Skip to main content

"खलील"

"खलील"

१९८४ डिसेंम्बर,मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज  नागपूर,एम.बी.बी.एस.करून,एक वर्षाची इंटर्नशिप करून पुढे एम.एस.जनरल सर्जरी करण्याची सुरुवात म्हणून,सर्जरी डिपार्टमेंट मध्ये हाऊस ऑफिसर(त्यावेळचं नाव,आत्ताचं-ज्युनियर रेसिडेंट)म्हणून रुजू झालो. मला हेड ऑफ दी डिपार्टमेंट डॉ.एन.के.देशमुख यांचा वॉर्ड नं.७ मिळाला.

आता थोडक्यात मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये काम कसे चालते ते पाहू : प्रत्येक स्पेशालिटीचे एकेक डिपार्टमेंट असते,जसे-सर्जरी,गायनिक,मेडिसिन,पीडियाट्रीक,ऑपथॅलमोलॉजी,इएनटी,ऑर्थोपेडिक वगैरे.प्रत्येक डिपार्टमेंटचे युनिट्स असतात,काम-शिक्षक-विद्यार्थी यांच्या संख्येवर अवलंबून दोन ते सहापर्यंत. प्रत्येक युनिटला एक मेल आणि एक फिमेल वॉर्ड असतो रुग्ण भरती करण्यासाठी.प्रत्येक वॉर्ड मध्ये साधारणतः चाळीस ते पन्नास रुग्ण भरती असतात.युनिटच्या ऍडमिशन डे ला त्या चोवीस तासातील सर्व रुग्ण त्या युनिटच्या वॉर्डस मध्ये भरती होतात.आमच्यावेळी दर ऍडमिशन डे ला साधारणतः दोन्ही वॉर्ड मिळून चाळीस रुग्ण भरती व्हायचे.
हाऊस ऑफिसर हा वॉर्ड मधील सर्वात ज्युनियर मेम्बर,त्याच्यावर वॉर्डची संपूर्ण जबाबदारी : ऍडमिट झालेल्या प्रत्येक रुग्णाची पूर्ण माहिती घेणे,ती ऍडमिशन फॉर्मवर व्यवस्थित उतरवणे,सिनियरनी सांगितलेल्या सर्व तपासण्या(रक्ताच्या तपासण्या,एक्स-रे,सिटी स्कॅन,ई.)रक्त लागणार असेल तर ब्लड बँक मध्ये त्याच्या नावाने रिझर्व्ह करणे,नातेवाईकांचे समुपदेशन करून ऑपरेशनची संमती घेणे,प्रिऑप राउंड मध्ये अनेस्थेटीस्ट ने सांगितलेल्या तपासण्या करवून फिटनेस घेणे. ही कामे झाल्यावर,पहिले स्वतः चा राउंड-ड्रेसिंग्स-डिस्चार्ज कार्ड्स भरणे,मग येण्याऱ्या प्रत्येक सिनियर सोबत(रजिस्ट्रार,लेक्चरर,रीडर,असोशिएट प्रोफेसर आणि शेवटी-बॉस,युनिट इंचार्ज)राउंड घेणे आणि त्यात दिलेल्या सूचना अमलात आणणे,राउंड झाल्यावर बॉस आणि सर्व सिनियर्स ची चहा नाश्त्याची सोय बघणे, मग स्वतः चा अभ्यास,लायब्ररी,थिसिस ची तयारी,सेमिनार्स ची तयारी,अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना शिकविणे,यातून वेळ मिळेल तेंव्हा दाढी-आंघोळ-जेवण आणि झोप घेणे!

तर सांगायचा मुद्दा असा,की मी जेव्हा नव्याने रुजू झालो तेंव्हा ही सर्व सिस्टीम समजून घेण्यास आमच्या इनचार्ज सिस्टर,स्टाफ सिस्टर्स,ब्रदर्स,आणि वॉर्ड मधील स्वीपर,बार्बर यांनी मदत केलीच पण एक "खलील"नावाच्या  बारा-तेरा वर्षांच्या मुलाने सावलीसारखे माझ्यासोबत राहून मला सर्वतोपरी "टाईम मॅनेजमेंट"शिकवले,धीर दिला आणि पहिल्या आठवड्यातच मी पीजी सोडून देण्याचा विचार करत होतो,त्यापासून परावृत्त केलं!

आता हा खलील कोण ते पाहूया.
त्याकाळी नागपूर मेडीकल कॉलेज हे मध्यप्रदेश,आंध्रप्रदेश,छत्तीसगढ ई. जवळच्या राज्यातील रुग्णांसाठी उपलब्ध असलेली सर्वात मोठी सरकारी वैद्यकीय  यंत्रणा होती,त्यामुळे या भागातील भरपूर रुग्ण असायचे.खलील हा असाच,आंध्र प्रदेशातील एका छोट्या गावातील सात-आठ वर्षांचा अनाथ पोरगा. सोडावॉटर (गोटीसोडा)बनवण्याच्या फॅक्टरीत काम करायचा आणि पोट भरायचा.एकदा ती गोटी भरून बाटली सील करतांना फुटली आणि त्या सोड्याच्या प्रेशरने फुटलेल्या काचेच्या तुकड्याने याचा गळाच चिरला! मरणासन्न अवस्थेत त्याला नागपूर मेडिकल मध्ये आणण्यात आले.त्याची श्वासनलिका आणि अन्ननलिका दोन्ही कापल्या गेल्या होत्या,कसंबसं ताबडतोब ऑपरेशन करून रक्तस्त्राव थांबविला,भरपूर रक्त दिले,परंतु या दोन्ही नलिका ताबडतोब जोडणे शक्य नसल्यामुळे,श्वास घेण्यासाठी गळ्यात छिद्र करून श्वासनलिका उघडून  ठेवली(Tracheostomy)आणिअन्ननलिका वरती बंद करून अन्नासाठी पोटात छिद्र करून एक नळी टाकून ठेवली( Feeding Gastrostomy).आता स्वर यंत्रात हवा जाणे बंद झाल्यामुळे त्याचे बोलणे बंद झाले,तो तोंडाने हवा सोडून नुसताच "चुक चुक"असा आवाज काढायचा आणि खुणेनीच बोलायचा.तोंडावाटे खाणेही बंद झाले,सर्व नळीवाटे! काही दिवसातच त्याचे सो कॉल्ड नातेवाईक पसार झाले आणि खालिद वॉर्ड नं.७ ने दत्तक घेतला.(ही सर्व घटना मी जॉईन व्हायच्या पाच-सहा वर्षे आधीची आहे.) अन्ननलिका आणि श्वासनलिका जोडण्याचे ऑपरेशन खूप मोठे असल्यामुळे तो मोठा होऊन प्रकृती चांगली झाल्यावर करण्याचे ठरले. एनके सरांनी त्यांच्या स्पेशल पॉवर्स मध्ये त्याला रोज दोन अंडी आणि दोन लिटर दुध मंजूर करून घेतले होते.तो आपल्याच हातानी दूध-अंडी फेटून त्यात प्रोटीन पावडर,आयर्न-कॅल्शियम-व्हिटॅमिनच्या गोळ्या मिसळून  त्या नळीतून पोटात टाकायचा.वॉर्डच्या एका कोपऱ्यात त्याचा पर्मनंट पलंग होता,मात्र तिथे तो फक्त रात्रीच झोपायचा,त्याआधी प्रयत्नपूर्वक अभ्यास करून मराठी-इंग्लिश जुजबी का होईना,पण लिहिणे-वाचणे शिकायचा ड्युटीवर असलेल्या स्टाफला विनंती करून,दिवसभर हाऊस ऑफिसर सोबत सर्व कामे करायचा,(इन्वेस्टीगेशन्स चे फॉर्म्स आणून देणे, भरण्यास मदत करणे,तपासणीसाठी रक्त काढण्यास मदत करणे,सलाईन लावण्यास मदत करणे,सॅम्पल्स पॅथॉलॉजी डिपार्टमेंट मध्ये पोचवणे,तिथून रिपोर्ट्स आणणे,ते त्या-त्या रुग्णाच्या फाईलला लावणे,डिस्चार्ज कार्ड्स भरण्यास मदत करणे,इतकेच काय तर हाऊस ऑफिसरला वेळ नसल्यास कॉफी हाऊस मधून किंवा मेडिकल चौकातील शंकरआश्रमातून समोसा आणून देणे,ही सर्व कामे तो बिनबोभाटपणे करायचा.मेजर ऑपरेशन असलेल्या किंवा सिरीयस पेशन्ट असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना धीर देणे, त्यांची खाण्यापिण्याची सोय बघणे ही कामंही तो आपल्या मनानेच करायचा.खलील म्हणजे नवीन हाऊस ऑफिसर आणि सर्व रुग्णांसाठी एक देवदूतच होता,आणि नागपूर मेडिकल कॉलेज वॉर्ड नं ७ चा अविभाज्य अंग बनला होता!

१९८७ साली एम.एस.जनरल सर्जरी पास झाल्यावर माझं नागपूर सुटलं तरी सुट्टीत जेव्हाही नागपूरला जायचो,वॉर्ड सातचा सर्व स्टाफ आणि खलील,न चुकता भेटायचोच.(वॉर्ड नं ७ मध्ये काम केलेले जवळजवळ सर्वच डॉक्टर्स नागपूरला आले,की खलीलला भेटायचेच.)

काही वर्षांनी असा निरोप आला की आता खलीलचे ऑपरेशन करून अन्ननलिका आणि श्वासनलिका एकमेकांना जोडण्याचे ठरले आहे आणि यासाठी युनिट वन मधून एम.एस.करून पुढे कार्डियो थोरॅसिक सर्जरीत सुपर स्पेशलायझेशन करून इंग्लडमध्ये स्थायिक झालेला एक डॉक्टर येणार आहे. ऑपरेशनच्या दिवशी मूळचे वॉर्ड सात मध्ये काम केलेले आणि देश-विदेशात स्थायिक झालेले सुमारे पंचवीस डॉक्टर्स आले होते. ऑपरेशनच्या आधी आम्ही सर्वांनी खलीलला भेटून मिठी मारून शुभेच्छा दिल्या,तोही हसतमुखानी म्हणत होता की आता ऑपरेशन नंतर मला बोलता येईल,खाता येईल  आणि मी तुम्हा सर्वांशी मनसोक्त गप्पा मारीन,आणि तुमच्यासोबत शंकरआश्रमाचे समोसे खाईन(त्याला बिचाऱ्याला त्याची चव खूप छान असते हे माहीत होते,पण कधी खाऊच शकला नव्हता!)

त्या दिवशी इतर सर्व ऑपरेशन्स रद्द करून फक्त खलीलची केस ठेवली होती,हव्या तितक्या रक्ताच्या बाटल्या उपलब्ध करून ठेवल्या होत्या.ऑपरेशन सुरू झाले,गळ्यातील इजेमुळे सर्व महत्वाच्या रक्तवाहिन्या,मज्जातंतू,थायरॉईड ग्रँथी, अन्ननलिका आणि श्वासनलिकेचे फाटलेले तुकडे,सर्व एकमेकांना चिटकून सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे नुसता "चिवडा",चोथा",किंवा पुणेकरांच्या शब्दकोशातील "बल्ल्या" झालेला होता. काळजीपूर्वक डिसेक्शन करून ते सर्व सोडवून रिकन्स्ट्रक्शन करणे सुरू होते,एवढ्यात अनर्थ झाला.पल्मनरी एम्बोलायझेशन नावाचा प्रकार घडला(ज्यात रक्तवाहिनीमधून हवा ओढली जाते,त्याचे बुडबुडे फुफ्फुसाच्या धमनीत अडकतात आणि तडकाफडकी मृत्यू होतो.)आणि सर्वांदेखत इतके सर्व स्पेशालिस्ट असतांना,त्याकाळचे सर्वोत्कृष्ट ऑपरेशन थिएटर,सर्व प्राण वाचवू शकणारी उपकरणे असतांना सुद्धा कुणीच खलीलला वाचवू शकले नाही आणि आमच्यासर्वांदेखत तो आम्हाला पोरकं करून पुढील यात्रेसाठी रवाना झाला.😔

आम्ही सर्वजण एकमेकांची सांत्वना करत होतो,अश्रू पुसत होतो,एनके सर भावविवश झाल्याचे मी पहिल्यांदा पाहिले!
आम्ही कुणीच त्या दिवशी जेवलो नाही आणि अजूनही कधीही समोसा खातांना पहिला घास खलीलच्या आठवणीनं अडकतोच!

मला खात्री आहे की आमचा खलील वरती नक्कीच अल्लाहचा उजवा हात झाला असेल,आणि आम्हा सर्वांसाठी आणि वॉर्ड नंबर सातच्या सर्व रुग्णांसाठी अल्लाह कडे रोज दुवा मागत असेल!🙏🙏

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनक...