Skip to main content

दुनिया झुकती है,झुकानेवाला चाहीये!

मित्रांनो,

उत्क्रांती आणि विकास या गोष्टी मानवाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्या तरी या दोघांचे काही दुष्परिणाम,साईड इफेक्ट्स आहेत. मला प्रकर्षानी जाणवतोय तो म्हणजे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा,जिम-फिटनेस सेंटर्स,अध्यात्मिक गुरू आणि सत्संग,ध्यान-धारणा-योगा शिकवण्या,आहारतज्ज्ञ, करीयर गायडन्स सेंटर्स,डान्स क्लासेस या सर्वांचे फुटलेले पेव आणि या सर्वांच्या मागे धावून आपलं आयुष्य सुखी-समाधानी करण्यासाठी धडपडणारी जनता! असा समज पसरलाय की हे सर्व केलं नाही तर आपली आणि आपल्या मुलांची मानसिक आणि आर्थिक उन्नती होणारच नाही.

मला राहून राहून टाटा-बिर्ला-अंबानी-महिंद्रा या सर्वांचे आश्चर्य वाटते की या सुविधा नसतांनाही इतकी प्रगती कशीकाय केली बुवा यांनी,नशीबच म्हणायचं नाही का!

खरंतर इंटरनेटची उपलब्धी आणि त्याचा व्यापक वापर यामुळे ज्ञानाची द्वारे उघडी झालीयत,पण बरेचदा याचमुळे अर्धवट ज्ञान मिळून मनाचा गोंधळच जास्ती होतो आणि याचाच फायदा ही क्लासेसवाली मंडळी पैसा कमावण्यासाठी घेतात.

अशा प्रकारच्या क्लासेस,कार्यशाळेत जाणे हे श्रीमंत मंडळीत प्रतिष्ठेचे लक्षण समजल्या जाऊ लागलंय( status symbol),पण गरीब लोकही यांच्या भूलथापांना बळी पडून आपली प्रतिष्ठा उंचावण्यास अनाठायी खर्च करतांना दिसतात.

माझ्या एका जवळच्या मित्राच्या आग्रहाखातर आणि हे सर्व काय आहे याचा जवळून अनुभव घेण्यासाठी मीसुद्धा अशाच एका  *"फोरम"* मध्ये नाव नोंदविले. मला असे कळले की भुसावळ आणि परिसरातील बरीच मंडळी आहेत माझ्यासोबत,आणि काही डॉक्टर्स ही आहेत.त्यापैकी दोनतीन डॉक्टरांना मी विचारलं की तुम्हाला कुठून कळलं या फोरम बद्दल,तेंव्हा कळलं की यासाठी एक विनामूल्य "ओळख सेमिनार"ठेवला होता,त्यात फोरम केलेले बरेच *"पदवीधर"* अनुयायी या म्हणून फार मागे लागले होते म्हणून आम्ही गेलो.त्यात आम्हाला फोरम साठी नाव नोंदवायला पैसे किंवा चेकबुक घेऊनच या अशी गळ घातली म्हणून नाईलाजानं आम्ही पैसे भरून नाव नोंदले,असे काही लोकांनी सांगितले.

माझ्या आयुष्यात काहीही अडचणी नव्हत्या आणि सगळं काही सुखात सुरू होतं, पण मला वाटलं की कदाचित हा भ्रम असेल आणि माझ्या चुकीच्या वागणुकीने माझ्या जवळच्या लोकांना त्रास होत असेल,तो तरी कळेल. व्यवसायातही खूप भरभराट होईल नक्कीच असेही कळले होते,म्हंटलं अनुभव तर घेऊ म्हणून केला मनाचा हिय्या आणि तीन दिवस घालवायचे ठरवले.

तुम्ही किती लवकर नाव नोंदवता यावर सोळा हजार ते बावीस हजार एवढी फी होती.मग फॉर्म भरले,स्वतःबद्दलची सर्व माहिती भरली त्याचसोबत सुमारे दोन-तीन पानं शेयर्सच्या फॉर्म मध्ये असते तशी खूप बारीक टाईप मध्ये छापलेली,वाचायला त्रास होणारी समजायला फार कठीण अशी माहिती,आणि त्याखाली सह्या!

तीन दिवसांचा फोरम होता,भुसावळपासून दीडशे किलोमीटरच्या गावाला.आम्ही चारही डॉक्टर्स रात्री तीन वाजता उठून ट्रेननी पोहोचलो त्या गावी सकाळी सातच्या सुमारास.फोरम चे ठिकाण,हे आधी स्टेशनजवळ होतं ते पाच किलोमीटर दूर हलवण्यात आले होते,कारण शिबिरार्थींची संख्या दोनशेवरून वाढून दोनशेपन्नासपर्यंत पोहोचली होती आणि आधीचा हॉल छोटा पडणार होता.("पदवीधर अनुयायांची" कमाल!) बाहेर खूप पाऊस होता पण माझ्या मित्राने आमच्या दिमतीला तिन्ही दिवसासाठी एक गाडी आणि ड्रायव्हर दिला होता आणि त्याच्याच फाईव्ह स्टार घरात आमची राहण्याची सोय केली होती. फोरमचे ठिकाण म्हणजे मल्टिप्लेक्स थिएटरचा एक हॉल होता,बसायची व्यवस्था,साउंड सिस्टीम,एअर कंडिशंड वातावरण,सर्वकाही संमोहित करण्यास या अनुकूल!

आम्हा सर्वांसाठी मुख्य अडचण वाटली ती म्हणजे रोज जवळजवळ पंधरा तास बसायचे,वाटेल तेंव्हा दोन तीन छोटी मध्यांतरे व्हायची म्हणा पोट भरण्यासाठी,लघवीला जायचे ते सुद्धा त्या अनुयायांच्या कठोर नजरेला तोंड देऊन.एवढे पैसे घेऊनही पिण्याच्या पाण्याशिवाय काहीच आयोजकांकडून मिळत नव्हते,बाहेर पैसे देऊन टुकार जेवणाची व्यवस्था होती,पण बसायची जागा अगदीच कमी,त्यामुळे बहुतेकांना उभ्या-उभ्यानेच जेवावे लागायचे.आम्ही त्या बाबतीत मात्र नशीबवान होतो,आमचा मित्र रोज आम्हाला घरच्या सकस सात्विक आहाराचा डब्बा पाठवायचा. हॉल मध्ये खायचे पदार्थ न्यायची आणि मोबाईल वापरायची मनाई होती.

सेशन सुरू झाले ते फोरमची ध्येय-धोरणे-उद्देश सांगण्याने.ही एक अमेरिकन कंपनी आहे,बहुतेक कार्यकर्ते हे ऐच्छिक विनामूल्य सेवा देतात,फोरम लीडर आणि पदवीधर हे सर्व मालक आहेत आणि उत्पन्नाचा बराचसा भाग हा धर्मदाय कामांसाठी वापरल्या जातो (कुठल्या ते मात्र सांगितले नाही) हे कळले. आमच्या मनात हे ठसवायला,की त्यांचे विचार किती निर्मळ आहेत आणि हे जग सुंदर बनविण्याचा विडा त्यांनी कसा उचललाय,याचा प्रचार करणारी एक व्हिडियो सुद्धा दाखवली!

फोरम लीडर एक पंजाबी होता.अतिशय सोज्वळ,देखणा,अफाट शब्दसंग्रह असलेला आणि भाषणात तरबेज.मराठी,इंग्रजी आणि इतरही अनेक भाषांवर प्रभुत्व(तो अनेक देशात फोरम लीड करतो म्हणे)स्फूर्ती आणि स्टॅमिना जबरदस्त होता त्याचा!
त्यांनी सांगितलं की दिल्लीला त्याचा मोठ्ठा कौटुंबिक व्यवसाय आहे,पण त्यांनी स्वतः आणि पूर्ण कुटुंबांनी फोरम करून स्वतःला *"मुक्त"* करून घेतल्यावर त्यांनी पूर्णवेळ फोरम चे काम समाज सुधरवण्यासाठी(?) करण्याचा निर्णय घेतला. (गणितात मी कच्चा असल्यामुळे मला हे समजायला वेळ लागला की किती थोड्या गुंतवणुकीत अफाट पैसा हे फोरम वाले कमावतायत म्हणून.)

फोरम सुरू केलं त्यांनी हे सांगून की सर्वांनी *"आत्मसमर्पण"* करायचे, त्यांनी सांगितले ते ऐकायचे,काहीही प्रश्न विचारायचे नाहीत आणि निर्लज्जपणे आपले सर्व प्रॉब्लेम्स सांगायचे!

तो म्हणाला की विदर्भाला त्याची ही चौथी भेट होती आणि त्याच्या अनुभवाप्रमाणे विदर्भी लोक फार आळशी आहेत,त्यांच्यात व्यावसायिकता मुळीच नाही त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही.एक कट्टर विदर्भी असल्यामुळे मला खटकले हे,जेंव्हा तो लागोपाठ तिसऱ्यांदा हे म्हणाला की *विदर्भी लोक पाठीत खंजीर खुपसणारे आहेत!*

माझं टाळकं जाम सटकलं होतं पण ही सर्व विदर्भी जनता शांत कशी काय? कुठे गेला यांचा आत्मसन्मान? संमोहित झाले असावेत बहुतेक नाहीतर आत्तापर्यंत त्याला बाहेरचा रस्ता दाखवला असता! *आळशी असू,ढिल्ले असू,पन प्रेम भल्ल करते लेका लोकाईनवर,आनं हेबी ध्यानात ठेव,जरका मुद्दाम पाय ठेवशीन शेपटावर,तर डसन बी तेवढयाच जोरानं,हां!*
मग त्यानी एकेकाला स्टेजवर बोलवायला सुरवात केली,आणि त्यांच्या अडचणी *"शेयर"* करायला सांगितल्या.पाच-सहा लोकांना एकावेळी समोर बोलवून तासनतास उभं करायचा, एकावेळी एकालाच संधी मिळायची. त्यांना तो बोलतं करायचा, वैयक्तिक माहिती विचारायचा,पोलीस किंवा सीबीआय च्या आवेशात उलटतपासणी करायचा,लोकांना टाकून बोलायचा,त्यांचा अपमान करायचा,त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करायचा.लोक रडवेले व्हायचे,चिडायचे, त्या मूर्खाला मारायची इच्छा होत असेल,पण मूग गिळून चूप बसायचे आणि शेवटी फोरम लीडर जे म्हणेल ते कबूल करायचे,लवकर "मुक्त" होण्यासाठी! आता फोरम लीडर स्वतःला देव भासवू लागला होता.

बहुतेक लोक विदर्भ आणि खान्देशातील असल्यामुळे खूप लोकांना मी ओळखत होतो,त्यापेक्षा जास्त लोक मला ओळखत होते.
बिचाऱ्या लोकांनी त्यांची अशी खूप गुपिते सांगितली जी मी कधीच ऐकायला नकोत असे मला वाटले.(माझं स्पष्ट मत आहे की वैयक्तिक आणि कौटुंबिक व्यथा या गोपनीय असतात आणि त्यासाठी मानसोपचार तज्ञ,समुपदेशक असतात,त्यांच्याशी बंदद्वार चर्चा,सल्लामसलत करावी,खुलेआम-चारचौघात मुळीच नाही.लक्षात घ्या राव,यापैकी बऱ्याच लोकांवर बलात्कार, मानसिक आणि शारीरिक अत्याचार झालेले असतात,काहींचे व्यवसायात दिवाळे निघाले असते,काही अगदी जवळच्या व्यक्तीकडून फसवल्या गेलेले असतात,काहींचे नवरे बाहेरख्याली असतात तर काहींच्या बायका व्याभिचारी!)
या लोकांची मग चौकशी,तपासणी,उलटतपासणी असे प्रकार होतात,त्यांचा छळ केल्या जातो,त्यांना हिणवल्या जाते,ते खोटं बोलतायत असा आरोप केल्या जातो आणि त्यांच्या मनाची लक्तरं फाडल्या जातात तेही सर्वांसमोर!(त्यांना खोटा समज देण्यात येतो की यातील एक शब्दही हॉलच्या बाहेर जाणार नाही(?) म्हणून.)

त्यांनी दिलेल्या उत्तरांनी फोरम लिडरचे समाधान झाले नाही तर त्या व्यक्तीला बाहेर नेऊन अनुयायांकडून जे हवे ते सांगेपर्यंत भरडले जाते.पोलीस कोठडीत असाच कबुलीजबाब घेतात म्हणे जोपर्यंत आरोपी केलेला(?) गुन्हा कबूल करीत नाही.असो!

या सर्व लोकांना मग आत्मपरीक्षण करायला लावून स्वतःच्या चुका शोधायला लावतात आणि मग बाहेर जाऊन मोबाईलवर त्या संबंधित व्यक्तीशी(नवरा-बायको-आई-वडील-मुले-मित्र,प्रियकर जो कुणी असेल तो) बोलायला सांगतात आणि आपल्या चुकांची(?) कबुली द्यायला लावतात.(शेयर)(सहा-आठ बोलावलेल्या लोकांपैकी दोन अथवा तीन लोकांचेच काम त्या सेशनमध्ये आटपते, बाकीचे निष्कारण पाय दुखवत उभे असतात,त्यांना वापस पाठवतात)

पुढच्याच सेशनमध्ये या चुका शेयर केलेल्या लोकांना पुन्हा स्टेजवर बोलावून त्यांना ठराविक उत्तराकडे नेणारे *"लिडिंग"* प्रश्न विचारतात आणि त्यांच्याकडून वदवून घेतात की आता अगदी "मोकळं" वाटतंय आणि मनातली अपराधीपणाची भावना पूर्ण गेलीय,खूपच प्रसन्नचित्त वाटतंय म्हणून.(माझं *स्पष्ट मत* आहे की आपल्या प्रत्येकात अपराधीपणाची भावना असतेच,असावीच.अपराधीपणाची भावना नसलेल्या व्यक्तीला *समाजविघातक(sociopath)* म्हणतात.अपराधीपणाची भावना आहे हे विवेक आणि सदसद्विवेकबुद्धी जागृत असल्याचं द्योतक आहे!)

गा सगळा प्रकार मला संमोहनासारखा वाटला.तुम्ही एखाद्या व्यक्तीला वारंवार एखादी गोष्ट सांगितली की ती खरी वाटू लागते.जसं एखाद्या लुकड्या व्यक्तीला तुम्ही सांगितलं की बाबारे,रोज दहा दंडबैठका घालत जा,तू पहेलवान होशील.आणि तिसऱ्याच दिवसापासून त्याला दिवसातून पन्नास वेळा म्हंटलं की व्वा, काय तगडा दिसतोयस,तर ती व्यक्ती आरशात दंड पाहून स्वतःला *दारासिंग* समजू लागेल.

या सर्व गरीब बिचाऱ्या लोकांना अस्तित्वात नसलेल्या फसव्या जगात घेऊन जातात आणि त्यांना खरंच वाटायला लागतं की आता आपलं जीवन तणावमुक्त झालंय,आपलं आयुष्य आमूलाग्र बदललंय, सर्व दुरावलेले संबंध सुधारलेत,एक वेगळा आत्मविश्वास आलाय आणि आता आयुष्य *अधिप्रमाणित(Authentic)* झालंय, जीवनाचा खरा अर्थ आताच कळालाय!

हे *संमोहनशास्त्र* आहे!

दुर्दैवानं ही परिस्थिती फार काळ टिकणारी नसते आणि जेंव्हा सत्यपरिस्थितीची जाणीव होते तेंव्हा मानसिक स्थिती पूर्वीपेक्षाही खराब होते.

शेवटच्या दिवशी सर्वांना एक "बोनस"संधी दिल्या गेली ती म्हणजे ज्यांना तुम्ही जवळचे समजता आणि ज्यांचं आयुष्य तुमच्याप्रमाणेच उज्वल(?) व्हावं असं वाटतं अशा तीन व्यक्तींना दोन दिवसानंतरच्या सेमिनारसाठी बोलवा!(यांनी फोरम केलेलं नसावं आणि हे त्यांना फुकट आहे)थोडक्यात त्यांनाही फोरमच्या जाळ्यात ओढायचं!
अहो, माझा एक मित्र अक्षरशः पळाला या अनुयायांच्या तावडीतून,रजिस्ट्रेशन करा,पैसे भरा म्हणून मागेच लागतात.

त्यानंतर सर्व शिबिरार्थींना पुढचा ऍडव्हान्स कोर्स करण्यासाठी आमिषे दाखविण्यात येतात.आत्ता नाव नोंदले तर अकरा हजाराची भव्य सूट!(३३००० ऐवजी २२०००) प्रत्येकाला गाठून जवळजवळ सक्ती करण्यात येते पैसे भरण्याची,जे नाही म्हणतात फोरम लिडरकडे नेण्यात येते.कसेही करून संमोहनात असतांनाच पैसे घेण्याकडे कल असतो. माझ्या एका डॉक्टर मित्राने विचारले की गरीब लोकांसाठी थोड्या कमी किमतीत फोरम नाही का ठेवता येणार?त्यांनाही जरूर आहे याची. "गरीब?"कोण आहे गरीब? ते गरीब नाहीत,तुम्ही गरीब म्हंटल्यामुळे ते गरीब झालेत!
त्याच्या "गुर्मी"मुळे त्याला हेही समजत नव्हते की तो श्रीमंतांनाही हा अनाठायी खर्च करायला लावून गरीब करत होता!

मला या सगळ्याचा उबग यायला लागला होता.जेवणाच्या सुट्टीत मी माझ्या काही मित्रांजवळ माझी नाराजी बोलून दाखवली आणि माझ्या ब्लॉग मध्ये या विषयावर लिहिन असे बोललो.त्यांचे अनुयायी हेरगिरी करतच असायचे,लगेच फोरम लिडरजवळ ही बातमी पोचली,त्यानी पुढच्या ब्रेकमध्ये मला बोलावले आणि एक तास माझा "ब्रेनवॉश" करण्याचा,मलाही संमोहित करण्याचा प्रयत्न केला.मी त्याचे ऐकले आणि आत्मसमर्पण केलं तर माझं आयुष्य बदलण्याची खात्री दिली. मी म्हणालो,की तुमची प्रत्येक आज्ञा मी तपासून पाहीन आणि तथ्य असेल तरच पाळीन. तो समजला आणि मला स्टेजवर बोलायची संधीच दिली नाही.मला समजावलं/धमकावलं की तू काही आमच्या विरुद्ध लिहिलंस तर आमचा कायदा विभाग तुझ्या मागे लागेल आणि तुला त्रास होईल. माझ्यासारखे अतृप्त आत्मे बरेच होते त्यांना "हेर" अनुयायी अलगद बाहेर न्यायचे आणि काहीतरी "समज"देऊन पुन्हा आत आणायचे.

शेवटी मी बळजबरीने माईक हातात घेतलाच आणि मनातली सगळी गरळ ओकली,पण त्या संमोहित जमावाला माझं बोलणं पटणे शक्यच नव्हते.ठीक आहे,तू आत्मसमर्पण करीत नाहीयेस,मी तुला मदत करू शकत नाही,त्याने अनुयायांना सांगितले की माझे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू करा. मी म्हणालो की पैसे तर तुम्ही द्याल वापस(मला शंका आहे) पण माझ्या आयुष्याचे वाया गेलेले *अमूल्य बहात्तर तास* तुम्ही कसे परत कराल?

आता तुम्हाला प्रश्न पडेल की जर हे बोगस आहे तर इतके लोक जातात कसे? उत्तर आहे की ते आपल्या कमकुवत मनाचा फायदा घेतात,जाहिराती करतात,आयुष्य बदलण्याच्या भुलथापा मारतात आणि त्यांचे पदवीधर अनुयायी मागे लागतात सारखे. आपणा सर्वांना माहिती आहेत अनेक भोंदू बाबा,त्यापैकी एक आहे निर्म....बाबा! नोकरी नही मिलती? क्या खाया सुबह? समोसा.कलसे कचोरी खाओ!
बीबी झगडा करती? क्या पहनते हो,चप्पल या जुता? चप्पल. ठीक है,जुता पहना करो! ठीक है बाबा!
हा फालतूपणा आहे हे समजत असूनही पैसे देऊन लोक जातातच आणि बाबांचा दरबार फुल्ल असतोच.

मला समजतंय की मी एवढ्या कळकळीने माझी व्यथा मांडून काहीही फरक पडणार नाहीये,हे तथाकथित *रॅकेट* असेच सुरू राहणार आहे.दुर्बल मनाचा फायदा घेण्यासाठी यांच्या "पदवीधर"अनुयायांचा ताफा आणि जाहिरातबाजी आहेच! पण जरका एकाही व्यक्तीला या आर्थिक,मानसिक त्रास आणि वाया जाणारा वेळ यापासून वाचवू शकलो तर माझी मेहनत कामी आली असं मी समजीन!

जाता जाता हे म्हणावसं वाटतं :

*हेतू* चांगले आहेत
 पण
 *सेतू* चुकीचा!

*कुवत* चांगली आहे
पण
*नियत* चुकीची!

आणि,

निर्णय घेताना,
*मेंदूपेक्षा हृदयाचे* ऐका!🙏

*जयहिंद!*
*जय महाराष्ट्र!*
*जय विदर्भ!*
*जय खान्देश!**🙏🙏

Comments

  1. " सच्चाई से लिख दिया
    फितरत भरा यथार्थ
    चेहरे पर चेहरे लगे
    कदम-कदम पर स्वार्थ
    पोस्टमार्टम कर दिया
    दे सुंदर निष्कर्ष
    पढ़कर मन मे हो रहा
    सूचिक के भी हर्ष "
    🙏🌷🙏

    ReplyDelete
  2. प्रारंभिक सम्मोहन से विवश होकर अपने बहुमूल्य 72 घंटे का होम करने वाले, मगर उतनी ही सफाई से इस मकड़जाल से निकल जाने वाले आशुतोष को साधुवाद.
    गर हस्ती दी है तो कुछ शान भी दे ,
    खुदा मेरे हिस्से का मुझे आसमान भी दे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनक...