*वाढदिवस* काल सात एप्रिल ,मी एकोणसाठ वर्षांचा पूर्ण झालो,आणि मागच्या सात-आठ-दहा वर्षातला माझा सगळ्या आनंदात खऱ्या अर्थानं वाढ करून गेलेला असं वर्णन करावं लागेल असा " वाढ "दिवस संपन्न झाला! अर्थातच पुढचा प्रश्न तुमचा असेल की का बॉ? तर सांगतो......याचं श्रेय जातं कोव्हिड आणि त्यामुळे असलेल्या लॉकडाऊनला! हे अँड्रॉइड मोबाईल फोन,आणि त्या अनुषंगाने आलेल्या व्हाट्सअप,फेसबुक,मेसेजिंग आणि तत्सम प्रकारामुळे वाढदिवस म्हणजे मला आदल्या दिवसापासूनच धडकी भरायची! कारण दिवसभर काम करून थकल्यावर रात्री जेवण करून झोपलं,आणि मस्त डुलकी लागली की बरोब्बर बारा वाजता फोन खणखणायचा..... हॅलो,काय झोपलास का? (रात्री बारा वाजता ज्यांचे प्रोफेशन *चोरी* नाही अशी सर्व सज्जन मंडळी झोपलेली असतात अशी सगळ्या जगात प्रथा आहे,असो.) नाहीरे,झोपतो कसचा, वाटच पहात होतो तुझ्या फोनची!आनंद वाटला तुझा आवाज ऐकून. अरे वा,हॅप्पी बर्थडे,काय,किती वर्षांचा घोडा झालास? (याठिकाणी घोडा म्हणायची प्रथा का व कशी पडली कुणास ठाऊक,मला मात्र बरेचदा इच्छा होते लोकांना त्यांचा स्वभाव किंवा शारीरिक जडणघडणीनुसार बैल,गाढव,माकड,कोल्ह