Skip to main content

हजामत

*हजामत*

केस कापणे यासाठी "हजामत" या शब्दाचा शोध कुणी लावला किंवा याचा उगम कुठून झाला काय माहीत,पण केशकर्तन अथवा कटिंग या मचूळ शब्दांपेक्षा हजामत खमंग आणि झणझणीत वाटतो,हो की नाही!भादरणे हाही शब्द तसा बराय,पण हजामत ची बातच काही और! एखाद्याची चांगली खरडपट्टी करणं याला "बिनपाण्यानी हजामत करणे" हा वाकप्रचार मस्त वाटतो.केस वाढलेत याला बरेच लोक "कटिंग वाढलीय" असं का म्हणतात काय माहीत,पण याच बरंच प्रचलन आहे. कटिंग बऱ्यापैकी रूढ शब्द जरी असला तरी हजामत हा केस कापणे आणि दाढी असा सर्वसमावेशक शब्द आहे. केशकर्तनकार लोकांना न्हावी किंवा हजाम असे संबोधित करतात,काही लोक या शब्दांचा वापर टिंगल-टवाळी करण्यास वापरतात,परंतु मला या लोकांबद्दल नितांत आदर आहे कारण ही एक कला आहे आणि ही मंडळी या कलेचे उपासक! मी खूप सन्मान करतो यांचा.

खान्देशात ह्या मंडळींना लग्नात एक वेगळा मान असतो.प्रथा अशी आहे,की लग्नाच्या जेवणाची बोलावणी(बहुधा गावजेवणच असतं)त्या गावचा सर्वात जेष्ठ न्हावी घरोघरी जाऊन करतो,की सर्वांनी जेवायला यायचं म्हणून आणि घरी चूल पेटवायची नाही(चुलीस निवतं) ,आणि बऱ्याच अंशी त्याचं पालनही होतं.
दुसरं म्हणजे,
लग्नाला येणाऱ्या मंडळींचे स्वागत हाच न्हावी कपाळावर टिक्का लावून करतो, आणि तिसरं म्हणजे,लग्नात तो ज्या पक्षाकडून असेल,त्यांना  मिळालेल्या भेटवस्तू एका रजिस्टर मध्ये लिहून लाउडस्पीकरवर अनाऊन्स करणे.याला "आहेर वाजवणे" असे म्हणतात. आपल्या नावाचा आणि आहेर किती केलाय याचा असा जाहीर बोभाटा होत असल्यामुळे लाजेकाजेस्तव लोक जरा बरा आहेर करीत असतील असे वाटते.😄

मला या संप्रदायाचा उल्लेख "नाभिक" असा केलेलाच आवडतो. या श्रीविठ्ठल आणि वारकरी संप्रदायाचे संस्थापक श्री संत सेना महाराज होते.या संप्रदायाने फक्त जातीपातींच्या सीमाच मोडल्या नाहीत,तर प्रांताप्रांतांच्याही सीमा ओलांडल्या.मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा.घरी जाऊन बादशाहाची हजामत करण्याचा मान त्यांचा.याप्रसंगी त्यांची एक कथा सांगितल्याशिवाय राहावत नाहीये.

एकदा एका मुसलमान बादशाहाने संत सेना महाराजांना हजामत करण्यास बोलावले. सेना महाराज इकडे देवपूजेत रममाण,तल्लीन झालेले. पाच वेळा बादशाहाचा दूत वापस गेला.बादशाहा आपल्या आज्ञेचा अवमान झाला म्हणून भयानक संतापला,त्याने हुकूम सोडला की सेना महाराजांचे हातपाय साखळदंडाने बांधून त्यांना नदीत फेकून द्या. त्या वेळी विठ्ठलाने सेना महाराजांचे रूप धारण करून बादशाहाची हजामत केली होती. बादशाहाला विठ्ठल डोक्याची चंपी करत असतांना तेलाच्या वाटीत सेना महाराजांची शंख-चक्र-गदाधारी कृष्ण आणि विष्णूची प्रतिमा दिसली,आणि त्याचे डोळे उघडले,त्यांनी सेना महाराजांच्या घरी जाऊन त्यांचे पाय धरले आणि एक सहस्त्र सुवर्णमुद्रा भेट दिल्या,अर्थातच सेना महाराजांनी त्या मंदिरास दान दिल्या.

देव आणि भक्त यातील नातं अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेचा भावार्थ समजून घ्यायला हवा.सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तीरसाची उपासना केलेली आढळते.

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा,आनंदे केशवा भेटतांची,
या सुखाची उपमा नाही त्रिभोवनी,पाहिले शोधोनी अवघी तीर्थे।

असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लीन झाला आणि पंढरी ही त्याच्या जीवनाचा ध्यास बनली. श्रावण वद्य द्वादशी ही त्यांची पुण्यतिथी मानली जाते.श्री संत सेना हरी मंदिर हे हुबळी येथे स्थित आहे.

माझी पहिली कटिंग/हजामत जी माझ्या आठवणीत आहे ती नागपूरची.लहानपणी सुट्टीत नागपूरला आजोळी जायचो बरेचदा. आजोबांच्या धंतोलीच्या गल्लीत तुकाराम नावाचे एक म्हातारे गृहस्थ यायचे सायकलवर त्यांची धोपटी घेऊन,हजामत करायला,आठवड्यातून दोनदा. नाव तुकाराम पण गुण सर्व मंबाजींचे! ती कटिंग म्हणजे एक भीतीदायक प्रकार असायचा.कटिंग करायचे एक हाताने चालवण्याचे एक मशीन असायचे त्यावेळी.तुकारामबुवा अंगणात पाट टाकून बसवायचे,आमच्या मागे स्वतः बसायचे,डाव्या हातानं डोकं खाली दाबून उजव्या हातानं गट..गट..गट असा आवाज करणारं मशीन मानेपासून सुरू करून वरपर्यंत फिरवायचे. त्या मशीनमध्ये केस अडकायचे आणि कापले जाण्याऐवजी ओढल्या जायचे.जाम दुखायचं पण मान हलवायची सोय नाही कारण कणखर हातानं ते दाबलेलं असायचं! बरं,आमचे केस खरोखरीच वाढलेत का,ते कापायची जरूर आहे का,हे ठरवणारा तोच,पंधरा दिवस झाले म्हणजे कटिंग करायचीच असा रतीब लावलेला!या एकाच कारणामुळं नागपूरला जायची भीती वाटायची,नाहीतर नागपूर म्हणजे काय विचारता,आजोबा आणि काका,लाडच लाड!

तुकारामबुवा वारल्यानंतर त्यांची गादी चालवायला ठाकूर म्हणून गृहस्थ आले.तुकारामाची थोडी सुधारीत आवृत्ती. उत्तरप्रदेशी भैय्या,वेळेचा एकदम पक्का! तो आल्यावर पाच मिनिटात खाली आलो नाही तर शेजारच्या घरी कटिंग सुरू! शेजारच्या वाड्यात नानासाहेब नावाचे सद्गृहस्थ रहायचे एकटेच,त्यांची आठवड्यातून दोनदा दाढी असायची,त्यादिवशी मात्र प्रेफरन्स त्यांनाच कारण त्यांनी बोलावल्यावर यायला वेळ लागला तर फार तणतण करायचे.ठाकूर आमच्याजवळ म्हणायचे की अब ये बुढेबाबा को दिनभर क्या काम है,लेकीन पाच मिनिट भी देर हो गयी तो बफरता है.पण त्यांचा आदरही करायचे ठाकूर आणि आम्ही सर्वही!

यावरून एक गमतीदार गोष्ट आठवतेय,आमचे एक खूप लाडके चुलते होते मनोहरकाका म्हणून,समोरच रहायचे.ते थंडीमध्ये अंगणात उन्हात बसून स्वतः दाढी करायचे.आम्ही आजूबाजूला क्रिकेट वगैरे खेळत असलो की बोलवायचे सर्वांना,मग एक जण समोर आरसा धरायचा त्यांच्या आणि एक-दोघे सकाळचा पेपर वाचून दाखवायचे त्यांना! अगदी राजेशाही थाट होता,काही विचारू नका,पण आम्हाला त्याच्या मोबदल्यात भरपूर गोळ्या-चॉकलेट्स मिळायचेत.

भुसावळला शाळेत असतांना मुन्सीपालटी हॉस्पिटलशेजारी बॉम्बे हेयर कटिंग सलून नावाचे दुकान होते तिथं बाबा घेऊन जायचे,आणि नंतर आम्ही पायी किंवा सायकलवर जायचो.तिथले मालक एक म्हातारे बाबा होते,त्यांचा विश्वनाथ नावाचा मुलगा होता एकदम पिळदार शरीरयष्टीचा,तो आम्हाला आवडायचा,कारण तो मशीन न वापरता कैची आणि कंगवा चालवायचा.तो उत्कृष्ट कबड्डीपटू होता आणि चातक मंडळ या क्लबचा खेळाडू होता.त्याच्या दुकानात कबड्डीच्या जिंकलेल्या बऱ्याच ट्रॉफीज होत्या.कटिंग करतांना प्रत्यक्ष कैची चालवण्याआधी नुसतीच हवेत कच..कच आवाज करत माहोल पैदा करायचा आणि मगच केसांवर तुटून पडायचा.ही त्याची अदा बरीचशी कबड्डी..कबड्डी करत चक्कर मारायची आणि प्रतिस्पर्ध्याचं लक्ष नसलं की मग शिताफीने टांग मारायची या सवयीशी मिळतीजुळती वाटायची. त्यावेळी पहिल्यांदा कापण्याआधी केस ओले करण्यास पिस्टन खालीवर करत फूस-फूस आवाज करणाऱ्या बाटलीतून पाण्याच्या फवारणीची प्रथा सुरू झाली होती.नेम चुकल्यामुळे बरेचदा तो पाण्याचा फवारा नाकातोंडातही जायचा,पण मजा यायची खरी!

 अकरावी-बारावीसाठी अकोल्याला गेल्यावर लांब केस आणि कल्ल्याची फॅशन आली.तेंव्हा माझे केस खूप घनदाट आणि लांबसडक होते.(ते अगदी लग्न होईपर्यंत!😜) अकोल्याला रामदासपेठेत रहायचो आजी-आजोबांकडे,जवळच स्टेशन रोडला एक सलून होते तिथे पहिल्यांदा हेयर सेटिंग करतात असं कळलं.त्यावेळी अमिताभचे डॉन,अमर अकबर अंथोनी,मुकद्दर का सिकंदर हे सिनेमे खूप जोरात सुरू होते आणि अमिताभसारखी  हेयर स्टाईल असावी असे सर्वच तरुणांना वाटे. त्या सेटिंग प्रोसेस मध्ये पहिले अमिताभ स्टाईल कान झाकणारे आणि मागे मानेवर रुळणारे असे केस कापायचे,मग डोकं शॅम्पूने धुवायचे आणि मग एका ब्रश आणि हेयर ड्रायरच्या सहाय्यानं ते वाळवत त्याला आकार द्यायचा.एक ते दीड तास चालायचा हा सोहळा! दहा रुपये घ्यायचा तो त्यावेळी! सात रुपयात दोन लिटर पेट्रोल मिळायचे त्या काळी,यावरून हा प्रकार किती महाग होता याची कल्पना यावी.
भुसावळला गेल्यावर बाबांनी ताबडतोब पुन्हा मिल्ट्री कट करायला लावला हा भाग वेगळा!

नागपूरला मेडिकलच्या शिक्षणात मेहाडिया चौकात एका सलूनमध्ये जायचो,शेषराव होतं त्या कारागिराचं नाव,ओळख झाल्यामुळे पटकन करून द्यायचा,साधी कटिंग,कारण वेळच नसायचा केसांकडे लक्ष द्यायला.कुरळे असल्यामुळे वाढले की विचित्र दिसायचे (असं मला वाटायचं) म्हणून छोटेच ठेवायचो.

भुसावळला आल्यावर आमचे जुने बॉम्बे हेयर कटिंग सलून बंद झालेले होते,त्याठिकाणी अय्यंगार बेकरी "पडली" होती आता. (इति खान्देश) मग वसंत टॉकीजसमोर "परख" मेन्स पार्लरच्या संजू अहिरेशी ओळख झाली.एकदम सज्जन पोरगा,मित्रच झाला माझा लगेच. त्याचे वडील बहुधा रेल्वेत होते त्यामुळे त्यांची माझा बाबांशीही ओळख होतीच. मधुरा आणि सुप्रिया या माझ्या मुलींनाही बाबा तिथेच न्यायचे कटिंगला. एयर कंडिशनर असलेले पहिले केश कर्तनालय अशी ख्याती होती त्याची.त्यानी जळगाव रोडला एक ब्रँचही सुरू केली,कालांतरानं तो बिल्डरशीप मध्ये उतरला मग माझे भेटणे कमी झाले.त्याच्या एका चुलत्याने जवळच असलेल्या नवशक्ती कॉम्प्लेक्स मध्ये "आयडियल" मेन्स पार्लर सुरू केलं(खान्देशीत त्याचा उच्चार "आडियल"असा करतात)तिथे जाऊ लागलो.आप्पा मोठा आणि गणेश छोटा असे दोघे भाऊ खूप प्रेमळ आणि लाघवी आहेत.आता केस अगदी कमी उरलेत डोक्यावर पण मी सवयीप्रमाणे दर पंधरा दिवसांनी जातोच.तिथे केस कापण्यापेक्षा गप्पागोष्टी,नवी-जुनी खबरबात,बाबा डॉक्टर,सुहास,आणि पाठक या मित्रांशी विचारांची देवाणघेवाण होते,मजा येते. अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते,आप्पाकडे कधीही सिनेमाची धांदडधिंगा असलेली गाणी ऐकायला मिळणार नाहीत,मंद स्वरात "सर्वमंगल मांगल्ये" हा देवीचा श्लोक सुरू असतो आणि आप्पा जेंव्हा हळुवार हातानं चंपी करतो तंद्री लावून,तेंव्हा मला त्याच्यात सेना महाराजांचाच भास होतो आणि,

आम्ही वारीक वारीक,करू हजामत बारीक,
विवेक दर्पण आयना दावू,वैराग्य चिमटा हालवू।
 ही ओवी तो गुणगुणतोय असे वाटते.


आता दाढी.....
बाबा दाढी करायचे तेंव्हा कुतूहलाने पहायचो मी.डबीतला साबण,त्यावर ओला केलेला ब्रश घासून फेस करायचा,तो ब्रशने गालावर लावायचा,तो मुरेपर्यंत ब्लेड काढून ते फावड्यात फिट करायचं,मधेच ब्लेडची साईड बदलायची,हे सर्व पाठ झालं होतं पाहूनपाहून. १९७५ साली आजीआजोबा अमेरिकेला गेले होते मामाकडे तेंव्हा त्यांनी कोलगेटची रेडिमेड फोमची बाटली आणली होती,वरून दाबलं,की त्या नॉझल मधून फस्सकन एव्हढामोठ्ठा फेस बाहेर यायचा.बाबा हॉस्पिटलला गेले की मी आणि माझा लहान भाऊ त्यानं हात आणि तोंड धुवायचो.कित्येक वर्षे मामा विलकिन्सन या जगप्रसिद्ध कम्पनीचे ब्लेडस आंतरराष्ट्रीय पत्रामध्ये चिकटपट्टीने चिकटवून पाठवायचा.त्यांनी दिलेलं जिलेट कंपनीच अँगल बदलू शकता येणारं फावडं अजूनही माझ्याकडे आहे.

पहिली दाढी केली ती बारावीत असतांना,थियरी पाठ असल्यामुळे प्रॅक्टिकल मध्ये अडचण आली नाही.
कटिंग जरी न्हाव्याकडे केली तरी दाढी प्रत्येकानं आपली आपणच करावी असे माझे ठाम मत आहे,कारण....तो एक वेगळाच आनंद आहे मित्रांनो! मस्तपैकी उभे-आडवे-तिरपे हात मारायचे,गुळगुळीत होईपर्यंत गाळ तासायचा.आणि तोही त्या जुन्याच प्रकारच्या ब्लेड-फावड्यानी बरं,त्या जिलेटच्या मॅक थ्री वगैरे सो कॉल्ड सेफ रेझरनी किंवा फिलिप्सच्या इलेक्ट्रिक शेव्हरने नव्हे.अहो थोडं कापल्या गेलं तर काय बिघडतं,उलट आफ्टर शेव्ह लोशन लावल्यावर जे झणझनतं त्याची लज्जत काही औरच असते गडयांनो! दाढी करतांना कापल्या गेल्याची निशाणी असणाराच खरा मर्द असं माझं ठाम मत आहे.

माझ्या आनंदाच्या परिभाषा थोड्या निराळ्या आहेत.माणूस असो वा पशू,तृषार्थाची तहान भागविणे,भुकेल्यास अन्न देणे,आजाऱ्याची शुश्रूषा करणे,तिला  धीर देणे आणि बरा होऊन जातांना त्याच्या डोळ्यातील कृतज्ञतेची भावना हृदयात साठवणे,आणि स्वतःची  दाढी स्वतः करणे यातील आनंद मी पहिल्या प्रतीचे मानतो.

मेडिकलमध्ये पीजी करतांना ऑर्थोपेडिक्स मध्ये हाऊसजॉब करतांना बऱ्याच पेशंट्सना ट्रॅक्शन लावावे लागायचे.त्यात पायावर मांडीपासून ते पावलापर्यंत स्टीकिंग प्लास्टर लावतात.ते नीट चिकटण्यासाठी पूर्ण पायावरचे केस आधी शेव्हिंग करून काढले जातात.हे शेव्हिंग करण्यासाठी वॉर्ड मध्ये न्हावी असतात.त्यावेळी त्यांना वस्तऱ्याने शेव्हिंग करतांना पाहिलं आणि आमच्या मनात एक नवीनच आयडिया आली की ही कला आपणही शिकावी! याला दोन कारणं : एक म्हणजे इंग्लडमध्ये आधीच्या काळी सर्जन्सना बार्बर सर्जन म्हणायचे कारण पेशंट्सची शेव्हिंगही तेच करायचे आणि दुसरं म्हणजे मी आणि माझा सवंगडी डॉ प्रशांत जोशी,जो आता ऑस्ट्रेलियात प्रख्यात हार्ट सर्जन आहे,आम्ही क्लिंट इस्टवूड चा एक वेस्टर्न मुव्ही पाहिला,ज्यात तो एका तोडक्यामोडक्या आरशासमोर उभा राहून वस्तऱ्याने स्वतःची दाढी करतो,तसंच करावंसं आमच्या तारुण्यात पदार्पण केलेल्या रांगड्या मनाला वाटलं! मग वॉर्ड च्या न्हाव्याकडून वस्तरा मिळतो त्या दुकानाचा पत्ता घेतला,इतवारीत जाऊन दोन वस्तरे,धार करायची दगडं,घासायचा पट्टा सर्व आणलं.वस्तरा वापरायचं टेक्निक शिकलो आणि प्रॅक्टिस साठी रोज एकमेकांची दाढी करू लागलो.पुढे कॉन्फिडन्स आल्यावर आपापली करू लागलो.खूप मजा येते दोस्तहो.आताचे मॉडर्न वस्तरे ब्लेडचे दोन तुकडे करून एका स्लॉट मध्ये फिट करून त्या ब्लेडनेच कापतात.हा प्रकार जास्त हायजीनिक आहे आणि धार लावायची कटकट नाही हे मात्र खरं.
पुढे सर्जरीतही हे शिकल्याचा फायदा झाला,डोक्यास मार लागून जखम झालेला पेशंट आला की आधी केस कापावे लागतात मगच टाके घालता येतात.बराच रक्तस्त्राव होत असेल तर न्हाव्याची वाट न पाहता आम्हीच शेव्हिंग करून टाके घालून टाकायचो.

सर्जरीत पोस्ट ग्रॅज्युएशन करतांना शेवटची दोन वर्षे दाढी ठेवली होती कारण कापण्यास वेळच मिळायचा नाही पण ती मेंटेन करणं जास्त जिकिरीचं आहे हे लक्षात आल्यावर उडवली तिला.

आता कटिंग हा शब्द जाऊन हेयर स्टायलिंग हा शब्द प्रचलित झालाय. नवीन पोरांचे विविध कट्स,मुलांनी घातलेल्या वेण्या,लाल-सोनेरी रंगवलेले केस,कानातील डूल पाहिले की टाळकं सणकतं बरेचदा,पण ही जनरेशन गॅप आहे असं समजवावं लागतं मनाला.
जावेद हबीब सारखे साखळी असणारे ब्रॅण्डेड सलून उघडलेत आणि करोडोंची उलाढाल असणारा व्यवसाय झालाय तो! हेयर विव्हिंग,ट्रान्सप्लांट,कलरिंग,स्टायलिंग ते विग इथपर्यंत पसारा झालाय,आमचं बरंय बुवा,ऑपरेशनची टोपी घातली की टक्कल लपतं,आणि या सर्व भानगडींतूनही सुटका होते.

संत सेना महाराज की जय.
नमस्कार!

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात,निव

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनकरराव ३ वर

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन*

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन* मित्रांनो, काल खूप दिवसानंतर रेल्वेचा भोंगा ऐकला ज्याला "सायरन"असे म्हणतात.आमच्या लहानपणी सर्व भुसावळकर जनतेच्या जीवनाचा हा भोंगा अविभाज्य अंग असायचा. डी.एस.ऑफिस(आताचे डी.आर.एम.ऑफिस) च्या छतावर हा बसविलेला आहे आणि आवाज इतका मोठा आहे की संपूर्ण शहरात सहज ऐकू यायचा,आता शहर खूप वाढल्यामुळं माहीत नाही सगळीकडे ऐकू येत असेल की नाही ते. सकाळी आठ,दुपारी चार आणि रात्री बारा अशा तीन वेळा हा भोंगा वाजत असे. रेल्वेच्या बहुतेक ड्युट्या सकाळी आठ ते दुपारी चार,दुपारी चार ते रात्री बारा आणि रात्री बारा ते सकाळी आठ अशा असायच्या. सकाळच्या ड्युटीला मॉर्निंग म्हणायचे पण दुपार आणि रात्रीचीला चार-बारा आणि बारा-आठ असेच प्रचलित  नाव होते. हे भोंगे अथवा सायरन्स या ठराविक वेळीच आणि एकदाच वाजायचे. एकावेळी एकापेक्षा जास्तीवेळा वाजले,तर त्याचा वेगळा अर्थ असायचा. तीन वेळा वाजले याचा अर्थ भुसावळ स्टेशन किंवा यार्ड परिसरात गाडी किंवा डब्बा रुळावरून घसरलाय,डिरेलमेंट झालीय किंवा अपघात झालाय,पाच वेळा वाजले म्हणजे भुसावळ डिव्हिजन मध्ये हा प्रकार घडलाय आणि सात वेळा वाजले म्हणजे भ