Skip to main content

टेलिमेडिसीन

टेलीमेडिसिन

 मित्रांनो,लॉक डाऊन सुरू झालं, आणि सर्वांना घरीच राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या. मग असाही  सल्ला दिला गेला की छोट्या-मोठ्या त्रासासाठी दवाखान्यात येऊ नका, फोनवरच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि इथून सुरू झाले टेलीमेडिसीन. याची कथा मी तुम्हाला सांगणार आहे.

 टेलीमेडिसीन सुरू झाल्यावर माझ्या मोबाईलवर मी नाव नसलेले नंबर सुद्धा उचलणे सुरू केले आणि मग कुणाचा फोन आहे हे कळण्यासाठी म्हणून ट्रूकॉलर हे ॲप वापरणे सुरू केले आणि यावर कसा विश्वास ठेवावा हे कळेना, त्याचं नाव ट्रूकॉलर की फॉल्स कॉलर असा संभ्रम मला पडला. गंमत म्हणजे ट्रू-कॉलर लावल्यावर मलाच माझ्या पॉप्युलॅरिटी चा आनंद व्हायला लागला, कारण की बरेच फोन केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश,दिल्ली किंवा जम्मू-काश्मीर असेच दाखवू लागले. जम्मूहुन फोन आला,मी हिंदीत बोलायला सुरुवात केली,तर  तिकडून प्युअर खान्देशी भाषेत बोलू लागला माणूस शेजारच्या कुर्हे गावाहून! पण छान वाटत होतं की टेलीमेडिसीनने आपण लॉक डाऊनला आपल्या परीने हातभार लावतोय म्हणून. 
लवकरच माझा भ्रमनिरास झाला, याची दोन कारणं आहेत एक म्हणजे लोकांना कनव्हीन्स करणं कठीण, की मला व्हाट्सअप करा, फाईल आणि प्रिस्क्रिप्शन चा फोटो पाठवा, इन्वेस्टीगेशन्स, सोनोग्राफीचे रिपोर्टस पाठवा,कम्प्लेन्ट्स काय आहेत ते सांगा, मग मी औषधे लिहून पाठवतो. 
पण त्यांचा एकच धोशा.....तपासून घ्या ना एकदा, फक्त आम्हाला तपासा,नाही सांगणार कुणाला. परेशान होऊन गेलो मी सांगून,की अहो जरूर नाहीये, फार त्रास नसेल तर उगाच कशाला येता, स्वतःचा आणि इतरांच्या जीव धोक्यात घालू नका, तरी वारंवार फोन करतातच.
आणि दुसरा म्हणजे रिकामचोट फोन.
"जरा तपासायला यायचं होतं."

"आधी आला होतात का?"

"नाही."

"मग काही त्रास आहे का?"

"नाही,पण जरा सल्ला घ्यायचा होता. आता तुम्ही रिकामे असालच, तुमचा पण वेळ जाईल चांगला माझ्याशी बोलून!काय?"

डोंबल माझं,निर्धार केला की चिडायचं नाही आणि शांतपणे उत्तरं द्यायची म्हणून.

पहिला फोन....
"हॅलो कोण बोलतंय?"
 मला फोन करायचा आणि कोण बोलतय विचारायचं, म्हणजे माझा फोन सदैव इतर कोणाकडे तरी असतो का? 

"अहो, तुम्ही डॉक्टर केळकर यांना फोन केला म्हणजे डॉक्टर केळकरच बोलत आहेत. आपण कोण बोलताय?"

"अच्छा, तुम्हीच बोलतायत का डॉक्टर? कुठून बोलताय?"

म्हणजे मी काय परग्रहावर गेलो फिरायला, लॉक डाऊन तोडून की लॉक डाऊन तोडल्यामुळे जेलमध्ये आहे, असा समज आहे या माणसाचा! कुठून बोलताय?अगदी तोंडावर आलं होतं म्हणायचं, की मी तोंडाने बोलतोय, आपण कुठून बोलताय? पण गप्प बसलो.

"अहो मी घरूनच बोलतोय,बोला."

"अच्छा घरीच आहात का?म्हणजे तुमच्याकडे पण लॉकडाऊन आहे का?"

आता बोला! भुसावळ भारतात नसून कुठेतरी हिंदी महासागराचे बेट असल्यासारखा विचारतोय.

"आहे ना,पूर्ण भारतातच लॉकडाऊन आहे,आणि मी भुसावळमध्ये,माझ्याच घरी आहे, सांगा काय मदत करू शकतो आपली?"

"मदत वगैरे काही नाही,पण जरा विचारायचं होतं."

"विचारा की,पण आपण कोण ते सांगा आधी."
"काय कमाल करताय डॉक्टर, ओळखलं नाही का मला?मी तो शालिग्राम,मागच्याच महिन्यात तर भेटलो,एवढ्यात विसरलात?"
"अच्छा शालिग्राम,पण लक्षात येत नाहीये,जरा अजून सांगा ना."

"अहो मी नाही का,तो,तुमचा एक मित्र असतो फॅक्टरीत,बरंच नाव आहे त्याचं,त्याच्या घराजवळ राहतो."

"अच्छा,पण नाही लक्षात येत कोण मित्र आणि कुठली फॅक्टरी नाही आठवत बघा."

"जरा द्या की स्मरणशक्तीला ताण, एक क्लू देतो,माझ्याजवळ निळ्या रंगाची स्कुटी आहे. बघा आता आठवते का ते."
"माझा एम एस जनरल सर्जरी चा व्हायव्हा सुद्धा यापेक्षा सोपा होता असं वाटू लागलं.मग मीच विषय बदलला.

"जाऊद्या, काय काम आहे ते सांगा."पण तो चिवट.

"जाऊद्या कसं? वा,वा हे काय,अजून एक क्लू  देतो,मी नेहमी बायकोला आणतो तपासायला!"

आता आमचं गायनिक हॉस्पिटल असल्यामुळे नेहमीच 90 टक्के नवरा-बायकोच तपासायला येतात. आता मात्र मी वैतागलो, म्हणालो "हरलो मी, सांगून टाक बरं!"

 मग तोही नरमला,
"अहो, मी शालीग्राम सातपुते,ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ मधल्या तुमच्या त्या अनिल का  काहीतरी नाव आहे त्याचं, बुलेट आहे त्याच्याकडे, त्याच्या गल्लीत राहतो."
मी वेळ मारून नेली,"अच्छा,तो शालीग्राम का, आठवला आठवला! कसा आहेस ?आणि बायको कशी आहे? नमस्कार सांग तिला माझा!"🙏

 "हा,हा पकडलं! लग्नच झालेलं नाहीये तर बायको कुठून असेल? मी तुमची मजा घेत होतो.सोडा!"

"अरे काय विनोदी आहेस रे तू!पण सांग ना,काय काम होतं?"

"काम काही नाही, थोडं विचारायचं होतं".....हरदासाची कथा पुन्हा मूळ पदावर.

"तसं काही नाही,एक तीन-चार दिवसांपासून नॉर्मल पोट दुखत होतं, (नॉर्मल म्हणजे काय आणि पोट दुखी मध्ये नॉर्मल आणि अबनॉर्मल असे प्रकार असतात हे मेडिकलमध्ये आम्हाला का शिकवलं नाही याचा मी विचार करत होतो)
आणि का,ते पण मला ठाऊक आहे. त्यादिवशी मित्रांसोबत घरीच चिकन बनवली होती. मस्त तिखट रस्सा होता,च्यायला,हान-हान हानला आणि दुसऱ्या दिवसापासून दुखणं सुरू झालं!घेतलं म्हणा इनो वगैरे,म्हणून बरं आहे आता. म्हणजे मी शक्यतो घरगुती औषधांवरच विश्वास ठेवतो, डॉक्टरांकडे जात नाही आणि औषधेही अगदी फारच त्रास झाला तरच. असा आहे आपला लाईफचा फ़ंडा!"
(मला त्याचा फंडा फार आवडला,फक्त त्याला आजच का तिलांजली दिल्या गेली हे नाही कळलं, आणि डॉक्टर कुठून झालो असं वाटायला लागलं.)

"बरं, आता कसंय, त्रास आहे का अजून?"

"नाही,आता बरं वाटतंय ,फक्त असं जोरात दाबलं तर दुखतय."

जोरात दाबलं तर कुणाचेही पोट दुखेल आणि मुळात जोरात दाबायचंच का म्हणून,असा बाळबोध प्रश्न माझ्या मनात आला,पण संभाषण कट शॉर्ट करण्यासाठी मी म्हणालो,"बरं बरं, औषध लिहून पाठवतो व्हाट्सअप वर बरे वाटेल त्याने."

"अच्छा,पण फार महागाची नको बरं, हो,नाहीतर घालाल शे दोनशे रुपयांनी गड्ड्यात!"

बरोबर, असे म्हणत मी फोन ठेवतो आणि हुश्श म्हणून घाम पुसत खुर्चीत बसतो,तेवढ्यात दुसरा फोन वाजतो.

 मी आता शहाणा झाला असतो, पटकन म्हणतो,
"नमस्कार ,मी डॉक्टर केळकर बोलतोय,केळकर हॉस्पिटल भुसावळ येथून,कृपा करून आपले संपूर्ण नाव ,वय, पत्ता आणि काय त्रास आहे ते सांगा.रेग्युलर पेशंट असाल तर आपल्या फाईल चा फोटो तपासण्या ट्रीटमेंट चा फोटो याच नंबर वर व्हाट्सअप वर टाका म्हणजे पटकन लक्षात येईल."

"अहो थांबा ना, इतकी काय घाई आहे,ऐका ना मी काय म्हणते ते,माझी कीनई, पाळी चुकलीय!"

आमच्या प्रॅक्टिस मधलं पाळी चुकणे हे कॉमन लक्षण आहे, आणि पाळी चुकली म्हटल्यावर मी सतर्क होतो,आणि माझ्याच हृदयाचा ठोका चुकतो!नवीन लग्न झालेलं जोडपं असेल,तर अरे वा!चुकली का पाळी! आणि पोक्त जोडपं असेल, चेहर्‍यावर अपराधीपणाची भावना असेल,तर अरेरे! चुकली का पाळी!

 पाळी वरून एक गोष्ट आठवली, एक मित्र आहे,असेल पन्नाशीचा. एकदा आला ओपीडीत.

"काय डॉक्टर,कसे आहात?बरेच दिवसात भेट नाही.तिकडे आलो होतो सहज म्हटलं भेटावं जरा!"

मला नक्की माहीत होतं की काहीतरी भानगड आहे. मीच म्हणालो,
"काय सर्व ठीक आहे ना?"

"हो ,सर्व ठीक आहे,आम्ही व्यवस्थित काळजी घेतो,आता लहान मुलगा १४ वर्षाचा झाला,गंमत आहे का मिस्टर १४ वर्ष सांभाळायची म्हणजे!"(त्याच्या कोडगेपणाचं मला कौतुक वाटलं,कारण त्यांचे प्रताप मला पूर्णपणे माहीत होते.पण या नटसम्राटाला दादही द्यावीशी वाटली.)

"असेलही वयोमानानी,मिसेसची पाळी चुकली आहे जरा!म्हणजे आमचं तसं काही नाही म्हणा, पण काय भरोसा? भूलचूक गच्चा व्हायचा,जरा देता का गोळ्या लिहून?" हसत हसत त्याने माझ्या पाठीवर जोरात दणका हाणला!

मी दिल्या गोळ्या लिहून,अशा मित्रांसाठी माझं प्रिस्क्रिप्शन तयारच असतं!मागे पान खायला जायचो रोज रात्री जेवण झाल्यावर,तेव्हा या गोळ्यांच्या दोन-चार चिठ्ठ्या जवळ ठेवायचो, मी यायच्या वेळी बरेच मित्र तिथे वाट पाहत असायचे.मात्र पानाचे पैसे कधी द्यावे लागले नाही म्हणा!

तर संध्याकाळी या मित्राचा फोन, "डॉक्टर माझं नशीबच वाईट, काय सांगू,तुम्ही दिलेल्या गोळ्या घेतल्या दुकानातून,दोनशे रुपयाच्या, घरी आलो तर मिसेस ची पाळी आलेली! नशीबच वाईट माझं!एकदा पंखा खराब झाला,वायरमनला बोलावलं, तो येऊन नुसतं त्यानी बटन दाबलं, आणि पंखा सुरू! गेले की शंभर रुपये! नशीबच वाईट."

त्यानंतर कुठे भेटला की मी विचारतो,
"का रे,पंखा सुरू आहे ना नीट?"तो ही म्हणतो,
"मस्त सुरू आहे आणि अगदी रेगुलर फिरतो आहे!"आता मात्र थांबला त्याचा पंखा कायमचा.कटकट गेली म्हणायची कायमची.

पाळी वरून अजून एक गोष्ट आठवली,युजवली पेशंट स्वतः फार कमी बोलते,बरोबर आलेले बाईच जास्त बोलते एकदा एका पेशंटला पाळी कमी जाते असं सांगायचं होतं, तर बरोबरची बाईच सांगायला लागली...."डॉक्टर इस्कु म्हावारी बहुत कम जाती है, इत्तीकम की कोई बोलेगाच नही की म्हावारी आई है!"
म्हणजे यांची काय अपेक्षा आहे अशी महावारी यावी,की सर्व मोहल्ला,सर्व गाव ,यांनी तारीफ करावी की,
"क्या आती है महावारी,इत्ती ब्लिडिंग होती की क्या बताना,पॅड के तीन-चार पाकीट खल्लास होते तीन दिनमे,देखनेवालाच घायल हो जावे,म्हावारी होना तो इनके जैसी!"

डोकं खराब होतं,पण शांतपणे ऐकावं लागतं.

हे पाळी पुराण सुरूच राहील जाऊद्या,परत जाऊ या त्या आपल्या फोन कडे.
"ऐका ना,माझी की नाही,पाळी चुकली आहे."

मग मात्र मी पटकन ताडलं की ही नवीन लग्न झालेली मुलगी आहे आहे आणि त्यांना प्रेग्नन्सी हवीच आहे,आणि घरीच युरिन टेस्ट करून टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे म्हणून आनंदी आहे. मग मी गर्भारपणात घ्यायची काळजी,आराम घेणे,जड काम न करणे,आहार,व्यायाम, योगासने,सोनोग्राफी आणि इतर तपासण्या यावर भाषण दिलं, त्यावर त्यांचा गुगलवर अभ्यास झाला होताच, माझीही परीक्षा घेतली गेली त्यांच्याकडून.गोळ्या लिहून पाठवल्या व्हाट्सअप वर. अर्धा-पाऊण तास गेला यात, असो ठेवला फोन,पाणी प्यायलो आणि एअर कंडिशनर ऑन करून बसलो, तेवढ्यात पुन्हा त्याच नंबरवरून फोन 

"डॉक्टर...ही एक नंबरची गोळी तुम्ही रिकाम्या पोटी लिहिली आहे म्हणजे कशी घ्यायची?"

"रिकामं पोट म्हणजे साधारण तीन ते चार तास पोटात काही गेलं नसावं."

"काहीच नाही?चहासुद्धा नाही?"

"नकोच,आधीच मळमळ असते या काळात."

"पण मला नाही होत अजून,आणि चहा घेतल्याशिवाय माझं तर होतच नाही, चालेल ना अर्धा कप घेतला तर? नाही म्हणू नका हो!"

"बरं बरं, घ्या." ठेवला फोन.
पाच मिनिटांनी पुन्हा,वाजला.

"गोळी कशी घ्यायची?पाण्यासोबत की दुधासोबत?"

"कशा सोबतही घ्या."

"असं नाही,काही गोळ्या दुधासोबत घ्याव्या लागतात नाही तर भलतेच साईड इफेक्ट व्हायचे,हां, तुम्ही सांगा,आम्ही सुशिक्षित आहोत,कोणतीच रीस्क घ्यायची नाही बरंका."

म्हटलं,"घ्या दुधासोबत"आणि सांगून टाकलं गाईचं,म्हशीचं,अगदी बकरीचं दुधही चालेल म्हणून ,हो नाहीतर थोड्यावेळाने पुन्हा फोन यायचा आणि आलाच की,आता विचारत होती की आणली गोळी पण नाव जरा वेगळं आहे,आतलं औषध तेच आहे चालेल का?

"चालेल,"मी म्हणालो.

"नक्की ना ?नाहीतर शोधते दुसरीकडे,आमचे हे जरा आळशीच  आहेत,जरा फिरायला नको,मिळेल त्या जवळच्या दुकानातून घेऊन आलेत."

"हो चालेल,कंपनी पण चांगली आहे."

"नाही नकोच भानगड,मिळाली तर तीच ओरिजिनल आणते,"आणि ठेवला फोन.

अर्ध्या तासाने परत फोन,
"डॉक्टर ही तीन नंबरची गोळी फारच मोठी आहे, एखादी छोटी द्या ना नाहीतर तोडून खाल्ली तर चालेल का?"

आठ दिवसापूर्वी मी याच बाईला पाणीपुरीच्या गाडीवर मगरी सारखा जबडा उघडून मटामट पाणी पुऱ्या हाणतांना पाहिलं होतं आणि ही गोळी मोठी वाटते तिला!

"हो, बाई तोडून खा,पावडर करून खा,तुकडे तुकडे करून खा,चोखून खा,चाटून खा!"

मी सर्व पर्याय सांगून टाकले एकदाचे आणि फोन ठेवला.

अर्ध्या तासानी परत तिचाच फोन.
"एक सांगायचं राहिलं डॉक्टर,तुम्ही मला जे सांगितलं ना,की आराम करा,जास्ती कामं करू नका  वगैरे,तेच माझ्या सासूचा फोन येईल तुम्हाला,त्यांनाही सांगा,माझी सासू फार खराब आहे!"(माझ्याकडे येणाऱ्या सर्व पेशंट्सच्या सासवा का खराब असतात हे मला अजून उमगलेले नाही.😜)
"बरं बरं,सांगतो" असं म्हणून ठेवला फोनआणि त्या दिवसासाठी तो नंबर ब्लॉक केला.

तर असे हे लॉकडाऊन चे तीन टप्पे टेलिमेडिसीन केल्यावर काल जेव्हा मोदीजींनी चौथा टप्पा जाहीर केला तेव्हा मात्र मी पेपर मध्ये जाहिरात दिली की टेलिमेडिसीनच्या या कामासाठी असिस्टंट डॉक्टर पाहिजे म्हणून.लग्न झालेला म्हणजे सोशिक, हुशार आणि शांत डोक्याचा आणि या प्रोफेशनमध्ये  डोक्यावरचे केस गळण्याची ची भीती असल्यामुळे शक्यतो टक्कल असलेला.😜
आणि पहिलाच फोन आला त्याला मी हो म्हटलं कारण त्याचं नाव होतं डॉक्टर ईक्बाल!आता लवकरच त्याचं नाव बदलून आपल्याला डॉक्टर बिनबाल ठेवावे लागेल हा भाग वेगळा!तर उद्यापासून आपले फोन हे डॉक्टर साहेब घेतील,पाहूया किती दिवस टिकतोय त्यांचा स्टॅमिना!

नमस्कार!🙏🙏

Comments

  1. छान, बऱ्याच दिवसांनी निखळ विनोदी वाचायला मिळालं 😝😃🤓😃

    ReplyDelete
    Replies
    1. ऑडीओ पण छान आहे, पु,ल, देशपांडे ह्यांच्या style ची आठवण होते,
      👌👌👍

      Delete
    2. धन्यवाद श्रीकांत.

      Delete
  2. डॉक्टर साहेब तुम्ही विनोदी अनुभवकथनाचे जाहीर कार्यक्रम करा तुफान हिट होतील.
    तुमची लेखन शैली तर उत्तम आहेच पण कथा रंगवून सांगण्याची पद्धत सुद्धा दाद देण्याजोगी आहे.

    उज्ज्वल सराफ

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद उज्जवल,तुझ्यापासूनच प्रेरणा घेतली आहे राजा!

      Delete
  3. तुमचा अजून एक पैलू समोर आला,टेबल टेनिस, हारमोनिका, विनोदवीर, आणि हा सुंदर blog

    ReplyDelete
  4. 😂🤣😂खुपच छान भरपुर मज्जा आली🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनक...