Skip to main content

"देव", भाग दोन .. "तेथे कर माझे जुळती"

"दिव्यत्वाचीF जेथे प्रचिती
तेथे कर माझे जुळती"

आमचे हॉस्पिटल सुरू होऊन दोन वर्षे झाली होती,बाबांनी रेल्वे दवाखान्यातून रिटायरमेंट घेऊन मला मार्गदर्शन करणे सुरू केले होते, बऱ्यापैकी काम वाढले होते,सुजाताचं एमडीचं शेवटचं वर्ष होतं आणि तीही लवकरच पूर्णवेळ जॉईन होणार होती,मधुरा दीड वर्षांची झाली होती,एकंदरीत सर्व आनंदी-आनंद होता.

एके दिवशी एक कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करायचे होते.आधीची दोन अपत्ये,पाच वर्षांच्या वरची आणि सुदृढ,पेशन्टला ब्लड प्रेशर,डायबिटीस असा कोणताच आजार नाही आणि सर्व दृष्टीनं ऑपरेशनसाठी "फिट" असा शेरा फिजिशियन ने दिलेला,जोडीला रक्ताच्या तपासण्याचे रिपोर्टसही नॉर्मल.
सकाळी नऊ वाजता स्पायनल अनेस्थेशीया मध्ये ऑपरेशन सुरू केले (स्पायनल म्हणजे पाठीच्या मणक्यांमध्ये एका बारीक सुईने एक औषध टोचायचे,ज्यामुळे एक-दीड तास कमरेखालचा भाग बधिर होतो आणि पोटाची आणि त्याखालील भागांची ऑपरेशन्स करणे सोप्पे जाते.) वीस मिनिटात संपलेही,काहीच गुंतागुंत न होता.पेशन्ट आमच्याशी पूर्णवेळ गप्पा करीत होती. पलंगावर शिफ्ट केल्यावर शिरस्त्याप्रमाणे मी व अनेस्थेटीस्ट डॉ मंगेश खानापूरकर यांनी पेशंटची शुद्ध, नाडीची गती,रक्तदाब,लघवीची मात्रा (consciousness,orientation,respiration,pulse,blood pressure,urine output) तपासली,सलाईन व्यवस्थित सुरू आहे हे पाहिले,रुग्ण आणि नातेवाईकांशी गप्पा मारल्या आणि ओपीडीत पेशन्ट पाहणे सुरू केले.दर अर्ध्या तासांनी या सर्व गोष्टींची सिस्टर व असिस्टंट डॉक्टर पाहून मला माहिती देतच होते.
साधारणतः दुपारच्या साडेबारा वाजता पेशन्ट थोडीशी असम्बद्ध बोलतेय असा मला निरोप आला,मी जाऊन पूर्ण पाहिलं,सर्व वैद्यकीय बाबींचे मापदंड  (parameters) नॉर्मल होते,आणि झोपेच्या इंजेक्शन मुळे गुंगीत कधीकधी थोडे विचित्र बोलतात त्यातला प्रकार असेल असे वाटले. परंतु थोड्या वेळात ती फार बेताल (Rowdy) झाली,चार जणांना आवरेना,जोरजोरात किंचाळणे, हातपाय फेकणे,हे प्रकार सुरू झाले,काही कळेना काय असावे आणि काय करावे ते! पहिला कॉल अर्थातच अन्सथेटिस्टला,तो धावतच आला,असंबद्ध बोलणे आणि हालचाल याव्यतिरिक्त सर्व बाबी नॉर्मल होत्या,आम्ही फिजिशियन डॉ अनिल चौधरी यांनी बोलावले,त्यांनाही हे किंचाळणे आणि हातपाय झटकणे याचा कशाशी संबंध आहे ते कळेना.बरं, फीट येऊन झटके येतात त्यातलाही प्रकार नव्हता.(Convulsions) मेंदूविकार तज्ञ डॉ सुनील गाजरे जळगाव यांना बोलावले.त्यांनी मेंदूला सूज आहे असे समजून ती उतरण्यास मॅनीटॉल,स्टिरॉइड्स,हाय्यर अँटीबायोटिक्स द्यायला सांगितले,त्याप्रमाणे दिले.नेत्ररोग तज्ञास पाचारण करून दृष्टिपटल (Retina) तपासला,तोही नॉर्मल! सर्व वैद्यकीय मापदंड नॉर्मल असतांना पेशन्टचे किंचाळणे आणि असम्बद्ध बडबड थांबेना,आम्ही सर्वजण हतबुद्ध झालो होतो.पेशंटला काहीतरी प्रॉब्लेम आहे ही बातमी पसरली आणि पाहता पाहता संध्याकाळपर्यंत पन्नास नातेवाईक आणि त्यांच्या हितचिंतकांचा गराडा पडला दवाखान्याला!
आता नवीन प्रॉब्लेम सुरू,पेशंटचा उपचार,निदान काय असेल याची काळजी,तिला वाचवायची चिंता यासोबत नातेवाईकांचे समुपदेशन सुरूच होते,परंतु पेशंटशी फार जास्ती संबंध नसलेले "हितचिंतक"ही जेंव्हा केबिनमध्ये घुसून आरडाओरडा करत,टेबलावर मूठ आपटून,"हे कसे काय झाले डॉक्टर, चुकीची नस कापली का,खर्च कितीही येऊ द्या,पैश्याची चिंता नका करू,पण आमचा पेशन्ट बरा व्हायलाच पाहीजे",असा गोंधळ घालू लागले तेंव्हा डोकं शांत ठेवणं कठीण झालं आणि चिंताही वाटू लागली,त्यात आई-बाबा,(डॉ जयंत केळकर) नागपूरला गेलेले,इथे मी एकटाच, पण त्यातल्यात्यात एक बरं म्हणजे सुजाता एक दिवसाच्या सुट्टीत मधुराला घेऊन आलेली होती, तिचा मानसिक आधार होता फार मोठा!
रात्री नऊ वाजता पेशंटची परिस्थिती तशीच,बिकट.आम्ही सर्व,डॉ अनिल,डॉ मंगेश,माझ्या विश्वासु स्टाफ जया-शशी सोबत तिथेच बसलेलो तिच्याकडे लक्ष ठेवत.त्यावेळी सुसज्ज अशी क्रिटिकल केयर सेंटर्स नव्हती जिथे ठेवता आलं असतं.
आता एक नवा मोड आला..... साडेनऊ वाजता नवरेबुवा दारू पिऊन फुल्ल टाईट अवस्थेत आले आणि खूप आरडाओरडा-तमाशा करून धमकी देऊन गेले की पाहून घेईन तुम्हाला,काही झालं माझ्या बायकोला तर! अशा प्रसंगी आपला तोल ढळू द्यायचा नाही,डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवायची ही आमचे सर,नागपूरचे डॉ गोवर्धन यांची शिकवण आठवली."आलिया भोगासी असावे सादर,चित्ती असू द्यावे समाधान" ही उक्ती म्हणणे सोपे आहे,अंगिकारणे फार कठीण,याची जाणीव झाली.
आम्ही कुणीच सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते,सुजातानी सर्वांसाठी चहा बिस्किटे आणली आणि जबरदस्ती दोन बिस्किटे,अर्धा कप चहा प्यायला लावला.टेन्शन काही केल्या कमी होईना,आणि पेशन्टचे काही बरेवाईट झाले,तर वैद्यक व्यवसाय सोडायचा हे मनोमन नक्की केलं!
हे सर्व सुरू असताना दुनाखे काका,ज्यांच्याबद्दल मी मागील लेखात सांगितले होते,ते कुठूनतरी आले,नेहेमीप्रमाणे घाईत आणि म्हणाले "आज फार नाचवलं या तरसोदच्या गजाननाने,काय गर्दी म्हणून सांगू,त्यामुळे राहून गेलं की आमच्या दत्ताचं दर्शन,आता उद्या आहे पुन्हा भांडण,असो,तोच सगळं घडवतो हे आणि स्वतःच भांडतो." माझा काही मूड नव्हता आज काकांशी बोलायचा,माझ्याच विवंचनेत बुडालेलो, काय बोलू त्यांच्याशी, काकांनीही प्रसाद ठेवला टेबलावर,नेहेमीप्रमाणे मी पाया पडलो त्यांच्या,पण मन काही थाऱ्यावर नव्हतं, काकांनी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले,"बाबांचा खास निरोप आहे,काही काळजी करू नकोस,सर्व काही ठीक होईल."आणि गेलेही उलट्यापावली. मी जरा चिडलोच होतो, इथे सर्व स्पेशालिस्ट हात टेकवून बसलेत,सर्व उपाय थकले आणि हे म्हणतायत सर्व ठीक होईल,डोंबल माझं!

रात्रीचे बारा वाजले,कंडिशन तशीच,आरडाओरडा,हातापायाला झटके देणे सुरूच,चार लोक धरून बसलेले,सलाईनची सुई(Intracath) आणि लघवीची नळी( urinary catheter)निघू नाही याच्या काळजीनं.आम्हीही सर्व तिथेच ठिय्या देऊन बसलेलो,बाहेर पन्नास साठ लोक बसलेले,परिस्थिती नाजूक. मनात विचारांचे काहूर...मधेच काकांचे शब्द आठवतायत...काळजी करू नकोस,सर्व काही ठीक होईल....

उठलो आणि आलो एकटाच  ऑपरेशन थिएटरमध्ये, सर्व देवांच्या फोटोसमोर हात जोडून उभा राहिलो,(अहंकार कसा असतो बघा,मी देवाला हात जोडतोय हे कुणाला दिसू द्यायचे नव्हते मला!)सत्यसाईंकडे डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिलं तर चक्क हसतांना दिसले ते मला(छे, भास होत असेल)
मी म्हणालो,की खरंच तू असशील कुठे आणि जगाची काळजी असेल तुला,तर माझ्या त्या निष्पाप पेशंटला बरं कर,काय दोष आहे तिचा,अरे दोन लहान मुलं आहेत तिला,त्यांनी काय घोडं मारलंय तुझं,त्यांनी का म्हणून अनाथ-पोरकं असं जीणं जगायचं आयुष्यभर,जी द्यायची ती शिक्षा मला दे,मी तयार आहे.

रात्रीचे दोन वाजले,तीन वाजले,तीच स्थिती,आम्ही जास्त जास्त हतबल होत चाललो होतो,आणि उद्याचा दिवस काही ही बाई पाहणार नाही याची खात्री पटत चालली होती.माझ्या डोळ्यासमोर सर्व चित्र तरळत होत : नातेवाईकांचा गोंधळ, पोलीस,पोस्ट-मॉर्टेम,त्यात कुटुंब नियोजनाची केस म्हणजे अजूनच सेन्सिटिव्ह! पण हे सर्व काय आहे,का झालं याचं उत्तर काही सापडत नव्हतं मनाला,शास्त्रीय विवेचन करूनही. जाऊद्या,नशिबात असेल ते होईल प्रयत्नात तर कमी नाही पडलो ना आपण,सुजाता धीर देत होती,देवावर विश्वास ठेवा,आणि पडा थोडं,मी आहे ना पेशन्ट जवळ.

देवावर विश्वास? कुठे आहे देव,सर्व अंधविश्वास,फालतुपणा,खोट्या आशेवर किती जगायचं?सोडा,कशाला दुखावू सुजाताला,ती बिचारी मला बरं वाटावं म्हणून म्हणतेय.

पहाटे पावणेपाचला पेशंटला थोडी झोप लागली,मी घाबरलो,की कोमात गेली की काय! पण सर्व मापदंड ठीक होते,चिमटा काढला की हातपाय हलवत होती. मलाही थोडी डुलकी लागली मग. सकाळी सहा वाजता सुजातानी हलवून ओरडून उठवलं मला,अहो उठा लवकर पहा,ही जागी झाली. माझा विश्वास बसेना माझ्या डोळ्यांवर,पेशन्ट पूर्ण जागी होती आणि माझ्याकडे बघून हसत होती.आजूबाजूला पाहून म्हणाली,का इतके लोक जमलेत माझ्याजवळ,मला भूक लागलीय,आणि ही लघवीची नळी काढा,मला जाऊद्या बाथरूममध्ये! इतकी नॉर्मल झाली ती,उठून लघवीला गेली,चहा बिस्किटे खाल्ली,सर्वांशी गप्पागोष्टी,फक्त मागच्या वीस तासात काय घडलं याचे विस्मरण! दुसऱ्या दिवशी सर्व नातेवाईक आणि हितचिंकांची पांगापांग,पेशंटही ड्रेसिंग करून घरी. पैश्याची चिंता  करू नका म्हणणारे बिलाच्या वेळी मात्र गायब,म्हणजे चिंताच नाही!असो,पेशन्ट बरी झाली यातच सर्व काही मिळालं.

हे काय होतं, आणि ती कशी ठीक झाली हे मला आजपर्यंत न उलगडलेलं कोडं आहे.
त्या दिवशी मी सुजाता आणि सर्व स्टाफला घेऊन पुन्हा ऑपरेशन थिएटर मध्ये गेलो आणि आणि सर्व अहंकार बाजूला ठेवून त्या सर्व देवांना मनोमन नमस्कार केला.मी म्हणालो,आज पटलं मला की देव नावाची शक्ती आहे,तिला नाव तुम्ही काहीही द्या,ती तुम्हाला दिसत नाही,भेटत नाही,पण तिचा अनुभव येतो,जो आज मला आणि आपल्या सर्वांना आला!

सर्वजण बाहेर गेल्यावर मी सर्व देवांना पुन्हा एकदा नमस्कार केला,तर काय सर्वजण मला चक्क हसतांना दिसले आणि सत्यसाईबाबांनी तर छानसे डोळेच मिचकावले माझ्याकडे बघून!

आजही हे सर्व फोटो माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत,त्यात आम्हाला अकाली सोडून गेलेल्या दोघांची भर पडलीय,एक माझे वडील,डॉ.जयंत केळकर आणि भावासारखा माझा असिस्टंट,धनंजय जोशी!(जया)

आजही ऑपरेशन करतांना काही गुंतागुंत वाटल्यास मी या सर्वांकडे पाहतो,आणि काय सांगू मित्रांनो,योग्य दिशा सापडतेच!

या विश्वासाला तुम्ही काय म्हणाल,श्रद्धा की अंधश्रद्धा?

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात,निव

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनकरराव ३ वर

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन*

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन* मित्रांनो, काल खूप दिवसानंतर रेल्वेचा भोंगा ऐकला ज्याला "सायरन"असे म्हणतात.आमच्या लहानपणी सर्व भुसावळकर जनतेच्या जीवनाचा हा भोंगा अविभाज्य अंग असायचा. डी.एस.ऑफिस(आताचे डी.आर.एम.ऑफिस) च्या छतावर हा बसविलेला आहे आणि आवाज इतका मोठा आहे की संपूर्ण शहरात सहज ऐकू यायचा,आता शहर खूप वाढल्यामुळं माहीत नाही सगळीकडे ऐकू येत असेल की नाही ते. सकाळी आठ,दुपारी चार आणि रात्री बारा अशा तीन वेळा हा भोंगा वाजत असे. रेल्वेच्या बहुतेक ड्युट्या सकाळी आठ ते दुपारी चार,दुपारी चार ते रात्री बारा आणि रात्री बारा ते सकाळी आठ अशा असायच्या. सकाळच्या ड्युटीला मॉर्निंग म्हणायचे पण दुपार आणि रात्रीचीला चार-बारा आणि बारा-आठ असेच प्रचलित  नाव होते. हे भोंगे अथवा सायरन्स या ठराविक वेळीच आणि एकदाच वाजायचे. एकावेळी एकापेक्षा जास्तीवेळा वाजले,तर त्याचा वेगळा अर्थ असायचा. तीन वेळा वाजले याचा अर्थ भुसावळ स्टेशन किंवा यार्ड परिसरात गाडी किंवा डब्बा रुळावरून घसरलाय,डिरेलमेंट झालीय किंवा अपघात झालाय,पाच वेळा वाजले म्हणजे भुसावळ डिव्हिजन मध्ये हा प्रकार घडलाय आणि सात वेळा वाजले म्हणजे भ