संगीत या प्रकाराशी लहानपणापासूनच काही फारसे सख्य नव्हते माझे.शाळेची पूर्ण वर्षे अभ्यास आणि मैदानी खेळ यातच गेला.शाळेतून घरी आल्याबरोबर दप्तर फेकले,कपडे बदलले,आणि आईनी तयार ठेवलेले दूध-बिस्कीट खाल्लं,की लगेच बाहेर! गोट्या,विटीदांडू,लगोरच्या,क्रिकेट, कबड्डी,आणि पावसाळ्यात खुपसणी हे ठरलेलं असायचं.आठवी-नववीत टेबल टेनिसची गोडी लागली,आणि १९९० सालापासून टेनिसची,ती मात्र आजतागायत पर्यंत कायम आहे! शनिवार-रविवारी दुपारी गळ्यात गुल्लेर,ज्याला खान्देशात "क्याटी"म्हणायचे,आणि खिशात गोटे घेऊन चिंचा, गोराटीम्बल्या,ज्याला आम्ही इंग्लिश चिंचा असेही म्हणायचो,आणि कैऱ्या तोडून खाण्याचा कार्यक्रम व्हायचा!(आणि सोबत आमच्या गोट्यानं कौलं फुटल्यामुळे बोलणी खाण्याचाही) खिशात तिखट-मिठाच्या पुड्या ठेवलेल्या असायच्या लावून खायला!पाणी सुटलं ना तोंडाला?असो!
अंधार पडला की घरी परतायचे,हातपाय-तोंड धुवून शुभंकरोती म्हणायची,टाकणं टाकल्यासारखा गृहपाठ करायचा,जेवायचं आणि झोपायचं असा दिनक्रम असे,यात संगीतासाठी होता कुठं वेळ? शाळेतही वक्तृत्व किंवा वादविवाद स्पर्धेत भाग घ्यायचो पण गायन....छे,आम्हीही कधी प्रयत्न केला नाही आणि गायनाच्या सरांनीही आमच्या भसाड्या आवाजामुळे कधी उद्युक्त केले नाही.शाळेच्या बँड पथकात एकदा बासरी वाजवीन म्हणून विचारलं तर क्लास टिचरांनी एक कानात वाजवून "मुकाट्यानं अभ्यास कर,पहिला नंबर टिकवायचा आहे ना" म्हणून भलावण केलेली चांगलीच आठवते!
तसं घरी संगीताला पोषक वातावरण होतं म्हणा. आई संगीतप्रेमी, मावशी संगीत विशारद आणि बाबांनाही शौक होता गाण्यांचा. त्याकाळी बाबांनी आवडीनं नेल्सन कंपनीचा रेडियो,त्याला जोडलेला फिलिप्स कंपनीचा रेकॉर्ड प्लेयर आणला होता, त्याला छान कॅबिनेट बनवली होती.
सुट्टीच्या दिवशी जळगावला जाऊन मनोचा आणि राकांच्या दुकानातून एचएमव्हीच्या ४५,७८ आणि ३३ आरपीएम च्या रेकॉर्ड्स निवडून आणायचो,त्यातील गाण्यांचे कॉम्बिनेशन तपासायचे,त्या पूर्ण वाजवून बघायच्या,कोण मोठा सोहळा असायचा तो! मेडीकलच्या पूर्ण शिक्षणात तो रेकॉर्ड प्लेयर माझ्याकडे होता,अजूनही तो आमच्या नागपूरच्या घरात माळ्यावर सापडेल कदाचित.भुसावळला एक बेहेरा म्युझिक हाऊस दुकान होते,त्याचे मालक श्री कन्हैय्यालाल बेहेरा एक वल्ली होते.पांढरे स्वच्छ धोतर,तितकाच शुभ्र कुडता,सोनेरी फ्रेमचा चष्मा,सुगंधी अत्तर,काही विचारू नका.संगीतप्रेमी होते खूप.कोणत्याही गाण्याबद्दल पूर्ण माहिती असायची- कोणत्या पिक्चर मधील आहे,कोणत्या साली प्रदर्शित झाला,कोण नट नटी होते,कुणी म्हंटले,संगीतकार कोण,सर्व सांगायचे.ती रेकॉर्ड लावायचे आणि पूर्ण गाणी ऐकवायचे.त्याच्याकडून घेतलेली जगजीत सिंग यांची "कम अलाईव्ह" म्हणून एक एलपी होती ती माझी फार फेव्हरिट होती, त्यातील गझला आणि "ढाई दिन ना जवानी नाल चलदी, कुडती मलमलदी" हे पंजाबी गाणं,या त्यावेळच्या आमच्या तारुण्यसुलभ मनाला साद घालायच्या,आणि मग त्यावर उतारा म्हणून दुसरी,पंडित भीमसेन जोशी यांची "तीर्थ विठ्ठल",आणि "इंद्रायणी काठी देवाची आळंदी"ही भजनं असणारी! काही विचारू नका.😄
बघा किती भरकटलो फक्त हे सांगायला की संगीत आणि मी,आमचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता! फक्त मेडीकलच्या होस्टेलमध्ये गरम पाणी नसल्यामुळे बाराही महिने थंड पाण्यानी आंघोळ करावी लागायची. त्यामुळे त्या जीवघेण्या थंडीत थंडगार पाण्यानी आंघोळ करतांना हाडापर्यंत पोहोचलेला थंडीचा कडाका सुसह्य होण्यासाठी आपोआपच गळ्यातून प्रसवलेला आवाज,लैला ओ लैला या रोमँटिक गाण्याच्या चिंध्या करत तारस्वरात हॉस्टेलभर गुंजायचा आणि माझ्या आंघोळीची दवंडी पिटायचा,तेवढाच संगीताशी संबंध!
(पलीकडच्या बाथरूममधून माझा चावट मित्र डॉ.प्रशांत जोशी,आता कार्डियाक सर्जन,ऑस्ट्रेलिया, "बैला ओ बैला" असं किंचाळून प्रतिसाद द्यायचा!)
नागपूरला मेडिकल कॉलेजला शिकत असतांना
आमच्या धंतोलीच्या घराच्या गल्लीत समोर घारे कुटुंबीय रहायचे.आमच्या नात्यातच होते,आहेत.कलाकार लोक होते सर्व! एक प्रभाकरकाका उत्कृष्ट व्हायोलिन वाजवायचे आकाशवाणीवर,त्र्यम्बककाका छान तबला,तर दत्ताकाका हार्मोनियम! त्यात माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा एक सतीश नावाचा इंजिनियरिंगचा विद्यार्थी होता(आता रिटायर झालाय तो पण अजूनही तरणाबांड दिसतो) तो माऊथ ऑर्गन वाजवायचा.खूप मस्त वाटायचं ऐकायला.एक शंभर रुपयांचा हिरो हार्मोनिका आणला आणि त्याच्याकडून "है अपना दिल तो आवारा" आणि "ही चाल तुरुतुरु" ही गाणी शिकली तोडकीमोडकी वाजवायला! पद्धत ऐकली तर हसू येते आता...आठव्या छिद्रात हवा फुंक,नवव्यात ओढ,मग बाराव्यात पुन्हा ओढ आणि दहाव्यात फुंक...याप्रकारे! मग गल्लीच्या गणपतीत सांस्कृतिक कार्यक्रमात सतिषभाऊसमोर वाजवले एकदा आणि मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात गॅदरिंग मध्ये वाजवायची संधी आली(मी स्पोर्ट्स प्रेसिडेंट होतो स्टुडंट काउंसीलचा) पण हिम्मत झाली नाही.झालं,तो हार्मोनिका गुंडाळून जो ठेवला तो बाहेर निघायला थेट २०१४ साल उजाडावं लागलं.(तसं मध्ये एकदा भुसावळ आयएमएच्या नववर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमात वाजवलं पण लोकांचा रिस्पॉन्स पाहून पुन्हा नाही कधी वाजवलं)
२०१४ साली अचानक काही ध्यानीमनी नसतांना बायपास सर्जरी करवून घ्यावी लागली पुण्याला आणि तिसऱ्या दिवशी चेस्ट फिजियोथेरपिस्ट दाखल,एक रेस्पीरोमिटर नावाचे यंत्र घेऊन!या मशीनमध्ये हवा फुंका आणि ओढा जितक्या जोरात करता येईल तितकं!यानी फुफ्फुसे मोकळी होतील,दहा मिनिटे करायचा हा व्यायाम दर दोन तासांनी,नाहीतर न्यूमोनिया होईल बरं, अशी धमकीही देऊन गेला! मी कंटाळलो चार तासातच.
मग आयडिया आली डोक्यात,म्हंटलं,माऊथ ऑर्गन तर हीच क्रिया करतं,सोबत आवाजही निघतोकी जरा बरा. विचारलं डॉ सुहास हरदास आणि डॉ विजय नटराजन यांना,त्यांनी दिली परवानगी.मग दोन दिवसात थोडीफार प्रॅक्टिस केली आणि चवथ्या दिवशी आयसीयू मधील एका इंचार्ज सिस्टरचा वाढदिवस होता तेंव्हा "हॅपी बर्थडे" ट्यून वाजवली! कोण आनंद झाला तिला आणि सर्व स्टाफला म्हणून सांगू! खरं तर बायपास ऑपरेशननंतर पाहिले चोवीस-अठ्ठेचाळीस तास फार महत्वाचे असतात आणि त्या दिव्यातून रुग्णाला यशस्वीरीत्या बाहेर काढण्यास या कर्तव्यतत्पर स्टाफचा फार मोठा हातभार असतो.
तर अशा रीतीनं मला पुन्हा माऊथ ऑर्गन ची गोडी लागली.भुसावळला आल्यावर युट्यूबवर बरीचशी हार्मोनिकावर वाजवलेली गाणी सापडली आणि ती ऐकून-ऐकून माझं शिकणं-वाजवणं सुरू झालं. एकदा मग माझा माऊथ ऑर्गनचा प्रवास मी फेसबुकवर टाकला आणि त्यामुळे भेट झाली एका अवलीयाशी,त्याचे नाव आहे रमणा! हैदराबादचा राहणारा रमणा हा इलायराजा या सुप्रसिद्ध संगीतकाराचा निस्सीम भक्त आणि त्यामुळे स्वतःचे नावही बदलून त्याने रमणा इलायराजा ठेवलेले.त्यानं हार्मोनिका प्रेमी लोकांचा एक ग्रुप तयार केला होता फेसबुकवर,त्यात मला सामील करून घेतलं! देशभरातील लहानथोर असे पंधराशे सदस्य होते तेंव्हा(आता तीस हजारावर आहेत!) सगळे एकमेकांना मदत करायला,शिकवायला तयार.मग कळलं की २०१२ सालापासून या ग्रुपची (इंडियन माऊथऑर्गन प्लेयर्स I.M.P.) वार्षिक मीट होते आहे आणि २०१५ साली ती इंदूरला आहे! झालं,मी नाव नोंदवलं आणि माझ्या आवडत्या जगजीत सिंग यांची एक गझल वाजवण्याचं ठरवलं.नवीन मैत्री झालेले हरहुन्नरी मित्र,पंढरपूरचे असामान्य डॉ.मिलिंद परिचारक यांनी ट्रॅक आणि त्यांनी वाजवलेलं गाणं पाठवलं प्रॅक्टिससाठी. गेलो इंदूरला,आणि वाजवलं जसं जमेल तसं. इंदूर मीटनी माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली.हार्मोनिकाचे दिगग्ज स्वरूप मित्रा,रुस्तम कारवा,नंदू बेलवलकर सर, राजीव राज,डॉ.राघवन,रमणा,मोहनिश शेटे,नकुल धगट, डॉ.दूरदर्शी सिंग,हरीश नय्यर,संदीपन,सुनील पाटील सर या मान्यवरांशी ओळखी झाल्या. नोटेशन्स नावाचा संगीत लिहिण्याचा एक प्रकार असतो आणि ते वाचून हार्मोनिका शिकता आणि शिकवता येते ही आजपर्यंत माहीत नसलेली आणि मनाला न पटणारी गोष्ट उमजली. त्यावेळी सुजाता नुसती सोबत म्हणून(accompanying person) आली होती,पण या सगळ्यांच्या भेटीनं इतकी भारावली,की तिनेही हार्मोनिका शिकण्याचे ठरवले! त्याचवेळी मीटचे होस्ट,इंदूर हार्मोनिका क्लब यांनी आलेल्या दोनशे प्रतिनिधींना घेऊन एकसाथ दहा गाणी एकापाठोपाठ एक वाजवण्याचा विक्रम केला आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये आमचे(ही) नाव आले!
आलो वापस भुसावळला, कुठूनतरी ही बातमी पोहोचली माझ्या एका पत्रकार मित्रापर्यंत आणि एके दिवशी सकाळी तो आला घरी माहिती घ्यायला.(मोना वाघमारे,दैनिक देशदूत)त्याला सांगितलं की त्या दोनशे लोकांपैकी मी शेवटचा होतो आणि त्या कोरसमध्ये धकून गेलो,माझी काही लायकी नाही अजून असल्या रेकॉर्ड करण्याची वगैरे.मग त्याला मी ती जगजीत सिंग यांनी तिथे वाजवलेली गझल वाजवून दाखवली,तो ट्रॅक बॅकग्राउंड वर लावून.तो म्हणाला,वाजवतोस छान पण तालाची फार बोंब आहे! मी विचारलं,मोना,तू संगीत शिकलायस का? नाही,पण मला ताल कळतो,तू सुजाताला विचार. विचारलं बुवा तिला.ती म्हणाली,खरं सांगतोय मोनाभाऊ,सूर चांगले आहेत पण ताल अगदीच नाही,त्यामुळे मजा येत नाही ऐकणाऱ्याला. आजपर्यंत वाईट वाटेल आणि तुझ्या आनंदावर विरजण पडेल म्हणून सांगितलं नाही तुला!
फार वाईट वाटले मला,की ताल समजत नाही आणि येत नाही म्हणून,आणि ठरवलं की ताल शिकायचाच!
आणि इथून सुरू झाली माझी तालाशी झटापट!
खरं सांगू मित्रांनो,ताल नावाचा काही प्रकार संगीतात असतो याची पुसटशीही कल्पना मला नव्हती.गायक गाणं गात असतांना मागं जो ऑर्केस्ट्रॉ असतो तो फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी असतो,त्याचे गाण्याशी काहीही घेणेदेणे नसते अशी माझी दृढ संकल्पना होती.एकदा आम्ही डॉ.उल्हास पाटील सरांच्या मेडिकल कॉलेजच्या स्नेहसम्मेलनात दादा कोंडके यांचे एक युगलगीत म्हंटले होते,प्रॅक्टिसच्या वेळी आम्ही म्हंटल्यानंतर तो ऑर्केस्ट्रॉचा मुखीया माझ्या चक्क पाया पडला आणि म्हणाला,"साहेब,आजपर्यंत खूप लोकांची साथ केली,पण तुमच्यासारखा कलाकार नाही भेटला! तुम्ही असेच मस्तीत गात रहा."(त्यानी नंतर संन्यास घेतला असे कळते)
यानंतर मी शिस्तबद्ध *स्वतःच्या* पद्धतीनं तालाचा अभ्यास सुरू केला.आमचे मित्र कोलकाता येथील प्रसिद्ध संगीतकार आणि हार्मोनिका वादक संदीपन चक्रवर्ती यांनी वाजवलेलं "दम मारो दम" आणि तितक्याच कालावधीचा त्यांनीच दिलेला बॅकग्राउंड ट्रॅक यांची सांगड घालून वाजवणे सुरू केले.म्हणचे,० ते ४३ सेकंद म्युझिक,४३ ते ६७ सेकंद वाजवायचं, पुन्हा ६७ ते ७९ सेकंद म्युझिक आणि ७९ ते ९७ सेकंद पुन्हा वाजवणे असे,अगदी *सिस्टीम्याटीक!* हा उद्द्योग जवळ जवळ आठ महिने चालला.मग २०१६ ला मुंबई मीट ची वेळ आली."याद किया दिल ने कहाँ हो तुम" हे युगलगीत बसवलं आणि सुजातानी ठोकून-ठोकून ठेका कुठे असतो ते समजावलं.सनथ कुमार या चेन्नईच्या मित्राने वाजवलेला व्हिडियो हजारेक वेळा पाहिला आणि ते दिव्य कसेबसे पार पडले खरे,पण तालाची समज काही फार वाढली नव्हती. मी बराच कंटाळलो होतो या तालाला, आणि समजलं मात्र होतं की ताल हा प्रकार अस्तित्वात आहे आणि तो शिकण्याशिवाय गत्यंतर नाही.(हेही नसे थोडके-इति सुजाता!) मला मग एक सवय लागली,की कुणीही मित्र भेटला की त्याला गाणं म्हणायला लावायचो,ताल येतोय का ते बघायला.हे लक्षात आलं की सूर नाहीत बरोबर,पण ठेका चुकत नाही!ताल म्हणे रक्तातच असावा लागतो भिनलेला,डोंबल माझं,काहीही काय! छान ताल असलेल्या एखाद्याचं एक-दोन बाटल्या रक्त घ्यावं का हाही विचार तरळून गेला मनात. त्यापेक्षा दुसरा एखादा छंद जोपासावा (ज्यात ताल नाही असा)हार्मोनिका द्यावे फेकून,नाही वाजवलं तर काय मरतोय का,हा विचार पक्का झाला.
सुजातानी मग मला ताल शिकवण्याचा विडा उचलला.गाणं खूपदा ऐकायचं,मग त्यावर ती सांगेल तसा ठेका द्यायचा टाळ्यांनी.अगं पण मी टाळ्या वाजवीन तर हार्मोनिका कोण पकडेल? माझा बाळबोध प्रश्न. मग पायानी ठेका द्या. पण तोच चुकीचा दिला तर? मी वैतागलो.पण खरं सांगू,आजपर्यंत जेवढी गाणी वाजवलीयत हार्मोनिकावर,त्या सर्वांमागे सुजाताची अनेक तासांची,न चिडता,डोकं शांत ठेवून केलेली मेहनत आहे.समोर बसून टाळ्या,हातवारे,इशारे,वेडीवाकडी तोंडं,नाही नाही ते प्रकार केलेत तिनं, पण माझी गाडी काही स्पीड पकडेना! सुजातानी मग "व्होकल" शिका,ताल "आपोआप" येईल असा आशेचा किरण दाखवला आणि मग येथून दुसराच अध्याय सुरू झाला जीवनाचा..... पेटी/हार्मोनियम,कीबोर्ड/सिंथेसायझर आणि गायनाचे सर!
सुजाताचे गायन सर श्री योगेश साळशिंगीकर यांचा क्लास सुरू झाला आठवड्यातून तीनदा! अतिशय सज्जन माणूस आणि हाडाचा शिक्षक! त्यांना आधीच कल्पना दिली की एकजण संन्यास घेऊन चुकलाय मला शिकवण्याच्या प्रयत्नात म्हणून! पण ते म्हणाले की आपण घाबरत नाही. ठिकाय बुवा,तुम्ही तयार आहात रिस्क घ्यायला,तर घ्या,माझं काय जातंय!
हे व्होकल संगीत असाच एक अचाट प्रकार आहे बॉ! सुरुवात सा,रे,ग,म,....पासून, तो "सा" लागण्यातच पहिले चार दिवस निघून गेले(लागला नाहीच तो भाग वेगळा)मग अलंकार बारा चवदा,मग राग,काही विचारू नका!बरं तेही लिमिटेड असावे ना,नाही,पायलीचे पन्नास! आणि प्रत्येक रागाची आपली एक खासियत,म्हणायचा एक काळ,प्रहर!(काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा उगम कशात आहे ते मला तेंव्हा कळलं)
सात स्वर,त्यातील काही फक्त शुद्ध,काही शुद्ध आणि कोमल तर फक्त मा शुद्ध आणि तीव्र! प्रत्येक रागात काही स्वर निषिद्ध! खालून वर चढणे म्हणजे आरोह,आणि वरून खाली उतरणे म्हणचे अवरोह!(चढावंच लागतं,लिफ्ट किंवा एसकॅलेटर ची सोय नाही) एक "पकड"ही असते म्हणे रागाची.प्रत्येक रागात काही "वादी"स्वर आणि काही "संवादी" स्वर,म्हणजे आधीच माझ्या गोंधळलेल्या मनात विसंवादाची वादावादी सुरू! पुढे जाऊन तान-आलाप आणि रागविस्तार!रागातही "घराणेशाही" आणि "थाट"असतात म्हणे!
आणि हे सगळं करत असतांना लय संभाळावी लागते ज्याला *ताल* म्हणतात.त्यासाठी मागे ठेका द्यायला तब्बलजी,किंवा इलेक्ट्रॉनिक तबला/मेट्रोनोम असते.गाणं म्हणणारे आणि म्हणवून घेणारे उस्ताद टाळ्या वाजवून ठेका देतात.यातही कधी उलटी तर कधी सुलटी टाळी का वाजवतात हे नाही कळलंय अजून,विचारीन म्हणतो कधीतरी. हे गुरुजी गाणं म्हणतांना आणि म्हणवून घेतांना इतके हातवारे करतात काय माहीत,पण त्या इशाऱ्यावर म्हणणारे म्हणतात आणि वाजवणारे वाजवतात. मोठमोठ्या ऑर्केस्ट्रॉ मध्ये एक माणूस हातात लांब काडी/छडी घेऊन ती का फिरवतो ते आता कळले,मला वाटायचं की चुका करू नये म्हणून धमकवायला त्याला ठेवले असावे! एकताल,तिनताल, झपताल,रूपक इत्यादी बरेच ताल असतात हे कळले.(दादरा,जो शब्द आम्ही रेल्वेच्या पुलाला वापरतो,त्याही नावाचा एक ताल असतो अशी ज्ञानात भर पडली.) बरेच लोक गातांना कानावर हात का ठेवतात,तर तार सप्तकात गातांना स्वतःलाच त्रास होऊ नये म्हणून,हेही समजले.सूर चुकले की हळूच गायक स्वतःचा कान धरतो आणि गुरुची माफी मागतो म्हणे.(मी तर पूर्ण वेळ एका हाताने कान धरूनच बसायचो,कारण फुल टू चुकीचेच गायचो!) पुढे तालातील मात्रा,सहा,आठ,सोळा,त्याहीपुढे म्हणचे २/४,४/८...असे क्लिष्ट प्रकार,काही विचारू नका, यापेक्षा मेडिसीन चा अभ्यास खूप सोपा वाटू लागला हो!
असे बरेच दिवस गेले आणि एके दिवशी पेपरात नाशिकच्या "महामंडळी" ग्रुप नी आयोजित केलेली सुशीर वाद्यवादन स्पर्धेची माहिती वाचली! झालं, किडा वळवळू लागला.पुन्हा संदीपन सर,त्यांनी राग भैरव चे नोटेशन्स पाठविले आणि साळशिंगीकर सरांनी प्रॅक्टिस घेणे सुरू केले.पुढचे पंधरा दिवस आमचे घर आणि दवाखाना फक्त राग भैरव ऐकत होता,इतकंच काय तर आमची लाडकी डोबरमन झेनाही भुंकतांना राग भैरवचा "कोमल रे"आणि "कोमल ध" वापरते असे वाटू लागले! साथीला तबला हवा म्हणून आमचा मित्र प्रसाद जोशी रोज दोन तास यायचा.
गेलो बुवा नाशिकला,सोबत आमचा सवंगडी श्रीपाद होताच. गम्मत म्हणचे सुशीर वाद्यात बासरी,सनई,सॅक्सोफोन,ट्रमपेट,तुतारी इत्यादी बरीच वाद्य वाजवणारे कलाकार होते पण हार्मोनिका वाला मी एकटाच होतो. सर्वात शेवटी माझा नंबर आला,गेलो स्टेजवर आणि नेटानी वाजवलं चार मिनिटे,भरपूर टाळ्या मिळाल्या(तशी पद्धतच असावी बहुधा) पण निकाल लागला तेंव्हा आनंद गगनात मावेनासा झाला,कारण चक्क दुसरा क्रमांक आला होता पन्नास स्पर्धकात!
हो,एक सांगायचंच राहून गेलं,इंदूर मीट नंतर आणि मला ताल यावा म्हणून सुजाता चक्क माझ्याकडून हार्मोनिका चे बेसिक्स शिकली आणि मूलतः गाणारी असल्यामुळे झटपट आणि छान वाजवूही लागली. त्यामुळे भारतातील युगलगीत वाजवणाऱ्या आम्हाला माहिती असणाऱ्या तीन नवरा-बायको कपल्सपैकी एक आम्ही आहोत हे सांगायला अभिमान वाटतोय!
गम्मत म्हणजे मधुरा आणि सुप्रिया या माझ्या दोन्ही मुलीसुद्धा शिकल्या वाजवायला आणि २०१७ जयपूर मीटमध्ये आम्ही चौघांनी मिळून एक गाणं वाजवलं. इतकंच काय तर माझी ऐंशी वर्षांची आईसुद्धा फुफ्फुसांच्या व्यायामाकरता नंदू सरांनी दिलेला जर्मनीच्या सिडेल कंपनीचा "पलमोनिका" वाजवायची!
आता फक्त आमची झेनाच राहिलीय,तीसुद्धा वाजवेल एखादे दिवशी,खात्री आहे मला.😄
नाशिकच्या यशामुळे मग आम्ही जर्मनीला "वर्ल्ड हार्मोनिका फेस्टिव्हल" ला जाण्याचे ठरविले नोव्हेंबर २०१७ मध्ये. गेलो दोघे,एक बॉलिवूड युगल गीत आणि मी सोलो राग आसावरी वाजवला(नोटेशन्स आणि ट्रॅक अर्थातच संदीपन सर आणि घोटाई साळशिंगीकर सर आणि सुजाता!) तिथे जास्त जॅझ आणि ब्लुज संगीत चालते,त्यामुळे भारतीय क्लासिकल आणि बॉलिवूड कुणाला कळले असेल माहीत नाही,टाळ्या जरूर वाजवल्या लोकांनी प्रथेप्रमाणे! पण आम्हाला मजा आली ती तिथल्या वातावरणाची,अफलातून साउंड सिस्टिमची,जगभरातील हार्मोनिका प्रेमी लोकांशी भेटण्याची,मैत्री करण्याची,आणि आपल्याच मस्तीत वाजवण्याची!
नुकतीच २०१८ ची हार्मोनिका मीट भाग घेऊन आलो कोलकत्याला जाऊन.खूप मजा आली,कोलकत्याला संगीताचे माहेरघर का म्हणतात ते कळले,आणि अतिशय प्रतिभावान कलाकारांशी ओळखी झाल्या,त्यातील बरेचसे बाल कलाकार आहेत!
ता.क. मधेच माझ्या एका चाळीस वर्षानंतर फोनवर भेटलेल्या शाळकरी मित्राने,जो संगीत विशारद आहे आणि रिटायर झाल्यावर क्लासेस घेतो, सांगितले की ताल शिकण्यास आधी तबला शिक! मग झालं,तबला आणि पुन्हा प्रसाद जोशी! एका दिवसातच कळलं की ही आपल्या बस ची बात नाही,मग त्या मित्राचा नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून मोकळा झालो,नाहीतर काय,तबला शिक म्हणे!
तालाशी माझी झुंज अजून सुरू आहे,आता तर हेही कळले की गाणं,वाजवणं आणि इतकंच काय तर नाचण्यासाठीही ताल लागतो! आतापर्यंत बायकोच्या तालावर नाचलो,आता खऱ्या तालावर वाजवणे शिकायचे आहे.
मध्यंतरी, पुण्याच्या सुरभी म्युझिक अकॅडमीचे सुनील पाटील सर आमच्याकडे आले होते,त्यांच्या कुलदैवत मनुदेवीच्या दर्शनाला,तेंव्हा माझ्या मनातली तालाची कथा आणि व्यथा त्यांच्याजवळ बोलून दाखवली.सरांनी विश्वास दिला की नक्कीच येईल ताल तुला म्हणून,पण सर पुण्याला,मी भुसावळला,कसं जमणार शिकणं! सरांच्या मागे लागलो मग मी की ऑनलाइन क्लासेस सुरू करा,खूप लोकांना फायदा होईल माझ्यासारख्या.मधे बराच काळ निघून गेला,आम्ही दोघेही आपापल्या कामात गढून गेलो आणि ऑनलाइन शिकणे थोडे मागे पडले. सरांनी हार्मोनिकाचा प्रसार करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरात कमीत कमी दहा-बारा कार्यशाळा घेतल्या होत्या त्या काळात!
मी खूप दिवसापासून वीर सावरकर संस्थेचं काम करतोय आणि मला त्यांचं "जयोस्तुते"हे गीत वाजवायची तीव्र इच्छा होती.पुण्याचे आमचे मित्र श्री हेमंत गद्रे यांनी अंदमानला जाऊन त्या तुरुंगातील अंडा सेलच्या समोर ते वाजवल्याचा व्हिडियो पाहिला,त्यानी प्रेरित झाल्यापासून!हेमंत सरांनी ट्रॅक तर पाठवला,पण नोटेशन्स नव्हते. मग मला आठवण झाली सुनील सरांची!सरांच्या मागे लागलो मग,सरांनीही वेळ काढून मला सुंदर नोटेशन्स पाठवलीत.सूर तर जमले,पण पुन्हा माझा जानी दुष्मन ताल,वाकुल्या दाखवून फिदीफिदी तोंडं वेंगांडू लागला!😥 पुन्हा मग सरांना साकडं घातलं,की आतातरी ऑनलाइन सुरू करा आणि मला ताल शिकवा!🙏 सरांनी हे चॅलेंज स्वीकारले आणि माझ्या व्यवसायाच्या अनियमिततेमुळे मला वेळ मिळेल तेंव्हा,स्वतः ऍडजस्ट करून माझे तालाचे पाच क्लासेस घेतले आणि निव्वळ जयोस्तुतेच करवून घेतलं असं नाही तर "मला ताल येईल" हा आत्मविश्वासही जागृत केला! माझं स्पष्ट मत आहे की शिक्षक स्वतः नुसता हुशार,विषयात पारंगत असून चालत नाही,तर त्याच्याजवळ विद्यार्थ्याला(माझ्यासारख्या बिनडोक,हेकट आणि हट्टी) शिकवण्याची हातोटी असणेही आवश्यक असते!) आणि मला अभिमान आहे की सुनील सरांमध्ये ती पुरेपूर आहे! मला खात्री आहे की लवकरच देशभरातील माझ्यासारखे बरेच लोक सरांच्या या ऑनलाइन शिकवणीचा फायदा घेतील.
एक मात्र अगदी खरं,की ताल हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे.जर श्वासाला लय आहे,हृदयाला ताल आहे,तरच जीवनगाणं सूरीलं आणि श्रवणीय होतं, आणि सूर-ताल मधेच चुकले तरी बरोब्बर समेवर येणं ज्याला जमलं,तोच जीवनात जिंकला,नाही का?💐💐
खुप छान माहीती दिलीत
ReplyDeleteतसे मला सुद्धा ऊत्सुकता होतीच या हरर्मोनिका प्रवासा बद्दल जाणुन घेण्याची
धन्यवाद विजयभाऊ.
DeleteVery inspiring sir... lot to learn from both of u...
ReplyDeleteThanks dear. We all are learning from each other.
Deleteतुम्हां दोघांचा हार्मोनिका प्रवास वर्णन अफलातून , योगेश साळशिंगीकरांचे वडील दत्ता साळशिंगीकरांकडे मी संगीत उपांत्य पर्यंत शिकले, खूप शांत शिक्षक होते, योगेश ला सांग मी आठवण काढली सरांची म्हणून .
ReplyDeleteतेरे खत में मेरा सलाम ☺️ पण हा प्रवास निरंतर चालू ठेवा , Good Luck !
आपला निरोप नक्कीच देतो सर,पण आपले नाव येथे न आल्यामुळे मला कळले नाही.कृपया माझ्या मोबाईलवर 9823078901 सांगाल का!💐
Deleteव्वा! हार्मोनिका शिकण्याची धडपड छान शब्दबद्ध केलीय.
ReplyDeleteधन्यवाद सर.
Deleteव्वा! हार्मोनिका शिकण्याची धडपड छान शब्दबद्ध केलीय.
ReplyDeleteअप्रतीम सर.....
ReplyDeleteमराठी भाषेवरील तुमचे प्रभुत्व खरच वाखानन्या जोगा आहे...
तुमच्या संगीत प्रवास वर्णनाला दिलेली विनोदाची फोडणी अगदि चपलख बसलीय ..( लैला ओ लैला / बैला ओ बैला, वादी-संवादी-वादावादी 😄😄)
खुपच छान सर....
धन्यवाद सर,खूप छान वाटलं आपली प्रतिजरिया वाचून आणि उत्साह सुद्धा वाढला!💐💐
Delete