Skip to main content

*फोडणीची पोळी आणि फोडणीचा भात*

*फोडणीची पोळी आणि फोडणीचा भात*

मित्रांनो,खरं सांगू? पोह्यांपेक्षा कोणती लाडकी डीश असेल माझी नाश्त्यासाठी तर ती म्हणजे फोडणीची पोळी आणि नंबर दोनवर फोडणीचा भात!

मला खात्री आहे की आक्ख्या महाराष्ट्रात फोडणीची पोळी आवडत नाही किंवा माहीत नाही अशी एकही व्यक्ती नसेल!
भुसावळला आई आणि नागपूरला आज्जी,दोघी फोडणीची पोळी करण्यात एक्सपर्ट! आणि मित्रांनो,अजून एक खासियत म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या हातची फोडणीची पोळी वेगळीच चव घेऊन जन्मास येते.माझ्या एका मित्राची आई हळद फोडणीत न टाकता नंतर वरून टाकायची,त्याचीही चव छान असायची.फोडणीची पोळी मात्र शिळ्या पोळ्यांचीच करावी लागते. मी तर रात्रीच्या जेवणात कमी पोळ्या खाऊन मुद्दाम त्या दुसऱ्या दिवशी फोडणीच्या पोळीसाठी उरवायचो! अजून एक गम्मत म्हणजे पोळ्या हातानीच कुस्करल्या पाहिजेत बरंका,मिक्सरमधून काढल्या की इतक्या बारीक होतात की डिशचा बल्ल्या वाजलाच म्हणून समजा! मस्तपैकी कांदा-टमाटू-कढीपत्ता-लाल मिरची-हिरवी मिरचीची फोडणी,त्यावर चिरलेली ताजी कोथिंबीर,व्वा! मराठवाड्यात शेंगदाणे टाकतात फोडणीत किंवा भाजून सोबत खातात. आणि मला ही चमच्यानी न खाता हातानीच खायला आवडते,हो! याला वेगवेगळी नावं आहेत,कुणी कुस्करा म्हणतं तर कुठे चुरमा. यासोबत ताजे विरजलेलं दही अथवा नुकत्याच काढलेल्या लोण्याचं ताक असेल तर सोनेपे सुहागा.
तीच कथा फोडणीच्या भाताची. शिळा भात मात्र फडफडीत असावा लागतो,बाकी सर्व प्रोसिजर फोडणीच्या पोळीसारखीच, फरक एवढाच की यासोबत दही अथवा ताक न खाता लिंबू पिळून छान लागते. हा भात कोणत्याही व्हेज फ्राईड राईस किंवा व्हेज पुलाव यांच्या थोबाडीत मारेल एवढा टेस्टी लागतो. शिळी कुस्करलेली पोळी आणि शिळा भात याला एकत्र करून फोडणी दिली तर याला "मनोहर" म्हणतात असे अंधूकसे आठवते.
आज्जी आणि आईच्या हातचे हे पदार्थ खाणं म्हणजे एक पर्वणी आहे,का सांगू? कारण त्यामध्ये इतर सर्व गोष्टींसोबत थोडं प्रेमही मिसळलेलं असतं! सुजाताही प्रयत्न करते तशीच बनवण्याचा आणि "आईसारखीच झालीय" अशी पावती मिळाली की तिचाही चेहरा उजळतो!

याठिकाणी आजीच्या आठवणीमुळे अजून एक पदार्थाचे वर्णन केल्याशिवाय रहावत नाहीये,तो म्हणजे तीन पिठी थालीपीठ. कणिक,ज्वारीचं पीठ आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. यात रात्री उरलेली भाजी,किंवा फोडणीचं वरण टाकायचं(वांग्याची भाजी असेल तर मग लॉटरी लागली समजा) या कालवलेल्या पिठाचं तेलावर फ्राय केलेलं थालीपीठ काय अप्रतिम लागतं म्हणून सांगू! मात्र यावर ताज्या लोण्याचा गोळा हा हवाच.

अजून एक प्रश्न मला नेहेमी सतावतो,तो म्हणजे हे पदार्थ फाईव्ह स्टार हॉटेल्स मध्ये का मिळत नाहीत? हो, म्हणजे जर का तिथे तारेच्या कळकट स्टँड मध्ये मळकट ग्लासमध्ये "कटिंग"चाय पन्नास रुपये ग्लास(अर्धा) मिळू शकतो तर मग या चविष्ट डिशेस का नाही! मला खात्री आहे की जर का हे लिखाण कुणा दर्दी शेफच्या नजरेस पडले तर तोही दिवस दूर नाही! पुढच्या वेळी जाल कुठे कॉन्फरन्सला आणि ब्रेकफास्ट करायला तिथल्या रेस्टॉरंट मध्ये तर दिसेल तुम्हाला "chopped fried Indian roti garnished with onion & corriander", किंवा "Traditional Indian fried rice", किंवा Grandma special Indian pancake!" मात्र या टेबलवर लाईन खूप लांब असेल हेही तितकेच खरे!

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनक...