Skip to main content

सिझेरियन, धरलं तर चावतंय,सोडलं तर पळतंय!



सिझेरियनचा उल्लेख इतिहासात प्रथम १५८१ व १५९८ सालात मिळतो.सिझेरीयन या शब्दाचा उगम नक्की माहीत नसला तरी ज्युलियस सिझरचा जन्म या प्रकाराने झाला अशी वदंता आहे.सिझेरियन शब्द लॅटिन भाषेतील कॅडेर (Cadere) या शब्दावरून आला असावा.कॅडेर म्हणजे कापणे(To cut)अशा प्रकारे जन्मलेल्या मुलांना सिझन्स (Caesons)म्हणतात.बऱ्याच धर्मातील पौराणिक कथांमधून पोट कापून देवी-देवतांच्या जन्माच्या कथा आहेत,उदा.ग्रीक पौराणिक कथेत त्यांच्या औषधशास्त्राचे देव अस्क्लेपियस यांचा जन्म त्यांचे वडील अपोलो यांनी त्यांची आई कोरोनीस यांचे सिझेरियन करून केला.नोंदविल्या गेलेली सिझेरियन डिलिव्हरी सन १८०० च्या काळात आढळते.
सन १८४६ मध्ये भूल देण्यासाठी "ईथर" चा शोध लागला.त्यानंतर "क्लोरोफॉर्म" चा वापर राणी व्हिक्टोरियाने आपल्या दोन्ही अपत्यांच्या डिलीवरीसाठी केला.

त्यावेळी मोठा प्रश्न होता जीवघेणा रक्तस्त्राव आणि जखमेत होणारा जंतुसंसर्ग!(Infection) १८६० मध्ये सर जोसेफ लिस्टर यांनी त्यासाठी कार्बोलीक ऍसिडचा वापर सुरू केला त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया करतांना दरवेळी नवीन धुतलेले,स्वच्छ  कपडे वापरणे,हातमोजे बदलणे,यामुळे जखम चिघळण्यावर अंकुश आला. सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी १९२८ मध्ये पेनिसिलीन हे प्रतिजैविक (Antibiotic) शोधणे ही वैद्यकीय क्षेत्रातली एक क्रांतीकारी घटना होती. पूर्वी पोटावरचा व गर्भाशयावरचा छेद उघडा ठेवत असत,त्यामुळे रक्तस्त्रावाने पेशन्ट दगावत असे.मग चांदीच्या तारेने गर्भपिशवी शिवण्याचा प्रयोग झाला ज्यामुळे रक्तस्त्राव होणे बंद झाले.या सर्व तंत्रात प्रगती होत गेली व त्यातून आजच्या आधुनिक सिझेरियन डिलीवरीचा जन्म झाला-ज्यात एक तासाच्या आत शस्त्रक्रिया पार पडून माता आणि बाळ यांचा जीव वाचविल्या जातो.

आता,कुठल्या केसमध्ये सिझेरियन करावे लागते याची कारणे
 थोडक्यात पाहूया :

A.मातेशी संबंधित कारणे:

१.संकोचलेला कटीप्रदेश(Contracted pelvis) ज्यामध्ये बाळास खाली सरकण्यास जागाच अपुरी असते.
२.चिकटलेली जुळी बाळे (Conjoint twins)
३.प्रसूतिमार्गातील ट्यूमरमुळे उत्पन्न होणारा अडथळा.
४.आधीच्या झालेल्या सिझेरियन शस्त्रक्रिया ज्यामुळे व्रण खूप नाजुक झालेला आहे(Scar weakness or impending rupture)

B.बाळाशी संबंधित कारणे :

१.बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होणे व कमीच राहणे(persistent foetal bradycardia)
२.बाळ आडवे किंवा पाहिलटकरीण स्त्रीमध्ये पायाळू असणे(Transverse lie or flexed breech position in a primipara)
३.बाळाभोवती गर्भजल कमी असणे(oligohydramnios)किंवा बाळाच्या गळ्याभोवती नाळेचे वेढे असणे ही कारणे *नाहीत*,परंतु यासोबत रंगीत सोनोग्राफीत (Colour Doppler studies)बाळाकडे जाणारा रक्तप्रवाह बाधित झाला असल्यास(foetal hypoxia).
४.कार्डियोटोकोग्राफ या मशिनद्वारे केलेल्या ग्राफ मध्ये बाळास जीवघेणा धोका वाटल्यास(abnormal or nonreactive result on Cardiotocography machine)

C.माता व बाळ दोहोंशी संबंधित कारणे :

१.वार सुटणे व रक्तस्त्राव होणे(Abruptio placenta)
२.गर्भाशयाच्या मुखावर असलेली वार(Placenta praevia)
३.बाळाचे डोके प्रसूतिमार्गापेक्षा मोठे असणे(Cephalo-pelvic disproportion)
४.प्रलंबित प्रसूती(Prolonged Labour)
५.पूर्ण दिवस भरल्यावरही नैसर्गिक कळा न आल्यामुळे प्रसूती होण्यास केलेल्या प्रयत्नांना यश न आल्यास(Failed Induction of Labour)

सिझेरियन शस्त्रक्रियेत देण्यात येणारी भूल(Anaesthesia)
सिझेरियनसाठी सर्वसाधारणपणे ठराविक जागेपुरती भूल देतात(Regional-Spinal-Epidural Anaesthesia)यामुळे बाळाला कुठलाही धोका उद्भवत नाही.काही गुंतागुंतीच्या केसेसमध्ये मात्र पूर्ण भूल द्यावी लागते(General Anaesthesia) मज्जारज्जूच्या आवरणामध्ये नळी टाकून त्यातून वारंवार भुलेचे औषध टोचून वेदनारहित प्रसूती करता येते (Continious Epidural Anaesthesia) मात्र त्यासाठी ५-१२ तास पूर्णवेळ भुलतज्ञ हजर असावे लावतात.

सिझेरियन शस्त्रक्रियेची पद्धत :
यामध्ये पोटावर अगदी खालच्या बाजूस सर्वसाधारणपणे आडवा छेद(Transverse or Pfannensteil's incision) घेतल्या जातो,कधीकधी उभा घ्यावा लागतो.आडव्या छेदामुळे पुढील काळात होणाऱ्या हर्नियाची(Incisional Hernia) शक्यता कमी असते व तो व्रण दिसतही नाही(Cosmetic Scar) सिझेरियन नंतर साधारणतः २४ तासाने अन्नपाणी देण्याची प्रक्रिया सुरू करतात आणि ४८ तासात माता स्वतः उठबस करू लागते,आणि काही गुंतागुंत नसल्यास ४थ्या दिवशी घरीही जाऊ शकते!याठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते,की विज्ञानाच्या प्रगतीमुळे भूल आणि शस्त्रक्रिया जरी खूप सुकर आणि सुरक्षित झाली असली तरी शेवटी ते एक मेजर ऑपरेशन आहे आणि त्यातही काही धोके असतातच.ब्लडप्रेशर अचानक कमी होणे(Spinal Shock),शस्त्रक्रियेदरम्यान आतडी,(intestines)लघवीची पिशवी(urinary bladder)अथवा इतर अवयव यांना होऊ शकणारी ईजा,ऑपरेशन नंतर आतड्यांचे काम सुरू व्ह्यायला वेळ लागणे आणि पोट फुगणे(Paralytic ileus)ऑपरेशनच्या व्रणाला आतडी चिकटून पीळ पडणे(Intestinal obstruction)इत्यादी गुंतागुंत कोणत्याही केसमध्ये होऊ शकते,त्यामुळेच सर्व साधनसामुग्रीने सज्ज असलेल्या थिएटरमध्येच ही शस्त्रक्रिया करतात.निष्णात,अनुभवी सर्जन,प्रशिक्षित स्टाफ,कुशल अनेस्थेटीस्ट याचबरोबर रक्तपेढीची उपलब्धता या बाबीसुद्धा ध्यानात ठेवाव्या लागतात. बरं, बाळंतपणाची वेळ काही सांगून येत नाही,त्यामुळे स्त्रीरोगतज्ञास २४ तास सचेत(Alert,on the toes) रहावेच लागते.
अजून एक महत्वाची गोष्ट ईथे सांगावीशी वाटते म्हणजे जे धोके सिझेरियन डिलिव्हरी मध्ये आहेत त्यातले अनेस्थेशीया आणि ऑपरेशनशी संबंधित धोके वजा जाता ईतर सर्व धोके नॉर्मल डिलीवरीमध्ये असतातच (जसे,गर्भाशय आकुंचन न पावल्यामुळे होणारा रक्तस्त्राव(Post partum haemorrhage),(ज्यानी अभिनेत्री स्मिता पाटीलचा मृत्यू झाला) गर्भाशयमुखास होणारी ईजा(Cervical tears),योनीमार्गास होणारी ईजा,(Vaginal tears)प्रलंबित प्रसूतीमुळे लघवीच्या पिशवीस होणारी ईजा(bladder injury)प्रसूती सुलभ व्हावी म्हणून योनीमार्गास छेद देऊन तो टाके देऊन शिवतात,ती जखम दुखणे आणि टाक्यात इन्फेक्शन होणे(Episiotomy pain & infection),आणि सर्वात भीतीदायक म्हणजे ऍमनीऑटिक फ्लूईड एम्बोलीजम(Amniotic fluid embolism).
यासोबत तितकेच महत्वाची म्हणचे बाळाची काळजी : लगेच रडायला पाहिजे,श्वास घ्यायला पाहिजे,शरीराचे तापमान राखायला हवे,कारण बाळंतपणात बाळाच्या मेंदूला ऑक्सिजन कमी पडला तर मंदबुद्धी राहून पूर्ण आयुष्याचे नुकसान!त्यासाठी नवजात शिशुरोगतज्ञ त्याच्या सर्व साधनांसहित हजर हवाच! म्हणजे दोन जीवांची काळजी,उगाच नाही बाळांतपणाला स्त्रीचा पुनर्जन्म म्हणतात! एवढे सर्व असूनही समाज "नॉर्मल"ती डिलिव्हरी आणि "अबनॉर्मल" ते सिझेरियन अशाच नजरेनी पाहतो याचा खेद वाटतो.😔

*काही समज व गैरसमज*

प्रसूतिशास्त्र हा एक अतिशय "गुगली"म्हणता येईल असा विषय आहे.बाळंतपण कधी अतिशय सोपे(डॉक्टर व पेशंटसाठी) तर कधी अतिशय कठीण,भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणणारे,सारे कौशल्य पणाला लावावे लागणारे असते.या विषयात इतकी विविधता,ईतके बारकावे आहेत,की सर्वसामान्य जनतेस त्याचे गांभीर्य कळत नाही."आमच्या वेळेस असं नव्हतं,आता सर्व बदललंय"असं खूप लोक म्हणतांना दिसतात.जुनं ते सर्व चांगलं आणि नवीन ते सर्व खराब हे मानणं कितपत योग्य आहे?


*काळातील बदल*
बदल हा  निसर्गाचा नियम आहे.
बदला किंवा नष्ट व्हा!
(Change is the rule of nature,either change or perish!)
मागची आणि आत्ताची पिढी यामध्ये बाळंतपणाविषयी जे बदल जाणवतात त्यामागची कारणे ढोबळमानानी खालील आहेत :
१. शिक्षण,प्रसारमाध्यमे आणि इंटरनेट यामुळे जोडप्यांची जागरुकता(Awareness) वाढलीय.अगदी सुरुवातीपासूनच डॉक्टरांकडे जाऊन सल्ला,सोनोग्राफी,रक्त-लघवीच्या तपासण्या,आहारविषयक माहिती घेऊन नीट काळजी घेण्याकडे कल वाढलाय.
२.एक किंवा दोनच अपत्ये असावीत,ती पूर्णपणे सुदृढ असावीत,त्यामधील अंतर योग्य असावे,त्यांचे संगोपन नीट करता यावे या भावना वाढीस लागल्यात.पूर्वीच्या काळी सुविधा नसल्यामुळे बरीच बाळंतपणे घरीच व्हायची,त्यात माता आणि बालमृत्यूंचे प्रमाण बरेच होते.बाळंतपण सुखरूप झाले तरी बाळ तीन वर्षांचे होईपर्यंत न्यूमोनिया,फ्लू,गॅस्ट्रो,मलेरिया इत्यादी आता साधे वाटणारे आजार बरीच बाळे हिरावून न्यायचे,कारण स्पेशालिस्ट डॉक्टर्स,आधुनिक मशिनरी व नवीन गुणकारी औषधे नव्हती.माझ्या स्वतःच्या आजीची नऊ बाळंतपणे झालीत,त्यापैकी सहा बाळे दगावली,फक्त तीन वाचलीत!
विवाहाचे आणि पर्यायाने बाळंतिणीचे वाढलेले वय,विभक्त कुटुंबपद्धती,कामकाजी महिला,धकाधकीचे तणावपूर्ण जीवन यामुळे आईचे व बाळाचे पोषण नीट होत नाही.प्रदूषण,नवनवीन जंतूंचा प्रादुर्भाव यामुळे गर्भपात(Recurrent Abortions),कुपोषण(Intrauterine Growth Retardation),बाळंतपणातील रक्तदाब(Pregnancy Induced Hypertension)मधुमेह(Gestational Diabetes Mellitus)यामुळे बाळंतपणातील गुंतागुंत वाढली आहे.

*नॉर्मल डिलिव्हरी विरुद्ध सिझेरियन*


आत्ताच्या घडीला सर्वात जास्त चर्चिला जाणारा आणि स्त्रीरोगतज्ञांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणारा हा विषय आहे.यावर अनेक मतांतरे आहेत,पण मी एक त्रयस्थ सर्जन म्हणून आणि गेली तीस वर्षे बाबा(कै.डॉ.जयंत केळकर) आणि डॉ.सुजाता केळकर,स्त्रीरोगतज्ञ,यांच्यासोबत काम करतांना खूप जवळून अनुभव घेतल्यामुळे माझी मतं मांडीत आहे,कोणत्याही विवादात पडण्याची माझी इच्छा नाही.

माझ्या मते कोणताही डॉक्टर जरुरी नसतांना सिझेरियन करणार नाही.जसे रुग्णास नॉर्मल डिलिव्हरी हवी असते,तशीच डॉक्टरलाही ती हवी असते.परंतु कधीकधी बाळ व बाळंतिणीच्या काळजीने हा कटू (?) निर्णय घ्यावा लागतो.जर पेशन्ट,नातेवाईक आणि डॉक्टर यांचा परस्परांवर विश्वास असेल तर हा निर्णय योग्य वेळी व लवकर घेता येतो जेणेकरून बाळ आणि बाळंतीण या दोघांचीही प्रकृती सुखरूप राहते.
शंभर टक्के नॉर्मल डिलिव्हरीची हमी जगातील कुठलाही डॉक्टर देऊ शकत नाही.प्रसववेदना सुरू झाल्यावरच काय परिस्थिती आहे यावर सर्व अवलंबून असते.माझ्याकडे एकदा आधीच्या नऊ नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या पेशन्टचे दहाव्या वेळी सीझर करावे लागले होते आणि एकदा आधीची दोन अपत्ये सिझरनी झालेल्या स्त्रीचे तिसरे बाळंतपण ऍडमिट झाल्यापासून केवळ पंधरा मिनिटात नॉर्मल व सुखरूप झाले होते,बोला आता!

पेशन्ट व डॉक्टर यांचा अंतिम ध्यास "सुखरूप बाळ व बाळंतीण" असा असतो व त्या ध्येयासाठी डिलिव्हरी नॉर्मल की सीझर हा मुद्दा गौण ठरतो. पैश्यासाठी डॉक्टर सिझेरियन करतात हा समज खोटा ठरविण्यासाठी पुण्यातील एका ठिकाणी या दोन्ही प्रकारच्या बाळंतपणाचे शुल्क एकच ठेवले होते,परंतु हा उपाय तेवढा व्यावहारिक नाही वाटत.आधी सांगितल्याप्रमाणे काळातील बदलामुळे सिझेरियनचे प्रमाण वाढले आहे हे खरे, परंतु मानवी विकासाचा तो एक "साईड इफेक्ट"आहे असे म्हणावे लागेल. कटुता टाळण्यासाठी परस्परविश्वास(जो मागील नऊ महिन्यात तयार झालाय) अतिशय महत्वाचा आहे.हा विश्वास एकदा तुटला की मग डॉक्टर-पेशन्ट हे पवित्र नातं जाऊन ग्राहक व विक्रेता हे समीकरण येऊन बसते. हा विश्वास कायम राहण्यास "संवाद"(Proper Communication)हा महत्वाचा दुवा(Catalyst)आहे.हा दुवा नीट सांधून, परस्पर संबंध विकसित व्हावयास हवेत.संवादानी वाद आणि विसंवाद व त्याचे होणारे अनिष्ट परिणाम,दोन्ही टाळता येतात,मात्र त्यासाठी दोन्ही बाजूकडून प्रयत्न व्हायला हवेत.🙏

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनक...