Skip to main content

"देव" भाग एक.

*"देव"*

माझ्या कन्सलटिंग रूम आणि ऑपरेशन थिएटरमध्ये  गणपती,दुर्गादेवी,बालाजी,दत्तभगवान,येशू,गुरुनानक,साईबाबा,स्वामी समर्थ,गजानन महाराज,सत्यसाईबाबा,अजमेर दर्गा ई.सर्व धर्मातील देव-देवतांचे फोटो आहेत कारण आजारी व्यक्तींनी आपले श्रद्धास्थान असलेला फोटो पाहिला की आपोआपच धीर येतो आणि मन हलके होते असा माझा अनुभव आहे.हे सर्व फोटो माझ्या सर्व धर्मातल्या श्रद्धाळू पेशन्टनीच आणले आहेत. मी स्वतः कोणत्याच एका देवाला मानत नाही,पण त्या शक्तीला नमस्कार करतो जी अदभुत, अनाकलनीय आहे,जीला आपण ईश्वर-गॉड-अल्लाह असे म्हणतो,आणि सर्वांना चांगली बुद्धी,चांगले आरोग्य दे एवढेच मागतो.(एवढे मिळाले की त्यासोबत सुख-शांती-समाधान येणारच!)

तर मित्रांनो,हा सर्वशक्तिमान देव कुणाला दिसत नाही, भेटत नाही तर तो "अनुभवावा"लागतो!
माझ्या एका कन्सलटिंग रूममध्ये माझ्या खुर्चीमागे श्री सत्यसाईबाबा यांचा पूर्णाकृती फोटो आहे,तो फोटो पाहून येणारे कित्येक लोक "साईराम" म्हणून नमस्कार करतात तर कित्येक लोक भुवया उंचावून "डॉक्टर तुम्ही सुद्धा?" असा चेहेरा करतात. हा फोटो तिथे आलाच कसा? याची "ष्टोरी" तुम्हाला आज सांगतो!

आमच्या वडिलांचे एक दुनाखे म्हणून टेलिफोन डिपार्टमेंट मध्ये काम करणारे मित्र होते,आम्ही दुनाखेकाका म्हणायचो त्यांना.दुनियेतील सर्व देव-बाबा यांची भक्ती करण्याचा ठेका जणू यांनीच घेतला होता अशा अविर्भावात वावरायचे! बजरंगबली, गणपती,दत्त,साईबाबा,गजानन महाराज कोणत्याही मंदिरात दर्शन घेऊन आले की न चुकता आमच्या घरी प्रसाद घेऊन यायचे.त्यांची वागण्या-बोलण्याची पद्धत अशी होती : "भांडून आलो आज दत्ताशी,समजतो काय स्वतःला,फ्रॅक्चर झाल्यामुळे दोन महिने अंथरुणावर पडून होतो,तर ओरडला माझ्यावर,की कुठे होता इतक्या दिवस म्हणून! मग मीही चिडलो,म्हणालो,मी नाही आलो,तर तुला नव्हतं का येता येत,वारेवा....मग नरमला, म्हणाला जाऊदे,आता बरायस ना!"(त्यांना न ओळखणाऱ्या माणसाला वाटेल की वेडाच आहे,पण ते स्वतःमध्येच मस्त असायचे आणि आपली नोकरी,कुटुंब,कर्तव्ये,सर्व व्यवस्थित सांभाळून भक्ती करायचे,फार अफलातून व्यक्ती होती!) तर एकदा हे दुनाखेकाका घरी आले आणि म्हणाले,"काल रात्री जेवून अंगणात हात धुवायला गेलो,तर समोर प्रत्यक्ष सत्यसाईबाबा उभे!म्हणाले अरे,आशुतोषच्या कन्सलटिंग रूम आणि ऑपरेशन थिएटर मध्ये माझा एक-एक फोटो लाव. उद्या आणून लावतोय मी,चालेल ना?" काय बिशाद नाही म्हणायची माझी!
तर अशा रीतीनं ते फोटो माझ्या तपासणीच्या खोलीत आणि ऑपरेशन थिएटर मध्ये विराजमान झाले!

असेच एके दिवशी काका म्हणाले,की बाबांनी तुझ्या वेटिंग रूम मध्ये एक भजन करायला सांगितलं आहे,करू का? म्हंटलं करा. मला वाटलं की या निमित्ताने काही देणगी अपेक्षित असेल,ठिकाय, देऊया.(किती कोतं मन होतं माझं,हे मला नंतर कळलं!)

ठरल्या दिवशी सकाळी सात वाजता सर्व (चाळीस-पन्नास)साईभक्त मंडळी  जमली,त्यात स्त्री-पुरुष आणि लहान मुले सुद्धा होती.आल्याबरोबर त्यांनी स्वतः आणलेल्या झाडूनं वेटिंग रूम आणि बाहेरचा पॅसेज स्वछ झाडला-पुसून लक्ख केला,आपापल्या चपला बाहेर नीट काढून ओळीनं लावून ठेवल्या,सोबत आणलेला बॅनर बाहेर दोरीनं व्यवस्थित बांधला,रूमच्या आत सतरंज्या टाकल्या,समोर खुर्चीवर बाबांचा एक फोटो ठेवला,त्याला हार घातला,पूजा केली.मग त्यांच्यातल्या दोघातिघांनी प्रवचन दिले,भजने म्हंटली.(माईक,लाऊडस्पीकर वगैरे लावून पूर्ण गल्लीला त्रास देणे तर दूरच,पण माझ्या दवाखान्यातील ऍडमिट पेशन्ट्सना सुद्धा त्रास होणार नाही याची खबरदारी घेत,हळुवार आवाजात सर्व सुरू होतं!)आम्हाला म्हणाले तुम्ही आलात,बसलात तर आनंद होईल,जबरदस्ती नाही.दोन तास हा भक्ती-आनंद सोहळा सुरू होता,झाल्यावर त्यांनीच किटलीत आणलेला चहा आणि पेढयांचा प्रसाद आम्हाला आणि सर्व भक्तांना दिला,सर्व पुन्हा नीट स्वच्छ करून शांततेने परत जायला निघाले. माझ्याकडून काहीच न मागता निघाले? मलाच लाज वाटली,मी विचारलं,काका,ही भक्त मंडळी कुठुन आली आहेत,मी त्यांची जेवणाची व्यवस्था करतो. काका उत्तरले, ही भक्तमंडळी वरणगाव,जळगाव,पाचोरा,चाळीसगाव ते धुळे इथपासून आली आहेत,त्यांनी शिधा आणला आहे,आता माझ्या घरी जाऊ,तिघे स्वयंपाक
 करू,जेवणी करू, मग एक भजन माझ्याइथे करून सर्वजण आपापल्या घरी परततील.
सगळं कसं,आखीव रेखीव,आरडाओरडा गोंधळ काही नाही,आणि लहानथोर,सर्वांच्या चेहेऱ्यावर हसू आणि समाधान!

आता मला थोडं थोडं पटायला लागलं की देव दिसत नाही,भेटत नाही,देवत्व अनुभवावं लागतं, पण खरी प्रचिती अजून यायची होती,ती कशी आली,ते एका पेशन्टच्या अनुभवातून,पुढच्या भागात!

                          क्रमशः

Comments

  1. दुखानेकाका एकदम अफलातून व्यक्तिमत्व.देवाशी मित्रत्वाच्या नात्याने वागणारे असेही माणसे असतील, यावर विश्वासच बसत नाही.

    ReplyDelete
  2. दुखानेकाका एकदम अफलातून व्यक्तिमत्व.देवाशी मित्रत्वाच्या नात्याने वागणारे असेही माणसे असतील, यावर विश्वासच बसत नाही.

    ReplyDelete
  3. खूप छान मस्त वर्णन केलय हुबेहूब व्यक्तिचित्रण

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनक...