Skip to main content

आनंदी जीवन जगतांना

 नमस्कार मित्रांनो.

परवा आमच्या हार्मोनिका परिवारातील परममित्र,विष्णुकांत शर्मा,जो गितोक्त या अध्यात्मिक केंद्रातही सक्रिय आहे,त्याने,आम्ही गेल्या बत्तीस वर्षांपासून वैद्यकीय व्यवसायात असूनही कसं हसतखेळत तणावमुक्त जीवन जगतोय आणि त्यास काही धार्मिक,अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे का अशी पृच्छा केली. आणि गितोक्त केंद्राच्या व्यासपीठावर यासंबंधी एक भाषण देण्यास आम्हा दोघांस बोलाविले. एक सव्वा तासाची ती झूम मिटिंग होती,त्यात गितोक्त परिवाराचे स्वामी जितात्मानंदजी,आणि ईतर महानुभाव अनुयायी उपस्थित होते. खरं तर आम्ही मानवता हा धर्म आणि मानवसेवा हीच पूजा असं मानणारे,एवढ्या मोठ्या विद्वानांसमोर काय बोलणार? पण त्यानं आग्रहच केला आणि त्यानिमित्तानं आम्हीसुद्धा आमच्या जीवनात डोकावून पाहिलं,की असं काय आपण केलं,की ज्यामुळे तणाव असूनही आम्ही आनंदी वृत्ती,हास्य टिकवू शकलो. या मंथनातून ज्या बाबी समोर आल्या त्या त्यांच्यासमोर मांडल्या. झूम मिटिंग,आणि तीही हिंदी भाषेत होती,नेट मधेच मिळायचे नाही त्यामुळे अडथळे आले बरेच,तरी मजा आली आम्हाला त्या विचारांच्या देवाणघेवाणीत.बऱ्याच मित्रांच्या आग्रहास्तव त्याचं सार मराठीत सादर करतोय आपल्यासमोर.


एवढ्यातच आपण सर्वांनी अक्षय तृतीया आणि ईद हे दोन सण या करोनामुळे घरीच बसून साजरे केले.कोव्हीडच्या भीतीनं आपल्या सर्वांच्या जीवनात अंध:कार पसरलाय,सर्वजण घाबरलेत,दुनियेतील सर्व डॉक्टर्स,शास्त्रज्ञ,नेतागण हतबल झालेत,यावर काही ठोस इलाज सापडत नाहीये,लाखो निरपराध लोकांनी आपला जीव गमावलाय.आपण सर्वजण या सृष्टीच्या मालकाकडे,त्या परमात्म्याकडे,मग त्याला ईश्वर,अल्ला,येशू,वाहेगुरु काहीही नाव द्या,प्रार्थना करून दयेची भीक मागतोय.

याच आशयाचं एक गाणं आम्ही हार्मोनिकावर वाजवतोय आणि त्याच्यापुढे हात जोडतोय.


*ए मालिक तेरे बंदे हम*


तर मित्रांनो,आजचा जो विषय आहे,तणावमुक्ती,सकारात्मकता,ईश्वर,ध्यानधारणा,धार्मिकता,

अध्यात्म,सद्गुरू-सत्संग वगैरे,याबाबत बोलण्याची आमची खरं तर लायकी नाहीये,कारण यावाटेला आम्ही कधी गेलो नाही,नाही कधी कुणी अध्यात्मिक गुरू केला. बस,मागे वळून पाहिल्यावर काय दिसलं की ज्यामुळे जीवनात आनंद मिळाला,हास्य कायम राहिलं,ते आपणासोबत शेयर करतोय.


१. *तणावमुक्ती* 

वास्तवात पूर्ण तणावमुक्ती शक्यच नाही.मनुष्याचा जसजसा विकास होतोय,तणाव तितकाच वाढत चाललाय.मुलांना अभ्यासाचा,परीक्षेत उत्तम मार्क्स मिळवण्याचा,छान कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून चांगली मनासारखी डिग्री मिळवण्याचा,नंतर नोकरी मिळण्याचा अथवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा,नोकरीत प्रमोशनचा,व्यवसाय वाढवण्याचा,कर्जाचे हफ्ते भरण्याचा,लग्न,घर बांधणं,मग मुलंबाळं,त्यांना मोठं करणं,शिकवणं,त्यांची लग्ने.........यादी फार मोठीय. म्हणजेच,तणाव हे आपल्या आयुष्याचं अविभाज्य अंग आहे आणि तणावमुक्ती हा शब्दच खोटा आहे.

मला असं वाटतं की तणाव हा हवाच,त्यामुळे आपण कार्यरत राहतो.तणावामुळे शरीरात adrenaline,noradrenaline,corticosteroids यासारखी सम्प्रेरके तयार होतात ज्यामुळे आपल्या शरीरातील सर्व संस्था व्यवस्थित काम करतात.मी तर एक झालं की दुसरं काहीतरी नवीन शिकण्याचा,करण्याचा ताण ओढवून घेतो,ताण नसला तर मी अस्वस्थ होतो. अर्थात जास्त ताण जरूर हानिकारक आहे आणि निराशेच्या गर्तेत लोटणारा आहे,हे नक्की. म्हणून तणावमुक्तीपेक्षा तणाव व्यवस्थापन आणि तणावशमन हे शब्द जास्त योग्य आहेत.(Tension management & Tension relief) हे आम्ही कसं केलंय ते सांगतो आता.


कमकुवतपणा असणे पाप नाही,पण तो भरून काढण्याचे प्रयत्न न करणे पाप आहे.आम्ही आमच्यातली कुवत ओळखून त्याप्रमाणे आमची क्षमता वाढविण्याचा संकल्प केला आणि आमची उद्दिष्टे ठरवली.मोठ्या शहरांपेक्षा भुसावळसारख्या छोट्या गावात आईवडिलांसोबत राहून वैद्यक व्यवसाय करण्याचे ठरविले.आम्ही कधीही स्वतःची तुलना आमच्या इतर शहरी  प्रथितयश-नावाजलेल्या,खूप पैसे कमविणाऱ्या मित्रांसोबत केली नाही.आधुनिक उपकरणे आणून,आहे त्या पायाभूत सुविधांचा वापर करून,चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला/अजूनही करतोय.वडिलांच्या अनुभवाचा फायदा घेऊन,पुस्तके वाचून,वैद्यकपरिषदांमध्ये सहभाग नोंदवून,भुसावळ-जळगावातील जेष्ठ सहकार्यांसोबत काम करून,कामामध्ये अधिक सफाई आणण्याचा प्रयत्न केला. पैसा कमावणं हे तर सर्वांचंच उद्दिष्ट असतं पण त्याला प्राथमिकता नाही दिली,नाही त्यासाठी कधी चुकीच्या मार्गांचा अवलंब केला.आईवडिलांनी दाखविलेल्या सचोटीच्या मार्गावर,ज्ञानाचा,कौशल्याचा पूर्ण वापर करून रुग्णसेवा करतोय.


छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद घ्यायला शिकलो,जसं,सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणात स्नान करणं,पहिल्या पावसाच्या सरीत भिजणं,पक्ष्यांची किलबिल ऐकणं,त्यांना दाणे टाकणं,बगीच्यातली हिरवीगार झाडं-फुलात रमणे,लहान मुलांशी खेळणं,गल्लीत फिरणाऱ्या मुक्या जनावरांना खायला देणं,पाणी पाजणं,कुणी काही छान काम केलं की सर्वांसमोर त्याची मुक्तकंठाने तारीफ करणं,कुणी काही चुकल्यास त्याला न रागावता समजून घेणं वगैरे.राग हे चिंता,ताणतणाव आणि इतर बऱ्याच आजारांचे मूळ आहे.मुळात राग येऊच न देणं आणि आलाच तर लवकर विसरणं हे आधी माझ्या आईकडून,सासूबाईंकडून आणि मग सुजाताकडून शिकलो/शिकतोय.चुका आमच्याकडूनही झाल्या,आजाणतेपणे काहींना दुखावलेही असेल,पण कुणाशी शत्रुत्व नाही ठेवलं कधी.आयुष्यात उतारचढाव सर्वांसारखेच आम्हालाही आले,आनंदात खळखळून हसलो,दुःखात अश्रूंना मोकळी वाट करून दिली,पण चेहेर्यावरचं हसू कधी ढळू दिलं नाही.आईकडून शिकलो की हास्य हा सर्वात सुंदर दागिना आहे आणि हसून स्वागत केलं तर शत्रूसुद्धा मित्र बनतो.

अजून एक : घरी पाळीव प्राणी असणं यासारखा अनोखा आनंद नाही,अर्थात,त्याला कुटुंबातील एक सदस्य असा दर्जा मात्र द्यायला हवा,नाहीतर कुत्रा पाळलाय,पण तो चोवीस तास साखळीनं बांधलेला,एकदा सकाळी शान मारत फिरायला नेऊन आणला की झालं काम.आमची झेना,कधीच बांधली नाही,गळ्यात साखळी आहे,पण सोनेरी,शोभेची,घरभर मुक्त संचार असतो तिचा.वाट पहात असते आम्ही दवाखान्यातून वर घरी यायची,आल्यावर तिच्या डोळ्यातला आनंद आणि प्रेम पाहिलं,तिला जवळ घेतलं,की सर्व तणाव कुठल्याकुठे पळून जातो.


टीव्ही वरील निरनिराळे न्यूज चॅनल्स,सोशल मीडिया यापासून फार सावध राहतो.निगेटिव्ह बातम्या वारंवार दाखवण्याची आणि आम्ही पहिले दाखवलं हे सांगण्याची चढाओढ असते त्यांची. दुःख,क्लेश निर्माण करणाऱ्या बातम्या,व्हिडियो दाखवतात,का माहिती? कारण सामान्य माणसालाही मनाच्या कोपऱ्यात इतरांचे दुःख बघायला आवडतं.त्याचा फायदा घेत ही मंडळी आपला टीआरपी वाढवतात. यामुळे भीती उत्पन्न होऊन चिंता-तणाव वाढतो.



२. *ईश्वर*

खरं सांगायचं तर या पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली,सुर्यमालिका कशी उत्पन्न झाली,गुरुत्वाकर्षण काय आहे,जीवजंतू कसे तयार झाले,मानव आणि त्याची उत्क्रांती कशी झाली हे सर्व विज्ञानानं छान विशद केलेलं आहे.जन्म-मृत्यू,आजार-रोगराई,औषधोपचार हे सर्व वैध्न्यानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर निसर्गनियमच आहेत हे पटतं,त्यामुळे ईश्वर,अल्ला,येशू,वाहेगुरु असा कुणी सृष्टी चालवणारा आहे यावर विश्वास ठेवणं कठीण वाटतं.ती एक श्रद्धा आहे,पण श्रद्धेस आपल्या जीवनात फार मोठं स्थान आहे.श्रद्धा म्हणजे कुठल्यातरी काल्पनिक गोष्टीवर दृढ विश्वास ठेवणे,जसं,अणू असतो,त्याचं केंद्र असतं,त्याभोवती प्रोटोन्स,इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स फिरतात हे विज्ञान मानते,अणू सगळ्यात पॉवरफुल सुक्ष्मदर्शकातूनही दिसत नाही,पण तो आहे हे मानलं तर इतर सर्व शास्त्रीय गणिते पटापट  सोडवता येतात,तसं,ईश्वर आहे हे श्रद्धेनी मानलं तर मानवी जीवनाचा अर्थ समजणं सोपं होतं,त्यामुळे अशी एक सुपरपॉवर आहे असं आम्ही मानतो आणि त्याला नमस्कार करतो,नाव काहीही द्या त्याला.

पण मग जर "तो" आहे आणि ही दुनिया त्यांनी बनवलीय,तर मग का त्यानी इतकी असमानता,इतकी विषमता का ठेवली,का गरीब-श्रीमंत,दुर्जन-सज्जन,रोगराई,अत्याचार बनवले? याचं उत्तर आमच्याजवळ नाही.

याच अर्थाचं एक सुंदर गाणं: *दुनिया बनानेवाले,क्या तेरे मनमे समाई,काहेको दुनिया बनायी*.. आता हार्मोनिकावर वाजवूया.


याची रचना किती अर्थपूर्ण आहे बघा,कवी शेवटी म्हणतो: 

गुपचूप तमाशा देखे,वाहरे 'तेरी खुदाई,काहेको दुनिया बनायी तूने...


याचं उत्तर स्वामीजींनी छान दिलं,ते म्हणाले,ईश्वरानी मानव बनवला,त्याला बुद्धी दिली,मात्र तिचा वापर कसा करायचा हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे,त्यात तो ढवळाढवळ करीत नाही,तुमच्या पाप-पुण्याचा लेखाजोखा नंतर होतो.

आम्ही मात्र ईश्वरासारखे शक्तिमान,दयाळू,मायाळू सर्वांना मदत करणाऱ्या,भले करणाऱ्या माणसातच ईश्वर शोधतो.असो,हे आमचे विचार आहेत,कुणाच्याही भावना दुखविण्याचा हेतू नाहीये.🙏


३. *संस्कार*

आचार-विचार,नीती-अनिती,चांगलं-वाईट या संकल्पना मेंदूत तयार होणे आणि तसे आचरण करणे याला संस्कार म्हणतात. हे आपोआप होतात,करावे लागत नाहीत.लहानाचे मोठे होतांना आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना यास कारणीभूत असतात.मुलांना कान पिळून देवापुढे उभं करून शुभंकरोती म्हणायला लावणं म्हणजेच संस्कार असं नाही.आम्ही नेहेमी पालकांना सांगतो की फक्त हे लक्षात ठेवा की मुलं तुम्हाला पाहतायत,बस. आईवडील,आजीआजोबा घरातील इतर कुटुंबीय जसे वागतात तेच संस्कार मुलांवर होतात.घरात सौजन्यपूर्ण वातावरण असेल,गरीब-श्रीमंत असा भेदभाव नसेल,खोटं बोलणं नसेल,व्यसन करणं नसेल,भ्रष्टाचार नसेल,तर मुलं आपोआपच सद्गुणी निपजतात,रोजची भांडणं,शिवीगाळ,वाममार्गानं पैसे कमावणं,फोन आला की मुलाला सांगायचं की सांग बाबा घरी नाहीत,म्हणजे खोटं बोलणं ठीकच असतं हे संस्कार,याचा विपरीत परिणाम मुलांवर होतो आणि तेही तसेच वागू लागतात.आपल्या आईवडिलांशी आपण प्रेमानं वागलो तर तीच वागणूक आपली पोरं मोठी झाल्यावर आपल्याशी ठेवतील,नाहीतर जा म्हणतील खुशाल वृद्धाश्रमात! 


४. *धार्मिकता आणि आध्यात्मिकता*

Religion & spirituality.


 आपापल्या धर्माचं पालन करणं ठीक आहे,पण आपलाच धर्म सर्वस्रेष्ठ हे मानणं चुकीचं आहे. पूजा,नमाज,प्रेयर,अखंडपाठ हे सर्व इतर कुणाला त्रास न होऊ देता करणं ठीक आहे. पण वाहतुकीला अडथळा करत मिरवणुका काढणं,मोठमोठ्यानं ढोलताशे वाजवून,घन्टानाद करणं,लाउडस्पीकरवर ध्वनिप्रदूषण करणाऱ्या टेप्स लावून शांतीचा भंग करणं हा धर्म नाही.

आमच्या मते सर्व धार्मिक विधीत आपण स्वतःसाठी आणि आपल्या परिवारासाठी सुखसंपन्नता,शांती मागतो,बरेचदा त्यासाठी वाममार्गानं कमावलेला पैसा दानपेटीत टाकून देवालाही लाच देण्याचा प्रयत्न करतो.कोणताही धर्म प्रेम,सदाचार,शांती,सदभावना याचीच शिकवण देतो,पण आज धर्माचा वापर राजकीय फायद्यासाठी होतांना दिसतोय.धर्मानी हे जग विभागलं गेलंय,युद्धे झालीयत. माणुसकी हा एकच धर्म मानला तर दुनियेत शांती स्थापित होईल हे नक्की.


अध्यात्म म्हणजे स्वतःसाठी काहीही न मागता मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्न करणे. यात माणूस भौतिक सुखांपासून दूर जातो.From attatchment to detatchment. ती स्टेज यायची बाकी आहे अजून.😄

माझा पुतण्या सौरभ वैशंपायन यानं खूप छान सांगितलं: धार्मिक असण्यासाठी आस्तिक असणं जरुरी आहे,पण नास्तिक माणूसही अध्यात्मिक असू शकतो.


५. *सद्गुरू सत्संग*


भरकटलेल्या मनाला योग्य दिशा दाखवण्यास पुस्तके,ग्रंथ बरेच आहेत,पण हे काम सद्गुरू जास्त परिणामकारकरित्या करू शकतो,ज्याच्याशी आपली wavelength जुळते तो.आता wavelength जुळणं म्हणजे काय? तर बघा,एका बंद खोलीत दोन कोपऱ्यात दोन तंबोरे ठेवले आणि एका तंबोऱ्याची तार छेडली तर थोड्या वेळाने दुसऱ्या तंबोऱ्यातूनही आवाज येणे सुरू होते,कारण का,तर एकाच्या ध्वनिकंपनाच्या लहरींमुळे दुसऱ्याचीही तार छेडली जाते,तसं सद्गुरुशी एकरूप होऊन ज्ञान लवकर प्राप्त होते. अशा तारा जुळलेल्या बऱ्याच लोकांसोबत विचारांचे आदानप्रदान म्हणजेच सत्संग.


६. *जन्म-मृत्यू-काळ*


या तीन गोष्टी मानवासाठी नेहेमीच जटील आणि रहस्यमय आहेत,कारण त्यावर आपलं नियंत्रण नाही.यांना ओलांडू शकत नाही आणि ओलांडले,तर माघारी येता येत नाही. मरणाला सर्वचजण घाबरतात आणि मरणाची भीती हेच तणाव,चिंतेचं मुख्य कारण आहे.जन्म कुठे होईल,कोणत्या देशात,कुठल्या कुटुंबात,कुठल्या मातेच्या पोटातून ते आपल्या हातात नाही,मृत्यू आहे नक्की,पण कधी ते माहीत नाही. माझ्या मते,मृत्यू ही ईश्वरानी दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.कल्पना करा की आपण सर्व अमर झालोत,काय होईल? जीवनाला काही अर्थच उरणार नाही,जीवन निरस होईल.मृत्यू निश्चित आहे पण कधी,हे माहीत नाही म्हणूनच तर  जीवन जगण्याची मजा आहे,हवं ते प्राप्त करण्याची दौड आहे,ते मिळवण्याचा आनंद आहे,नाहीका! 

तसंच काळाचं,भूतकाळ परत आणू शकत नाही,भविष्य काय ते माहीत नाही,आपल्या हातात आहे तो वर्तमानकाळ.मग त्यातच छान जगा,आपल्या आरोग्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे,ती योग्य निभवा,इतरांनाही त्याचं महत्व पटवून द्या,वेळेचा सदुपयोग करा,स्वतःसाठी व इतरांसाठीही जगा,लोकोपयोगी कामं करा,इतरांना सुख द्या,आनंद वाटा,त्यांच्या चेहेऱ्यावर हास्य फुलवा,जेणेकरून तुम्ही सर्वांना हवेहवेसे वाटाल. कुणाला नकोसे होणं यासारखं दुःख या जगात नाही. प्रेम,आनंद वाटा,तो दसपट वाढून तुमच्याकडे परत येतो. फोन अथवा कॉम्प्युटर ची मेमरी फुल झाली की तो ठीक काम करत नाही,तसंच मेंदूचं आहे,हार्ड डिस्क भरली,की मालफन्क्शन.त्यामुळे कटू आठवणी,कुणाबद्दलचा राग,द्वेष,मत्सर डिलीट करा आणि मग बघा किती ताजंतवानं  वाटतं ते!


७. *ध्यान-धारणा*

आमच्या मते स्वतःशी अवगत होणं,स्वतःला ओळखणं म्हणजेच ध्यान. आपण कसे बोलतो-चालतो,काय खातो-पितो,आम्हास काय आवडतं,काय नाही आवडत,आमची महत्वाकांक्षा,आमची ईर्ष्या काय आहे,आम्ही कसला-कुणाचा-का द्वेष करतो,कशानं खुश होतो हे सर्व समजून घेणं म्हणजेच ध्यान. हे आयुष्य जगत असतांना,आपली कामे करत असतांनाही होऊ शकतं,त्यासाठी वेगळा वेळ काढून कुठेतरी एकांतात डोळे मिटून ध्यानस्थ होण्याची जरूर नाही. आपल्या मनाची कवाडं उघडी ठेवा,ध्यान आपोआप होईल,आणि स्वतःबद्दलच्या धारणाही बदलतील,आपल्यात सुधारणा करता येतील.आत्मपरीक्षण न करता जगत राहिल्यास जीवनात ना प्रगती होईल ना अधोगती आणि एकाच ठिकाणी अडकून पडू.अस्तित्वाची ही अत्यंत धोकादायक अवस्था आहे.


८. *सकारात्मकता*

Positivity.


यासाठी आम्ही एकमेकांच्या आणि सोबतच्या सर्व मंडळींच्या  विचारांना महत्व देतो,जे आवडतं त्याची खुल्या दिलानं तारीफ करतो,जे नाही आवडलं,ते त्याच्या त्याच्या तोंडावर स्पष्ट सांगतो,मागे नाही.कुणाच्याही पाठी तिसऱ्याजवळ तिच्याबद्दल बोलत नाही,ज्याला गॉसिपिंग म्हणतात आणि जे खूप लोकप्रिय आहे.😄 याने आपल्या व्यवहारात पारदर्शकता येते आणि आपोआप तणाव कमी होतो.नेहेमीच खरं बोलणं फार चांगलं,कारण कुणाला काय सांगितलंय हे लक्षात ठेवावं लागतं नाही आणि ताण हलका होतो.

नियमित व्यायाम,जसे,पायी चालणे,सायकल चालवणे,वजने उचलणे,योगाभ्यास,हास्य,संगीत,हार्मोनिका वाजवणे यासर्वांमुळे आपल्या शरीरात happy hormones जसे, Dopamine,Serotonin,Oxytocin,Endorphins तयार होतात आणि सकारात्मकता,जीवन जगण्याची नवी उमेद मिळते. 

हे समजून घेणे जरुरी आहे की या जगात काहीच स्थायी-permanent नाहीये,अगदी आपला खराब काळसुद्धा! 

त्यामुळं हा करोनाचा खराब काळसुद्धा जाईलच हा विश्वास ठेऊया!

*दानधर्म*

या समाजानी,मित्रांनी,आमच्या हजारो समाधानी पेशंट्सनी आम्हाला जे आशीर्वाद,प्रेम,दिलंय,पैसा दिलाय,सुख-शांती दिलीय,त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे असं आम्ही समजतो.चांगल्या कार्यासाठी आपल्या क्षमतेनुसार दान करणे छानच. आणि दान करणं म्हणजे केवळ पैसे देणं असं नाही तर आपण आपला वेळ,प्रेम,सहानुभूती,शारीरिक मेहनत हेसुद्धा दान करू शकतो.त्याचप्रमाणे रक्तदान,देहदान,त्वचादान,नेत्रदान,अवयवदान अमूल्य दान आहेत.

संत कबीरांचा एक दोहा जो सुजाताच्या आईंनी आज सांगितला आम्हाला,तो खूप सुंदर आहे.

दाता दाता चली गये,रही गये मक्खीचूस,

दान मान समुझे नही,लडनेको मजबूत.

म्हणजे,संसारात आता दानी व्यक्ती कमी राहिल्यात,आता कंजूस लोकांचाच जास्ती भरणा आहे.दान वगैरे कुणी करत नाहीत,पण भांडण-मारामाऱ्या करायला मात्र तयार.


याप्रसंगी एक सुंदर गाणं,ज्याच्या अर्थाप्रमाणे आम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय,सुजाता हार्मोनिकावर वाजवतेय:

*किसीकी मुस्कुराहटो पे हो निसार,किसीका दर्द हो सके तो ले उधार,किसीके वासते हो तेरे दिलमे प्यार*.....

*जीना इसीका नाम है*.


मित्रांनो,आम्ही काय करतोय ज्याने आम्ही आनंदी राहतो,तणाव काबूत ठेवतो हे सांगण्याचा हा प्रयत्न होता,आम्ही कुणालाही काही शिकवू शकू,काही संदेश देऊ शकू ही पात्रता आमची नाहीये.


जाता जाता,नेहेमीसारखं आम्हाला काय सगळ्यात प्रिय आहे ते पुन्हा सांगतो :

आम्हाला कुणाच्याही चेहेऱ्यावर निखळ निर्मळ निरागस हास्य फुललेलं पाहतांना खूप सुंदर वाटतं,आणि या हास्याचं कारण जर आम्हीच असलो तर.....

अधिकच सुदंर!🙏🙏

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात,निव

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनकरराव ३ वर

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन*

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन* मित्रांनो, काल खूप दिवसानंतर रेल्वेचा भोंगा ऐकला ज्याला "सायरन"असे म्हणतात.आमच्या लहानपणी सर्व भुसावळकर जनतेच्या जीवनाचा हा भोंगा अविभाज्य अंग असायचा. डी.एस.ऑफिस(आताचे डी.आर.एम.ऑफिस) च्या छतावर हा बसविलेला आहे आणि आवाज इतका मोठा आहे की संपूर्ण शहरात सहज ऐकू यायचा,आता शहर खूप वाढल्यामुळं माहीत नाही सगळीकडे ऐकू येत असेल की नाही ते. सकाळी आठ,दुपारी चार आणि रात्री बारा अशा तीन वेळा हा भोंगा वाजत असे. रेल्वेच्या बहुतेक ड्युट्या सकाळी आठ ते दुपारी चार,दुपारी चार ते रात्री बारा आणि रात्री बारा ते सकाळी आठ अशा असायच्या. सकाळच्या ड्युटीला मॉर्निंग म्हणायचे पण दुपार आणि रात्रीचीला चार-बारा आणि बारा-आठ असेच प्रचलित  नाव होते. हे भोंगे अथवा सायरन्स या ठराविक वेळीच आणि एकदाच वाजायचे. एकावेळी एकापेक्षा जास्तीवेळा वाजले,तर त्याचा वेगळा अर्थ असायचा. तीन वेळा वाजले याचा अर्थ भुसावळ स्टेशन किंवा यार्ड परिसरात गाडी किंवा डब्बा रुळावरून घसरलाय,डिरेलमेंट झालीय किंवा अपघात झालाय,पाच वेळा वाजले म्हणजे भुसावळ डिव्हिजन मध्ये हा प्रकार घडलाय आणि सात वेळा वाजले म्हणजे भ