रुग्णसुश्रुषा (नर्सिंग) व्यवसायासला प्रतिष्ठा देणारी नर्सिंगचे आद्य प्रणेती फ्लोरेन्स नाईटिंगेलचा १२ मे हा जन्मदिवस जागतिक नर्सिंग डे म्हणून साजरा केल्या जातो.त्या अनुषंगाने फ्लोरेन्स नाईटिंगेल व नर्सिंग व्यावसायिक यांची महती विशद करणारा हा लेख.
इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ नर्सिंगने घेतलेल्या निर्णयानुसार फ्लोरेन्स नाईटिंगेलच्या जन्मदिनानिमित्ताने १२ मे हा दिवस जागतिक नर्सिंग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
१२ मे १८२० रोजी एका धनाढ्य ब्रिटिश कुटुंबात जन्मलेली फ्लोरेन्स अतिशय सुंदर व गुणी मुलगी.तिच्या आयुष्याची ध्येये सुरुवातीपासूनच वेगळी होती.तिला गरीबांची व रुग्णांची शुश्रूषा करण्याची उपजतच आवड होती. हे ध्येय गाठण्यासाठी लग्न अडसर ठरणार म्हणून ती अखेरपर्यंत अविवाहित राहिली.तिच्या म्हणण्यानुसार तिला वयाच्या १७ व्या वर्षीच ईश्वराने दर्शन देऊन सुश्रुषेची प्रेरणा दिली.१८५१ मध्ये फ्लोरेन्सने जर्मनीतील कैसरवर्थ येथे नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले.त्याकाळी नर्सिंग व्यवसायाला समाजात प्रतिष्ठा नव्हती व अशा स्त्रियांकडे समाज तुच्छ नजरेने पहात असे.१८५३ मध्ये ब्रिटनमध्ये परत आल्यानंतर तिची नर्सिंग स्कुलमध्ये सुप्रीटेंडेंट पदावर नियुक्ती झाली.१८५४ मध्ये रशियाविरुद्ध युद्ध सुरू झाले आणि डॉक्टर व नर्सेसच्या अभावी जखमी जवानांचे हाल होऊ लागले.त्यावेळी फ्लोरेन्सने आपल्या चमुसकट आघाडीवर जाऊन जवानांची शुश्रूषा करून अनेक जीव वाचविले.आघाडीवरील त्या तात्पुरत्या उघडलेल्या वैद्यकीय सेवा केंद्रात रात्री हातात कंदील घेऊन जातीनं सर्वांची विचारपूस करणारी फ्लोरेन्स,"लेडी विथ द लॅम्प" म्हणून प्रसिद्ध झाली!
युद्धानंतर फ्लोरेन्स सैनिकी रुग्णालयात सेवा देऊ लागली.निर्जंतुकीकरण व स्वच्छता यांचा पाठपुरावा करून तिने थोड्याच दिवसात मृत्यूचे प्रमाण ६० टक्क्यांपासून ते ३ टक्क्यांपर्यन्त खाली आणले. १८६० साली लंडनच्या सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये तिने नाईटिंगेलं स्कुल ऑफ नर्सिंग सुरू केले.नर्सिंगवर तिने अनेक पुस्तके लिहिली व अनेक नर्सिंग स्कुल्सना चालना दिली.तिच्यामुळे या व्यवसायाला समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली.१८६२ मधील भारतभेटीनंतर तिने भारतातील सांडपाण्याच्या नियोजनाबद्दलही लेखन केले होते. १८८७ मध्ये तिबे ब्रिटिश नर्सेस असोसिएशनची स्थापना केली.१९०७ मध्ये सातव्या एडवर्ड राजाने तिला "ऑर्डर ऑफ मेरिट" ची पदवी दिली. अशा या दैदिप्यमान आयुष्याचा शेवट १३ ऑगस्ट १९१० मध्ये झाला.
नर्सिंग हे एक पवित्र व्रत आहे.डॉक्टर आणि रुग्ण यामधील तो एक महत्वाचा दुवा आहे. रुग्णास देवदूतासमान वाटणारे डॉक्टर रुग्णांना दिवसातून फारतर दोनदा किंवा तीनदा भेटणार, त्यानंतरचा सर्व काळ त्यांची विचारपूस,शुश्रूषा,शंका समाधान,प्रेमाने धीर देण्याचे काम नर्सेसचेच असते. वैयक्तिक आयुष्यातील अडचणी,दुःखे बाजूला ठेवून अविरतपणे रुग्णसेवा बजावायची,रुग्णांचा त्रागा,त्रास सहन करायचा परंतु मायाळूपणे रुग्णास बरे होण्यास मदत करायची,हाच वसा त्यांनी घेतलेला असतो.नर्सेसच्या या त्यागाची जाण समाजाने व डॉक्टरांनाही ठेवावयास हवी. वैद्यकशास्त्र इतक्या झपाट्याने प्रगती करीत आहे की आज प्रत्येक स्पेशालिटीला त्यामधील प्रशिक्षण घेतलेल्या नर्सेसची आवश्यकता आहे.दुर्दैवाने असे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था कमी आहेत. क्रिटिकल केयर युनिट,ऑपरेशन थिएटर,किडनी युनिट,बर्न्स वार्ड,कार्डियाक अँड न्यूरो सर्जरी येथील केसेसची यशस्विता बऱ्याच प्रमाणात उत्तम नर्सिंग सेवेवर अवलंबून असते. या क्षेत्रात आपल्या देशात फक्त १० टक्के पुरुष आढळतात,पाश्चात्त्य देशात हेच प्रमाण ४० ते ५० टक्के आहे.
आज संपूर्ण जगात भारतातील प्रशिक्षित नर्सेसना मोठी मागणी आहे . "The nurse is always there for you." हे नर्सिंग डे चे ब्रीदवाक्य आहे. अशा या निस्वार्थी-प्रेमळ-कष्टकरी नर्सिंग भगिनी व बंधूंना त्यांनी आजपर्यंत मानवजातीवर केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद,आणि हे व्रत पुढे चालविण्यासाठी खूप शुभेच्छा देऊया!💐💐
Comments
Post a Comment