नमस्कार मित्रांनो. परवा आमच्या हार्मोनिका परिवारातील परममित्र,विष्णुकांत शर्मा,जो गितोक्त या अध्यात्मिक केंद्रातही सक्रिय आहे,त्याने,आम्ही गेल्या बत्तीस वर्षांपासून वैद्यकीय व्यवसायात असूनही कसं हसतखेळत तणावमुक्त जीवन जगतोय आणि त्यास काही धार्मिक,अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे का अशी पृच्छा केली. आणि गितोक्त केंद्राच्या व्यासपीठावर यासंबंधी एक भाषण देण्यास आम्हा दोघांस बोलाविले. एक सव्वा तासाची ती झूम मिटिंग होती,त्यात गितोक्त परिवाराचे स्वामी जितात्मानंदजी,आणि ईतर महानुभाव अनुयायी उपस्थित होते. खरं तर आम्ही मानवता हा धर्म आणि मानवसेवा हीच पूजा असं मानणारे,एवढ्या मोठ्या विद्वानांसमोर काय बोलणार? पण त्यानं आग्रहच केला आणि त्यानिमित्तानं आम्हीसुद्धा आमच्या जीवनात डोकावून पाहिलं,की असं काय आपण केलं,की ज्यामुळे तणाव असूनही आम्ही आनंदी वृत्ती,हास्य टिकवू शकलो. या मंथनातून ज्या बाबी समोर आल्या त्या त्यांच्यासमोर मांडल्या. झूम मिटिंग,आणि तीही हिंदी भाषेत होती,नेट मधेच मिळायचे नाही त्यामुळे अडथळे आले बरेच,तरी मजा आली आम्हाला त्या विचारांच्या देवाणघेवाणीत.बऱ्याच मित्रांच्या आग्रहास्तव त्याचं स...