*हजामत* केस कापणे यासाठी " हजामत " या शब्दाचा शोध कुणी लावला किंवा याचा उगम कुठून झाला काय माहीत,पण केशकर्तन अथवा कटिंग या मचूळ शब्दांपेक्षा हजामत खमंग आणि झणझणीत वाटतो,हो की नाही!भादरणे हाही शब्द तसा बराय,पण हजामत ची बातच काही और! एखाद्याची चांगली खरडपट्टी करणं याला "बिनपाण्यानी हजामत करणे" हा वाकप्रचार मस्त वाटतो.केस वाढलेत याला बरेच लोक "कटिंग वाढलीय" असं का म्हणतात काय माहीत,पण याच बरंच प्रचलन आहे. कटिंग बऱ्यापैकी रूढ शब्द जरी असला तरी हजामत हा केस कापणे आणि दाढी असा सर्वसमावेशक शब्द आहे. केशकर्तनकार लोकांना न्हावी किंवा हजाम असे संबोधित करतात,काही लोक या शब्दांचा वापर टिंगल-टवाळी करण्यास वापरतात,परंतु मला या लोकांबद्दल नितांत आदर आहे कारण ही एक कला आहे आणि ही मंडळी या कलेचे उपासक! मी खूप सन्मान करतो यांचा. खान्देशात ह्या मंडळींना लग्नात एक वेगळा मान असतो.प्रथा अशी आहे,की लग्नाच्या जेवणाची बोलावणी(बहुधा गावजेवणच असतं)त्या गावचा सर्वात जेष्ठ न्हावी घरोघरी जाऊन करतो,की सर्वांनी जेवायला यायचं म्हणून आणि घरी चूल पेटवायची नाही(चुलीस निवतं) ,आणि बऱ्...