Skip to main content

"क्रिकेट मॅनिया"

"क्रिकेट मॅनिया"

सध्या आयपीएल ने भारावलेलं वातावरण आहे.रोज संध्याकाळी कधी एक तर कधी दोन मॅचेस चालू आहेत,कोणतीही टीम असो,ग्राउंड प्रेक्षकांनी फुल्ल! त्यांच्या लाडक्या टीमचा युनिफॉर्म घातलेले,रंगीबेरंगी टोप, रंगवलेली तोंडं, हातात फलक, चौका किंवा छक्का मारला,की तोकडे कपडे घालून नाच करणाऱ्या चियर-गर्ल्स,एयर कंडिशंड बॉक्सेस मध्ये बसलेले टीमचे मालक(शाहरुख-अंबानी-प्रिटी झिंटा....विजय माल्याची कमी जाणवतेय मात्र!) करोडो रुपये खर्च करून विकत घेतलेले निरनिराळ्या देशांचे हे प्लेयर्स,हजारो रुपये खर्च करून पहायला आलेले प्रेक्षक आणि थेट प्रक्षेपण करून अब्जावधी रुपये कमावणाऱ्या वाहिन्या.........वेळ आणि पैसा याचा जमाखर्च माझ्या बुद्धीच्या कुवतीबाहेरचा आहे!😇😇

 या अनुषंगानं मागे आपण टी-ट्वेन्टी विषवचषक जिंकला त्यावेळची आठवण आली.सारे भारतवर्ष आनंदाने न्हाऊन निघाले होते,भारतीय असण्याचा सार्थ अभिमान प्रत्येकाला वाटू लागला होता.विजयी चमूचे धडाकेबाज स्वागत आपण केले आणि सहार विमानतळ ते वानखेडे स्टेडियम अशी पस्तीस किलोमीटरची भव्य मिरवणूक आपण काढली.स्टेडियमवर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षिसांच्या खैरातीचा कार्यक्रम झाला,या सर्वांचा एक छोटासा आर्थिक आढावा घेऊया.......

भारतीय विजयी चमूला आयसीसी कडून अधिकृत बक्षीस मिळालेली रक्कम ४ लाख ९० हजार डॉलर्स-सुमारे २२ कोटी रुपये,(ज्याचे आपण अधिकृत हक्कदार आहोत!) स्वागत,मिरवणूक,शोभायात्रा,वानखेडे स्टेडियमवरचा कार्यक्रम,आतिषबाजी,खेळाडू आणि मान्यवर यांची सुरक्षा व्यवस्था इत्यादींचा ढोबळ खर्च-५ कोटी रुपये.श्री.शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून टीमला २० लाख डॉलर्सचे(सुमारे ९ कोटी रुपये)- प्रत्येक खेळाडूला ८० लाख प्रमाणे १५ खेळाडूंना १२ कोटी रुपये,प्रत्येक राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील खेळाडूंना सरासरी ३ लाख प्रमाणे सर्वांना मिळून ४५ लाख रुपये,सहारा इंडिया कडून प्रत्येकास कमीतकमी २५ लाखाचे एक अशी १५ घरे म्हणजे पावणेचार कोटी रुपये.नागरी उड्डयन मंत्री यांनी प्रत्येक खेळाडूला पुढील  पाच वर्षांसाठी अमर्यादित अंतर्देशीय विमान प्रवास फुकट जाहीर केला होता.प्रत्येक खेळाडू मॅच किंवा शिबिरासाठी बोर्डाच्या पैशांची विमानानी जातोच,आता फुकट म्हंटल्यावर कमीतकमी तीन चकरा तो महिन्यातून करेलच.एक फेरी जाऊनयेऊन कमीतकमी १५ हजारात जाते (इकॉनॉमी क्लासची) म्हणचे दरमहा दर खेळाडू ४५ हजार,एक वर्षात ५ लाख ४० हजार,पाच वर्षात सत्तावीस लाख आणि सर्व खेळाडू मिळून पाच वर्षात साधारणतः साडेचार कोटी रुपये.म्हणचे खेळाडूंना अधिकृत २२ कोटी बक्षिसाशिवाय इतर २२५ कोटी रुपयांची उधळण  झाली आहे. आणि हे पैसे मंत्री-खासदार-आमदार यांच्या खिशातले नसून सरकारी तिजोरीतील (पापभिरू,सज्जनतेनी कर भरणाऱ्या नागरिकांचा पैसा) आहे.खेळाडूंच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन तर करायलाच हवे,पण जनतेचा पैसा बक्षीस म्हणून खैरात करण्याचा आणि उधळपट्टी करण्याचा अधिकार यांना कुणी दिला?

भारताला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे  झाली होती त्यावेळी NCEUS या संस्थेने त्यामागील दहा वर्षातील सरकारी आकड्यांच्या आधारावर एक अहवाल प्रसिद्ध केला होता.त्यानुसार देशातील ७० टक्के जनता  दिवसाला २० रुपये कमवत होती,दारिद्र्य रेषेची मर्यादा दिवसाला १२ रुपये असल्यामुळे हे नागरिक दारिद्र्य रेषेखालील गणल्या जात नव्हते.वास्तविक हे नागरिक मोठ्या मुश्किलीनं स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरत असत,पण हे वास्तव "दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या संख्येत घट"या बातमीखाली लपवले गेले! शेतकऱ्याच्या आत्महत्येचे आपणास काहीच वाटत नाही कारण त्याचा सरळ संबंध आपणाशी नसतो.बाजारात अन्नधान्याचे वाढणारे भाव आपल्याला खटकतात,पण मरमर करून कोट्यावधी जनतेसाठी धान्य उगवणाऱ्या शेतकऱ्याच्या तुटपुंज्या मोबदल्याचा विचार आपण करत नाही.त्यामध्ये,यावर्षी अमुक अमुक कोटी रुपयांची तरतूद शेतकरी वर्गासाठी करण्यात आली आहे ही नेत्यांची घोषणा दिलासा देते पण ही मदत खरंच किती गरजवंतांपर्यंत पोहोचते?

सारे भारतवर्ष जल्लोष करीत असतांना आणि खेळाडूंवर बक्षिसांची खैरात करत असतांना मी रेल्वे फलाटावर उभा राहून रेल्वे रुळांवर प्रवाशांनी फेकलेल्या अन्नावर पोटाची खळगी भरणारी ८-१० मुलं  डोळ्यात पाणी आणून पहात होतो.हे अश्रू वाया न जाऊ देण्यासाठी काय करावे या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करीत आहे,आहे का उत्तर तुमच्याजवळ?😥😥

वैधानिक इशारा :
१.खेळ हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे,मी स्वतः खेळाडू आहे,त्यामुळे,कोणत्याही खेळाडूचा अनादर करण्याचा माझा मुळीच उद्देश नाही.🙏

२..माझं गणित कच्चे आहे(त्यामुळेच मी भीतीनं बारावीला गणित सोडून बायोलॉजी घेतलं आणि डॉक्टर झालो) त्यामुळं आकडेमोडीतील चुकभुल घेणे-देणे आणि माफ करणे!🙏

३. या पोस्टद्वारे कोणत्याही आजी-माजी राजकीय नेते अथवा पक्ष यांच्यावर टीका किंवा आरोप करण्याचा उद्देश नाही,स्वतंत्र देशाचा एक सुजाण नागरिक म्हणून मला जे वाटले ते लिहिले,गैरसमज नसावा!🙏

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

Senseless Sense of Well Being

Hello friends. There are a few side effects of development. The one I am seeing obviously is the spurt of Wellness-Fitness centers,Gymnasiums,Spiritual Gurus holding Satsangs,verious diet planners,Weight loss-inch loss centres,Personality development courses,Career guidance centres & many more.We feel that unless we do such courses,we & our children cannot progress, be successful,wealthy & achieve peace of mind. I wonder how the  previous generation managed to do well without having the advantages of these schools. The Tatas,Birlas,Ambanis, Mahindras must have been real lucky,isn't it! Infact,the advent of internet,it's widespread use, resulting in an outburst of knowledge(many times incomplete & confusing) has changed the psyche of the people & these agencies take advantage of this situation to make money. This has become a status symbol amongst the riches,who can afford,but the poor are also lured & made to spend in an attempt to uplift their ...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...