संगीत या प्रकाराशी लहानपणापासूनच काही फारसे सख्य नव्हते माझे.शाळेची पूर्ण वर्षे अभ्यास आणि मैदानी खेळ यातच गेला.शाळेतून घरी आल्याबरोबर दप्तर फेकले,कपडे बदलले,आणि आईनी तयार ठेवलेले दूध-बिस्कीट खाल्लं,की लगेच बाहेर! गोट्या,विटीदांडू,लगोरच्या,क्रिकेट, कबड्डी,आणि पावसाळ्यात खुपसणी हे ठरलेलं असायचं.आठवी-नववीत टेबल टेनिसची गोडी लागली,आणि १९९० सालापासून टेनिसची,ती मात्र आजतागायत पर्यंत कायम आहे! शनिवार-रविवारी दुपारी गळ्यात गुल्लेर,ज्याला खान्देशात "क्याटी"म्हणायचे,आणि खिशात गोटे घेऊन चिंचा, गोराटीम्बल्या,ज्याला आम्ही इंग्लिश चिंचा असेही म्हणायचो,आणि कैऱ्या तोडून खाण्याचा कार्यक्रम व्हायचा!(आणि सोबत आमच्या गोट्यानं कौलं फुटल्यामुळे बोलणी खाण्याचाही) खिशात तिखट-मिठाच्या पुड्या ठेवलेल्या असायच्या लावून खायला!पाणी सुटलं ना तोंडाला?असो! अंधार पडला की घरी परतायचे,हातपाय-तोंड धुवून शुभंकरोती म्हणायची,टाकणं टाकल्यासारखा गृहपाठ करायचा,जेवायचं आणि झोपायचं असा दिनक्रम असे,यात संगीतासाठी होता कुठं वेळ? शाळेतही वक्तृत्व किंवा वादविवाद स्पर्धेत भाग घ्यायचो पण गायन....छे,आम्हीही कधी प्रयत्न...