला,तू लगेच इकडे ये,मी इथल्या सर्व रेसिडेंट डॉक्टरांकडून पैश्यांची व्यवस्था करतो. मी रात्री दहाची शेवटची बस( ४ लिमिटेड,बेस्ट) पकडली आणि साडेअकराला जसलोकला पोहोचलो.त्यांनी पंधराशे रुपये जमवून मला दिले,त्याचे आभार मानून मी ग्रांट रोड स्टेशनवरून पाऊण वाजताची शेवटची लोकल पकडून अंधेरीला उतरून काकांकडे पोहोचलो. पहाटे चार वाजता काका मला सांताक्रूझ एअरपोर्ट ला घेऊन आला,तिकीट काढले,चेक-इन चे सर्व सोपस्कार आटोपून इंडियन एअरलाईन्सच्या विमानात बसलो. तो माझा पहिलाच विमानप्रवास! त्याचा आनंद घेणे राहिले दूरच,मनात भयानक धाकधूक होती की पुढे काय वाढून ठेवलंय याची,कारण नुसताच अपघात झालाय ही खबर होती,बाकी काहीच माहीत नव्हते!

साडेआठ वाजता विमान कलकत्त्याला लँड झाले,तिथे कलकत्त्याच्या महाराष्ट्र मंडळाची भावाची मित्रमंडळी मला घ्यायला आली होती. त्यांनी सांगितलं की  काल सकाळी अपघात झालाय आणि त्याच्या पायावरून बसचे चाक जाऊन तो चिरडला गेलाय.तडक गेलो भाऊ ऍडमिट असलेल्या दवाखान्यात. शिशुमंगल नावाचे हॉस्पिटल होते,तिथले नियम भलतेच कडक... रुग्णांना भेटायची वेळ फक्त दुपारी चार ते सहा,बाकी वेळी कुणीच भेटू शकत नाही. मी सांगितलं,मी त्याचा भाऊ आहे,स्वतः सर्जन आहे...एक नाही की दोन नाही...उत्तर एकच...मिलनेका वक्त दोपहर चार बजे! मग महाराष्ट्र मंडळाच्या दिग्गजांनी त्यांचे वजन वापरून ऑर्थोपेडिक चे चीफ,डॉ.होमचौधरी यांचे घर गाठले आणि माझी त्यांच्याशी भेट करवून दिली. त्यांनी त्यांच्या असिस्टंटला फोन करून मला भेटायची परवानगी दिली. अशा रीतीने मी दुपारी दीड वाजता भावाला भेटलो,तेंव्हा त्याला ऑपरेशन थिएटर मध्ये नेत होते. मी सुद्धा मागेमागे पोहोचलो आत. पण मला बाहेरच्या खोलीत थांबायला सांगितलं.थोड्या वेळाने एक कंपौंडर एक संमतीपत्रक घेऊन आला माझी सही घ्यायला.मी तीनताड उडालोच,गुडघ्याखाली पाय कापण्यास संमती होती ती! मी खूप विनवण्या केल्या,की मला फक्त एकदा ऑपरेशन थिएटर मध्ये येऊ द्या,बघू द्या काय परिस्थिती आहे,मग करतो मी सही. नेलं एकदाचं मला आत,बघतो तर काय,सर्व तयारी झाली होती अँप्युटेशन करण्याची. तसा मार बराच होता,पूर्ण पाऊल चिरडले गेले होते,पण पाऊल वाचवण्याचा काही प्रयत्न न करता सरळ कापून टाकणे मनाला पटत नव्हते. नाही कापायचा तर वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध डिस्चार्ज घ्या आणि न्या कुठेही.....! मी मनाचे न ऐकता हृदयाचे ऐकले आणि डिस्चार्ज पेपरवर सही केली.
बाहेर येऊन फोन केला नागपूरच्या माझ्या बॉस डॉ.मगनभाई ओसवाल यांना.ते ताबडतोब म्हणाले,आण नागपूरला,पुढचे मी पाहतो.

मित्रांनी रात्री आठ वाजताच्या फ्लाईटची दोन तिकिटे बुक केली आणि भावाला स्ट्रेचरवर घेऊन आम्ही चेक-इन केलं,टाटा करून सर्व मित्र पाणावलेल्या डोळ्यांनी घरी निघाले. प्रत्यक्ष बोर्डिंगच्या वेळी एक नवीनच झंझट उभी ठाकली! नियमानुसार स्ट्रेचर विमानात ठेवायला तीन सीट काढून तिथे तो ठेवावा लागणार होता,म्हणजे अजून दोन तिकिटे घ्यावी लागणार होती.आलीकी पंचाईत,आहेत कुणाजवळ इतके पैसे? मित्रांनी दोन तिकिटे काढून दिली होती आणि ते निघून गेले होते,आता काय करायचे?ही फ्लाईट चुकली तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत थांबावे लागणार होते,आणि त्या विलंबामुळे जखम चिघळली तर.....
एवढ्यात साधारणतः माझ्याच वयाचा एक तरुण माझ्याजवळ आला,म्हणाला,मी सगळं ऐकलय,मीही नागपूरचाच आहे आणि नागपूरलाच चाललोय,मी काढतो तिकिटं. असं बोलून तो गेलाही आमची दोन तिकिटं घेऊन आणि अजून दोन घेऊन आला.त्यातली एका लायनीतली तीन तिकिटं देऊन स्ट्रेचर ठेवण्यास तीन सीट्स काढायला कर्मचाऱ्याना सूचना देऊन झाल्याही! विमान वेळेवर निघाले आणि भुवनेश्वरला काही वेळाकरता थांबले,त्यावेळी बऱ्याच मागच्या सीटवर बसलेल्या या सद्गृहस्थाला मी जाऊन भेटलो आणि धन्यवाद दिले,(आणि उद्या पैसे परत करतो म्हणालो) ते बघू पुढे असं ते म्हणाले,त्यावेळी कळलं की त्यांचं नाव आशुतोष चितळे आहे आणि ते आपल्या पत्नीसोबत म्हणजे सुचेता सोबत नागपूरला परतत आहेत.

रात्री साडेबाराच्या सुमारास आम्ही नागपूरला लँड झालो.विमानाच्या दाराशी ओसवाल सर अँबुलन्स घेऊन उभे होते,त्यासाठी पोलीस कमिशनरची स्पेशल परवानगी घ्यावी लागली होती! तडक श्रीवर्धन कॉम्प्लेक्स च्या त्यांच्या नर्सिंग होम मध्ये पोहोचलो. अर्ध्या तासात ऑपरेशन थिएटर मध्ये नेऊन अनेस्थेटीस्ट डॉ.साने,ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.काळे,प्लॅस्टिक सर्जन डॉ.टी. एस.राव,आणि ओसवाल सर यांनी जखमेची पाहणी केली,खराब झालेली चामडी काढून टाकली,तुटलेल्या हाडांना पिना टाकून जोडले, चुरा झालेली दोन हाडे काढून टाकली आणि जखम स्वच्छ करून त्यावर स्किन ग्राफ्टिंग केलं आणि पाऊल वाचवण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकल्या गेलं!
पहाटे तीन साडेतीन वाजले असतील रूममध्ये शिफ्ट करायला,पाहतो तर काय,आशुतोष-सुचेता हजर,घरून गरम-गरम जेवणाचा डब्बा घेऊन,सोबत सकाळी लागेल म्हणून चहाचा थर्मास आणि कप!काहीही लागलं तर फोन करा म्हणून एक कार्ड ठेवून निघूनही गेले. नागपूरला माझं आजोळ असल्यामुळं पुढच्या चोवीस तासात सर्व जवळचे नातेवाईक आले,पण त्यांना त्रास नको म्हणून बरेचदा चितळेंकडून डब्बा यायचाच.दुसऱ्या दिवशी त्यांच्या माणसांनी एक छोटा रंगीत टीव्ही सुद्धा आणून ठेवला रूम मध्ये!
सर्व डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि भावाचा पाय वाचला! दीड महिना आम्ही ओसवाल सरांच्या दवाखान्यात होतो,एक पैसाही सरांनी काय,डॉ.काळे,डॉ.राव,डॉ.साने,कुणीच घेतला नाही.असलं प्रेम आपल्या शिष्यावर करणारा गुरू विरळाच! आशुतोष मधूनच येऊन जायचा कसंकाय चाललंय विचारपूस करायला,त्यांनीही त्या दोन विमानाच्या तिकिटाचे पैसे अनेक विनवण्या करूनही घेतले नाहीत.

सर्वकाही स्थिरस्थावर झाल्यावर मी पुन्हा मुंबईला परतलो,जसलोक हॉस्पिटलमध्ये काही दिवस अनुभव घेतल्यावर भुसावळला आलो आणि बाबांच्या सोबत स्वतःचा दवाखाना थाटला.नंतर लग्न,मुलंबाळं, दवाखान्याचा वाढता व्याप यात वर्षे कशी निघून गेली कळलेच नाही,आशुतोषशी फोनवरच बोलणे व्हायचे फ़क्त, प्रत्यक्ष भेट नाहीच,तेही कालांतरानं कमी होत गेलं.
मध्यंतरी माझा भुसावळचा एक स्नेही श्री.गणेश वढवेकर(निस्सीम वीर सावरकर भक्त,जो "मृत्युंजय"मासिक संपादित करतो) आशुतोषकडे नागपूरला गेला होता.(त्याला प्रेमळ आतिथ्य,योग्य सल्ला,शाबासकीची थाप आणि भरघोस मदत मिळाली हे सांगणे न लगे) पण तो भुसावळचा आहे हे समजल्याबरोबर आशुतोषनी माझ्याबद्दल विचारलं.गणेशनी  ताबडतोब मोबाईल लावून आमचे बोलणे करून दिले आणि आमच्या मैत्रीचा दुसरा अध्याय सुरू झाला!

आशुतोष चितळे,नागपूरच्या प्रसिद्ध ऑल इंडिया रिपोर्टर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एक डायरेक्टर. त्यांचे आजोबा,श्री व्ही. व्ही. चितळे यांनी सन १९१४ मध्ये सुरू केलेली फर्म, आज देशातील अग्रगण्य कायदेविषयक पुस्तके आणि जर्नल्स प्रकाशित करणारी संस्था आहे,आणि त्यांचे तीन लाख वाचक(Readership) आहेत. इन्फोटेक,वेब वर्ल्ड,लॉ अकॅडमी,आणि कॅफे अशा चार संबंधित कम्पन्या आहेत,सहाशेहून अधिक लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जुळलेआहेत आणि देशातील सर्व महत्वाच्या शहरांमध्ये शाखा आहेत!
ऑल इंडिया रिपोर्टरच्या कामानिमित्त आशुतोष देशातील जवळजवळ सर्व राज्यांना भेट देऊन चुकलाय. हा एव्हढामोठा डोलारा सांभाळायला सुरेख साथ लाभलीय सुचेता वहिनींची. त्या स्वतः उत्कृष्ट चित्रकार आहेत,विणकाम,भरतकाम अतिशय सुरेख करतात,आणि गृहसजावट तर विचारूच नका,अप्रतिम! एकेक वस्तू नजरेत भरेल अशा जागी विराजमान झालेली,बागेतली फुलंही यांच्या आदेशानुसारच उमलतात की काय असं वाटतं. हो,सांगायचं राहूनच गेलं,त्या अतिशय सुगरणही आहेत,लिंबाचं लोणचं बेडेकरांनी यांच्याकडून शिकावं असं सांगावंसं वाटतं!

आशुतोष-सुचेता यांना अद्वैत व स्नेहा ही दोन अपत्ये.अद्वैत चार्टर्ड अकाउंटंट असून ऑल इंडिया रिपोर्टर ची अकाऊंटस आणि संगणिकीकरण (डिजिटल मीडिया) ही कामे सांभाळतो, मुलगी स्नेहा लग्न होऊन दिल्लीला असते,बी.टेक. कॉस्मेटोलॉजी आहे आणि एल.एल.बी.पण केलं आहे,पण वकिली न करता घर सांभाळते.जावई सिद्धेश कोतवाल सुप्रीम कोर्टात वकिली करतात.अद्वैतच्या दोन गोड मुली तन्वी आणि तनया,त्यांना छान संस्कार देण्याचे काम या सर्व कुटुंबियांसोबत सून माधवी समर्थपणे सांभाळते.या गोड पऱ्या आशुतोषला आजोबा न म्हणता "आजो" म्हणतात,मज्जा येते ऐकायला.

आशुतोष-सुचेता यांनी सढळ हातांनी मदत करून अनेक गरिबांच्या आयुष्यात आनंद आणि हास्य फुलविले आहे,परंतु त्याची थोडीही प्रसिद्धी किंवा गाजावाजा केलेला त्याला मुळीच आवडत नाही.याबाबतीत मात्र मी त्याच्याशी सहमत नाहीये.माझ्या मते,अशा चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी मिळालीच पाहिजे,आपली पाठ थोपटून घेण्यासाठी नव्हे,तर इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून. पण आशुतोष म्हणतो की तसं नाही,आणि का नाही ते तुला मी समजावीन.आता वकिलीची जनुके अनुवांशिकतेनी रक्तातच असल्यामुळे तो माझी बोलती बंद करेल यात शंका नाही,असो! याबाबतीत संत  कबिराचा एक दोहा आठवतोय :

"जो कोई करे सो स्वार्थी,
अरस परस गुन देत,
बिन किये करे सो सुरमा,
परमारथ के हेत।

(जो काही मनोकामना ठेवून दान करतो तो स्वार्थी आहे,परंतु जो कोणतीही आशा न ठेवता दान करतो,तो परमार्थी आहे.)

अशा या लक्ष्मी-सरस्वती-पार्वती यांचा त्रिवेणी संगम असलेल्या,(साधेपणाचं प्रतीक पार्वती!)एका अतिशय सुसंस्कृत परिवारास भेट देण्याचा योग आला परवा सव्वीस जानेवारीला आशुतोष-सुचेता यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्ताने! खरं तर वय नुसतं कागदोपत्री असतं हे यांच्याकडे पाहून पटतं कारण तिशीच्या तरुणांना लाजवेल अशी तडफ आहे या दोघांच्यात! इतकं सगळं असून कुठेही गर्वाचा लवलेशही नाही.आपल्या कर्तृत्व,दातृत्व आणि अतिथ्यानी सर्वांना आपलंसं करणाऱ्या या निर्मळ मनाच्या  जोडप्यास वाढदिवसानिमित्त अशाच आनंदी-आरोग्यदायी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!💐💐🙏

Comments

  1. खरंच अशी माणसं दूर्मिळ...

    ReplyDelete
  2. ओघवती शैली,रसाळ वर्णन आणि शेवटपर्यंत बांधून ठेवणारा स्वानुभव..

    ReplyDelete
  3. Thanks all,Chitales are really very nice & generous people.

    ReplyDelete
  4. Such a great man is my friend. I feel honoured

    ReplyDelete
  5. Bravo Ashutosh and Sucheta. Wish you a long and blessed life...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनक...