Skip to main content

डॉक्टर्स डे!

१ जुलै २०१३.
डॉक्टर्स डे! 
भारत रत्न डॉ.बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस व पुण्यतिथी (दोन्ही एकाच दिवशी) भारतभर त्यांच्या सन्मानार्थ "डॉक्टर्स डे" म्हणून साजरा केल्या जातो.
भुसावळ इंडियन मेडिकल असोसिएशन ने डॉ.प्रवीण महाजन यांच्या धन्वंतरी ब्लड बँकेच्या विद्यमाने त्यादिवशी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं,आयएमए सभागृहात. त्यात भुसावळ आयएमए च्या सर्व सदस्यांनी रक्तदान करण्याचे ठरविले होते. मी व सुजातानीही सायंकाळी साडेचारच्या सुमारास जाऊन रक्तदान केले. त्यानंतर चहा-कॉफी आणि जमलेल्या डॉक्टर मंडळींशी गप्पागोष्टी असा कार्यक्रम आटोपून आम्ही स्कुटरवर घरी जायला  निघालो.

हंबर्डीकर चौकात दत्त बेकरीच्या समोर बरीच गर्दी पाहिली आणि काय भानगड आहे हे पहायला आम्ही थांबलो.पाहतो तर एक विशीचा तरुण रस्त्यात पडला होता आणि लोक त्याला कांदा-चप्पल सुंघव असा प्रकार करत होते. (अशा वेळी बहुतेक लोक नुसते बघ्यांचे काम करत असतात पण काही हुशार लोक '"चक्कर आली असेल,पाणी पाजा","ए,पाणी शिंपडा तोंडावर,आत्ता उठेल","कांदा सुंघवा,नाहीतर चामड्याची चप्पल आणा"असे सर्व अशास्त्रीय उद्द्योग आपणच सर्वज्ञानी असल्याच्या आविर्भावात करत असतात)
आम्ही दोघे ताबडतोब गर्दी दूर करून (छोटं गाव असल्यामुळे लोकांनी ओळखलं आणि वाट करून दिली) त्याच्यापाशी पोचलो. तो अगदी निपचित पडला होता,मी नाडी पाहिली,लागेना,गळ्यात कॅरॉटीड आर्टरीचेही ठोके लागेनात, श्वासही बंद होता.
सुजाता,अरेस्ट आहे,चल पट्कन, सीपीआर द्यावा लागेल.सुजातानी कार्डियाक मसाज सुरू केला आणि मी माऊथ टू माऊथ रेस्पिरेशन द्यायला लागलो.बरं, आमच्याजवळ हृदय सुरू झालंय की नाही हे पहायला स्टेथोस्कोपही नव्हता, छातीला कान लावूनच पहात होतो.दोन मिनिटं सीपीआर दिल्यावर सुरू झाले एकदाचे हृदय,आणि श्वासही घ्यायला लागला तो. त्याच्यासोबत फक्त त्याची मावशी होती,आम्ही पटकन एक ऑटो रिक्षा थांबवली,त्याला उचलून  डॉ.मानवतकरांच्या आयसीयू मध्ये नेलं.ऑक्सिजन,आयव्ही लाईन,सलाईन,इमर्जन्सी इंजेक्शन्स सर्व दिले,ईसीजी काढला डॉक्टरांनी.सुदैवाने हार्ट अटॅक नव्हता,पण तो अजून शुद्धीवर आला नव्हता,त्यामुळे मेंदूवर सूज असण्याची शक्यता होती.थोडी कंडिशन बरी झाल्यावर अंबुलन्स मध्ये त्याला जळगावला नुरॉलॉजी आयसीयू मध्ये हलवलं.दोन दिवसात एमआरआय,रक्ताच्या तपासण्या,सर्व नॉर्मल रिपोर्ट्स आले,आणि तीन दिवसात तो पूर्ण बरा होऊन घरीही परतला.नंतर कळले की तो नाशिकच्या एका आयुर्वेदिक कॉलेज मध्ये तिसऱ्या वर्षात होता.

मित्रहो,ही गोष्ट सांगण्यामागे आमची स्वतःची बढाई करणे आणि पाठ थोपटून घेणे हा उद्देश मुळीच नाही, तर हे कार्डियो पल्मनरी रीसक्सीटेशन (CPR) थोडे ट्रेनिंग असलेली व्यक्तीही देऊन कित्येक जीव वाचवू शकते हा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा आहे!🙏

आता थोडक्यात आपल्या शरीराचे कार्य कसे चालते ते बघूया.
शरीरातील सर्व अवयव पेशींनी मिळून बनले आहेत.त्या अवयवाच्या कार्यानुसार वेगवेगळ्या पेशी असतात,पण या सर्वांनाच ऑक्सिजन आणि ग्लुकोज हे मूलभूत घटक अत्यावश्यक असतात.हे पोहोचविण्याचे काम रक्ताद्वारे होते. हृदय हा रक्त आपल्या सर्व अवयवांना पोहोचविणारा एक पंप आहे.सर्व शरीराकडून आलेलं अशुद्ध रक्त शुद्धीकरणासाठी फुफ्फुसात पाठविणे,फुफ्फुसातून आलेलं शुद्ध रक्त मग सर्व अवयवांकडे पाठवणे हे काम हृदय अव्याहतपणे करत असते!

हृदय बंद पडण्याच्या कारणांमध्ये हार्ट अटॅक(Acute Myocardial Ischaemia or Infarction) या व्यतिरिक्त वेसो वेगल अटॅक(Vaso-Vagal attack) हे एक महत्वाचे कारण असते.अचानक मानसिक आघात झाला,खूप भीती वाटली,झोपलेल्या अवस्थेतून एकदम उठून उभे राहिले तर कधीकधी या वॅगस नावाच्या नर्व्हच्या उद्दीपनामुळे हृदय बंद पडू शकते. हृदय बंद पडले की पेशींना मिळणारा ऑक्सिजन आणि ग्लुकोजचा पुरवठाही बंद होतो.बऱ्याच पेशी काही काळ तग धरू शकतात,पण मेंदूच्या पेशी तीन मिनिटाच्यावर हा उपवास सहन करू शकत नाहीत आणि मेंदूतील महत्वाची सेंटर्स निकामी व्हायला लागतात.म्हणून या तीन मिनिटांना गोल्डन पिरियड म्हणतात,म्हणजे जर या तीन मिनिटात मेंदूचा रक्तपुरवठा सुरू झाला तर ती व्यक्ती वाचायची खूप शक्यता असते. सीपीआर मध्ये हृदयाला मसाज करायचा साधारणतः मिनिटाला साठ म्हणजे दर सेकंदाला एक,जेणेकरून हा पंप सुरू राहील आणि मेंदूला ऑक्सिजन आणि ग्लुकोज मिळत राहील,दुसरे म्हणजे या मसाजमुळे हृदयाच्या स्नायूंची चेतना जागृत होऊन स्वतःचे पंपिंगही सुरू होते. आता कार्डियाक मसाजमुळे रक्त शुद्धीकरणासाठी फुफ्फुसात तर पोहोचते पण श्वासच बंद असल्यामुळे ऑक्सिजन नसतो,त्यासाठी कृत्रिम श्वास द्यायचा, मिनिटाला पंधरा या गतीने.म्हणजे हृदयाला चारदा मसाज केला की एकदा कृत्रिम श्वास द्यायचा.
याचसोबत,ताबडतोब कुणीतरी अंबुलन्स बोलावून (नंबर १०८) सुसज्ज दवाखान्यात लवकरात लवकर नेण्याची सोय करावी.

आता थोड्या गैरसमजुतीही दूर करूयात.
एखाद्या व्यक्तीला चक्कर आली,फिट आली किंवा हार्ट अटॅक आला आणि ती खाली पडली याचा अर्थ तिचे ब्लडप्रेशर खूप कमी झाले आहे आणि मेंदूला रक्तपुरवठा कमी पडतोय.अशावेळी त्या व्यक्तीचे पाय डोक्यापेक्षा उंच केल्यास गुरुत्वाकर्षणाने रक्त मेंदूकडे पोहोचेल.अशा व्यक्तींना कधीकधी उलटी होऊ शकते आणि बेशुद्ध असल्यामुळे ती श्वासमार्गात अडकू शकते.म्हणून डोके खाली आणि एका बाजूस करावे म्हणजे उलटी बाहेर पडेल,झाल्यास ती फडक्याने पुसून घ्यावी.बसवून पाणी पाजण्याचा प्रयत्न तर मुळीच करू नये,पाणी श्वासनलिकेत जाऊन जीव गुदमरू शकतो.फिट आली असल्यास दातात जीभ चावली जाते,म्हणून एखाद्या रुमालाची घडी किंवा चमचा दातांमध्ये सरकवावा. चामडी चप्पल सुंघवणे याला काही अर्थ नाही.कांदा सुंघवल्याने त्याच्या झोम्बणाऱ्या तिखट वासाने मेंदूतील श्वसनकेंद्र उद्दीपित होऊन श्वास कधीतरी सुरू होऊ शकतो,पण नाकावर दाबल्याने हवेचा मार्ग बंद होऊ शकतो.

हे झालं थोडक्यात सीपीआर देण्याचं वर्णन.पुण्यातील सुप्रसिद्ध हृद्यरोगतज्ञ डॉ.सुहास हरदास(मला जीवदान देणारा माझा सख्खा मावसभाऊ) यांनी एक "वरदान" नावाचे ट्रेनिंग सुरू केले आहे सर्वांसाठी आणि ते इच्छुक असलेल्या सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग देतात व प्रशिक्षित लोकांना मग "लाईफ अँजेल" चे सर्टिफिकेट देतात.ती लिंक सोबत जोडीत आहे.

तर मित्रांनो बनूया आपण सर्व लाईफ अँजेल्स आणि मदत करू प्राण वाचवायला!

How to give CPR?

Life Angels by Hardas Heart Care,Pune.

https://youtu.be/YjRJAketi4k

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात,निव

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने होणारा प्रस

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनकरराव ३ वर