Skip to main content

वाढदिवस

*वाढदिवस*

काल सात एप्रिल,मी एकोणसाठ वर्षांचा पूर्ण झालो,आणि मागच्या सात-आठ-दहा वर्षातला माझा सगळ्या आनंदात खऱ्या अर्थानं वाढ करून गेलेला असं वर्णन करावं लागेल असा "वाढ"दिवस संपन्न झाला!

अर्थातच पुढचा प्रश्न तुमचा असेल की का बॉ? तर सांगतो......याचं श्रेय जातं कोव्हिड आणि त्यामुळे असलेल्या लॉकडाऊनला!

हे अँड्रॉइड मोबाईल फोन,आणि त्या अनुषंगाने आलेल्या व्हाट्सअप,फेसबुक,मेसेजिंग आणि तत्सम प्रकारामुळे वाढदिवस म्हणजे मला आदल्या दिवसापासूनच धडकी भरायची! कारण दिवसभर काम करून थकल्यावर रात्री जेवण करून झोपलं,आणि मस्त डुलकी लागली की बरोब्बर बारा वाजता फोन खणखणायचा..... हॅलो,काय झोपलास का? (रात्री बारा वाजता ज्यांचे प्रोफेशन *चोरी* नाही अशी सर्व सज्जन मंडळी झोपलेली असतात अशी सगळ्या जगात प्रथा आहे,असो.)

 नाहीरे,झोपतो कसचा, वाटच पहात होतो तुझ्या फोनची!आनंद वाटला तुझा आवाज ऐकून.

अरे वा,हॅप्पी बर्थडे,काय,किती वर्षांचा घोडा झालास? (याठिकाणी घोडा म्हणायची प्रथा का व कशी पडली कुणास ठाऊक,मला मात्र बरेचदा इच्छा होते लोकांना त्यांचा स्वभाव किंवा शारीरिक जडणघडणीनुसार बैल,गाढव,माकड,कोल्हा,लांडगा,उंट,जिराफ ई. संबोधित करण्याची ) आता माझाच बॅचमेट असल्यामुळे आमचे वय सारखेच असेल हेही त्या "गाढवाला" कळू नये का,पण नंतर लक्षात आलं की हा बरेचदा गटांगळ्या खाऊन अनेकांचा बॅचमेट राहून चुकलेला "टोणगा" आहे म्हणून!असो.

काय,मग उद्या कुठे यायचं पार्टीला? आणि हो,मला फक्त स्कॉचच लागते बरं, ऑन दि रॉक्स,सोडा नसला तरी चालेल.त्याचं काय आहे,की स्कॉचची खरी मजा "नीट" घेऊन ती गुळणी जिभेनं तोंडात फिरवायची,त्याचा अरोमारुपी सुगंधित दर्प नाकातल्या आतून मेंदूपर्यंत पोहोचू द्यायचा,आणि मग तो जळजळीत घोट स्वरयंत्राजवळ टोल टॅक्स द्यायला थोडा वेळ थांबवायचा आणि शेवटी अन्ननलिकेतून चुरचुर करत पोटापर्यंत ढकलायचा,समजलं का? समजलं समजलं,(हे तर कधीचच समजलंय की उभ्या जन्मात या गृहस्थानं आपल्या पैशानं स्कॉचच काय,गावठी दारूसुद्धा  प्यायली नाहीये!)

धन्यवाद! मी सुटकेचा केविलवाणा प्रयत्न करतो,पण कसचं काय.......
तुझ्या परवानगीनं(?) मी बायको-पोरांनाही घेऊन येणार आहे बरंका,हो,उद्या आमच्याकडे चूल बंद!
बरं बाबा,ये.
हा फोन ठेवीपर्यंत अनेक मिस्ड कॉल्स आलेले असतात. पुढचा अर्धा-एक तास त्या सर्वांना धन्यवाद,थॅंक्यु थॅंक्यु म्हणत आणि उद्याच्या पार्टीच्या खर्चाचा हिशोब मांडण्यात जातो!

सकाळी जाग आली आणि फोन हातात घेतला की त्याचं वाढलेलं वजन आलेल्या शेकडो मेसेजेसची जाणीव करून देतं. व्हाट्सअपचे आमचे ग्रुप्स ही खुप आहेत,यातील बऱ्याचश्या ग्रुप्स मध्ये मी जबरदस्ती घुसवल्या गेलोय आणि भिडस्तपणामुळे निघू शकत नाहीये,असो. शाळेतील सवंगड्यांचा  एक,कॉलेजातील मित्र-मैत्रिणींचा एक,हार्मोनिका वाले तर दहा-बारा ग्रुप्स,सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांचा  एक,संध्याकाळच्या जिमचा एक,सामाजिक कार्य (?) करणारेही अनेक,पोलीस आणि गुन्हेगार मंडळी एकत्र असणारा एक,त्यात राजकारणी घुसलेले अनेक,आर्थिक गुंतवणुकीची माहिती देणारा एक ग्रुप,स्थानिक डॉक्टर मंडळी असलेला आय.एम.ए चा एक,इतर पॅथीचेही डॉक्टर असलेला एक,सर्जन लोकांचा एक,राज्य आणि देशपातळीवरील जनरल आणि स्पेशालिस्ट डॉक्टरांचे अनेक,टेबल टेनिस खेळणारे आणि प्रेमीलोक,यांचे अनेक,तीच बाब टेनिसची, इतर ग्रुप्सवर निषिद्ध असलेल्या चावट नॉनव्हेज  जोक्स-गप्पा-गोष्टी-चलचित्र यांची चलती असलेला (खोटं कशाला बोलू?)एक सर्वात लाडका आणि उघडण्यासाठी पासवर्ड लागणारा ग्रुप......... काही विचारू नका!

बरं, कोणत्याही ग्रुपवर एखादा जवळचा मित्र शुभेच्छा देणाऱ्या मेसेजची सुरुवात करतो,आणि मग सुरू होते कॉपी-पेस्टची झुंबड! कॉपी-पेस्ट वाटू नये म्हणून कुणी त्यात फुल टाकतं तर कुणी पूर्ण गुलदस्ता.संध्याकाळपर्यंत या गर्दीत इतर महत्वाच्या पोस्ट्सकडे दुर्लक्ष होतं. एकदा का वाढदिवसाचा मेसेज पाहिला की कुणीही त्याची शहानिशा न करता तोच मेसेज पुढे ढकलतो.एकदा मी गम्मत केली होती... अगदी पहाटे एका मित्राला त्याचा वाढदिवस नसतांना शुभेच्छा दिल्या,झालं...संध्याकाळपर्यंत त्याच्यावर शुभेच्छांचा भडिमार झाला,त्यानी बिचाऱ्यानी एकदा प्रयत्न केला सांगण्याचा की आज नाहीये माझा वाढदिवस,पण कसचं काय!त्याकडे दुर्लक्ष करत त्याच्यावर हॅपी बर्थडेचे घणाघाती प्रहार होतच राहिले.
एक गम्मत आहे... आमच्या कॉलेजच्या ग्रुपवर अशी बरीच मंडळी आहेत की मी ज्यांना आजपर्यंत कधीही भेटलो नाही,किंवा भेटलोही असीन तर आता आठवत नाहीत.(सांगायला अभिमान वाटतोय की माझ्या बॅचच्या बहुतांश मुलींकडे मी डोळे वर करूनही पहायचो नाही,इतका सज्जन होतो आणि अजूनही आहे)ही पोरंही इमाने-इतबारे संदेश पाठवतातच,म्हणजे यात काही वाईट नाही,पण खऱ्या प्रेमापेक्षा यात मी नाही मेसेज केला तर इतरांना काय वाटेल हीच भावना जास्ती असते! असो.
त्या दिवशी रात्री आणि पुढचे दोन-तीन दिवस या सर्व शुभेच्छा देण्यारांचे आभार मानण्यात जातो.अगदी आठवण ठेवून सर्वांची नावं लिहावी लागतात,नाही लिहिली,तर ते लोक जाणीव करून देतात,की मला विसरलास कारे,मीही केलंय तुला विश!

इकडे दवाखान्यात वेगळाच प्रकार असतो,स्टाफ बिचारा खऱ्या प्रेमानं शुभेच्छा द्यायला आपल्या ड्युट्या झाल्यावरही थांबला असतो,पण बरेचदा इमर्जन्सी केसेसमुळे त्यांना सवडच सापडत नाही आणि त्यांनी आणलेली फुलं,ग्रीटिंग्ज,केलेल्या कविता,गाणी सगळी राहून जातात आणि ते हिरमुसले होतात. पण मी आवर्जून त्या सगळ्या छोट्या छोट्या भेटवस्तू घेतो आणि प्रेमानं जपून ठेवतो.
ओपीडीत बरेच मेडिकल रेप्स येतात त्यांच्या साहेबांसोबत.मग ते केक कापणं,फोटो,टाळ्या वगैरे प्रकार होतात,या मंडळींशी माझे वैयक्तिक संबंध असल्यामुळे गप्पागोष्टीत खूप वेळ जातो आणि रीसेप्शनिस्ट आठवण करून देते की पेशंट्स बरेच आहेत आणि खोळंबा होतोय म्हणून.
अजून एक कंटाळवाणी गोष्ट म्हणजे बायको कटाक्षानं नवीन, कमीतकमी शर्टतरी घालायलाच  लावते,जे मला बिलकुल आवडत नाही,पण ईलाज नसतो.माझ्याकडे बहुतेक नवीन शर्टस मी आणलेले नसून भेट मिळालेलेच आहेत,त्यामुळे फिटिंग होईलच याची खात्री नसते.(चार वर्षांपूर्वी दिलेला शर्ट आज टाईटच होईल ना,किंवा एखाद्याने दुरदर्शीपणे वाढत्या मापाचा दिला असेल तर ढिला होण्याची शक्यता!) एकदाचं फोटो सेशन झालं की मी आधी तो नवीन शर्ट काढून फेकतो आणि जुनाच शर्ट घालून "मोकळा" होतो.

 इकडे मित्रांनी संध्याकाळच्या पार्टीचे हॉटेल,वेळ,मेन्यू,ड्रिंक्स, लोकांची यादी,परस्परच ठरवून टाकलेली असते.पार्टी,मग ती कसलीही आणि कुणाचीही असो, बायकोचा उत्साह मात्र शिगेला पोहोचला असतो.दुपारी ओपीडी आटोपली की लगेच संध्याकाळचा पोशाख कोणता याची तयारी सुरू होते.ड्रेस की साडी यावर मुलींसोबत फोनवर खलबतं होतात,मग त्या प्रत्येकाची ट्रायल-एरर होते. आधी मला कोणता ड्रेस किंवा कोणती साडी चांगली दिसतेय अशी विचारणा व्हायची,पण मी पहिल्यांदा जे दिसेल तेच सर्वात सुंदर असं म्हणतो हे कळल्यापासून माझी त्यातून सुटका झाली! मग मॅचिंग ब्लाउज,(ज्याला पोलकं म्हणणं गावठीपणाचं लक्षण आहे हा नवा शोध मला लागला!)कानातलं, गळ्यातलं, हलकंस लिपस्टिक,सेंट,मॅचिंग पर्स,इतकंच काय तर चपलाही मॅचिंग!हे खूप वेळ चालू असतांना खोलीत मला शिरायची मुभा नसते."अहो किती घाई करता,तरी किती पटकन तयार होते मी,एखादी तासनतास पार्लर मध्ये जाणारी मिळाली असती म्हणजे समजलं असतं", ही समज मिळते वरून आणि मी किती भाग्यवान आहे याची मला जाणीव होते!
इकडे माझेही कपडे तयार ठेवलेच असतात,तेच घालावे लागतात.एकदा नवीन सलवार आणि वरती शेरवानी की काय म्हणतात असा झब्बा आणला होता. ही सलवार पोटरीपर्यंत भयानक घट्ट आणि मांड्यांपासून कमरेपर्यंत दोन आशु बसतील एवढी ढगळी का डिझाईन केली असेल हे कोडं मला अजूनही उलगडलं नाहीये! बरं, त्यात नाडी असेलच याचीही खात्री नाही,अशा आणिबाणीच्या प्रसंगी  नाडी घालतांना मागे भोक असलेल्या टूथब्रशनी ती कशी पटकन घालायची हे शिकल्यामुळं सर्जरी करतांना कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे धैर्य आले हे मात्र खरे!

तर अशी आमची वरात पोचते हॉटेलमध्ये,तिथे आगाऊ मित्रांनी रोषणाई,फटाके,डीजे,मोठ्या अक्षरात "हॅपी बर्थडे डियर आशु" असे थर्मोकोल चे कटिंग लावलेले असते. हारतुरे वगैरेंनी स्वागत होते,आणि मला उगीचच बुजल्यासारखं होतं. इतर उपस्थित बघे हसतायत ते माझ्या शेरवानीलाच अशी माझी खात्री पटते,पण करता काय!
पार्टी सुरू होते,सगळेजण आपापल्या परीनं माझं अभिनंदन करतात,ड्रिंक्सचे दोन राउंड आत गेले की मराठीची जागा इंग्रजी घेते,तिसऱ्या राउंडनंतर आमच्या मित्रांमधले कलाकार जागे होतात आणि शेरोशायरी(माझ्यावर!) आणि गायन सुरू होतं. सोबत असलेली लहान मुलं आईवडिलांच्या आग्रहाखातर डान्स,कविता वगैरे म्हणतात.काही वर्षांपूर्वी ज्या मित्रांची मुलं करमणूक करायची,आज त्यांची नातवंडे करतात! माझ्या वाढदिवशी एका  छोट्या मुलानी "जॅक अँड जिल वेंट अप द हिल" किंवा "बाबा ब्लॅकशीप हॅव यू एनी वूल" म्हणावे आणि मी घसरणारी सलवार सावरत टाळ्या वाजवाव्यात,यापेक्षा जास्ती दैवदुर्विलास तो कोणता?

यथावकाश जेवणं होतात,गिफ्ट्स,रिटर्न गिफ्ट्स यांची देवाणघेवाण होते आणि घरी यायला रात्रीचे साडेबारा-एक होतात.असतेच स्वागताला एखादी होऊ घातलेली डिलिव्हरी,मी पुन्हा कामाला भिडतो आणि पुढचं एक वर्ष वाढदिवस नाही या भावनेनं सुखावतो!

हे सर्व काल नव्हतं,त्यामुळं,कालचा दिवस खूप मस्त होता आणि शुभेच्छांची उत्तरे देण्यापासून सुटका मिळाल्यानं हे लिखाण करायला वेळ मिळाला!🙏

मित्रांनो, काल वाढदिवस विसरलात म्हणून आता कृपया शुभेच्छा देऊ नका,आपले सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव माझ्यासोबत आहेतच,तीच माझी खरी संपत्ती आहे.आणि हा लेख एक स्वैर विनोदी विचारांची मांडणी म्हणूनच  पहावा,कुणाचीही टिंगल-टवाळी करण्याचा माझा उद्देश नाही.

कालच्या "वाढ"दिवशी माझ्या आनंदात वाढ तर झाली खरी,पण उरलेल्या आयुष्यात एक वर्षाची "घट" झाली ही भावना कुठेतरी सलतेय, पण त्याच वेळी, उरलेलं आयुष्य केवळ स्वतःसाठी न जगता,डॉक्टरी व्यवसायाच्या माध्यमातून गरजवंत,दुःखी-कष्टी रुग्णांच्या जीवनात आनंद,हास्य फुलवण्यासाठी वापरावं,समाजाकडून घेतलेल्या ऋणाची परतफेड अजून जोमानं करावी,ही नवी उमेद मनात उमलली आहे!
एखाद्या व्यक्तीला निखळ-निरागसपणे आनंदाने हसतांना पाहणे ही गोष्ट मला खूप सुंदर वाटते; आणि त्या आनंदी हसण्या मागचं कारण जर मी स्वतःच असेल तर? अधिकच सुंदर!!
नमस्कार!🙏🙏

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनक...