Skip to main content

*"अनुसूयाबाई"*



१४ फेब्रुवारी १९९१.
आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता,कारण सुजाता आणि मधुरा औरंगाबादहून भुसावळला आले होते.सुजाता घाटी हॉस्पिटलला एम.डी. करत होती आणि मधुरा नऊ महिन्याची होती फक्त,त्यामुळे तिच्याचजवळ औरंगाबादला रहायची.सुजाताचे वडील,मेजर दिनकरराव बाब्रस यांचे घर घाटी हॉस्पिटलच्या जवळच असल्यामुळे मधुराला तिथेच ठेवणे सोपे गेले.दिनकररावांनी त्या सुमारास मारुती ८०० ही त्यांची पहिली-वहिली नवी कोरी गाडी घेतली होती आणि ते स्वतः गाडी चालवीत सुजाता व लहानग्या मधुराला घेऊन आले होते एक दिवसाकरता फक्त- कारण....त्या दिवशी सुजाताचा वाढदिवस होता!🎂
त्या दिवशी आम्ही ओपीडीही कमीच बघायचे ठरवले होते आणि एकही ऑपरेशन ठेवले नव्हते,कारण,जास्तीतजास्त वेळ मधुरा सोबत घालवायचा होता!
एकंदरीत सर्व आनंदीआनंद होता.

सकाळचे साडेदहा वाजले होते,आमचे पेशन्ट पाहणे सुरू झाले होते.सर्व कसे छान,आरामात सुरू होते.एवढ्यात बाहेर काहीतरी आरडाओरडा ऐकू आला.जाऊन पहातो तो काय...एका अत्यवस्थ गरोदर स्त्रीला ३-४ माणसे उचलून आणत होती.मी ताबडतोब स्ट्रेचर मागविला आणि  त्या पेशन्टला तपासणी कक्षात आणले. डोंगरकठोरा गावाची आदिवासी स्त्री,नऊ महिन्याची गर्भार,आत्तापर्यंत कुठल्याच दवाखान्यात काहीच तपासण्या न केलेली,आणि अचानक रक्तस्त्राव सुरू झाला आणि पोट दुखू लागले म्हणून शेजाऱ्यांनी उचलून आमच्याकडे आणलेले!(कुणीतरी सांगितले की भुसावळला केळकरचा दवाखाना नवीनच "पडलाय",तो बराय, तिथे न्या!) (भुसावळला सर्व....दवाखाने,थिएटर्स,दुकाने,हॉटेल्स,नवीन "पडतातच!"ही बोलायची सर्वमान्य पद्धत आहे इथे.)असो.

पेशंटची कंडिशन अतिशय वाईट.पांढरीफटक पडलेली,नाडीची गती खूप जास्त,श्वास अतिशय वेगात,ब्लड-प्रेशर खूप वाढलेले,आणि सोनोग्राफीत गर्भाशयात वार सुटून भरपूर रक्तस्त्राव झालेला(Pre-eclampsia with accidental haemorrhage).एकच जमेची बाजू होती,ती म्हणजे बाळाची वाढ पूर्ण दिवसाची होती आणि एवढा रक्तस्त्राव होऊनही बाळाचे ठोके शंभरीच्या आसपास होते.

ताबडतोब सिझेरियन केले तरच बाळ आणि आई वाचण्याची शक्यता होती.म्हंटलं बोलू नातेवाईकांशी,तर सर्वजण गायब! ते सर्व आजूबाजूचे होते,फक्त एक शेजारीण थांबली होती सोबत.तिच्याकडून कळले की ही अनुसूयाबाई शेतात मोलमजुरी करून २० रुपये रोज  कमावते,त्यावरच गुजारा करावा लागतो,कारण नवरा दिवसभर दारू पिऊन पडलेला असतो. आता संमतीपत्रकावर (Consent form) सही कोण करणार?

माझ्या मनात दंद्व सुरू झालं....एक मन म्हणत होतं, कुठे झंझट टांगून घेतो गळ्यात,पाठवून दे ना सिव्हिल हॉस्पिटलला,दिवस खराब होईल तुझा पूर्ण,आणि पुन्हा काही बरं वाईट झालं तर,आफत!(नेमके त्याचदिवशी माझे वडील आणि निष्णात स्त्रीरोगतज्ञ डॉ.जयंत केळकरही रेल्वेच्या तातडीच्या कामानी मुंबईला गेले होते.)
दुसरं मन म्हणत होतं,कशाला झालास तू डॉक्टर?अशावेळी माघार घेतोस?जळगावपर्यंत जाऊच शकणार नाही ते बाळ जिवंत,आणि बाईसुद्धा........

दुसरं मन जिंकलं,मी ताबडतोब आमचे सर्वांचे लाडके,कै.डॉ.विजय भंगाळे,पॅथॉलॉजिस्ट,यांना फोन केला आणि परिस्थिती सांगितली.मी आलोच,ते म्हणाले,तू कर तयारी सिझेरियनची!  मग मी ओपीडीत बसलेल्या पेशन्ट्स आणि त्यांच्या नातेवाईकांना थोडक्यात केस समजावली, आणि त्या बाईला वाचविण्यासाठी सिझेरियन करण्यास त्या सर्वांची संमतीपत्रकावर सही घेतली.

पेशंटला थिएटरमध्ये घेतलं,सुजाताही आलीच होती धावत,हे सर्व समजल्यावर,आणि भक्कमपणे उभी होती माझ्यासोबत!भरभर सलाईन लावलं,लघवीची नळी(urinary catheter)टाकलं,अनेस्थेटीस्ट डॉ.मंगेश आणि बालरोगतज्ञ डॉ.उमेश खानापूरकर हे बंधुद्वय ही हजर होतेच.डॉ.विजय भंगाळे त्यांचा मायक्रोस्कोप,सर्व रिएजंट्स,घेऊनच आले होते.आशु,एक छान बातमी आहे की रक्तगट ओ पॉझिटिव्ह आहे,खूप लोकांचा असतो,मिळतील डोनर्स, पण वाईट बातमी आहे ती अशी,की हिमोग्लोबिन फक्त २ ग्रॅम आहे, बऱ्याच बाटल्या लागतील रक्ताच्या!!!😟
त्या वेळी भुसावळला ब्लड-बँक नव्हती,आणि जळगावहून मागवायला मनुष्यबळ आणि वेळ,दोन्ही नव्हते! मग बाहेर बसलेल्या लोकांपैकीच दहा जणांचा ग्रुप तपासला सरांनी,पाच निघाले ओ पॉझिटिव्हीचे आणि तयारही झाले रक्त द्यायला.बाजूच्याच खोलीत हा रक्त काढून क्रॉस मॅच करण्याचा आणि आणलेल्या एसीडी बॅग्ज मध्ये रक्त काढण्याचा सोहळा सुरू होता.
ऑपरेशन थिएटरमध्ये आम्ही देवाचे नाव घेऊन सुरू केले काम.मंगेशनी सफाईदारपणे पहिल्याच प्रयत्नात स्पायनल अनेस्थेशीया दिला,आणि मोजून तिसऱ्या मिनिटाला आम्ही बाळ बाहेर काढले! सव्वातीन किलोचा मुलगा.झाल्याबरोबर जोरदार रडला(आणि आम्ही हसलो!) सुटलेली वार (placenta) आणि जवळजवळ दीड-दोन लिटरच्या रक्ताच्या गुठळ्या(Retro-placental clots) काढल्या.अशा प्रसंगी बरेच धोके असतात,थकलेले गर्भाशय आकुंचन पावायची शक्ती गमावून बसले असते,त्यामुळे धो-धो रक्तस्त्राव होतो,(post partum haemorrhage) खूप रक्त गोठल्यामुळे उरलेल्या रक्ताची गोठण्याची क्षमता नाहीशी होऊन सर्वदूर रक्तस्त्राव होणे (Disseminated intravascular coagulation) आणि मेंदूला सूज येऊन झटके येणे ( Eclampsia). यापैकी नशीबानी फक्त गर्भाशय महाशयांनी आकुंचन पावायला थोडे नखरे केले,पण त्यावेळी नवीन निघालेल्या Prostodin नावाच्या इंजेक्शनामुळे आणि त्या बाहेर बसलेल्या सहृदय डोनर्सनी दिलेल्या पाच बाटल्या ताज्या रक्तानी त्याला वठणीवर आणले!

ब्लडप्रेशर आवाक्यात येऊन ती जोखीमीबाहेर निघेपर्यंत तीन दिवस आम्ही तिला ऑपरेशन थिएटरच्या बाजूच्याच खोलीत ठेवले होते.सातव्या दिवशी पूर्ण बरी होऊन छानशा गोंडस बाळाला घेऊन ती घरी गेलीसुद्धा.चवथ्या दिवशी नवरोबा आले होते थोडी उतरल्यावर,आणि मुलगा झाला कळल्यावर लगेच निघून गेले जवळच्या गुत्त्यावर "सेलिब्रेट"करायला!

या स्त्रीला आणि तिच्या बाळाला जीवदान देण्यात डॉ.विजय भंगाळे,डॉ.मंगेश आणि उमेश खानापूरकर,सुजाता यांचे मोलाचे सहकार्य तर आहेच,परंतु,संमतीपत्रकावर सही करणारे आणि ताबडतोब रक्त देणारे ते माझ्या ओपीडीतील ते देवदूत यांचा सिंहाचा वाटा आहे.

बाबांनी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आणि कुशीत घेऊन वात्सल्याने बाळाला पाजणाऱ्या त्या अनुसूयामातेच्या चेहऱ्यावरील समाधान यांनी त्या दिवशीचा पूर्ण थकवा पळाला आणि सुजाताचा तो वाढदिवस अविस्मरणीय झाला!💐💐

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनक...