चहा आज सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर आईच्या हातचा पहिल्या वाफेच्या चहाचा आस्वाद घेत आणि सोबत चौकीदाराने जिन्याच्या जाळीत अडकवलेले वर्तमानपत्र चाळीत गच्चीतल्या झोपाळ्यावर बसलो होतो,आणि गर्मीनं दिवसभर अंगाची लाही लाही करणाऱ्या ग्रीष्म ऋतूच्या सकाळच्या वेळच्या थंडगार झुळुकेची मजा घेत होतो. सुरुवात करतांना पहिला घोट बशीत ओतलेल्या चहाचा घ्यायचा आणि एकदा तो किती गरम आहे याचा अंदाज आला,की उरलेला मग कपाने प्यायचा हा शिरस्ता! यामागे दोन उद्देश : एक,जीभ भाजण्याची भीती नाही,आणि दोन,कपातल्या चहाची लेव्हल कमी झाल्याने पेपरात अर्धे लक्ष्य असल्यामुळे हिंदकळून गरम चहा अंगावर सांडण्याचीही भीती नाही.असो. दोन वर्षांपूर्वी केरळ ट्रीपला गेलो असतांना, मुन्नारला भेट दिली होती,त्याठिकाचे सुंदर चहाचे मळे आणि चहा बनवण्याच्या फॅक्ट्रीची भेट आठवली.तिथे ऐकलेल्या चहाच्या इतिहासाची उजळणी थोडक्यात करतो. कॅमेलिया सायनेन्सिस असे बोटॅनिकल नाव असणाऱ्या चहाचा उगम हजारो वर्षांपूर्वी चीनमध्ये झाला.त्यानंतर जवळजवळ जगातील सर्वच देशात त्याचा वापर होऊ लागला.चहाच्या उत्पादनावरील चीनची मक्तेदारी संपवण्यास ब्रिटिशांनी भारत आ