Skip to main content

नागपूर,आमचे लाडके नागपूर!

नागपूर,आमचे लाडके नागपूर!

आमच्या आयुष्याची सर्वात तरुणाईची, उमेदीची वर्षे ज्या शहरात गेली ते नागपूर! त्याविषयी खूप खूप गोष्टी आहेत,लिहीत बसलो तर एक जाडजूड पुस्तकच तयार होईल,पण आज एका खास आठवणीला उजाळा देण्यासाठी हा प्रपंच,ती म्हणजे नागपूरचे इंडियन कॉफी हाऊस!

नागपूरमध्ये त्यावेळी चार ब्रांचेस होत्या या ओरिजनल मद्रासच्या कॉफी बोर्ड ऑफ इंडियानी चालविलेल्या कॉफी हाऊसच्या : एक धंतोलीतील पंचशील चौकाच्या अलीकडील यशवन्त स्टेडियमसमोर,एक धरमपेठेत लक्ष्मीभुवन, सरोज टॉकीजसमोरील वेस्ट हायकोर्ट रोडवर,मुख्य शाखा
 सदरमध्ये लिबर्टी टॉकीज शेजारी,आणि चवथी म्हणजे आमच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजातील,आमच्या रोजच्या जीवनाचं अविभाज्य अंग असलेलं!

या कॉफी हाऊसला एक ऑरा आणि अरोमा अशा दोन्ही गोष्टी होत्या.आत शिरल्याबरोबर एक टिपिकल फिल्टर कॉफीचा घमघमाट(अरोमा) आणि एका वेगळ्याच साऊथ इंडियन संस्कृतीचं वातावरण(ऑरा)
पॉलिश केलेलं लाकडी फर्निचर,पांढरे स्वच्छ कडक इस्त्रीचे कपडे आणि त्यावर तुर्रेबाज फेटा घातलेले मितभाषी वेटर्स,आणि काउंटरवर बसलेला सो कॉल्ड मालक मात्र साध्या वेशात! मेनुकार्ड मागायची कधी जरूरच भासली नाही कारण आमचा मेनू फिक्स असायचा: घाई असली तर वडा उपमा किंवा इडली सांबार,वेळ असला तर दोसा- उत्तपा किंवा कटलेट! इथले कटलेट खूप छान असायचे आणि एक वेगळीच गोडसर चव असायची,बहुधा बिटरूट चा वापर करीत असावेत.त्यावर जे सॉस मिळायचे ते सुद्धा काचेच्या बाटल्यात नसून लाल रंगाच्या पांढरे झाकण असलेल्या पिचकारीसारख्या प्लास्टिकच्या बाटलीत असायचे,चवही टोमॅटो सॉसपेक्षा वेगळीच असायची, पण आवडायची मात्र नक्की!

इथली सर्वात घाईची वेळ म्हणजे सकाळी सात ते आठ! सर्व हाऊस ऑफिसर्स वार्ड किंवा ओटीच्या आधी घाईघाईनं नाश्ता करून पुढे जायचे,कुणाला बोलायला वेळ नसायचा.आठ ते दहा म्हणजे सकाळच्या लेक्चर्सला चाट मारलेली अंडर ग्रॅज्युअटची पोरं, आणि दहा ते साडेअकरा म्हणजे राउंड झाल्यावर बॉस सोबत आलेलं पूर्ण युनिट! तो सीन पाहण्यालायक असायचा : आयताकृती टेबलाच्या छोट्या बाजूकडील एकमेव असलेल्या खुर्चीवर बॉस,त्याच्या दोन्हीकडे असलेल्या दोन बाजूस त्यांचे डावे/उजवे हात-रीडर/लेक्चरर,त्यानंतर रजिस्ट्रार,पीजी स्टुडंट्स आणि या सर्वांची नीट व्यवस्था होतेय की नाही हे बघणारा हाऊस ऑफिसर! मात्र यावेळचे सर्व बिल बॉस देणार हा मात्र अलिखित शिरस्ता होता! एनके सर,दास सर,चौबे सर,सूर सर ही दिगग्ज मंडळी आली की काय थाट असायचा म्हणून सांगू! आणि रेडियोलॉजीचे व्हील चेयरवर आलेले,पांढरी फर कॅप घातलेले रुबाबदार दिवेकर सर दिसले की आपोआपच हात जुळायचे आणि मस्तक लिन व्हायचे!
बारा ते चार हा पिरेड पुन्हा पिरेड चुकव्यांसाठी किंवा प्रेमी युगुलांसाठीचा! कुणाचा कुणाशी टाका भिडलाय हे इथे कळायचे.

या कॉफी हाऊसला उधाण यायचे ते गॅदरिंग आणि इलेक्शनच्या काळात! कॉस्मो पॅनल,फ्रेंड्स पॅनल,उभे असलेले उमेदवार,घोषणाबाजी जिंकल्यावरचा जल्लोष,या सर्वांचा साक्षीदार आहे हे कॉफी हाऊस!

खूप वर्षात गेलो नाही नागपूरला आणि मेडिकलच्या कॉफी हाऊसमध्ये,पण पुढच्या भेटीत मात्र नक्की जाणार आणि नागपूरमध्ये असलेल्या सर्व
मित्रांना भेटायला तिथेच बोलावणार हे ठरलं!!💐💐

(कॉफी हाऊस आणि दोसा,याबद्दलचे अनुभव कथन पुढच्या भागात!🙏)

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनक...