Skip to main content

लवकर निजे लवकर उठे

लवकर निजे लवकर उठे

मित्रांनो,आज सकाळी सकाळी आमचे जळगावचे मित्र प्रसिद्ध रेषाकार आणि टिकटिककार,अवलिया श्री प्रदीपजी रस्से यांची पोस्ट पाहिली आणि विचारचक्र सुरू झाले. ती होती..
Early to bed & early to rise.makes a man healthy wealthy & wise.

प्रदीपजी यांच्या रेषा आणि टिकटिक हा खरंतर एका स्वतंत्र लेखाचा मोठ्ठा विषय आहे,पण आज फक्त एवढंच सांगतो की प्रतिभा आणि प्रतिमा या दोहोंचे धनी आहेत ते. आणि मजेची गोष्ट ही,की आम्ही अजून एकदाही प्रत्यक्ष भेटलेलो नाहीये,नुसती फेसबुक आणि व्हाट्सअप्प ची मैत्री,असो.

तर,मूळ विषय :लवकर निजे लवकर उठे....हा.
आमच्या संपूर्ण पिढीला लहानपणी हे वारंवार ऐकवल्या जायचं आणि मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जायचा की जो लवकर निजेल आणि लवकर उठेल त्यालाच ज्ञान,आरोग्य आणि संपत्ती मिळेल.(कशी ते मात्र नाही सांगितलं कधी आणि आम्हीही विचारण्याची हिम्मतही नाही केली कधी) हे मात्र मनोमनी पटलं होतं की याशिवाय गत्यंतर नाही म्हणून.

याचं मूळ कशात आहे तर ते वयोमानानुसार वृद्धांना होणाऱ्या निद्रानाशात! आजोबा-पणजोबा निद्रानाशामुळे लवकर उठत असतील.आजी-पणजी लोकांना तर उठावंच लागायचं,कारण सर्व घरकाम सर्व त्यांनाच करावं लागे... झाडू-पोछा,धुणं-भांडी,स्वयंपाक इत्यादी,कारण नोकरदार मंडळी एकतर जेवून जायची कामावर किंवा डबातरी घेऊन जायची,म्हणजे स्वयंपाक लवकर करणं आलंच.पुरुष मंडळी आपल्या परीने हातभार लावण्याचा प्रयत्न करायची,जसं,अंगण झाडणं,पाणी भरणं, झाडांना पाणी टाकणं,मुलांना उठवून शाळेसाठी तयार करणं,शाळेत पोहोचविणे वगैरे.
आम्हाला नागपूरला असतांना पहाटे आजोबा ग्राउंडवर पळायला पाठवीत आणि आल्यावर अभ्यासाला बसविल्या जायचं. खरंतर खूप कंटाळा यायचा आणि आठवड्यातून एक दिवस आम्ही हट्टाने मागून घ्यायचो लवकर न उठता जास्तवेळ झोपण्यासाठी. आणि तेव्हाही मनाशी ठरवलं होतं की मोठा झाल्यावर आणि आयुष्यात सेटल झाल्यावर मुळीच कधी लवकर उठणार नाही, मनसोक्त आठ वाजेपर्यंत लोळणार.(आता आयुष्यात सेटल होणं म्हणजे काय आणि त्याची व्याख्या काय,हे अजूनही कळलं नाहीये हा भाग वेगळा.) पण उशिरा उठण्याची इच्छा मेडिकल प्रोफेशन आणि त्यातही गायनॅकॉलॉजिस्ट बायको असल्यावर बऱ्याच अंशी पूर्ण झालीय कारण आठवड्यातून चार  पाच दिवस रात्री-बेरात्री इमर्जन्सी डिलिव्हरीजनी जागरण होतं आणि मग आपोआपच सकाळी उशीरा उठल्या जातं.
पहाटेची झोप यालाच साखर झोप का म्हणतात याची थेअरी नाही सांगता येणार,त्याचा प्रॅक्टिकल अनुभवच घ्यावा लागतो.विशेषतः थंडीच्या दिवसात. मस्त रजई पांघरून आणि कानाला मफलर गुंडाळून झोपण्याची मजा काही औरच. बरेच कमनशिबी लोक या थंडीत स्वेटर मफलर हातमोजे घालून मॉर्निंग वॉक की काय म्हणतात त्याला जातात,फॅशनच झालीय ती.अरे मस्त घरातच मारा दोरीवरच्या उड्या,किंवा लावा आपली साधी सायकल स्टँडवर आणि मारा की पायडल ब्रेक दाबत दाबत! कशाला बाहेर फिरायचं आणि करायचं स्वतःला एक्स्पोज त्या करोना व्हायरसला,आजकल ऐकलंय की मोकळ्या हवेतही तरंगतो तो दोन तीन तास म्हणून.
मी तर बरेचदा चार साडेचारचा अलार्म लावतो,उठतो आणि अजून तीन-चार तास झोपायचं आहे या आनंदाने पुन्हा झोपतो .एक अजून फायदा अशा उठण्याचा,झोप लागता लागता तुमच्या आवडत्या गोष्टीचा विचार करायचा म्हणजे तीच स्वप्ने पडतात आणि पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणतात बुवा.इट्स अ व्हेरी गुड बाय प्रोडक्ट ऑफ अर्ली मॉर्निंग स्लीप.अजून एक फायदा,ही स्वप्ने ताजी असल्यामुळे बऱ्याच अंशी आठवतात,आणि मला मज्जा येते ती सर्व सुजाताला सांगण्यात,जवळजवळ रोजच सांगतो तिला(तिला मजा येते की नाही काय माहीत,पण ऐकते बिचारी,काय करेल!)

आता रात्री जागण्याच्या टेक्निकल पॉइंटसचा विचार करूयात :
काही कामं,जसं अभ्यास,कम्पनीची प्रोजेक्टस, आमच्यासाठी हार्मोनिकावर गाणी बसवणं,प्रॅक्टिस करणं आणि वाजवणं, रेकॉर्ड करणं, हे रात्रीच छान होतात,कारण गणपती दुर्गादेवीचा काळ सोडला तर रात्री दहा नंतरची वेळ अगदी शांत असते,तुम्हाला वेळेचं बंधन नसतं, कामात मन लागलं तर अगदी एक दोन तीन वाजेपर्यंतही बसता येतं.हेच सकाळी पाच वाजता सुरू केलं तर दोन तीन तासाचीच मुदत असते कारण पहाटेपासूनच पक्ष्यांचा कलकलाट,फेरीवाले,दूधवाले,भाजीवाले,पाव विक्रेते,भंगारवाले यांच्या हाकाट्या सुरु होतात.तुम्हालाही सकाळचे कार्यक्रम आटोपून तयार होऊन ऑफिसला जाण्याची घाई असते आणि लागलेली तंद्री सोडून कामं अर्धवट सोडून उठावं लागतं. आता करोनामुळे वर्क फ्रॉम होम कल्चर आलेलं आहे त्यात आयटी सेक्टर वाले शांतपणे रात्री काम करतात कारण त्यांचे पाश्चिमात्य देशातील  काऊंटरपार्टस यांच्याकडे त्यावेळी सकाळ दुपारचा वर्किंग टाईम असतो त्यांना सोयीस्कर होतं ते. आताच्या पिढीचं बायोलॉजिकल क्लॉकच बदललंय. दे आर ट्युन्ड टू वर्क लेट नाईटस अँड स्लीपिंग टिल लेट इन द मॉर्निंग्ज.
ही झाली जागरण करणारी मंडळी.पण काही लोकांना जागरण घडतं,कसं ते पाहूया.ब्लड प्रेशर,हार्ट डिसीज असणाऱ्या लोकांना मीठ कमी खायचं असतं,तरी ते जास्त खातात,मग ते मिठाला जागत नाहीत तर हृदयाला सूज आल्यामुळे मीठ त्यांना जागवतं! तसंच रात्री उशिरा तेलकट,तुपकट मसालेदार अन्नाचं सेवन करणारे अन्नाला जागत नाहीत,तर ऍसिडिटी झाल्यामुळे अन्न त्यांना जागवतं! आता कोव्हीडच्या जमान्यात सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या फेक न्युज आणि सो कॉल्ड भोंदू कोव्हीड तज्ञ यांच्या लोकांना घाबरवून भीतीमुळे झोप उडवून खऱ्या अर्थानं "जन जागरण"करणाऱ्या पोस्ट्स याही कारणीभूत आहेत.
तर उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे ही या जमान्याची संस्कृती झाली आहे.

This is a change & we must accept it.As,
Change is the rule of nature,either change or perish.
And,I feel it's better to change rather than to perish.

त्यामुळे आता हे जे  slogan होतं,

Early to bed & early to rise
Makes a man healthy,wealthy & wise.
By Benjamin Franklin.

Has changed to:

Late to bed & later to rise
May make a man filthy wealthy & maybe wise,whatever the price!
By Benja"mean" Frankly.

नमस्कार.

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात,निव

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनकरराव ३ वर

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन*

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन* मित्रांनो, काल खूप दिवसानंतर रेल्वेचा भोंगा ऐकला ज्याला "सायरन"असे म्हणतात.आमच्या लहानपणी सर्व भुसावळकर जनतेच्या जीवनाचा हा भोंगा अविभाज्य अंग असायचा. डी.एस.ऑफिस(आताचे डी.आर.एम.ऑफिस) च्या छतावर हा बसविलेला आहे आणि आवाज इतका मोठा आहे की संपूर्ण शहरात सहज ऐकू यायचा,आता शहर खूप वाढल्यामुळं माहीत नाही सगळीकडे ऐकू येत असेल की नाही ते. सकाळी आठ,दुपारी चार आणि रात्री बारा अशा तीन वेळा हा भोंगा वाजत असे. रेल्वेच्या बहुतेक ड्युट्या सकाळी आठ ते दुपारी चार,दुपारी चार ते रात्री बारा आणि रात्री बारा ते सकाळी आठ अशा असायच्या. सकाळच्या ड्युटीला मॉर्निंग म्हणायचे पण दुपार आणि रात्रीचीला चार-बारा आणि बारा-आठ असेच प्रचलित  नाव होते. हे भोंगे अथवा सायरन्स या ठराविक वेळीच आणि एकदाच वाजायचे. एकावेळी एकापेक्षा जास्तीवेळा वाजले,तर त्याचा वेगळा अर्थ असायचा. तीन वेळा वाजले याचा अर्थ भुसावळ स्टेशन किंवा यार्ड परिसरात गाडी किंवा डब्बा रुळावरून घसरलाय,डिरेलमेंट झालीय किंवा अपघात झालाय,पाच वेळा वाजले म्हणजे भुसावळ डिव्हिजन मध्ये हा प्रकार घडलाय आणि सात वेळा वाजले म्हणजे भ