Skip to main content

माझ्या आठवणीतील अविस्मरणीय रुग्ण

माझ्या आठवणीतील अविस्मरणीय रुग्ण

वैद्यकीय व्यवसायात असे अनेक अनुभव येतात की जे स्मृतीत नेहेमीकरता कोरल्या जातात.असाच एक सुरस आणि विस्मयकारी अनुभव येथे कथन करीत आहे :

३० डिसेंम्बर १९९०,सकाळची वेळ,कडाक्याची थंडी,नवीन व्यवसाय सुरू करून जेमतेम एक-सव्वा वर्ष झालेलं. एक दीड वर्षाचं अत्यवस्थ बाळ बालरोग तज्ञ डॉ.उमेश खानापूरकर यांनी पाठवलं.

 बाळाची स्थिती अतिशय नाजूक-पोट टम्म फुगलेलं,नाडी आणि श्वासाची गती खूप वाढलेली,अंगात खूप ताप,हिरव्या उलट्या होतायत,तीन दिवसांपासून शौचास झालेली नाही,मेडिकल भाषेत ज्याला डिहायड्रेटेड टॉक्सिक लुक्स  म्हणतात ते,आणि एक्स रे मध्ये आतड्याला पीळ पडल्याची लक्षणं.......... ऑपरेशन ताबडतोब करणं आवश्यक,नाही केलं तर १०० टक्के मृत्यू ठरलेलाच,पण ऑपरेशन करतांना किंवा त्यानंतर चोवीस तासातही दगावण्याची शक्यता खूपच जास्ती. बरं, त्या काळी आजच्यासारख्या आधुनिक उपकरणांच्या सोयी ऑपरेशन थिएटरमध्ये उपलब्ध नव्हत्या आणि बालरोगशल्यक्रियातज्ञ(Paediatric surgeons) सर्वात जवळ म्हणचे औरंगाबादलाच होते, आणि तिथपर्यंत जिवंत पोहोचण्याची शाश्वती नव्हती.

बाळाचे वडील सैन्यात होते,आणि नशिबानं सुटीत आपल्या मूळ गावी विवरा येथे आले होते.त्यांच्याशी सल्लामसलत केली आणि ईश्वरावर भरवसा ठेवून ऑपरेशन टेबलावर घेतले.

भुलतज्ञ डॉ.मंगेश खानापूरकर यांनी त्यांच्या कौशल्याची कसोटी लावत भूल दिली व मी पोट उघडले.आत पाहतो तर काय,लहान आतडे मोठ्या आतड्यात शिरून होणारा आंत्रावरोध (intestinal obstruction due to intusucception) होता. हळूहळू गरम पाण्याच्या स्पंजेसनी शेकून आत शिरलेले  लहान आतडे मोठ्या आतड्यातून बाहेर काढले आणि माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला.....कमीतकमी ८-१० ठिकाणी आतडे पूर्ण सडलेलं होतं(Gangrene) सडलेला तुकडा कापून चांगले आतडे एकमेकाला जोडण्याची प्रक्रिया पाच ठिकाणी केली (Resection-anastomosis) परंतु तीन-चार ठिकाणी जिथे रक्तपुरवठा जरा बरा वाटत होता ते आतडे ईश्वराच्या भरवशावर तसेच ठेवायचे ठरले,त्याला कारणे दोन : तेही कापले असते,तर लहान आतडे फारच कमी उरले असते,आणि बाळाची भूल उतरू लागली होती,अजून भूल दिली असती,तर ते बाळ कधीच शुद्धीत न येण्याचा धोका होता.
 झटपट केलेलं शिवणकाम योग्य झालंय हे तपासलं,सलाईननं पोट व्यवस्थित धुवून घेतलं आणि टाके घेऊन पोट बंद केलं!

आटपलं एकदाचं ऑपरेशन, पण ऑपरेशननंतरचा काळही फारच महत्वाचा असतो आणि नाजूकही. एवढ्याश्या बाळाच्या मानानी हे म्हणजे फारच मोठं ऑपरेशन होतं, आणि आधीच अत्यवस्थ स्थिती असल्यामुळे शरीरानं साथ देण्याची मर्यादाही खालावलेली असते.
एकतीस तारीख उजाडली, बाळाची स्थिती फारच नाजूक..आम्हा सर्वांसकट,(ज्यात माझे वडील,कै.डॉ.जयंत केळकर,ज्यांचा प्रगाढ अनुभव आणि ख्याती आमच्या पाठीशी होती) डॉ उमेशही तिथेच बसून...दोन्ही हाताला सलाईन,त्यातून प्रतिजैविके,रक्तदाब सुरळीत ठेवण्यास लागणारी औषधे सुरू (antibiotics,dopamine & steroids)...नाकातील नळीने पोटातील घाण काढण्याचे काम सुरू.....त्यावेळी आमच्याकडे अत्याधुनिक इनक्युबेटर्स नव्हते,बाळाला गरम ठेवण्यासाठी पाळण्याच्या दांडीला दोन १०० पॉवरचे दिवे लावून तात्पुरती सोय केलेली,तरीही हवा तसा प्रतिसाद नाही.संध्याकाळ झाली,सारी दुनिया रात्री नववर्षाच्या स्वागताला तयार होत होती,आणि आम्ही सर्वजण मात्र चिंतेत,हे बाळ १९९१ साल पाहू शकणार नाही अशीच स्थिती होती.😔 बारा वाजले,फटाके फुटले,आमची झुंझ सुरूच.पहाटे नाडीची आणि श्वासाची गती थोडी कमी झाली,नळीतून जी पोटातली घाण निघत होती तीही थोडी कमी झाली,तापही कमी झाला,आणि एक जानेवारीला सूर्योदय झाला तरी आमचे बाळ जिवंत होते,नव्हे, थोडे रडायलाही लागले होते,आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
एक तारखेच्या संध्याकाळपर्यंत प्रगती छानच झाली आणि दोन तारखेच्या संध्याकाळी त्यास शौचासही झाली.....याचा अर्थ,आमचे शिवणकाम तग धरून गेले आणि सडलेले आतडेही पुन:रुज्जीवित झाले! नंतर ते हळूहळू सुधरतच गेले,आणि सर्व अडथळ्यांवर मात करीत आमचं बाळ (लाडाचं नाव-टिक्कु) दहाव्या दिवशी टाके काढून सुखरूप घरी गेलं!

इतकं सर्व छान झालं तरी मनात धाकधूक होतीच....भुलेत असतांना आणि नंतरच्या ४८ तासात बाळाच्या मेंदूला ऑक्सिजन कमी पडला तर पुढे मंदबुद्धी राहण्याची भीती असते(रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजणारे पल्स ऑक्सिमिटर यंत्र तेंव्हा नव्हते) नशीबानी बाळाची प्रगती व्यवस्थित होत गेली.दरवर्षी न चुकता एक जानेवारीस आमचा टिक्कु आम्हाला भेटण्यास येत गेला आणि आम्ही त्याच्या पुनर्जन्माचा वाढदिवस एक जानेवारीसच साजरा करत गेलो!

आज हा टिक्कु ६ फूट २ इंच उंचीचा एक तगडा,हुशार  नौजवान आहे,परतवाड्याच्या शासकीय तंत्र निकेतनातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलंय आणि सैन्यात जाण्यासाठी परीक्षा देतोय, वडिलांप्रमाणेच.(वडील सैन्यातून निवृत्त होऊन विवऱ्यातच आता शेती करतायत.

या केसमधून अगदी सुरुवातीच्या काळातच माझे वडील आणि वडीलभावासारखे उमेशदादा यांच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या,ज्या मला पुढील आयुष्यात फार मोलाच्या ठरल्या,त्या म्हणजे,स्वतःवर,स्वतःच्या कुवतीवर विश्वास ठेवायचा आणि जिद्द,चिकाटी न सोडता प्रयत्न करीतच रहायचे (believe in yourself,your abilities,never give up,keep on trying with faith relentlessly.) आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर पूर्ण विश्वास ठेवला,तर डॉक्टरची जबाबदारी आणि त्यासोबत हिम्मतही वाढते,आणि यश हुलकावणी देत नाही मग!

असा हा आमचा लाडका टिक्कु आणि त्याची ही सुरस आणि चमत्कारिक कथा!असा निखळ आनंद,आणि आत्मिक समाधान,ज्यापुढे कितीही पैसा,मानसन्मान,प्रतिष्ठा,फिक्की आहे,केवळ वैद्यकीय व्यवसायच देऊ शकतो हे मात्र अगदी खरं!

देव तारी त्याला कोण मारी,ईश्वरेच्छा बलीयसी,आयुष्याची दोरी बळकट असणे,प्रयत्नांती परमेश्वर,प्रयत्ने वाळूचे कण रगडिता...... अशा अर्थाच्या म्हणी व वाकप्रचार अशाच काही घटनांनंतर शोधल्या गेल्या असाव्यात बहुधा!

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात,निव

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनकरराव ३ वर

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन*

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन* मित्रांनो, काल खूप दिवसानंतर रेल्वेचा भोंगा ऐकला ज्याला "सायरन"असे म्हणतात.आमच्या लहानपणी सर्व भुसावळकर जनतेच्या जीवनाचा हा भोंगा अविभाज्य अंग असायचा. डी.एस.ऑफिस(आताचे डी.आर.एम.ऑफिस) च्या छतावर हा बसविलेला आहे आणि आवाज इतका मोठा आहे की संपूर्ण शहरात सहज ऐकू यायचा,आता शहर खूप वाढल्यामुळं माहीत नाही सगळीकडे ऐकू येत असेल की नाही ते. सकाळी आठ,दुपारी चार आणि रात्री बारा अशा तीन वेळा हा भोंगा वाजत असे. रेल्वेच्या बहुतेक ड्युट्या सकाळी आठ ते दुपारी चार,दुपारी चार ते रात्री बारा आणि रात्री बारा ते सकाळी आठ अशा असायच्या. सकाळच्या ड्युटीला मॉर्निंग म्हणायचे पण दुपार आणि रात्रीचीला चार-बारा आणि बारा-आठ असेच प्रचलित  नाव होते. हे भोंगे अथवा सायरन्स या ठराविक वेळीच आणि एकदाच वाजायचे. एकावेळी एकापेक्षा जास्तीवेळा वाजले,तर त्याचा वेगळा अर्थ असायचा. तीन वेळा वाजले याचा अर्थ भुसावळ स्टेशन किंवा यार्ड परिसरात गाडी किंवा डब्बा रुळावरून घसरलाय,डिरेलमेंट झालीय किंवा अपघात झालाय,पाच वेळा वाजले म्हणजे भुसावळ डिव्हिजन मध्ये हा प्रकार घडलाय आणि सात वेळा वाजले म्हणजे भ