Skip to main content

माझे आई-बाबा(सासू-सासरे)



नमस्कार मंडळी.🙏


आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय.


माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय.


प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे! 

दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या.


ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली.


दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६.

जन्मगाव बीड.

वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनकरराव ३ वर्षांचे असतांना वडिलांचे निधन झाले,त्यानंतर आई आणि मोठ्या भावाने त्यांचा सांभाळ आणि शिक्षण केलं.आईला तेंव्हा मासिक ३ रुपये पेन्शन(वजीफा म्हणायचे पेन्शनला) मिळायची.दत्ताकाका हे इंजिनियर झाले आणि बी अँड सी मध्ये एक्झेक्युटिव्ह इंजिनियर म्हणून नोकरी करून रिटायर झाले.भास्करकाकाही केमिकल इंजिनियर झाले,जर्मनीला गेले,आल्यावर भिवंडीला चौगुले केमिकल्स मध्ये नोकरी केली,मग नागपूरला स्वतःची फॅक्ट्री टाकली.

दिनकरराव(बाबा) यांचं मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण बीडला झालं. इंटरसायन्स गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबादला.त्यावर्षी १०६ पैकी फक्त ३ मुलं पास झाली इंग्लिश विषयात,बाबासुद्धा नापास! मग भास्करकाकांनी त्यांना हैदराबादला बोलावलं,ते उस्मानिया युनिव्हर्सिटी मध्ये होते त्यावेळी,तिथे ऍडमिशन करवली.एक डॉ राव या प्राध्यापकाकडे इंग्रजीची ट्युशन लावली.फार गर्दी असायची त्यांच्याकडे,कारण पेपर तेच सेट करायचे आणि तपासायचेही तेच.श्रीमंत मुलं नुसती नावाला ट्युशन लावायची कारण पास व्हायची खात्री असायची.पण बाबा आणि त्यांचे ५ मित्र नियमित जायचे आणि झटून अभ्यास करायचे. नेमकं त्यावर्षी पेपर काढले दुसऱ्यानी आणि तपासले तिसऱ्यानी,त्यामुळे अभ्यास करणारे हेच ५ मित्र पास झाले!

पुढच्या शिक्षणास औरंगाबादला जावं लागलं कारण उस्मानिया युनिव्हर्सिटी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजशी संलग्न नव्हती.औरंगाबादला त्यावेळी बीएससी ची सुविधा नव्हती.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजची शाखा,मिलिंद महाविद्यालय सुरू केलं औरंगाबादला.मुंबई-नागपूरहून चांगले प्राध्यापक आणले.प्रा.वानखेडे प्रिन्सिपॉल होते,आणि डॉ नरवणे झुऑलॉजी चे मुख्य.त्यांच्यामुळे बाबांनी झुऑलॉजी विषय घेतला.त्यावेळी कॉलेजची इमारत नव्हती,झेडपी ऑफिस मधेच क्लासेस व्हायचेत.रेस्ट हाऊस मध्ये हॉस्टेल होतं,त्याची मेससकट फी होती,३० रु.महिना.अण्णा ४० रु.पाठवायचे महिन्याला,उरलेल्या १० पैकी ५ रु.कटिंग आणि धोबी,उरलेले ५ खर्चाला! त्यामुळे हॉटेलिंग वगैरे शक्यच नव्हतं. बाबा त्यांच्या शिक्षकांचे लाडके होते. होस्टेलच्या रेक्टर होते मुंबईचे प्रो.वर्टी,त्यांनी बाबांना मुंबईची सफर (पहिला आगगाडी प्रवास)स्वखर्चाने घडवली आणि दुसरे प्रा.गोविंद म्हैसेकर यांनी बाबांना पुणे दाखवलं.


बाबा १९५७ मध्ये बीएससी आणि १९६१ साली एमएससी पास झाले.एमएससी करतांनाच १९५९ साली देवगिरी कॉलेजला डेमोनस्ट्रेटर ची नोकरी लागली,११७.५० रु पगारावर.पुढे लेक्चरर झाल्यावर २३५ रु महिना मिळू लागला. शिकत असताना एनसीसी "सी" सर्टिफिकेट मिळवलं असल्यामुळे कॉलेज एनसीसी मध्ये सेकंड लेफ्टनंट चे पद मिळाले. १९६३ साली ऍडव्हान्सड ट्रेनिंगसाठी ६ महिने पुरंदर किल्ल्यावर गेले.संपूर्ण देशातून १२४ ऑफिसर्सचे सिलेक्शन झालं होतं.त्याचवेळी भारत चीन आणि पाकिस्तान युद्धाचे दिवस होते. दिल्लीचे मिलीटरी सिलेक्शन बोर्डाचे लोक पुरंदरला आले आणि या १२४ जणांमधून महाराष्ट्रातले दोघेजण निवडल्या गेले,एक बाबा आणि दुसरे कोल्हापूरचे कॅप्टन जाधव. बाबांचं पोस्टिंग झालं औरंगाबादलाच,कर्नलच्या हाताखालचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर,५१ बटालियन HQ  AMO  म्हणून.तिथे सर्व चीफ ऑफिसर्स च्या गळ्यातले ताईत बनले,कारण कोणतेही काम असो,बाबांना सांगितलं की व्हायलाच पाहिजे! कर्नल धारेश्वर,कर्नल इंद्रजित सिंग,कर्नल बल्लूसिंग,कर्नल घायाळ ई. त्यातील कर्नल धारेश्वर हे बाबांचे सर्वात आवडते.धिप्पाड,गोरेपान,अतिशय देखणे आणि मनाचा राजा माणूस. पायलट होते,एकदा काश्मीरहून विमान घेऊन आले होते औरंगाबादला,तेंव्हा सर्वांसाठी तांदूळ,केशर,आक्रोड पोत्यात भरून आणले होते. ते असतांना ऑफिसर्स मेसमध्ये पार्ट्यांची चंगळ असायची.सुजाता-शिल्पाचे विशेष लाड करायचे,घरी आले की क्रेट भरून कोकाकोला-फंटा च्या बाटल्या आणायचे आणि मंगलताईंना म्हणायचे भाकरी-पिठलं करा.त्यांचे वडील सांगलीच्या राजाचे मुनीम होते आणि तिथे कर्नलसाहेबांचं प्रेम झालं राजाच्या मुलीशी! लग्नाला परवानगी मिळणं शक्यच नव्हतं त्या काळी,म्हणून ती दोघेही जन्मभर अविवाहित राहिले.त्या मुलीनेही सोशल वर्कर म्हणून युद्धकाळात आर्मी जॉईन केली.कर्नलसाहेबांचा चतुशृंगी देवीच्या मंदिरामागे बंगला होता.


बाबांना पगार आर्मीकडून मिळायचा,पण फंड जमा व्हायचा कॉलेजमध्ये.आर्मीत दर दोन वर्षांनी रिन्युअल व्हायचं.पुढे  कायम व्हायची शक्यता होती,पण कर्नल घायाळ यांनी आर्मी सोड आणि कॉलेजला जा परत असा मोलाचा सल्ला दिला,म्हणले,धड इकडचा ना तिकडचा.कायम झाली नोकरी तरी दर तीन वर्षांनी बदली,कुटुंबाची परवड.मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे दादासाहेब सावंत आणि प्रिन्सिपॉल बागल सर यांनी बाबांना परत कॉलेजला आणलं आणि परत झुऑलॉजी शिकवू लागले. एनसीसी मात्र कायम राहिले,ऑफिसर कमांडिंग ७ गर्ल्स बटालियन या हुद्द्यावर. विद्यार्थ्यामध्येही बाबा खूप पॉप्युलर होते,कारण गॅदरिंगमध्ये खूप सवलत द्यायचे मस्ती करायला.


औरंगाबादचे एनसीसी ऑफिस उस्मानपुऱ्यात होतं,तिथे बाबा नेहेमी जायचे.त्यामागे गाडगीळ यांच्या बंगल्यात भिडे कुटुंब रहायचं,त्यांच्या दोन मुली मोठी मंदा आणि धाकटी मंगल या रोज कॉलेजला पायी जायच्या.असं ऐकलं की बाबा आणि मंगलआई यांचं "आंखो ही आंखोमे इशारा हो गया" असं काहीतरी झालं आणि प्रेम झालं.इकडे मंदाताई MSEB ऑफिस मध्ये लागल्या नोकरीला आणि इंजिनियर नानासाहेब देव यांच्या प्रेमात पडल्या आणि लग्न झालंही त्यांचं १९६५ साली. दादासाहेब सावंत,कर्नल चांदवडकर जे भिडेसाहेबांचे मित्र होते,त्यांनी मध्यस्थी करून आईबाबांच्या लग्नास संमती मिळवली आणि १९६६ मध्ये त्यांचं लग्न झालं,३० एप्रिल रोजी. बाबा गमतीने अजूनही सांगतात की नानासाहेब देव म्हणाले होते भिडेकाकांना की घाई केली,मी अजून चांगला मुलगा मिळवून दिला असता म्हणून! 😂

१९६८ मध्ये आनंदनगर कॉलनीत घर बांधलं,नाव ठेवलं बंगल्याला आईच्या नावावरून "गीताई".

एनसीसी मधला सर्वात मानाचा क्षण म्हणजे रिपब्लिक डे परेड दिल्लीसाठी निवड होणं.बाबांवर संपूर्ण महाराष्ट्राच्या एनसीसी संघाला दिल्लीला नेण्याची जबाबदारी देण्यात आली १९७० मध्ये.त्याची तयारी म्हणून एक महिना पुण्याला गॅरिसन इंजिनियर ग्राउंडवर एक महिना ट्रेनिंग कॅम्प झाला.दिल्लीलाही आठ दिवस आधी विमानतळाच्या शेजारच्या ग्राउंडवर तंबू ठोकून संपूर्ण संघ राहिला होता.१९७८ मध्ये तनमर्ग काश्मीर येथेही एक महिन्याचा कॅम्प घेऊन गेले होते.


इकडे कॉलेजमध्येही संपूर्ण मराठवाड्यात परीक्षा घ्यायला जावं लागायचं.त्याकाळी फोन-मोबाईल,काही नव्हते,त्यामुळे काही कारणास्तव परीक्षा लांबली तरी घरी कळायचे नाही आणि सर्वजण नुसतीच काळजी करत बसायचे.

पैसा फार नाही कमावला पण काटकसर करून नीटनेटकं रहायचे संस्कार दिलेत मुलींना आईबाबांनी. देशभर फिरवलं मुलींना,छान शिक्षण दिलं आणि सुजाण नागरिक बनवलं. मित्र खूप जोडले बाबांनी,चावडा सर,अयुब खान,मदरे सर,डॉ सासवडे,सराफ सर,बोरगावकर,साठे हे तर माझ्या माहितीतले,अजूनही खूप आहेत. औरंगाबादच्या त्यांच्या खालच्या घरात मेडिकल कॉलेज जवळ असल्यामुळे अनेक डॉक्टर मंडळी राहिली आहेत.डॉ चन्द्रिकापुरे,डॉ सोमण,डॉ शहापुरकर हे बरीच वर्षे होते.

बाबा त्यांच्या बंगल्याची काळजी अगदी मुलासारखी घ्यायचे.मागच्या अर्ध्या प्लॉट मध्ये बगीचा होता,त्यात नारळ,आंबा,पेरू,लिंबू,मोसंबी,अंजीर,द्राक्षे,याव्यतिरिक्त मोगरा,पारिजातक,गुलाबाच्या तीन जाती,जास्वंदाच्या व्हरायटी,शेवंती,काटेकोरांटी,अबोली,अबब....

रोज सकाळी पूर्ण बगीचा आणि अंगण झाडणे,झाडांना पाणी देणे ही सर्व कामे बाबा स्वतः करायचे.कोर्पोरेशनचे पाणी आलं की खालच्या टाक्या भरायच्या,पंपानी ते पाणी वरच्या टाक्यात चढवायचं,ही कामे ते मागच्या दोन वर्षापर्यंत करत होते. घरातही झाडू-पोछा,भांडी विसळणे,आंब्याचा रस काढणे(आंबा म्हणजे त्यांचा विक पॉईंट,उन्हाळ्यात दोन-तीन महिने रोज आंबा हवाच!)ओटा धुणे,वॉशिंग मशिनमधले कपडे वाळत टाकणे,वाळल्यावर त्यांच्या घड्या करणे ही सर्व कामे आजही वयाच्या ८७ व्या वर्षी ते करतात.आणि हेच त्यांच्या फिटनेसचं रहस्य आहे.मोतीबिंदू,

गॉल ब्लॅडर आणि नी रिप्लेसमेंट ही तीन ऑपरेशन्स सोडली,तर इतर काहीही त्रास नाही.सर्व दात ओरिजनल आणि मजबूत आहेत,केस जरी पांढरे झालेत,तरी कंगवा तुटेल इतके दाट आहेत,दर १५ दिवसांनी कटिंग लागतेच.सन १९९६ पासून हळूहळू वाढत जाणारा  बहिरेपणा त्यांनी मस्त पचवलाय.मशीन लावून पाहिलं काही दिवस,पण सोडला त्याचा नाद काही वर्षातच.लीप रिडींग मस्त करतात,एकटे फिरतात बाहेर,रिक्षा ठरवतात,दुकानातून हव्या त्या वस्तू आणतात,काही अडत नाही.आणि जास्ती पायीच फिरतात,कंटाळा आला तरच रिक्षा करतात किंवा हाताने खूण करून लिफ्ट मागतात,आणि गंमत म्हणजे कॉलेजची पोरंसोरं आणून सोडतात बरोबर घरी.बहिरेपणावर उपाय म्हणून मी तर चक्क पाटी-पेन्सिल ठेवलीय,त्यांना सगळं लिहून दाखवतो,कारण खाणा-खुणा करून बोलायचा पेशन्स नाहीये माझ्यात.आणि मेहनत करून पानभर लिहिलं आणि दोन ओळी वाचून सोडून दिलं त्यांनी तर आग्रह करून पूर्ण वाचायलाच लावतो मी!घरी ते फक्त हाफ पॅन्ट आणि हाफ बनियनवर असतात.एकदा पासपोर्ट फोटो काढायचा होता तर वरती टाय-सूट आणि खाली तीच अर्धी चड्डी! खाली कोण पाहतंय म्हणले. आणि अजून एक सवय म्हणजे लिफ्ट मधून अकराव्या मजल्यावर येईपर्यंत बूट-मोजे,शर्ट काढायची घाई,पॅन्ट ची बटणंही सोडून ठेवायची.औरंगाबादला असतांनापासून ही सवय आहे आणि सुजातालाही जीन्स मधून या थोड्या सवयी आल्यायत कारण लिफ्टमध्येच ती बुटाच्या लेसेस सोडवून ठेवते.


व्यवस्थितपणा शिकावा तो बाबांकडून! सगळ्या वस्तूंच्या जागा ठरलेल्या,तिथेच सापडणार.तीच कथा सर्व कागदपत्रांची,व्यवस्थित फाईलिंग केलेली.प्रत्येकाच्या नावाच्या वेगळ्या फाईल्स,क्रोनोलॉजिकली लावून ठेवलेल्या.सुजाताचं १९६७ सालचं ओरिजनल बर्थ सर्टिफिकेट,शाळेच्या प्रत्येक यत्तेतल्या मार्कशीटस,दहावी,बारावी,मेडिकलचे पासिंग सर्टिफिकेट्स सर्व एक मिनिटात हजर! 

आर्थिक गुंतवणूकीबाबत ते आजही बँकेच्या डिपॉझिट्स वर विश्वास ठेवतात,भलेही व्याज कमी मिळालं तरी.आणि dont keep all your eggs in one basket या उक्तीप्रमाणे बऱ्याच बँकेत पैसे ठेवलेयत.त्यांची एक मास्टर वही आहे,ज्यात बँकेचे नाव,शाखा,रक्कम,कधी मॅच्युअर होणार,व्याज किती,नॉमिनी कोण या सर्व नोंदी आहेत.मार्च मध्ये टीडीएस होऊ नये म्हणून फॉर्म 15 भरून तो सर्व बॅंकांमध्ये पोहोचवतात.

इथे पुण्यालाही सकाळी ६ वाजेपासून त्यांचा दिवस सुरू होतो.कालची सर्व वर्तमानपत्रे रद्दीमधे टाकणे,आजची आली की ती सॅनिटायझरचा शिडकावा करून वाळत ठेवणे,दूध तापवणे,आम्हाला चहा गरम करून देणे आम्ही उठलो की,झाडझूड,दाढी-आंघोळ,पूजा मग टीव्हीवरच्या बातम्या पाहणे आणि दूध-बिस्कीट-टोस्ट असा थोडा नाश्ता. थोडावेळ मनवाशी खेळणं,मग पाऊण ते एक दरम्यान जेवण,त्यानंतर भांडी पाण्यातून काढून डिशवॉशर मध्ये लावणं.दुपारी त्यांच्या भाषेत घंटा दीड घंटा झोप,मग लोकसत्ता,मटा च्या जपून ठेवलेल्या पुरवण्यांचे वाचन. संध्याकाळी चहा झाल्यावर एक पायी चक्कर,मग सिरियल्स टीव्हीवरच्या नऊ वाजेपर्यंत(आजकाल मराठी कॅप्शन्स खाली येत असल्यामुळे न ऐकू येण्याची खंत नाही. मग जेवण,पुन्हा भांडी आवरणे,डायनिंग टेबल आवरणे ई. झोपण्याआधी डिटेलमध्ये दोन्ही पेपर्स वाचणे आणि *काही नाही पेपरमध्ये* हा नेहेमीचा हमखास डायलॉग मारून बेडरूमकडे रवाना!


अजून एक खासियत त्यांची,ती म्हणजे दुपारी जेवण झाल्यावर ओल्या नारळाचा तुकडा स्वतः खाणार आणि मलाही देणार.तसंच त्यांची माझी गट्टी जमायचं कारण म्हणजे जेवण झाल्यावर आम्हा दोघांनाही गोड लागतं,मग ते काहीही असो,आमरस,खीर,आईस्क्रीम,श्रीखंड,पेढे,काजूकतली,काहीच नसलं ते चॉकलेट ते साधी साखरसुद्धा! रात्री जाग आली,आणि काही खावंसं वाटलं तर मी हळूच कोठीच्या खोलीत जायचो,बरेचदा तिथे ऑलरेडी बाबा असायचे डबे शोधत,मग आम्ही जॉईंट शोधमोहीम राबवायचो आणि आईनी लपवून ठेवलेल्या डब्यातील गोड पदार्थ सापडवायचो! 

बाबा,आणि मीही,पट्टीचे खवैय्ये आहोत,आम्हाला वेगवेगळे पदार्थ खायला आणि इतरांना खिलवायला खूप आवडतं. समोसा-कचोरी-चाट-जिलबी असो की रस्सेदार झणझणीत मटण करी-बाजरीची भाकरी असो,चार मित्र बोलवायचे आणि सगळ्यांसोबत पार्टी करायची.ड्रिंक्सचीही खूप आवड,पण घेणार किती,तर अर्धा ग्लास बियर फक्त,पण दर पंधरा दिवस-तीन आठवड्यानी म्हणणार,काय डॉक्टर,फार दिवस झाले काहीच नाही,आणू का आज?

ते फारच कमी घ्यायचे पण त्यांच्या नावावर माझे मित्र मजा करायचे,स्वतः पीत नाही अशी इमेज असायची पण बाबा भुसावळला असले,की राजरोसपणे दुकानात जाऊन हवा तो ब्रँड घ्यायचे,आणि म्हणायचे,की *वो बाबा मिलिट्रीवाले है,उनको तो रोज लगती है*.😄



आता थोडं आमच्या आईंबद्दल :

त्यांना मी साध्वी म्हणतो.संसारात राहूनही त्यापासून अलिप्त रहायचं आणि परमार्थ कसा साधायचा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मंगलताई! आजपर्यंत मी त्यांना एकदाही रागावलेलं पाहिलं नाहीये.कोणत्याही प्रसंगाला न डगमगता कसं सामोरं जायचं ते शिकावं यांच्याचकडून.

आईंचे आईवडील अतिशय प्रतिभावान.वडील श्री बळवंत भिडे,कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवायचे,खूप नाव होतं त्यांचं. आई,विमल खाडिलकर बीए संस्कृत परीक्षेत पुण्यातून पहिल्या आल्या होत्या. मंगलआईंना तीन बहिणी आणि दोन भाऊ,मोठे मोहन भिडे व्हीजेटीआयचे मेकॅनिकल इंजिनियर,तिथेच प्रोफेसर म्हणून रिटायर,लहान डॉ रघुनंदन भिडे,पॅथॉलॉजिस्ट,औरंगाबादला लॅब चालवतात.मंगलआई मराठीत बीए,एमए झाल्या औरंगाबाद मधल्या एस बी कॉलेजमधून.मग *अनंत काणेकर यांचं वांड्.मय* या विषयावर पीएचडी चा थिसीस लिहिला श्री वा.ल. कुलकर्णी विद्यापीठातील मराठी विषयाचे प्राध्यापक यांच्या गाईडन्सखाली. पण दुसऱ्या गाईडने त्यांच्या अंतर्गत वादामुळे तो रीजेक्ट केला आणि उगाच वाद-भांडण नको म्हणून आईने तो प्रयत्न तिथेच सोडला. मुलींकडे नीट लक्ष देता यावे म्हणून त्यांनी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला,सुजाता-शिल्पाकडे पाहिलं की किती सार्थ ठरला तो निर्णय याची खात्री पटते.


आई स्वयंपाकात अतिशय सुगरण आहेत,त्यांच्या हातच्या गरमगरम घडीच्या पोळ्यांची चव   अजूनही मी विसरू शकत नाही.

स्वतः नॉनव्हेज खात नसूनही त्या उत्तम चिकन रस्सा बनवायच्या.हिरव्या मुगाची ओल्या नारळाचा किस टाकलेली उसळ,जीवनाचं सगळं सार ज्यात सामावलं आहे असं नारळाची चव टाकलेलं टमाटूचं सार,अहाहा,काय वर्णन करू! त्यांच्या घरीच साठ वर्षे नारळाचे झाड असल्यामुळे कदाचित ओलं खोबरं जेवण्याच्या पदार्थात वापरण्याचा कल जास्ती असेल.


आई जरी जुन्या जमान्यातील असल्या तरी मॉडर्न टेक्नॉलॉजी आत्मसात केलीय बऱ्यापैकी. मोबाईल चा योग्य वापर त्या शिकल्यात,नंबर सेव्ह कसे करायचे,मेसेजेस कसे पाठवायचे,जीपे आणि फोनपे वरून पैसे कसे पाठवायचे,हे सर्व येतं त्यांना. व्हाट्सअप्प चे तर अनेक ग्रुप्स आहेत त्यांचे,एकाचं *बकुळसुगंध* असं सुंदर नाव आहे माहितीय मला. सर्वांचे वाढदिवस,वेडिंग अनिव्हर्सरीज नोंद करून ठेवली असते,रोज सकाळी त्यांना आठवणीनं शुभेच्छांचे फोन करतात.रोज पहाटे बऱ्याच ग्रुप्सवर छान छान प्रेरणादायक मेसेजेस टाकतात.


अजून एक खासियत आईची म्हणजे त्यांची जिद्द आणि चिकाटी.गेली कित्येक वर्षे त्या पहाटे साडेतीनला उठतात,सर्वांचा चहा करून ठेवतात आणि मग योगा आणि प्राणायम सुरू होतो,ते साडेसात वाजेपर्यंत.दुपारी जेवण झालं की एक तास झोप आणि रात्री साडेनउला झोपणार म्हणजे झोपणारच.बरं,त्यांच्या या व्यासंगांचा इतर कुणालाही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी त्या घेतात.हॉल मध्ये कुणी असलं,तर गेस्ट रूम मध्ये,तिथेही कुणी असलं तर वर गच्चीवर,अगदीच शक्य नसेल कुठे तर त्यांच्याच बेडरूम मध्ये एखाद्या सामटीत,पण खंड पडू देत नाहीत.आता सद्ध्या त्या ज्ञानेश्वरी ग्रँथ हस्तलिखित अवतारात लिहितायत,इतकं सुंदर अक्षरात तो लिहितायत,की छपाई केल्यापेक्षा छान दिसतोय.


मदत आणि दानधर्म यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही,अर्थात,बाबांचा भक्कम पाठिंबा असतोच,कितीही आरडाओरडा करू द्या वरवर!

भुसावळला आम्ही असतांना काही मदत लागली तर तीन तासात हजर. लहानपणी सुप्रिया आजारी असतांना एक महिना राहिले होते हे दोघे,खूप आधार वाटला होता. माझ्या बायपासच्या वेळी एक महिना पुण्यास सोबत आणि मग तीन महिने भुसावळला.माझं कोलेस्टेरॉल आणि शुगर थोडी वाढली होती,त्यांच्या निगराणीत आहार घेतल्यामुळे चार महिन्यात वजन १९ किलो कमी झालं आणि ९० टक्के गोळ्या कमी झाल्या.

औरंगाबादचे एक प्रथितयश डॉक्टर,जे बरीच वर्षे आईबाबांच्या खालच्या घरात राहिले,ज्यांची दोन्ही मुलं सुजाता-शिल्पाच्या अंगाखांद्यावर वाढली,त्यांची बदली झाली होती मिरजेला.तिथे त्या काकूंना संधीवाताचा तीव्र झटका आला,इतका की त्या अंथरुणालाच खिळल्या होत्या. मंगलआई त्या बऱ्या होईपर्यंत एक महिना त्यांच्याकडे जाऊन राहिल्या आणि डॉक्टर आणि मुलांची आबाळ होऊ दिली नाही. म्हणूनच त्यांचा मोठा मुलगा जो एक प्रसिद्ध कार्डियाक सर्जन आहे,तो आईंना "मदर इंडिया" म्हणतो! आई कामवाल्या स्वयंपाकी बायका,सफाई कामगार,चौकीदार,रिक्षावाले या सर्वांशी प्रेमाचे संबंध ठेवून असते,त्यांच्या वाढदिवशी मिठाई,काही छोटीशी भेट ती आवर्जून देईल. त्यांच्या मुलांना कपडे,शालेय पुस्तके,ट्युशन फी,बऱ्याच गोष्टी आई करतात,आणि आत्ता आम्ही त्यांच्याजवळ राहतोय म्हणून कळलं.


मधुरा जरी आमची मुलगी असली तरी ती ९०टक्के औरंगाबादला आईबाबांकडेच वाढलीय. मधुराची पहिली तीन वर्षे सुजाता एमडी गायनिक करत होती घाटीला. चोवीस तास बिझी असायची.बाबा मधुराच्या फिडिंगच्या वेळा पाळून एकतर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे,किंवा रात्री बेरात्री सुजाताला १५ मिनिटांसाठी फिडिंग करायला घरी तरी घेऊन यायचे. 

पाचवी ते बारावी नाथ वॅली शाळेत असताना,तिचे युनिफॉर्म प्रेस करून देणे,तिच्या बुटांना पॉलिश करणे,तिला शाळेच्या बसपर्यंत सोडणे-आणणे,तिचा डबा भरणे,सर्व कामे करायचे आई-बाबा. म्हणून आम्ही म्हणतो की त्यांचीच पोरगी जास्ती आहे.


त्या भाविक आहेत,सर्व देवांवर आहे तशीच त्यांची शेगावचे गजानन महाराज आणि गन्नोर(हरियाणा)येथील गुरुमाँवर श्रद्धा आहे. मी बऱ्यापैकी नास्तिक आहे आणि बरेचदा गमतीत टवाळ टीका करतो,पण त्या खिलाडूवृत्तीने घेतात आणि म्हणतात,चालूद्या,अनुभूती आली की पटेल तुम्हालाही. मी जसा माझ्या आईच्या खोड्या काढायचो तशा यांच्याही काढतो. त्या जेवायला बसल्या की डोळे मिटून मनोभावे आधी अन्नाला नमस्कार करतात.त्यावेळी मी समोर असलो,तर त्या मलाच नमस्कार करतायत असं दाखवून मीही त्यांना कोपरापासून हात जोडतो.डोळे उघडले की त्या मंद स्मितहास्य करतात फक्त.


झोपण्याआधी आम्ही चारही लोकांचे ४ ग्लास तयार करायचे,मध आणि लिंबाचा रस टाकून.सकाळी उठलो की टेबलावरच्या गरम पाणी भरलेल्या थर्मासमधून पाणी टाकायचं आणि ग्लासभर प्यायचं. मग चार छोट्या वाट्यात सुका मेवा(अंजीर,बदाम,काजू,काळ्या मनुका आणि आक्रोड) ठेवलेला,तो खायचा.म्हणे यांनी आरोग्य छान राहतं,म्हंटलं,हो तुम्ही इथे आल्यापासून त्या दुकानदाराच्या आरोग्यानं चांगलंच बाळसं धरलंय!😄 अजून एक गोष्ट,जी बऱ्याच घरी आहे असं मला कळलं,की दूध, बटर,चीज,सॉस,फळं  याव्यतिरिक्त  डाळी,हरभरे,दाणे,वेगवेगळी पीठे(शक्तिपीठे!),तांदूळ,मेतकूट,रवा,राजगिरा लाह्या आणि पीठ,मेथी चूर्ण,तांदळाची पिठी,उपवास भाजणी,सुजी,बेकिंग पावडर,सर्व ड्राय फ्रुटस,केशर ही सर्व मंडळीही फ्रीजमध्ये ठेवली तर जास्ती टिकतात! त्यामुळे आमचं ६५० लिटरचे मोठ्ठं फ्रीज या *टिकोजीरावांनीच* भरलंय,अतिक्रमण आणि घुसखोरी काय फक्त रोहिंग्याच करतात का? मला तर कोणत्याही दुकानात या वस्तू फ्रीजमध्ये ठेवलेल्या दिसल्या नाहीत,जाऊद्या,खराब झाल्या तर नुकसान त्याचंच होईल,माझं काय जातंय!😂


शफलिंग हा प्रकार फक्त बुद्धिबळातच असतो असा माझा आजपर्यंतचा समज होता,तो खोटा ठरला. खाद्यपदार्थ ठेवलेले डबेही आमच्याकडे शफल करण्याची पद्धत आहे. काल संध्याकाळी मी आपल्या हातानी भरून कपाटात समोर ठेवलेला बटाट्याच्या चिवड्याचा डबा आज सकाळी एकदम मागच्या रो मध्ये शफल केलेला असतो,आणि त्याच्यासमोर गूळ,तिखट,सैंधव मीठ,कणिक यांनी भरलेले जाड-जड डबे असतात,आणि त्यांची झाकणं(मुद्दाम)लापट असतात,आणि काही डब्यात वाळलेले सांडगे किंवा न्यूट्रिनगेट्स असतात,जेणेकरून तो डबा हलला की आवाज यावा आणि लोक सतर्क व्हावेत. पाक बॉर्डरवर आईची ही डब्यांची आयडिया वापरली तर घुसखोरी एकदम बंद होईल.प्लास्टिकचे पारदर्शक डबे हा उपाय छान आहे,पण प्लास्टिक तब्येतीसाठी हानिकारक असतं आणि काच फुटू शकते म्हणून पारदर्शक डबे रद्द. मग स्टीलच्या डब्यांवर नावांच्या चिठ्या चिटकवायच्या हाही प्रयत्न झाला,पण वर चिट्ठी एकाची आणि आत वेगळाच पदार्थ असं व्हायला लागलं. अहो,चिवडा लिहिलेल्या डब्यात फरसाण निघालं तर ठीक,पण तिखटाची पूड निघाली तर?बोंबला.


घरघुती उपायांच्या गोष्टी तर खूप आहेत.खोकला,सर्दी,ताप,डोकेदुखी,ऍसिडिटी ई.विकारांवर त्यांच्याकडे अनेक घुटी,काढे,चूर्ण आहेत आणि देतातही लगेच बनवून.मी मुद्दामच घेतो आणि मग त्यांना एका शेतकऱ्याची गोष्ट सांगतो.शेजाऱ्याच्या सांगण्यावरून तो आजारी बैलाला रॉकेल पाजतो आणि दुसऱ्या दिवशी बैल मेल्यावर शेजाऱ्याला जाब विचारायला जातो.मेला,का?माझाही मेला होता,शांतपणे शेजारी उत्तरतो.

अहो,तुम्ही बैल आहात का? आई मला न चिडता निरुत्तर करतात.😄


आईचं लक्ष फार बारीक असतं.आशुतोष,काल आणि परवा,दोन दिवस तुम्ही आंघोळ केली नाहीये,कसं तर टॉवेल नाही दिसला वाळतांना! एखाद दिवशी संध्याकाळी क्लिनिकहून येतांना चुपचाप पाणीपुरी खाऊन आलो आणि जेवतांना म्हंटलं,की जास्त भूक नाहीये,दुपारी चार पोळ्या खाल्ल्या होत्या.... चूक,एकंदरीतच पाच केल्या होत्या,एकेक मी आणि बाबांनी खाल्ली,एक सुजातानी आणि अर्धी उरलीय म्हणजे तुम्ही दिडच खाल्ली! असंका,अरे हो भात खाल्ला होता एव्हढामोठा. छे,भात केलाच नव्हता आज दुपारी. 

अशाच काही कारणांमुळेच गांधीजी खरं बोलण्याकडे वळले असतील ही खात्री आहे मला.


हे काहीही असो,सुजाता आणि मी खूप भाग्यवान आहोत हे मात्र शंभर टक्के खरंय. आईबाबांनी त्यांच्यासोबत आम्हाला नुसतंच राहू दिलं नाही तर अमाप माया आम्हा सर्वांना दिली,देतच आहेत.मनवाच्या रुपात त्यांची चौथी पिढी बहरतांना ते पाहतायत,मनवाच्या लग्नापर्यंत ते असेच निरोगी,दीर्घायू,आनंदी राहो,ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो आणि त्यांचा आशीर्वाद सतत आम्हाला लाभो अशी कामना करतो आणि त्यांच्या लग्नाच्या ५७ व्या वाढदिवशी शुभेच्छा देतो.🙏🙏


डॉ.आशुतोष केळकर.

Comments

  1. अप्रतिम लिहिलं आहे....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...