आज सकाळी वर्तमानपत्र उघडताच जळगावात"भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यानं फोडला बालिकेचा डोळा" ही हृदयद्रावक बातमी वाचली.
पंधरा दिवसांपूर्वी भुसावळला हनुमान नगरातील एकतीस वर्षाच्या तरुणाचा गाडीवर जात असतांना कुत्री मागे लागल्यामुळे तोल जाऊन गाडी पडली व डोक्याला इजा होऊन मृत्यू झाला.
जळगावचा एक प्लंबर आणि मुंबईच्या कांदिवलीत एक बालक हेसुद्धा पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळं मृत्युमुखी पडल्याच्या घटना आत्ताआत्ताच्याच आहेत.
भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्यामुळे होणारे अपघात यांचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. पहाटे मॉर्निंग वॉकला जातांना नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.माझ्याकडे रात्री-बेरात्री इमर्जन्सी केससाठी येणारे अनेस्थेटीस्ट, कुत्र्यांच्या दहशतीमुळे सोप्या असलेल्या टू व्हीलरवर न येता जिकिरीच्या फोर व्हीलरवर येतात बिचारे!
या सर्वांना कारणीभूत आहेत "पिपल फॉर अनिमल्स" या दिल्ली येथील संस्थेच्या अध्यक्षा आणि राष्ट्रीय प्राणिहक्क आयोगाच्या श्रीमती मनेका गांधी! १९९३ पासून त्यांच्या चळवळीमुळे भटक्या कुत्र्यांना मारण्याऐवजी त्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्याचा कायदा आला आणि या बेवारस कुत्र्यांची संख्या भरमसाठ वाढू लागली. कुत्र्यांना माणुसकीची वागणूक आणि माणसांच्या नशिबी कुत्तेकी मौत असा प्रकार झालाय!
काही वर्षांपूर्वी मी श्रीमती मनेका गांधी यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले होते,त्यातील काही ठळक मुद्दे देत आहे :
* जगभरात "रेबीज"या पिसाळलेला कुत्रा चावून होणाऱ्या रोगाने वर्षाकाठी ५० हजार लोकांचा मृत्यू होतो,त्यातील ३० हजार लोक एकट्या भारतात मरतात. भारतात मृत्युच्या कारणांची नोंद करण्यात फार अनागोंदी असल्यामुळे खरा आकडा यांच्या दहापट असू शकतो!
* भारतातील बेवारस कुत्र्यांची संख्या ३५ दशलक्ष आहे.एक कुत्री दरवर्षी किमान ५-६ पिल्लांना जन्म देते,त्यातली २-३ ही वाचली तरी काही वर्षांत कुत्र्यांची संख्या लोकसंख्येची बरोबरी करेल.
*हत्ती,माकडे,साप,कासव,गुरे-ढोरे या इतर प्राण्यांप्रमाणे पर्यावरण राखण्यास कुत्र्यांचा काहीही उपयोग नाही.
* कुत्र्यांमुळे केवळ रेबीजच नव्हे तर हायड्याटिड सिस्ट,लेप्टोस्पायरॉसिस,ब्रुसेलोसिस,काला आजार ई. घातक रोगसुद्धा पसरतात.रेबीज हा आजार इतर उष्ण रक्ताच्या प्राण्यांपासूनही होतो,परंतु २५% कारणीभूत कुत्रीच असतात.
* रेबीज हा आजार १००% प्राणघातक आहे आणि अजूनपर्यंत तरी त्यावर उपचार सापडलेले नाहीत.
* रेबिजची लस (vaccine) अतिशय महाग आहे.कुत्रा चावल्यावर रेबीजपासून खऱ्या अर्थाने पूर्ण बचावासाठी HRIG आणि HDCV अशा दोन्ही लसी द्याव्या लागतात,यांची किंमत जवळजवळ १५ हजार असते,आणि सरकारी दवाखान्यात यातील HRIG ही लस बरेचदा उपलब्ध नसते.
* हाफकीन इन्स्टिट्यूट या सरकारी संस्थेत मेंढयांपासून लस बनवायचे,परंतु मेंढयांची दया आल्यामुळे तिचे उत्पादन बंद झाले,हासुद्धा प्राणिमित्रांचाच प्रताप!
* कुत्र्यांचे निर्बिजीकरण(Animal birth control)ही एक अतिशय खर्चिक योजना आहे व त्याची अमंलबजावणी कठीण आहे. मुंबईत दरवर्षी ४० हजार कुत्री मारली जायची .१९९३ पासून त्याऐवजी केवळ ५ हजार कुत्र्यांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया होते,उरलेले ३५ हजार गेल्या २५ वर्षात चक्रवाढ व्याज दराने किती वाढली असतील याचा विचार तुम्हीच करा.
या सर्वांचा मतितार्थ असा,की प्राणीमित्र जरूर व्हा,पण जरा व्यावहारिक होऊन माणूसमित्र होण्याचेही विसरू नका!
Comments
Post a Comment