Skip to main content

कॉफी हाऊस आणि दोसा!

कॉफी हाऊस म्हंटलं की आठवतो तो म्हणजे माझा लाडका दोसा!साऊथ इंडियन डिश पैकी माझी सर्वात लाडकी डिश!!दोसा मला कधीपासून आवडू लागला नक्की आठवत नाही,पण एकोणीसशे एक्काहत्तर साली,(जेंव्हा मी पाचवीत असीन),त्यावेळी आमच्या भुसावळमधील धनराज हॉटेलमधील(आताचं ममता रेस्टॉरंट) दोसा मी विसरुच शकत नाही.माझी मामी आणि माझ्याहून लहान असणारे दोन मामेभाऊ,अमेरिकेला मामाकडे जायच्या आधी आमच्याकडे आले होते,त्यावेळी धनराज हॉटेलमध्ये खास मद्रासी कारागीर आणले होते आणि माझे बाबा म्हणजे पक्के खवय्ये,त्यांनी पार्सल मागवले होते घरी,ती चव आजतागायत मला कुठेही मिळाली नाहींअसो!अगदी मद्रासच्या सर्वनाज, केरळ ट्रिप मध्ये कमीतकमी दहा ठिकाणच्या खादाडीत किंवा कुर्ग मधील क्लब महिंद्राच्या रेस्तराँ मध्ये!

दोसा म्हणजे तांदुळाच्या पिठीचा-उडदाच्या डाळीचा,किंवा रव्याचा, साधा असेल तर नुसताच,त्यावर ती स्पेशल खोबऱ्याची चटणी,आणि मद्रासी सांबार.हा सांबार म्हणजे त्यात आख्ख्या लाल मिरच्या आणि लाल भोपळ्याचे तुकडे हवेतच,अगदी पहिल्याच भुरक्याला ठसका लागायलाच हवा.आणि मसाला दोसा असेल तर त्यात मॅश केलेल्या उकडलेल्या बटाट्याची,बारीक आणि लांब चिरलेल्या कांद्याची परतलेली भाजी!
दोसा म्हणजे साधा,मसाला,रवा साधा आणि रवा मसाला! यावरील व्हरायटी म्हणजे नुसता फालतूपणा असे माझे स्पष्ट मत आहे!! मैसूर दोसा,दावणगिरी दोसा,पेपर दोसा,(इतका लांब,की पाच-सहा लोकांनी मिळून खायचा म्हणे!)ओनीयन दोसा,आणि आतातर काही विचारू नका,पनीर दोसा,इतकंच काय तर चिकन दोसाही मिळतो!
खरा खवय्या फक्त वरील वर्णनातीलच व्हरायटीचा खातो.आणि नागपूरचा बेस्ट दोसा मिळतो बर्डी मेन रोड वरील महाजन मार्केट मधील वृंदावन मध्ये! तसं मेनरोडच्या सुरुवातीला आणि मूनलाईट फोटो स्टुडियोच्या मागेही एकेक वृंदावन आहेत,पण याची सर नाही.चाफेकर दुग्धालयमधेही छान मिळतो असे ऐकले होते पण त्यांनी मसाला दुधावरच लक्ष केंद्रित करावं असा माझा अभिप्राय मागच्या भेटीत झाला.
तसेच,घरी दोसा वगैरे बनविण्याच्या भानगडीत पडू नये.कुठल्यातरी बाहेर खाल्लेल्या डिशला छान म्हंटले,की घरच्या बाईला ते फार झोम्बतं आणि मग पुढचे चार-आठ दिवस आई-बहीण-मैत्रिणींना विचारून,पाककलेची पुस्तकं आणून घरी बनविण्याचे प्रयोग होतात,ते बरेचदा यशस्वी होतातही,पण मित्रांनो,माझे स्पष्ट मत आहे,की कितीही चांगले झाले तरी त्यात "ती" मजा नाही.जिसका बंदर वही नचाये, ही म्हण बहुधा यावरूनच निघाली असावी.

वृंदावनला एक प्रतिस्पर्धी मात्र आहे तो म्हणजे नागपूरच्या धनतोलीतील आनंदाश्रमातील दोसा!(आता,विवीयन रिचर्ड आणि गुंडप्पा विश्वनाथ हे प्रतिस्पर्धी म्हणवता येणार नाहीत कारण दोघांची शैली वेगळी परंतु तितकीच आनंददायी आहे!) तिथे सकाळी आणि संध्याकाळी वेगळा दोसा असतो,अप्रतिम चव,तिथली चटणी सुद्धा वेगळी परंतु फारच मस्त असते,सो कॉल्ड सांबार म्हणजे चक्क फोडणीचे वरण असते,पण या वेगळेपणातही एक मजा आहे दोस्त! या आंनदाश्रमानी मॉडर्न भाषेत म्हणायचे म्हणजे आपले "हेरिटेजपण"राखून ठेवलंय. दरवाज्याशी तेच जुने काउंटर,मागे लावलेले जुन्या मालकांचे फोटो(यातील दोन जणांना आम्ही लाईव्ह पाहिले आहे)काचेच्या कॅबिनेट मध्ये ठेवलेला "खारा आणि गोडा माल",संगमरवरी टॉप असलेली टेबलं आणि लोखंडी आसाऱ्याच्या खुर्च्या,पैजामा-शर्ट घातलेला आणि खांद्यावर पंचा टाकलेला ऑर्डर घेऊन स्वतःच सर्व्ह करणारा वेटर कम मालकाचा उजवा हात असलेला शामराव.(मोठ्या हॉटेलात जायची मला जरा भीतीच वाटते,कारण तिथला तो भपका,आपल्यापेक्षा स्मार्ट दिसणारा आणि सूट बुटात ऑर्डर घेणारा "कॅप्टन",चामड्याच्या पाकिटात आणलेले बिल,ते वाचायचीही सोय नाही कारण त्या कॅप्टनची "काय भिकारचोट आहे"अशी नजर,आणि सर्वात संताप येतो तो म्हणजे एका डिशसाठी अर्धा पाऊण तास ताटकळणे! पुन्हा "टीप" द्यावी लागते लाजेकाजेस्तव ती वेगळीच.) त्यापेक्षा आमचा शामराव परवडतो, फास्ट सर्व्हिस,एक्स्ट्रा चटणी-सांबार फुकट देणार,टीप ची अपेक्षा मुळीच नाही.खाऊन झालं की ताटातच हात धुवायचे,फिंगर बाउल वगैरे तमाशे नाहीत,जातांना काउंटरपाशी पोहोचलो की शामराव ओरडणार : लाल शर्ट पंधरा रुपये,पिछेकी काली टोपी साडेसात! बाहेर जाण्याचे दार सत्ताड उघडे,दार ओढून कुणी अदबीने सलाम ठोकणारा मिशिवाला-धिप्पाड चोकीदार नाही की कुणी नाही,शेजारच्या चौरासियाकडे मिठी पत्ती एकसोबीस किवाम लाललेलं पान खाल्लं की, "पांडुरंगा,इहलोकावरचं काम आता संपलं, पुष्पक पाठव" असं म्हणावसं वाटतं!

मला आनंदाश्रमाचा आणि वृंदावनचा दोसा कॉफी हाऊसपेक्षा जास्ती का आवडतो याला अजून एक सॉलिड कारण आहे आणि ते म्हणजे ईथे दोसा खायला काटा-सूरी न देता दोन चमचे देतात! काटा-चमच्यांनी आक्खा दोसा खाण्यापेक्षा फस्ट इयरची अनाटॉमी-फिजियोलॉजी-बायोकेम असे किचकट विषय असलेली परीक्षा पास होणं जास्त सोपय! उजव्या हातात सूरी,डाव्या हातात काटा,त्यांनी त्या दोस्याचा आतल्या भाजीसकट तुकडा कापायचा,तो काट्यात घुसवायचा आणि डाव्या हाताने तो सक्सेसफुली तोंडापर्यंत नेऊन, न पाडता तोंडात डिलिव्हर करायचा,अबब,केवढी मोठी सर्कस! (मला खात्री आहे की असे काट्या-सुरीने दोसा खातांनाच लॅप्रोस्कोपीक सर्जरी सुरू करण्याची प्रेरणा मिळाली असावी!)आणि हे सर्व करत असतांना हळूच डोळ्यांच्या कोपऱ्यातून आजूबाजूला लक्ष ठेवावे लागते की ही कसरत आणि होणारी फजिती याला कुणी साक्षीदार तर नाहीत ना म्हणून! तो खाली पडलेला घास मग सर्वांची नजर चुकवून शिताफीने तोंडात टाकायचा,केवढी मरमर! बरं काटा सुरीने खायचा दुसरा तोटा म्हणजे अंदाज नाही येत हो की बटाटा किती गरम आहे याचा!सर्कस जमली आणि घास तोंडात पोहोचला,तरी गरम बटाट्यानी तोंड बरेचदा भाजलंय माझं,तेंव्हापासून मी चक्क हाताने खातो,कुणाला मी कितीही गावंढळ वाटो! आणि एक गम्मत सांगू का,कित्त्येकदा माझ्याकडे पाहून इतरही लोक ही सर्कस थांबवून हाताने खाऊ लागतात.

तर अशी ही दोसावारी,सुरू झाली मेडिकलच्या कॉफी हाऊसवरून,आली बर्डीवर, आणि संपली धंतोलीवर.🙏🙏

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनक...