Skip to main content

भाषा,व्याकरण,शुद्धलेखन,शुद्ध-संभाषण ई.

भाषा,व्याकरण,शुद्धलेखन,शुद्ध-संभाषण ई.

मानवानी आपला संदेश,आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाषा शोधून काढली.आधी बहुतेक नुसत्याच खाणाखुणा करीत असावेत. या भाषा प्रत्येक भौगोलिक विभागाच्या आपापल्या होत्या,आजही आहेत.विचारांचे आदानप्रदान समोरासमोर असतांना बोलीभाषेने होई,परंतु हजर नसलेल्या व्यक्तिपर्यंत ते पोहोचण्यासाठी लिखित भाषेचा उदगम झाला.त्यामध्ये सुसूत्रता आणि सुसंबद्धता आणण्यासाठी आणि ती सर्वमान्य होण्यासाठी पुस्तके लिहिल्या गेलीत.कालांतरानी दळणवळणाची साधने वाढली आणि सर्व भूभागातील माणसे एकमेकांना भेटू लागल्यावर काही सर्वमान्य-सामान्य (common) भाषेची जरूर वाटू लागली.इंग्रजांचे राज्य जगातील बऱ्याच भागात असल्यामुळे इंग्रजी ही जगाची सर्वमान्य भाषा बनली,तरी अजूनही बऱ्याच प्रदेशात फ्रेंच,जर्मन,स्पॅनिश ई. भाषाच प्रामुख्याने बोलल्या जातात.आपली राष्ट्रभाषा हिंदी जरी असली तरी आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्रजीच बोलतो,याउलट रशिया,जपान,चीन ई. देशांचे राज्यकर्ते त्यांच्याच राष्ट्रभाषेत बोलतात,दुभाषी असतो हव्या त्या भाषेत भाषांतर करायला,असो!

सर्व प्रादेशिक भाषा या त्या-त्या राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात शिकविल्या जाऊ लागल्या त्यामुळे त्यावर अभ्यासात्मक पुस्तके लिहिल्या गेलीत,व्याकरण शिकविल्या गेले आणि शुद्धलेखनासाठी व्याकरणाचा अभ्यास फार महत्वाचा ठरला.इंग्रजांचा प्रभाव असल्यामुळे शुद्ध इंग्रजी लिहिण्या-वाचण्यासाठी अगदी सुरुवातीपासून तर्खडकर व्याकरण मुलांना शिकविल्या जाऊ लागले.मला आठवतं ते म्हणजे मराठी व्याकरणासोबत त्या शब्दांचे इंग्रजी बंधू अधिपत्य गाजवू लागले आमच्या लहानग्या मनावर; जसे नाम (noun),सर्वनाम(pronoun),विशेषण(adjective),क्रियापद(verb),ई. यापुढील पायरी म्हणजे कर्ता, कर्म(माझं!),करण, मग प्रथम पुरुष,द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष यांची एक फळी उभी राहिली आणि त्यांना चालवायला शिकविले जायचे,उदा.I-go,you-go,He she it-goes,they-go. हे एकदा झाल्यावर भाषेचे प्रयोग शिकविल्या जायचे,कर्तरी-कर्मणी-भावे प्रयोग ई.(अजूनही शहारे येतात अंगावर!)

बोलीभाषाही लिखित भाषेसारखीच शुद्ध बोलावी अशी रास्त अपेक्षा असते या सर्व बुद्धिवाद्यांची,परंतु व्यवहारात याउलट घडतांना दिसते. बोलीभाषेवर ज्या-त्या प्रदेशाचा पगडा असतो.उदा,मराठी भाषा विदर्भात,मराठवाड्यात,खान्देशात,कोकणात आणि पुण्यात खूप वेगळी बोलल्या जाते.(आणि प्रत्येकालाच आपापल्या प्रादेशिक बोलीचा सार्थ अभिमान असतो!) कुठे चाललास?(पुणे),कोठे जाऊ राहिलास?(विदर्भ),कुठं निघाला राव?(पश्चिम महाराष्ट्र),कुठं जायलाय?(मराठवाडा),कुढी चालला भो?(खान्देश). विदर्भात तर लिंगच बदलून टाकतात...बाई म्हणते मी चाललो आणि माणूस म्हणतो मी जाते!😄

तर मित्रांनो,या सर्व गोष्टींचा उहापोह करण्याची जरूर आज का वाटली....तर मला स्पष्ट असं वाटतं की लिखाण व्याकरणाच्या दृष्टीनं शुद्ध असावे,परंतु बोलतांना याची तमा बाळगू नये,कारण बोलणं हे संभाषणासाठी असतं, परीक्षा देण्यासाठी नव्हे.इंग्लिश भाषाही भारीच चावट...आता जसं स्पेलिंग आहे तसाच उच्चार असावा की नाही?तर तसं नाही...pneumonia चा p सायलेंट,त्याला पन्यूमोनिया नाही म्हणायचे तर न्यूमोनिया म्हणायचे(मग p लिहायचाच कशाला?) Sachet चा उच्चार सॅचेट नाही करायचा तर म्हणे "सॅशे" असा करायचा....का? Data चा उच्चार डाटा असा न करता डेटा असा करायचा,का बरं बॉ? आणि I goes म्हंटलं तर यांच्या बापाचं काय जातं, मी माझ्या मनाचा राजा आहे,I will go or,I will goes, हां! आणि व्यंजनाच्या आधी(a,e,i,o,u) an लावायची जबरदस्ती बोलतांना का करावी..... लिहितांना लिहीन हो,an elephant,पण म्हणतांना a elephant म्हंटलं तर तुमच्या अंगाला भोकं पडतात का?

बोली भाषा हे संवाद साधण्यासाठीचं प्रभावी माध्यम आहे,आपल्याला येईल त्या,जशी शिकली असेल त्या भाषेत सुसंवाद घडावा ही अपेक्षा. माझ्याकडे नेहेमीच medical representatives येतात,बरेच खूप छान इंग्रजी बोलतात,काहींची मात्र इंग्रजी शब्दांची जमवाजमव करून वाक्य बनवतांना खूप तारांबळ उडते,आणि आपलं हसं करून घेतात.मला आठवतंय,काही वर्षांपूर्वी एक MR आला होता,म्हणाला...डाक्तरसाहेब,माही पयलीच नोकरी हाय अन पहिलाच कॉल हाय,मले इंग्लिश जमत नाय,मराठीत बोललो तर चालन काय? हो म्हणालो...त्याचा आत्मविश्वास जबरदस्त...म्हणाला, यक्कच प्रॉडक्ट हाय,आयबुप्यारा...येकदम ष्ट्यानडर गोळी हाय...बमबाट काम करते....स्वस्तबी हाय...सर्वीकडं भेटन... लिहिसान तर माहिबी नोकरी पक्की व्हयीन! मी खूप लिहिली. आज तो बऱ्याच वरच्या पदावर गेलाय आणि आता छान इंग्रजी बोलतो,पण माझ्याशी अजूनही तशाच रांगड्या मराठीत बोलतो... मला तसाच आवडतो तो!

असाच माझा एक अगदी जवळचा मित्र आहे-बबन,सर्व लहानथोर  त्याला बबनमामा  असंच म्हणतात.(आणि तोही सर्वांना मामाच म्हणतो!)पानांचं दुकान आहे त्याचं, अफलातून व्यक्तिमत्व आहे,वल्लीच!भुसावळच्या अमरदीप टॉकीज चौकात प्रसिद्ध आणि खूप जुनं "पटेल पान सेंटर" म्हणून त्याच्या वडिलांच्या काळापासूनचे दुकान आहे, तिन्ही भावंडं मिळून चालवतात ते.अतिशय सज्जन,सहृदयी,अहोरात्र काम करणारी आणि सदैव सर्वांच्या मदतीला तयार असणारी अशी त्यांची ख्याती आहे.एकदा माझे अमेरिकन भाऊ-वहिनी आले होते आमच्याकडं,आणि जेवण झाल्यावर आम्ही पान खायला या मित्राच्या दुकानात गेलो.
"यस मामा,वेलकम,लूकिंग गेस्ट,गुड इव्हनिंग सर,गुड इव्हनिंग मॅडम,आय मेक ब्युटीफुल पान फॉर यू!वहिनीने विचारले- व्हाट इस धिस पान? मी म्हंटलं,बबनराव,आता तुम्हीच  सांगा  हिला समजावून...
तो लागलीच म्हणाला...नो प्रॉब्लेम, मॅडम,यू नो पान, इट इज पान, धिस पान...त्यांनी हाताचा पंजा फैलावून दाखवला आणि त्यावर पान ठेवलं,म्हणाला...धिस ग्रीन पान... यू पुटिंग चुना-कत्था ऑन इट अँड मिक्सिंग अँड मिक्सिंग....देन पुटिंग शोप-सुपारी-गुलकंद-विलायची ऑन इट अँड फोल्डिंग अँड इटिंग....यू सिंग मॅडम? देन आय पुट सम ठंडाई,अलसो कॉल्ड आसमंतारा,थ्रोट क्लियर अँड यू सिंग लाईक लता मंगेशकर!माऊथ फ्रेश नाऊ अँड स्टमक फ्रेश इन द मॉर्निंग...डायजेशन ऑल फूड....नो गॅस,नो ढेकर...
आफ्टर इटिंग वन टाईम,यू कमिंग मेनी टाईम!
वहिनीला बरोब्बर समजलं सगळं,तिनी आवडीनं खाल्लं आणि दुसरं मागून घेतलं!पुढचे तिन्ही दिवस न चुकता रोज रात्री जेवणानंतर आमची वरात  बबनकडे!
प्रत्येकवेळी अमेरिकेहून फोन आला की वहिनी आपुलकीनं आधी  बबनची  विचारपूस जरूर करतात,आणि म्हणतात अमेरिकेला आमच्याकडे याल तेंव्हा बबनमामांना नक्की घेऊन या!🙏

हे असलं अफलातून कम्युनिकेशन स्कील कुठल्यातरी आयआय एम मध्ये शिकवतात का हो?

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

Senseless Sense of Well Being

Hello friends. There are a few side effects of development. The one I am seeing obviously is the spurt of Wellness-Fitness centers,Gymnasiums,Spiritual Gurus holding Satsangs,verious diet planners,Weight loss-inch loss centres,Personality development courses,Career guidance centres & many more.We feel that unless we do such courses,we & our children cannot progress, be successful,wealthy & achieve peace of mind. I wonder how the  previous generation managed to do well without having the advantages of these schools. The Tatas,Birlas,Ambanis, Mahindras must have been real lucky,isn't it! Infact,the advent of internet,it's widespread use, resulting in an outburst of knowledge(many times incomplete & confusing) has changed the psyche of the people & these agencies take advantage of this situation to make money. This has become a status symbol amongst the riches,who can afford,but the poor are also lured & made to spend in an attempt to uplift their ...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...