Skip to main content

चहा

चहा

आज सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर आईच्या हातचा पहिल्या वाफेच्या चहाचा आस्वाद घेत आणि सोबत चौकीदाराने जिन्याच्या जाळीत अडकवलेले वर्तमानपत्र चाळीत गच्चीतल्या झोपाळ्यावर बसलो होतो,आणि गर्मीनं दिवसभर अंगाची लाही लाही करणाऱ्या ग्रीष्म ऋतूच्या सकाळच्या वेळच्या थंडगार झुळुकेची मजा घेत होतो.
सुरुवात करतांना पहिला घोट बशीत ओतलेल्या चहाचा घ्यायचा आणि एकदा तो किती गरम आहे याचा अंदाज आला,की उरलेला मग कपाने प्यायचा हा शिरस्ता! यामागे दोन उद्देश : एक,जीभ भाजण्याची भीती नाही,आणि दोन,कपातल्या चहाची लेव्हल कमी झाल्याने पेपरात अर्धे लक्ष्य असल्यामुळे हिंदकळून गरम चहा अंगावर सांडण्याचीही भीती नाही.असो.

दोन वर्षांपूर्वी केरळ ट्रीपला गेलो असतांना, मुन्नारला भेट दिली होती,त्याठिकाचे सुंदर चहाचे मळे आणि चहा बनवण्याच्या फॅक्ट्रीची भेट आठवली.तिथे ऐकलेल्या चहाच्या इतिहासाची उजळणी थोडक्यात करतो.

कॅमेलिया सायनेन्सिस असे बोटॅनिकल नाव असणाऱ्या चहाचा उगम हजारो वर्षांपूर्वी चीनमध्ये झाला.त्यानंतर जवळजवळ जगातील सर्वच देशात त्याचा वापर होऊ लागला.चहाच्या उत्पादनावरील चीनची मक्तेदारी संपवण्यास ब्रिटिशांनी भारत आणि श्रीलंकेत चहाचे मळे सुरू केले.भारतात आसाम,दार्जिलिंग,निलगिरी आणि मुन्नार येथे चहाचे मळे,ज्याला "टी इस्टेट" म्हणतात,आहेत.
चहाचे मुख्यतः सहा प्रकार आहेत. ब्लॅक टी, ग्रीन टी, उलांग टी, व्हाईट टी,यलो टी आणि फरमेंटेड टी. चहाच्या मळ्यातून पाने खुडण्यापासून ते दुकानात विक्रीला उपलब्ध होण्यापर्यंत बरीच लांबलचक प्रक्रिया असते.आपण नेहेमी वापरतो तो चहा बहुधा ब्लॅक टी असतो.त्यातही CTC(Crush,Tear,Curl),(दाणेदार किंवा भुकटी) आणि चहापत्ती (Leaf tea) यातीलच प्रकार जास्त चालतो.
चहामध्ये दूध आणि साखर टाकण्याची प्रथा ब्रिटिशांनी सुरू केली,तरी खऱ्या चवीनं चहा पिणारे लोक कोरा चहाच पितात.

*भारत आणि चहा*

-भारत हा जगातील चहाचा  सर्वात मोठा उत्पादक आणि वापरकर्ता आहे.जगातील २७% चहा भारतात बनतो.

-भारत हा चहाचा एक मुख्य निर्यातदार आहे आणि जगाच्या निर्यातीतील १३% निर्यात एकटा भारत करतो.

-भारतातील ८५% लोक चहा पितात.आणि वार्षिक ६०० दशलक्ष किलो चहा खपतो.

-भारतातील चहाचा उद्द्योग फार मोठा आहे.जवळजवळ १३ हजार चहाचे मळे असून यात २० लाख लोक काम करतात.९ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होते. १० दशलक्ष लोकांची रोजीरोटी चहावर अवलंबून आहे.भारतातील चहा उद्द्योगात ५१% स्त्री कामगार आहेत आणि त्यांना पुरुषांइतकाच पगार मिळतो.

-भारतात १६९२ पंजिकृत चहा निर्माते आहेत,२२०० पंजिकृत निर्यातदार आहेत,५५४८ पंजिकृत मोठे खरीददार आहेत आणि ९ मोठी लिलाव केंद्रे आहेत.

आपल्या ओठावर ढोबळ मानाने जरी फक्त ब्रूक बॉण्ड रेड लेबल  आणि लिप्टन हीच नावे  असली,तरी आठ कंपन्या नामांकित आहेत :

-हिंदुस्तान लिव्हर
-टाटा टी
-डंकन टी
-गुडरीक ग्रुप
-हसमुखराय आणि कं.
-गिरनार चहा
-वाघ बकरी (आता हे काय नाव आहे,पण आहे,आणि खपतोही आहे!)
-सपट

आता आपल्याकडे चहा बनविण्याच्या अनेकविध पद्धती आहेत,आणि प्रत्येक गृहिणीची आपली एक खास पद्धत आणि सवय असते,त्यात सहसा बदल होत नाही.पाणी गरम करायला ठेवायचे,त्यात साखर विरघळवायची,उकळी आल्यावर चहापत्ती टाकून झाकण टाकायचे व गॅस बंद करायचा ही झाली एक पद्धत,चहापत्ती टाकून खूप वेळ उकळवायचा ही दुसरी,साखर नंतर टाकायची ही तिसरी,साखर मुळात टाकायचीच नाही,ज्यानी त्यांनी आपली आपली टाकून घ्यायची ही अजून एक.या सर्वात हे मिश्रण गाळल्यावर दूध टाकतात.
काही लोक पूर्ण दूध किंवा दूध-पाणी एकत्र करूनच साखर चहा टाकून उकळवतात. यात आलं,वेलदोडा,थोडी मिरपूड टाकली की झाला मसाला चहा!

हा झाला घरचा उद्द्योग,पण काही प्रसिध्द चहाच्या टपऱ्या,ठेले पाहिलेत का,जिथे मोठ्या प्रमाणावर चहा बनतो आणि खपतो.(घोटलेला=घोटेल,आटवलेला=आवटेल) मोठ्ठं अल्युमिनीयमचं भांडं,त्यात दूध-पाण्याचं मिश्रण,ढवळायला एक मोठा डाव,साखर-चहा टाकून घोटायचं, उतू न जाऊ देता!पातेल्यातल्या मिश्रणाच्या कडांवर जमलेली चहापत्ती सारखी त्या डावाने खरवडायची आणि ढवळायची. मधेच साखर-पत्तीचा समन्वय जमलाय का हे पहायला डावानी ते गरम मिश्रण डाव्या हाताच्या ओंजळीत घेऊन चाखायचे. हा चहा गाळण्यानी न गाठता दुसऱ्या एका मोठ्या पातेल्यावर फडकं ठेवून त्यांनी गाळायचं, आणि त्या फडक्याची घडी करून चहापत्ती पिळून घ्यायची,व्वा! हे सर्व चाललं असतं उघड्यावर,सर्व गिर्हाईक पहात ताटकळत उभे असतांना,त्याच हातानी ढवळतोय, त्यांनीच चाखतोय,उष्ट-माष्ट कुणाला काही पर्वा नाही ना कुणाला खंत!
हा चहा मग एका मोठ्या किटलीत भरायचा आणि ती गॅसवर ठेवायची पुन्हा.इथले काचेचे ग्लास असतात खाली निमुळते,त्यामुळे चहा मावतो फारच कमी आणि भरायचा पाऊणच ग्लास,असो.झक्कास चव लागली की बाकी सर्व विसरायला होतं हेच खरं! हे सर्व उष्टे ग्लास विसळायला असते एक अर्धी बादली पाणी.द्रौपदीच्या थाळीसारखी ही बादली कितीही ग्लास धुवू शकते.(महाभारतात चहा नव्हता नाहीतर त्या ऋषींनी द्रौपदीला चहाच मागितला असता)

आता,निरनिराळ्या गावात निरनिराळी नावं आहेत चहाच्या दर्जानुसार : स्पेशल,बादशाही,अमृततुल्य,संगम,गुलाबी,मारामारी(?),खुन्नस,ई. जळगावला बीजे मार्केटमध्ये आमचा खास विजू चहावाला आहे,त्याच्याकडे "पलंगतोड" चहा मिळतो! मी जर कधी चहाची टपरी काढली,तर "बोलाचाली" चहा ३ रुपये,"वादावादी"चहा  ४ रुपये,हमरीतुमरी" चहा ५ रुपये,"भांडाभांडी"चहा ६ रुपये,"फोडाझोडी" चहा ७ रुपये,आणि शेवटी "खुनाखुनी" चहा १० रुपये असा चहाच्या "पिव्वरपणाच्या" ग्रेडिंगनुसार नावे आणि किमती ठेवायचा विचार आहे!🙏कशी वाटली आयडिया?

अजून एक गम्मत सांगतो,आधी पूर्ण ग्लासभरून चहा म्हणजे "फुल" आणि अर्धा म्हणजे "हाफ" अशा संज्ञा प्रचलित होत्या. मग त्या हाफ ला "कट" म्हणू लागले,होता होता त्याचा अपभ्रंश "कटिंग" असा झाला,आणि तो इतका तोंडवळणी पडलाय की सुटबुट-टाय लावलेले लोकही मुंबईला कटिंग चाय ऑर्डर करतांना दिसतात पॉश हॉटेल्समध्ये.(एकदा रजनीकांत चहा पीत होता,अचानक त्याने खिशातून कात्री काढली आणि चहाचे कापून दोन तुकडे केले,तेंव्हापासून कटिंग चहाचा उदय झाला असेही ऐकिवात आहे म्हणे!) आता तर फाईव्ह स्टार हॉटेल्स मध्येही कटिंग चहा मिळतो.
Cutting chai 50 Rs
Cutting masala chai 75 Rs. असे मेन्यूकार्ड वर लिहिले असते. तो सर्व्ह करायला कळकट तारेच्या जाळीच्या स्टँड मध्ये काचेच्या ग्लासात आणतात. याठिकाणी मात्र कटिंग म्हणजे ग्राहकांची हजामत ही उक्ती बरोबर लागू पडते!😜

चहाच्या टपरीवरून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते : साधारणतः तीस वर्षांपूर्वी आम्ही जेंव्हा दवाखाना सुरू केला भुसावळला हनुमान नगरमध्ये, तेंव्हा हा भाग जवळजवळ गावाबाहेर होता आणि पेशन्ट आणि त्यांच्या नातेवाईकांना चहासाठी रेल्वे स्टेशन गाठावे लागायचे.मग रात्रीच्या वेळी गैरसोय होऊ नये म्हणून आमची आई त्यांना घरातून चहा पाठवायची,काही काही दिवसांनी लोकांनी दिवसाही आईला तुम्हीच चहा द्या अशी गळ घालणे सुरू केले.सुरुवातीला फुकट द्यायची,पण कोणत्याही फुकट दिलेल्या वस्तूला मोल नसतं आणि आपलंही काम थोडं कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही एक रुपया कप घेऊ लागलो.बिचाऱ्या आईला दिवसाकाठी पन्नास-साठ कप चहा बनवावा लागत असे.लोकांना इतका आवडायचा,की भेटायला आलेल्या सर्व पाहुण्यांना ते आग्रहाने पाजायचे. याहूनही कळस म्हणजे एक डिलिव्हरी झालेली बाई (यावलची आसमाबी, नावंही आठवतंय मला) बरेच दिवसपर्यंत भुसावळला काही इतर कामानी आली,तरी आईचा चहा प्यायला आमच्या दवाखान्यात जरूर यायची,"हमे चेकप नही करवाना है,सिर्फ चाय पीना है,अम्माको बोलो,आसमा आयी है",असं सांगायची,आणि आईसुद्धा प्रेमानी एक पैसाही न घेता तिला चहा जरूर पाजायची! कालांतराने जवळपास तीन-चार टपऱ्या सुरू झाल्या आणि आईचा चहा देणे बंद झाले.आता आईचा ताण हलका करायला आईची एक प्रेमळ असिस्टंट,प्रतिभाताई,(आमच्या सर्वांची "पतूमावशी") तयार झालीय,तिच्या चहाची लज्जत काही औरच आहे,संध्याकाळी आम्ही सगळे वाट पहात असतो पतूमावशी येण्याची)

ब्रिटिश लोकांनी काळ्या किंवा लाल चहामध्ये दूध-साखर घालून पिणे शिकवले त्याबद्दल त्यांचा आभारी आहे मी,पण,काही गोष्टी मला खटकतात.एक म्हणजे,चहा डायरेक्ट कपात न आणता,लाल चहा,दूध,वेगवेगळ्या किटलीत आणायचे,त्यावर गरम रहावा म्हणून किटली झाकायला उबदार कपड्याचं "टीकोजी" नावाचे कव्हर,साखर किंवा शुगर क्यूब्स (आता शुगर फ्री च्या पुड्या) मग नाजूकपणे ते एकेक करून कपात मिसळवायचे आणि मग तो चहा प्यायचा! अहो,एवढा वेळ कुणाला आहे हा राजेशाही थाट करायला,आणि या सर्व उद्द्योगात तो चहा थंड होतो त्याचं काय? दुसरं म्हणजे पिण्याची पद्धत : मुळीच आवाज यायला नको तोंडाचा, बॅड मॅनर्स असतात म्हणे ते! अरे,या बावळटांना फुरका मारून चहा(आणि कढी) पिण्याची लज्जत कधी समजणारच नाही.आणि शास्त्र आहे त्यात,फुरका मारतांना ओढलेल्या हवेनी तो चहा त्यांच्या भाषेत म्हणजे "ऑप्टिमम" थंड होतो आणि जीभ भाजत नाही,कसं समजवावं या शहाण्यांना? एक अजून ऑब्जेक्शन आहे माझं,ते म्हणजे,चहा सोबत बिस्कीट खातांना,बिस्कीट चहात बुडवायचं नाही,तर बिस्किटाचा कोरडा तुकडा खायचा,मग आवाज न करता हळूच चहा प्यायचा,शुद्ध मूर्खपणा वाटतो मला हा! मी कुणाचीही तमा न बाळगता कुठेही असलो तरी,आणि कितीही लोक बघत असले तरी,बिस्कीट चहात बुडवूनच खातो!(आणि माझा अनुभव आहे,की मी असं केल्यानं आजूबाजूचे बरेच लोक बुडवून खाऊ लागतात!) बरेचदा ग्लुकोज किंवा मारी बिस्कीट गरम चहात बुडवल्यावर मऊ होऊन त्याचा तुकडा चहात पडतो,मग शिताफीने चहात बोट बुडवून तो बोटावर घेऊन अलगद तोंडात टाकायचा आणि थोडा चटका बसलेलं बोटही तोंडात टाकून थंड करायचं,ही सर्कस एकदाची जमली की कोण आनंद होतो म्हणून सांगू! काही लोक चहात पडलेल्या तुकड्याला दुसऱ्या बिस्किटाने बाहेर काढू पाहतात,आणि दोन्ही बिस्किटे हातची घालवून बसतात,असो!

सुटसुटीतपणा येण्यासाठी टी बॅग्ज निघाल्यात,पण अस्सल चहाची मजा काही येत नाही त्या चहात! टीव्हीवरच्या जाहिरातीमुळे त्या लोकप्रिय झाल्या हे मात्र खरे.आठवतेय ती जाहिरात,"डीप डीप डीप, ऍड या लिटल शुगर अँड मिल्क ,अँड इट इज रेडी टू सिप", किंवा उस्ताद झाकीर हुसेन म्हणतोय,"वाह ताज बोलीये!" मला आधी आवडायची ती म्हणजे मिशीवर ताव देऊन एक पहेलवान दाखवायचे आणि मागून आवाज यायचा,"त्यांना पाहिजे टायगर चहा!" आताच्या घडीला ब्रूक बॉण्ड रेड लेबलची सचिन खेडेकर करतो,मुसलमान शेजारीणीच्या घरात पहिले नाही म्हणून,आणि मग चहाच्या सुगंधानी आपोआप ओढल्या जातो ती!

आताच्या धकाधकीच्या जगात आणि फास्ट फूडच्या जमान्यात,सगळा झटपट मामला आहे,चहाचेही वेंडिंग मशिन्स निघालेत,पण त्यात मजा नाही,निभावून न्यायची तल्लफ कशीबशी एवढेच! मात्र गिरनार कंपनीने रेडी टी मिक्स च्या बॅग्स काढल्या आहेत,खूप छान आहेत त्या. आम्ही युरोपला गेलो असतांना नेल्या होत्या सोबत.युरोपमध्ये चहा आपल्या दृष्टीने खूप महाग वाटतो( २ युरो म्हणजे १६० रुपये),पण प्रत्येक हॉटेलमध्ये उकळते पाणी चोवीस तास फुकट मिळते,एका कपात एक गिरनार मसाला चहाची पुडी टाकली की लज्जतदार चहा तयार.दूध-साखर,सर्व प्रीमिक्सड!(आणि किंमत,फक्त १४ रुपये!)

आताची ही नवीन पिढी, इंटरनेट आणि,जाहिरातींना बळी पडून हेल्थ कॉन्शस झालेले(भरकटलेले) आमच्या पिढीतले लोक "ग्रीन टी","आईस्ड टी","लेमन टी"यासारख्या फालतू पेयांच्या आहारी जाऊन चहाची खरी मजा घालवून बसलेयत,असो!

रेल्वेत मिळणारा चहा हा अजून एक मजेदार विषय आहे. प्रत्येक चहावाल्याची ओरडण्याची पद्धत वेगळी असते.काही कर्कश्श आवाजात "चाय बोलो चाय","हे मस्साला चाय",किंचाळतात, तर काही नुसतेच "छा"अशी हळुवार साद घालून आपण काही बोलेपर्यंत अंतर्धान पावले असतात! महाराष्ट्र सोडा,पण मध्यप्रदेश,उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये प्रत्येक स्टेशनवर अगदी रात्रीचे कितीही वाजले असुद्या,चहा हा मिळतोच,आणि अगदी या भलत्या वेळी चहा पिणारे दर्दी लोकही भरपूर असतात.बंगाल आणि बिहार मध्ये चहा हा आपली पणती कशी असते,त्याप्रकारच्या मातीच्या खोलगट पात्रात देतात,याला "चुक्का"किंवा "कुल्ह्ड"म्हणतात.बंगाली लोक चहा न पिता खातात याचाही शोध मला कलकत्त्याला लागला जेंव्हा मला विचारण्यात आले की "चा खाबे?"

भारतात चहा पाजणे,चहाला बोलावणे,हे मानाचे लक्षण समजल्या जाते,आणि मैत्री घट्ट करणारं एक जबरदस्त संप्रेरक आहे.(तसंच तंबाखू, सिगरेट आणि दारूहीआहे म्हणा,पण ती व्यसनं आरोग्याला घातक.)
आठवतंय का ते गाणं,"शायद मेरी शादीका खयाल दिल मे आया है,इसिलीये मम्मीने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है!)

पुरे झाले आता हे चहापुराण.
ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!

या आपण सर्वजण भुसावळला आमच्याकडे चहा प्यायला,सकाळी आलात तर आईच्या हातचा,संध्याकाळी आलात तर पतूमावशीच्या हातचा!🙏🙏

Comments

  1. Sir extremely beautiful write up on Tea in India.
    I am sure no where in world they must be having masala tea. Also no where the tea is made by spinning the hot boiling tea by hand and served hot.
    Chinese invented tea nut we popularised tea and made it world famous.
    Great job writing on such a issue

    ReplyDelete
  2. You are right sir,as you have the widest experience of moving around the world & seeing the world with vision & not just the sight.

    ReplyDelete
  3. Excellent... Around a decade back I had a thought/ idea of having a tea shops chain. (Branded टपरी chain). Further to it, based on your liking and timing the tea would be served (bed tea) on Sunday / Saturday morning at your home..... We will talk about it when we meet.

    Excellent article...

    ReplyDelete
    Replies
    1. Wow,great idea sirjee. Branded readymade tea served at your doorstep,at any time!

      Delete
  4. अनिल,आप खुश तो हमभी खुश!💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनक...