एवढ्यात आमच्या एका अगदी "सक्ख्या" मित्राचे हर्नियाचे ऑपरेशन झाले! ठरल्या दिवशी ते दोघेच पती-पत्नी आले,ऑपरेशन झाल्यावर त्यांच्यासोबत फक्त एक मित्र होता रात्री झोपायला,इतर कुणालाच सांगितले नसल्यामुळे एकही जण त्या दोन दिवसात भेटायला आला नाही,तिसऱ्या दिवशी सकाळी ते घरी गेलेसुद्धा!
ते "कोकणस्थ" होते आमच्याचसारखे हे सूज्ञ लोकांना लक्षात आलेच असेल!😜
खान्देशात याउलट चित्र असते. ऑपरेशनची तारीख ठरली,की सर्व नातेवाईक-इष्टमित्र-सगेसोयरे यांना फोनने कळविण्यात येते,फोन नव्हते तेंव्हा पोस्टकार्ड लिहिल्या जायचे.मी स्वतः पाहिलंय, बायकोच्या ऑपरेशनची तारीख ठरली की नवरा तिला घरी सोडून मोठया पोस्ट-ऑफिस मध्ये जाऊन शंभर पोस्टकार्ड आणायचा आणि दुसऱ्या दिवशी एकच मजकूर असलेली ती कार्डे रवाना सुद्धा व्हायची! मग किती लोक येतील याचा अंदाज बांधून त्यांची रहाण्या-जेवणाची सोय काही आपल्या घरात,काही जवळच्या नातेवाईकांकडे,इतर जवळच्या मित्रांकडे,या सर्वांचे नियोजन व्हायचे.
ऑपरेशनच्या दिवशी पेशन्ट सोबत बराच मोठा ताफा ऍडमिट होतांना हजर.आता यात जवळचे किती,खरच काळजीने आलेले किती आणि नुसतं तोंड दाखवायला आलेले किती हे कळणं मुश्किल,परंतु इतक्या वर्षाच्या अनुभवांनी आता मला ओळखू यायला लागलीत ही मंडळी.
असो!बहुधा सगळीकडेच ऑपरेशन ठरल्यावर डॉक्टर मंडळी रुग्णास आणि जवळच्या नातेवाईकांस ऑपरेशनचे स्वरूप,भुलेचा प्रकार,त्यातील संभाव्य धोके,आधी आणि नंतर घ्यावयाची काळजी,किती दिवस ऍडमिट रहावे लावेल आणि अंदाजे येणारा खर्च याची सर्व माहिती देतात आणि त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरेही देतात.याला आजकालच्या सुशिक्षित,सुधारित आणि पुढारलेल्या देशात "काऊन्सेल्लिंग" किंवा "समुपदेशन" असे गोंडस नाव आहे. बरेचदा आपण घसा फोडून तळमळीनं सगळं समजावलं,की त्यातील एखादा म्हणतो ,एक मिनिटं,माझे सासरे बाहेर आहेत,त्यांना बोलावतो,त्यांना सांगा! आता ते जर महत्वाचे आहेत,तर आधी का नाही बोलावलं त्यांना? असा विचार मनात येतो आणि रागही,पण काय करता! असो.
त्यानंतर एक नेहेमीच प्रश्न असतो तो हा,की काही "घाबरण्यासारखे" नाही ना? किंवा काही "तसं" नाहीना?मला आजपर्यंत हे "तसं" म्हणजे "कसं" हे कळलं नाहीये,पण मी कधी हे "तसं" म्हणजे "कसं" हे विचारायची हिम्मत केली नाही! आणि कोणतंही ऑपरेशन असो,त्यात कितीही काळजी घेतली तरी काहीवेळा अकल्पित गुंतागुंत निर्माण होऊन "घाबरण्यासारखी" परिस्थिती निर्माण होऊ शकते,पण रुग्ण जरी दाखवत नसला तरी तो घाबरलेला असतोच त्यामुळे त्याला काही नाही असा दिलासा द्यावाच लागतो,पण नातेवाईकांना वेगळं भेटून सत्य परिस्थिती सांगणे कधीही श्रेयस्कर. एक किस्सा आठवतोय : १९९० मध्ये आमच्या परिचयातील एका ऐंशी वर्षांच्या आजोबांचा हर्निया अडकला आणि त्यात गँगरीन झाले.ताबडतोब ऑपरेशन जरुरी,त्यात त्यांची ब्लडप्रेशर,डायबिटीस,हृदयरोग या सर्वांशी बऱ्याच वर्षांपासून सलगी!केस क्रिटिकल,ते रेल्वेचे रिटायर्ड नोकरदार असल्यामुळे रेल्वे दवाखान्यात ऑपरेशन ठरले. त्यावेळी तेथे डॉ. साहू म्हणून उत्तरप्रदेशी अनेस्थेटिस्ट होते.त्यांना यांच्या नातेवाईकांनी विचारले,की साहब,कुछ रिस्क है क्या?साहूसाहेब उतरले : इसमे केवल रिस्कही रिस्क है,रिस्कके अलावा और कुछ नाही है! नशिबानं त्यांचं ऑपरेशन छान झालं,आणि ते काका त्यानंतर बरीच वर्षे उत्तम आरोग्यात जगले,मला रोज सकाळी फिरतांना भेटायचे,आणि टपरीवर चहा पितांना दिसलो की टपरीवाल्याला सांगायचे,"डॉक्टरसे पैसे मत लेना,मेरे खाते मे लिख लो!"
आता ऑपरेशन सुरू झाल्यावर बाहेर नातेवाईक आणि मित्रमंडळी घोटाळत उभी असतात,मोजक्याच जवळच्या लोकांच्या तोंडावर काळजी असते,बाकीचे घड्याळाकडे पहात "कधी सुटका होईल" याची वाट पहात असतात. या हिंदी पिक्चरमुळे ऑपरेशन करणारे डॉक्टर्स आणि ऑपरेशन थिएटर याबद्दलच्या कल्पना दृढ झाल्यायत : ऑपरेशन सुरू असतांना दारावरचा लाल दिवा,आतबाहेर जा-ये करणारे वॉर्ड बॉईज आणि सिस्टर्स,मधूनच गंभीर चेहरा करून बाहेर येणारा डॉक्टर आणि एखाद्याच्या गळ्यात हात टाकून म्हणणार "बहुत कोशिश के बावजूद भी हम आपके पेशन्ट को बचा नही पाये", "आपको क्या चाहीये बताओ,माँ या बच्चा,मै किसी एककोही बचा पाऊंगा!"
ऑपरेशन सक्सेसफुल,आपका पेशन्ट अब आउट ऑफ डेंजर है! वगैरे वगैरे.
प्रत्यक्षात असे काहीच नसते,कोणतेही ऑपरेशन झाल्याबरोबर ते "सक्सेसफुल" किंवा "अनसक्सेसफुल" ठरत नाही,चोवीस ते अठ्ठेचाळीस तास जोखमीचे असतात आणि कित्येकदा तर दोन-तीन महिन्यांनी कळते की खरंच सक्सेसफुल झालंय की नाही ते उदा.फ्रॅक्चर,जॉईंट रिप्लेसमेंट,किडनी ट्रान्सप्लांट ई. आजकल ऑपरेशन सक्सेसफुल होण्यात "रिहाबिलिटेशन"चा मोठा रोल असतो.
पेशन्ट रूममध्ये शिफ्ट केल्यावर त्याला पाहण्या-भेटण्यासाठी झुंबड उडते,त्यात थोडी उत्सुकता-जास्त कर्तव्यपूर्तीचा भाग असतो! पेशंटच्याच पलंगावर चार -पाच लोकांनी बसणे, मोठमोठ्यानी बोलणे,सोबत आणलेल्या लहान मुलांनी गोंधळ घालणे हे प्रकार सर्रास सुरू असतात.डॉक्टर राउंडला येतायत म्हणून धमकी देऊन त्यांना थोडावेळ बोळवतात, पण डॉक्टर तपासून गेले,की पुन्हा येरे माझ्या मागल्या! नंतर सुरू होतो तो भेटणाऱ्या लोकांकडून पेशंटवर फळांचा मारा!कोणत्याही ऑपरेशननंतर साधारणतः तीन दिवसांनी नेहेमीसारखा आहार सुरू होतो, पण इथे तर पहिल्याच दिवसापासून पेशंटच्या बाजूला फळं(त्यातही सफरचंद आणि द्राक्षेच जास्त,चुकूनमाकून असलेच तर चिकू,ज्याचा "चक्कू"असा उच्चार करतात खान्देशात!) नारळपाण्याच्या डाबांचे ढीग लागतात! अजून एक गमतीदार गोष्ट पहायला मिळते ती म्हणजे घरातली सर्व मंडळी घरी न जेवता,दवाखान्यात डबे आणतात आणि पलंगाच्या बाजूला जमिनीवर सतरंजी अंथरून कोंडाळं करून मस्त गप्पा करत जेवत बसलेली असतात,राउंड घ्यायला गेलो की आपल्यालाच कानकोंडं होतं!
बरं भेटायला येणाऱ्या मंडळींनी काय बोलावे याचे भान ठेवणं जरुरी आहे.मागे आमच्या नात्यातील एक ऐंशी वर्षाचे गृहस्थ पडले आणि मांडीच्या खुब्याच्या हाडाचे फ्रॅक्चर झाले.आम्ही त्यांना पटवीत होतो की ऑपरेशन करून घ्या,लवकर चालू लागाल,नाहीतर तीन महिने बेड रेस्ट घेण्यात इतर गुंतागुंत होण्याची शक्यता या वयात फार असते म्हणून. तेवढ्यात त्यांच्या इतर मित्रांपैकी एकाची बायको(डॉक्टर नसलेली) म्हणाली,अहो,या वयात कसलं आलंय ऑपरेशन,आमच्या ओळखीचे एकजण टेबलावरच वारले! तिला चूप बसवता बसवता आमच्या नाकी नऊ आले.
डिस्चार्ज होऊन घरी गेल्यावरही ही भेटणाऱ्यांची गर्दी कमी होत नाही.तिथेही आलेल्या प्रत्येकाला पूर्ण वृत्तांत ऐकायचा असतोच.कधीपासून त्रास होता,मग आधी कसं लक्षात नाही आलं,त्रास काय होत होता,कायकाय तपासण्या केल्या,ऑपरेशन दुसरीकडे का नाही केलं,हे सर्जन चांगले आहेत का,किती पैसे लागले? अहो मला आधी सांगितलं असतं तर अमुक-अमुक ठिकाणी मी अगदी कमी पैशात करवून दिलं असतं, किंवा,हेच डॉक्टर,मला पाहताच कमी पैसे घेतले असते,वर्गमित्र आहोत आम्ही ना!
या सर्वांची समर्पक उत्तरे द्यावी लागतात.माझ्या बायपास नंतर मी सर्व अपेक्षित प्रश्नोत्तरांची एक ऑडिओ क्लिप बनवून ठेवली होती,आलेल्या प्रत्येकाला आधी ती ऐकवायचो,तरी वेगळे प्रश्न तयार असायचेच,आता बोला!
अजून एक पद्धत आहे इथली ती म्हणजे गिफ्ट आणि रिटर्न गिफ्ट,थेट लग्नासारखी! बाई असेल तर ब्लाउजपीस,माणसाला शर्टपीस किंवा इतर,आपापल्या ऐपतीप्रमाणे आणि किती जवळची मैत्री आहे त्यानुसार. बहुतेकदा तो आयटम "इद्री का माल उद्री" या प्रकारात मोडणाराच असतो(म्हणजे कुठल्यातरी समारंभात मिळालेल्या अनावश्यक वस्तू कुठेतरी खपवायच्या, यात भिंतीवरची घड्याळे,फोटो फ्रेम्स, लेमन सेट,नाईट लॅम्पस,ताट-वाट्या,थर्मास,फ्लॉवर पॉट हेच आयटम या घरातून त्या घरात वर्षानुवर्षे फिरत असतात)
पेशंटलाही कौतुक करून घ्यायला आवडतच म्हणा! आता लाप्रोस्कोपीक सर्जरी निघालीय,ज्यात एका दिवसात सुट्टी होते आणि तिसऱ्या दिवशी सर्व कामे करता येतात,अहो पण इथे हवंय कुणाला इतक्या लवकर कामं सुरू करायला!आणि टाके नाही?छे छे,जितके जास्त टाके,जितकी लांब जखम तितके जास्त कौतुक!आणि आराम तर बरेच दिवस हवा असतो,तशा सूचना मी "सासूबाईंना" द्याव्यात अशी अपेक्षाही असते!
असो,कौतुक करून घ्यायला प्रत्येकाला आवडतं हे खरंय,पण कौतुक करण्याच्या काही अजब पद्धतींचा सामना मी केलाय ती गोष्टही ऑपरेशनशी संबंध नसला तरी याठिकाणी सांगतोय.
ई. स.२००६,मी नुकताच भुसावळ इंडियन मेडिकल असोसिएशनचा सेक्रेटरी म्हणून चार्ज घेतलेला आणि "फिजिकल फिटनेस" ही वर्षभर राबवायची थीम ठरवली होती.त्यावेळी लायन्स क्लब नी चाळीस वर्षावरील व्यक्तींसाठी दहा किलोमीटर चालण्याची मॅरेथॉन स्पर्धा ठेवली होती.मी भाग घेतला आणि काहीही सवय नसतांना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर अडीचशे स्पर्धकांमध्ये पहिला क्रमांक पटकावला! पहिलं बक्षीस मिळालं,लोकांनी टाळ्या वाजवल्या,अभिनंदन केलं, हार-पुष्पगुच्छ दिले,बरं वाटलं.सत्काराला उत्तरही दिलं. (या सगळ्यांमध्ये,मी शोधत होतो त्या माणसाला ज्यानी त्या रस्त्यावरच्या कुत्र्याला दगड मारला,आणि ज्यामुळे माझी स्पीड वाढली!😜)
दिवसभर भेटायला लोक येत होते,मीसुद्धा थकलो होतो,रात्री लवकर झोपलो. सकाळी पावणेपाच वाजता चौकीदाराचा फोन आला,की कुणी यादव म्हणून गृहस्थ भेटायला आलेत आणि तुम्हाला खाली बोलावतायत.गेलो खाली,पाहतो तर माझा मित्र,भुसावळच्या प्रसिद्ध यादव पान सेंटरचा पहिलवान राजू यादव,एक पिशवी घेऊन उभा! म्हणाला,डॉक्टर,आपने कल मॅरेथॉन जिती,बहुत खुशी हुई,बहुत लोगोने आपको फूल-मिठाई दी होगी,लेकिन मै आपको बधाई देना चाहता हूँ आपकी मॉलिश करके,आइये इधर! मग तो मला आमच्या वेटिंग रूम मध्ये घेऊन गेला,खाली एक सतरंजी अंथरली,माझे आणि स्वतःचे सगळे कपडे काढले(अंडरपॅन्ट सोडून!) आणलेल्या तेलाच्या बाटलीतले भयानक वासाचे मेंदूला झिणझिण्या आणणारे तेल मला डोक्यापासून पायापर्यंत चोपडले आणि इजिप्तीशियन स्टाईलमध्ये जबरदस्त रगडून मसाज दिला,एक तास पूर्ण! हाडं हाडं खिळखिळी झाली खरी,पण इतकं हलकं वाटत होतं,की काय सांगू! अब गच्चीपे जाकर आधा घंटा धूप मे बैठो फिर गरम पानीसे नहाओ. मै चला.आणि तो गेलाही!
काय मजा वाटली साहेब,आहे की नाही अभिनंदन करण्याची अनोखी पद्धत? आणि हे जे प्रेम मी कमावलंय ही माझी खरी संपत्ती आहे त्याची तुलना ईतर कशाशीही होऊ शकत नाही!🙏🙏
Comments
Post a Comment