मागे वळून पाहतांना
-डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ.
भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.
डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने होणारा प्रसार,सोशल मीडियाचा प्रभाव,राजकीय शक्ती आणि देशाची प्रगती या सर्वांचा एकत्रित परिणाम जाणवतोय.
एक डॉक्टर म्हणून,आणि या सर्व बदलांचा त्यात भाग घेणारा साक्षीदार म्हणून मी जेव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा मला काय दिसतंय,समजतंय,ते लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय,ह्यात कुणालाही दुखवण्याचा हेतू नाही,आणि अजाणतेपणे कुणी दुखावल्या गेल्यास मी निर्मळ मनानी त्याची आधीच माफी मागतोय.
मी लहान असतांना डॉक्टरकडे जायची कधी पाळीच आली नाही कारण माझे वडीलच डॉक्टर होते. फक्त एक आठवण आहे,मी चौथीत असतांना मला मेनिंजायटीस झाला होता,त्यावेळी आठ दिवस रेल्वे दवाखान्यात ऍडमिट होतो,पण जाणवलं यासाठी नाही बाबांचेच सर्व मित्र उपचार करत होते आणि ते हॉस्पिटल म्हणजे घरंच वाटायचं.फक्त आठवतंय ते की उपासनीकाका दर आठ तासांनी पाठीत सुई टोचून एक औषध द्यायचे,पण त्यावेळी ते गोड बोलून गुंतवून ठेवायचे त्यामुळे दुखणं जाणवलं नाही,आणि त्यांचा हात खूपच हलका होता,त्यांचं कौशल्य जबरदस्त होतं.
अकरावीला असतांना शिकायला अकोल्याला आजोळी राहिलो तेंव्हा आमच्या रामदासपेठेत डॉ संघवी नावाचे जनरल प्रॅक्टिशनर होते.फार कमी बोलायचे,थोडे रागीट होते आणि प्रत्येक पेशंटला इंजेक्शन द्यायचेच.हुशार खूप होते आणि हमखास गुण यायचा.त्यांची दोन्ही मुलं माझ्या बरोबरीची होती आणि दोघेही आज प्रथितयश डॉक्टर्स आहेत अकोल्यात.अकोल्यात मध्य रेल्वेची एक डिस्पेनसरीही होती जिथं मला भुसावळला जायचं असलं की रेल्वे प्रवासासाठी मेडिकल एथोरिटी घ्यायला जावं लागे.तिथे डॉ गजभिये आणि डॉ टांक नावाचे वैद्यकीय अधिकारी होते,बाबांचे मित्र.मला पाहिलं की म्हणायचे"जायचंय का बाबांकडे" आणि केसपेपरवर काहीतरी आजार लिहायचे(जो मला कधीच कळला नाही कारण त्यांचं अक्षरच समजायचं नाही!😄) मग मी विनासायास फर्स्ट क्लासने आजीआजोबांसोबत भुसावळला जाऊन यायचो.
मेडिकलला ऍडमिशन मिळाल्यावर नागपूरला गेलो,तिथेही दिमतीला आक्खं मेडिकल हॉस्पिटल होतं त्यामुळं कधी बाहेर डॉक्टरांकडे जावे लागले नाही,उलट सर्व नातेवाईक,मित्र,गल्लीतले सर्वलोक यांच्या कुठल्याही आजाराची ट्रीटमेंट आमच्या ओळखीमुळे मेडिकलला व्हायची. आमच्या धंतोली भागात डॉ प्रधान आणि डॉ पेंडसे ही दोन दिग्गज मंडळी होती.खऱ्या अर्थानं फॅमिली डॉक्टर्स होते ते. वैद्यकीय सल्ल्याव्यतिरिक्त वैयक्तिक कौटुंबिक अडचणीतही त्यांचा सल्ला घेतला जाई.ते इंजेक्श न्स/गोळ्या/सिरप्स त्यांच्याचकडून द्यायचे.बाटलीला कागद चिटकवून डोज म्हणजे "टक" मार्क करून द्यायचे.इतका विश्वास होता लोकांचा की डॉ प्रधान वारल्यानंतर कित्येक वर्षे लोक त्यांच्या आसाराम नावाच्या कम्पाउंडरकडून औषधी न्यायचे. डॉ पेंडसे आमच्या नात्यात होते,त्यांची मुले डॉ शरद,डॉ ज्योती आणि ऍड.जयंत आपापल्या क्षेत्रातील मध्य भारतातील प्रसिद्ध नावे आहेत.
माझे वैद्यकीय शिक्षण सुरू असतांना भुसावळचे रेल्वे हॉस्पिटल हे त्या भागातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होतं.भारतीय रेल्वेमधील मध्य रेल्वे सर्वात मोठी,त्यातील सर्वात मोठे डिव्हिजन म्हणजे भुसावळ डिव्हिजन,(इगतपुरी-बडनेरा-जबलपूर ते आग्र्यापर्यंत पसरलेलं) इतक्या ठिकाणाहून रेल्वेचे नोकरदार इथे उपचारासाठी पाठवले जायचे.रेल्वेव्यतिरिक्त बाहेरचेही पेशंट्स असायचे भरपूर.त्याकाळी तिथले मुख्य होते डॉ हरबोला.ते एफ.आर.सी.एस.होते आणि अतिशय कुशल सर्जन होते.त्यांनी ऑपरेशन करून काढलेले मोठमोठे ट्युमर्स आजही तिथे मोठ्या दिमाखाने फॉर्मालीनच्या बरण्यात जतन करून ठेवले आहेत.त्यांचं इतकं नाव होतं आणि लोकांचा इतका विश्वास होता त्यांच्यावर की अगदी अगदी लास्ट स्टेजचा मरणासन्न रुग्णही हरबोलांनी तपासलं की सुखानं डोळे मिटायचा! रेल्वे हॉस्पिटलमध्ये इतरही नावाजलेली डॉक्टर मंडळी होती.डॉ भंडारीद्वय,डॉ उपासनी,डॉ ठाकरे,डॉ सिंग,डॉ बापट,माझे वडील-स्त्रीरोगतज्ञ,डॉ जयंत केळकर वगैरे.१९८० च्या दशकात ही मंडळी रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर असतांना डॉ राणे,डॉ लोखंडे,डॉ भिरुड,डॉ नाईक,डॉ गुप्ता,डॉ व्ही एन चौधरी,डॉ दावलभक्त,डॉ भंगाळे,डॉ महाजन,डॉ संतोष,डॉ उमेश खानापूरकर हे खाजगी व्यवसायिक आपले पाय रोवत होती. मी जेव्हा सन १९८८ मध्ये जनरल सर्जन म्हणून व्यवसाय सुरू केला तेंव्हा तिथे डॉ शिंदे नावाचे एकमेव अनेस्थेटीस्ट होते.ते सकाळी ५ वाजेपासून रात्री ११ पर्यंत सर्वांकडे फिरायचे.त्याकाळी भुलेसाठी ईथर खूप वापरलं जायचं,त्यामुळे ईथरचा वास आला की डॉ शिंदे सर आले आहेत हे समजायचं.
१९८८ मध्ये जेंव्हा आम्ही भुसावळला सर्जिकल व मॅटर्निटी नर्सिंग होम सुरू केलं त्यावेळी तिथं डॉ मनोहर उपाख्य बाबासाहेब खानापूरकर नावाचे मी पाहिलेले,अनुभवलेले सर्वात निष्ठावान,नीतिमत्ता पाळणारे आणि व्यवसायाशी प्रामाणिक जनरल प्रॅक्टिशनर होते.रुग्णसेवा हेच त्यांचं व्रत होतं.दिवसभर त्यांच्या दवाखान्यात गर्दी असायची आणि तरी रात्री कितीही वाजता कुणी आकस्मिक त्रास असलेल्या रुग्णास तपासणीसाठी बोलविल्यास ताबडतोब आपली बॅग घेऊन त्याच्या घरी हजर.त्यांच्या बॅगमध्ये स्टेथोस्कोप,हॅमर,टॉर्च,वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या-सिरप्स आणि इंजेक्शने असायची. कुठलीही घाईगडबड न करता ते पेशंटला पूर्ण,व्यवस्थित तपासायचे.मग इंजेक्शन द्यायचे असल्यास काचेच्या सिरिंजेस व सुया पेशंटच्या घरी असलेल्या भांड्यात,त्यांच्याच गॅसवर पाण्यात उकळवून निर्जंतुक करायचे.त्याकाळी आजसारख्या डीस्पोजेबल सिरिंजेस-निडल्स नव्हत्या.जबाबदार व्यक्ती सोबत असेल तरच ते इंजेक्शन द्यायचेत,नाहीतर ती व्यक्ती हजर होईपर्यंत थांबायचे ते.(खूप सारे व्यापारी त्यांची टिंगल करायचे की किती घाबरट डॉक्टर आहे,आम्ही जाऊन त्यांना धीर दिला तेंव्हा टोचलं इंजेक्शन त्यांनी म्हणून,पण बाबासाहेबाबांनी कधी असल्या लोकांची पर्वा केली नाही,आपल्या तत्वापासून कधी हटले नाहीत,म्हणायचे,नसेल पटत तर नका बोलावू मला,आणि लोकही मनात समजायचे की यांच्याशिवाय इतका चांगला डॉक्टर उभ्या जन्मात आपल्याला मिळणार नाही म्हणून) इंजेक्शन दिल्यावर १५-२० मिनिटे थांबायचे काही रिऍक्शन वगरे येत नाहीना म्हणून,आणि मग इतर सर्व सल्ले-खाणंपिणं,आराम वगरे नीट देऊन निघायचे घरी.फी ची नोंद त्यांच्या वहीत त्या पेशंटच्या खात्यात करायचे(ते कधी जमा व्हायचे देवालाच माहीत,कारण त्यांच्या पोतंभर वह्या आणि त्यांच्या मुलाच्या म्हणजे डॉ उमेश,बालरोग तज्ञ ह्यांचं एक पोतं अशी दोन पोती उमेशदादानी माझ्यासमोर पेटवून जाळून टाकली आणि म्हणाला,आता उतरलं माझ्या डोक्यावरचं ओझं! अशी ही देवमाणसं.)
पेशंट पाठवल्यावर तो माझ्याकडे पोहोचला की नाही याची खात्री ते फोनवर करत,नसेल पोहोचला तर त्याच्या घरी जाऊन त्याला आणि त्याच्या नातेवाईकांना पटवून सांगत की ऑपरेशन करणं का जरुरी आहे आणि नाही केलं तर काय नुकसान होऊ शकतं ते.त्यानंतर शक्य असेल तर त्याला गाडीत बसवून ते माझ्याकडे घेऊन यायचे.त्यांच्याकडे त्याकाळी बेबी ऑस्टिन गाडी होती छोटीशी,लोक गमतीने तिला आगपेटी म्हणायचे.
त्यावेळी अजून एक फिजिशियन कम जनरल प्रॅक्टिशनर होते.. डॉ गोपाळ भागवत.अतिशय देखणे,भारदस्त व्यक्तिमत्व होतं त्यांचं आणि खूप हुशार होते.खूप श्रीमंत होते,रावेरचे होते मूळचे ते,तिथे शेतीवाडी भरपूर होती.त्यांच्याकडे स्लेट कलरची अंबेसेडर गाडी होती.त्यांचे निदान अगदी अचूक असायचे पण त्यावेळच्या मानकांप्रमाणे जरा महाग वाटायचे.होम व्हिजिट्स करायचे पण फी जास्त असल्यामुळे लोक अगदी शेवटीच म्हणजे डेथ सर्टीफाय करायलाच बोलवायचे.त्यामुळे त्यांची गाडी कुणाच्या घरासमोर उभी दिसली की शेजारचे लोक खांद्यावर पंचा टाकून घरासमोर गर्दी करायचे.गमतीचा भाग सोडा,ते हुशार आणि व्यावहारिक होते,त्यांचा मुलगा राजीव आज नानावटी हॉस्पिटलमध्ये हृदयरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहे.
तो काळ होता चांगल्या जनरल प्रॅक्टीशनर्सचा.भुसावळला डॉ डी जी पाटील,डॉ प्रमोद चौधरी,डॉ चांदवडकर,डॉ कादरखान,डॉ परदेसी आणि अर्थातच डॉ बाबासाहेब,ज्यांच्याबद्दल मी मगाशीच सांगितलंय ते.ही सर्व मंडळी निपुण होती नुसत्या शारीरिक तपासणीनं निदान आणि उपचार करण्यात.जरूर भासल्यास ज्या-त्या स्पेशालिस्टकडे पाठवायची.फिजीशीयन्स हृदयरोग,किडनीचे-मेंदूचे-पोटाचे आजार,टायफॉईड,मलेरिया,कावीळ,डायबिटीस या सर्वांची ट्रीटमेंट करायचे,जनरल सर्जन सर्व प्रकारचे ऑपरेशन्स म्हणजे पोट-आतडी-मूळव्याध-लहान मुलांची-मूत्रमार्गाची-हाडांची सर्व स्वतःच करायचे,सुपर स्पेशालिस्ट नव्हते तेंव्हा.टॉन्सिल्स सुद्धा जनरल सर्जन्सच काढायचे.त्यावेळी असं समजायचे की टॉन्सिल्स काढलीत तर मुलांची वाढ छान होते.त्यामुळे उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत प्रत्येक सर्जन रोज चार-पाच टॉन्सिल्स करायचा.गंम्मत म्हणजे माझंसुद्धा भुसावळातील पाहिलं ऑपरेशन टॉन्सिलच होतं!
त्याकाळी रुग्णाच्या आजाराचा इतिहास आणि प्रत्यक्ष तपासणी करून रोगनिदान याला महत्व होतं,आजच्यासारखं उठसूठ रक्ताच्या तपासण्या करण्याची पद्धत नव्हती,विशेष तपासण्या जसं सिटी स्कॅन,एमआरआय हे नव्हतेच आमच्याइथे,त्यासाठी मोठ्या शहरात जावे लागे आणि महाग होते. तो काळ परस्पर विश्वासाचा होता,रुग्ण आणि डॉक्टर दोहोंसाठी. फार छान दिवस होते ते.
इकडे औषध उद्योग(pharma industry) झपाट्याने वाढू लागली होती.सिप्ला,रॅनबैक्सी,डॉ रेड्डी,पिरामल या भारतीय कम्पन्या ग्लॅक्सो,नोव्हार्टीस,स्मिथ क्लाइन,मर्क,जॉन्सन या पाश्चात्य कँपन्यांशी जबरदस्त टक्कर देत होत्या. त्यावेळी खूप शिकलेले,हुशार मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज होते.ही मंडळीच आम्हा डॉक्टरांना अद्ययावत ज्ञान पुरवायचेत,कारण आम्ही मेडिकलच्या दुसऱ्या वर्षी जे औषधशास्त्र शिकलो त्याच्या दसपट नवनवीन औषधी आली होती.आतासारखं इंटरनेट नव्हतं की पटकन एक मिनिटात अद्ययावत माहितीची दारं खुली होतील.ही मंडळीच आम्हाला नवनवीन रिसर्च पेपर्स आणून द्यायचे आणि आम्ही आमचं ज्ञान अद्ययावत करायचो.मी गमतीने म्हणायचो की माझी एक डिग्री MRTP आहे,(मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज ट्रेंड प्रॅक्टिशनर)😄
काही फार्मा कम्पन्या त्यांच्या भेटवस्तूंसाठी प्रसिद्ध होत्या,जसं हिमालया ड्रग्ज आणि टोरेंट यांचे कलेंडर्स,सिप्लाच्या डायऱ्या आणि आपलं नाव टाकलेले पेन्स,पेन स्टँडस वगैरे.आपलं नाव कोरलेले पेन्स आणि डायरी मिळणं हे अभिमानस्पद असायचं त्याकाळी. ही मंडळी बहुधा स्थानिक असायची चांगली व स्वस्त औषधी आम्ही लिहायचो ती या दोस्तांना खुश करायला.IMA भुसावळ ही खूप ऍक्टिव्ह होती,दर महिन्यास एक फॅमिली मिटिंग व्हायची भूत बंगल्यात,ज्यात राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ डॉक्टरांचे भाषण असायचे,डिनर आम्ही मंडळीच आमच्या नंबरप्रमाणे द्यायचो. नंतर भुसावळ आयएमए ने सहकार नगरमध्ये स्वतःचा हॉल बांधला आणि आता मिटिंग्ज तिथे होतात. मला हे सांगतांना अभिमान वाटतो की भुसावळ IMA ही एक परस्परसंबंध/मैत्र/सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था होती आणि अजूनही आहे.एकंदरीत सर्व काही छान होतं,वैद्यकीय व्यवसाय खूप आनंददायी होता,काम करण्यात मजा होती,पैसाही ज्याच्या-त्याच्या कुवतीप्रमाणे आणि ज्येष्ठतेप्रमाणे मिळत होता .मुख्य म्हणजे छोटं गाव असल्यामुळे वायफळ खर्च नव्हता,त्यामुळे बचत भरपूर व्हायची. समाजाकडून मान-मरातब,प्रेम,प्रतिष्ठा सर्वकाही मिळत होतं आणि डॉक्टर-पेशंट नात्यातली पवित्रता अत्युच्च होती.
मग उजाडले १९९५ साल,ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये वैद्यकीय व्यवसाय अंतर्भूत करण्यात आला,आणि हळूहळू हे सर्व चित्रच बदलले.डॉक्टरांनी बचावाचा पवित्रा घेतला,प्रत्येक रुग्ण हा कदाचित उद्याचा आपली तक्रार ग्राहक पंचायतीत करणारा फिर्यादीच आहे अशा नजरेने डॉक्टर त्याकडे पाहू लागला.मग त्या भीतीपोटी बऱ्याचश्या अनावश्यक रक्ताच्या तपासण्या,सिटी स्कॅन्स,एमआरआय,आपल्या कह्यातला आजार असला तरी स्पेशालिस्ट-सुपर स्पेशालिस्ट कडे रेफर करणे,हा प्रकार वाढला. थोडक्यात म्हणजे डॉक्टर-पेशंट या पवित्र नात्याच्या जागी ग्राहक-विक्रेता हे रुक्ष,अविश्वास असलेलं समीकरण रुजू लागलं.त्याच सुमारास राजकीय इच्छाशक्तींमुळे खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांचं पेव फुटलं.भरमसाठ कॅपिटेशन फीज भरावी लागत असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण खूप महागडं झालं.मोठमोठी कर्ज काढून आणि आईवडिलांची प्रॉपर्टी विकून तयार झालेली तज्ञ डॉक्टर मंडळी या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भल्याबुऱ्या मार्गाचा अवलंब करू लागली.पेशंट मिळण्यासाठी कट-कमिशन,अनावश्यक ऑपरेशन्स वाढले आणि डॉक्टर-पेशंट यातील दरी अधिकच रुंदावू लागली.
इकडे प्रोसेस पेटंट कायद्याचा आधार घेऊन बहुराष्ट्रीय कम्पन्यांची महागडी ऑफ-पेटंट औषधी दहापट स्वस्तात बनवून भारतीय औषध कम्पन्यांचाही झपाट्याने विस्तार होत होता.या औषध कम्पन्यांतही जीवघेणी स्पर्धा होती.आपलीच औषधी डॉक्टरांनी लिहावी म्हणून डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या पेन-कॅलेंडर-डायरीची जागा आता आणि परदेशवारी आणि मोठमोठ्या कॉन्फरन्सेस स्पॉन्सर करणं यांनी घेतली.कायद्यात या गोष्टी चपखल बसवल्यामुळे डॉक्टर मंडळीही यात ओढल्या गेली.एकंदरीत,नितिमत्तेचा ह्रास सुरू झाला.सुक्याबरोबर ओलेही जळते या न्यायाने चांगल्या डॉक्टरांकडेही समाज संशयाने पाहू लागला,डॉक्टरांवरील हल्ले,खटले वाढले,परदेशाप्रमाणे भारतीय डॉक्टर्सही लाखो रुपये हफ्ते असलेला महागडा विमा उतरवू लागले,आणि शेवटी याचा भार रुग्णांवर आलाच.खासगी वेद्यकसेवा सामान्य माणसाला झेपेनाशी झाली,पर्यायाने या कायद्याने डॉक्टर व पेशंट दोहोंचेही नुकसानच झाले.
२०२० साल उजाडलं आणि कोव्हीडनी सर्व जगाला हलवून सोडलं,न भूतो न भविष्यती अशी आणीबाणीची आणि प्रचंड अफरातफरीची परिस्थिती निर्माण केली, लाखो लोकांनी जीव गमावला.त्यातून साऱ्या जगानी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेतले,जनतेला लसीकरणाचे ,मास्कचे,आणि आरोग्यविम्याचे महत्व पटले.(त्याकाळी नव्याने रुजलेली टेलिकन्सलटिंग ही प्रथा टिकेल असं वाटलं होतं,पण तसं झालं नाही,अजूनही प्रत्यक्ष भेटल्याशिवाय रुग्णाचे समाधान होत नाही.)
आता काही सकारात्मक बाबी पाहूया :
सरकारच्या आयात कायद्यातील बदलांमुळे नवनवीन उपकरणे परदेशातून मागविणे सोपे झाले. सिटी स्कॅन्स,एमआरआय मशिन्स,रक्त तपासण्याची मोठमोठी ऑटो-अनालायझर्स,अद्ययावत सोनोग्राफी मशिन्स,मॅमोग्राफी,गॅस्ट्रो-कोलोनोस्कोप्स,सिस्टो-रिसेक्टोस्कोप्स,लॅप्रोस्कोप्स,ऑपरेटिंग रोबोट्स,अंजियोग्राफी-प्लास्टी साठी लागणाऱ्या कॅथ लॅब्स वगैरे. कॅन्सरचे निदान प्राथमिक अवस्थेत करून आधुनिक सर्जरी-किमो-रेडियोथेरपीनं बरेच रुग्ण कॅन्सरमुक्त झाले.
हृदयरोगाचे निदान होऊन अंजियोप्लास्टी-बायपास शस्त्रक्रियेमुळे हार्ट अटॅकनी होणारे मृत्यू कमी झाले,मोठ्या आजारांवरील बिनटाक्याच्या लॅप्रोस्कोपीक सर्जरीमुळे रुग्ण एका दिवसात घरी जाऊन तिसऱ्या दिवशी कामावर रुजू व्हायला लागला.गॅस्ट्रोस्कोपीमुळे पोटातील अल्सर्स आणि रक्तस्त्राव सहजपणे निदान होऊन शस्त्रक्रिया न करता औषधांनी बरा होऊ लागला.तंत्रज्ञानामुळे अवघड किडनी स्टोन्स आणि प्रोस्टेट ग्रँथी मुकाट्यानं बाहेर निघू लागले. क्रिटिकल केयर सेंटर्समुळे कित्येक जण यमाच्या दारातून परतलेत.एका छताखाली सर्व सेवा देणारी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स फोफावली.
या सर्वांमुळे भारत वैद्यकीय पर्यटनासाठी प्रसिद्ध झाला. पाश्चात्य देशांइतकीच चांगली ट्रीटमेंट पाच-दहापट कमी पैशात करून घ्या आणि ताज महाल-स्टेच्यु ऑफ युनिटी-वाराणासी-श्रीनगर पाहून आपल्या देशी वापस जा!
एक चांगली गोष्ट म्हणजे भारतीय मेडिकल काऊन्सिलने सुद्धा दवाखान्याची आधुनिकता प्रमाणित करण्यासाठी एनएबीएच ऍक्रीडेशन आणि डॉक्टरांचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यास मेडिकल कॉन्फरन्स/वर्कशॉप्स यात दरवर्षी उपस्थिती सक्तीची केलीय.बघूया काय फरक पडतोय ते,पण विचार उत्तम आहे नक्कीच.अँड्रॉइड मोबाईल फोन्स,इंटरनेट आणि गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णास त्याचा आजार आणि त्यावरील उपचार याची बरीचशी माहिती डॉक्टरकडे जायच्या आधीच असते.याने डॉक्टरचं काम सोपं होतं,त्याला फक्त माहितीच्या भडीमारानं भांबावलेल्या रुग्णाला त्यातील योग्य काय ते समजवावं लागतं.😄
माझ्या मनात फक्त एक चिंता आणि प्रश्न आहे की या शास्त्रीय प्रगतीचा फायदा आपल्या देशातील कॉमन मॅन(ज्याची संख्या ७०% आहे)त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल,कारण या सर्व सोयी सरकारी दवाखान्यात उपलब्ध नाहीतच! गरजूंना प्रायव्हेट हॉस्पिटल्स मधेच जावे लागते.प्रायव्हेट हॉस्पिटल्सना सुद्धा ही सर्व उपकरणे आणणे आणि मेंटेन करणे यात फार मोठी गुंतवणूक आणि दरमहा मेंटेनन्सचा मोठा खर्च असतो. त्यामुळे त्यांनी कितीही कमी दर लावला,तरी तो सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा असतो.ही सर्व असंतोषाची जननी आहे,जेणेकरून डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स जनक्षोभाच्या शिकार होतात.
माझ्या मते सरकारनी बजेट मध्ये आरोग्यासाठी जास्त पैसे मंजूर करावेत,जेणेकरून सरकारी दवाखाने सर्व आधुनिक सामग्रीने सुसज्ज असतील,आणि मग तेथे छान पगारावर काम करणारे स्पेशालिस्ट डॉक्टर्स व भरपूर प्रशिक्षित कर्मचारी असतील.तसेच सामान्य माणसाचा वैद्यकीय विमा असावा,जो की या विद्यमान सरकारचा प्रयत्न दिसतोय.
डॉक्टर आणि पेशंट्सचे प्रमाण योग्य ठेवण्यास जास्त सरकारी महाविद्यालये सुरू करावीत. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना अस्तित्वात पुन्हा आणण्यासाठी हा विषय सरकारनी पदव्युत्तर अभ्यासक्रमात ठेवलाय.लोकांची मानसिकता बदलून सरळ स्पेशालिस्टकडे न जाता आधी फॅमिली डॉक्टरकडे जाणे रुजायला हवे,जेणेकरून वेळ आणि पैसा,दोहोंची बचत होईल.
मागील चाळीस वर्षात अनेकदा रात्रीच्या जागरणामुळे झालेलं झोपेचं खोबरं,वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याचे वाजलेले बारा,छोट्या गावात कमीतकमी संसाधनात केलेल्या अनेक जोखमीच्या शस्त्रक्रिया आणि बाळंतपणे,आटवलेलं रक्त आणि पर्यायाने स्वतःवर ओढवून घेतलेली बायपास सर्जरी,हे सर्व तुच्छ आणि नगण्य वाटतं जेंव्हा काळवेळेची पर्वा न करता देऊ केलेली वैद्यकीय सेवा,योग्य ठिकाणी योग्य प्रकारे वापरलेला चाकू,महत्वाच्या क्षणी घेतलेले निर्णय यामुळे ज्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडलाय ती मंडळी भेटली की! आतड्याला पीळ पडल्यामुळे तातडीनं शस्त्रक्रिया करून सडलेली आतडी काढल्याने जीव वाचलेला तीन महिन्याचा एकुलता एक पोरगा,जो आज सहा फुटी दणकट नौजवान आहे आणि सीमेवर सैन्यात देशसेवा करतोय,तो भेटायला येऊन पायावर डोकं ठेवतो तेंव्हा,रात्री दोन वाजता ऍडमिट झाल्यापासून दहा मिनिटात सीझर केल्यामुळे वाचलेली धो-धो रक्तस्त्राव होत असलेली गर्भवती आणि तिची पोरगी जेंव्हा २५ वर्षांनी त्याच लग्न झालेल्या पोरीला बाळंतपणासाठी अभिमान आणि विश्वासानं आमच्याकडे आणते त्यावेळी मला एखाद्या कादंबरीतल्या नायकासारखं वाटतं.
या सर्व गोष्टीचे सार हे आहे की,वैद्यक व्यवसाय अजूनही सर्वात नोबल म्हणजे उदात्त व्यवसाय आहे कारण विधात्यानी याद्वारे माणुसकीची सेवा करण्याची संधी दिली आहे.
मला हा व्यवसाय स्वीकारल्याबद्दल जराही खेद होत नाहीये,जरी,या रस्त्याने प्रवास करतांना बऱ्याच खाचखळग्यांचा सामना करावा लागला तरी,
आणि,
माझ्या मुलांनी ह्याच व्यवसायाचा मार्ग स्वीकारावा का,या प्रश्नाचे उत्तर निसंगदिग्धपणे "हो" असेच आहे.🙏🙏
Comments
Post a Comment