Skip to main content

पोहे

आज सकाळी नाश्त्याला पोहे खाल्ले!

आता तुम्ही म्हणाल,की त्यात काय मोठं,पुष्कळ जण बरेचदा पोह्यांचा नाश्ता करतात,अगदी खरंय, पण पोह्यांचं माझ्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे,कसं ते सांगतो पुढं!तत्पूर्वी पोह्यांबद्दल थोडं बोलूया.

तर,आख्ख्या महाराष्ट्रात पोहे ही बहुतेकांची आवडती डिश,परंतु करण्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या पर्यायांनी चवी निराळ्या! कांदा हवाच,पण आवडीप्रमाणे बटाटा,दाणे,हिरव्या मिरच्या,लाल तिखट,कढीपत्ता,ओल्या नारळाचा किस,कोथिंबीर टाकून त्याची लज्जत वाढवतात.बऱ्याच ठिकाणी त्यावर तिखटजाळ रस्सा टाकून "गिल्लेपोहे"खातात,तर घरी त्यावर सॉस किंवा कैरीचे लोणचे तोंडीलावणे म्हणून वापरतात.मध्यप्रदेशात,विशेषतः इंदूरमध्ये पोह्यांवर बारीक शेव टाकतात.असो,मूळ मुद्दा हा की या पोह्यांचं मला एवढं अप्रूप का!

एकोणीसशे पंच्यांशीची गोष्ट आहे,मी एमबीबीएस होऊन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरला ऑर्थोपेडिक्स मध्ये हाऊसजॉब करत होतो. ऑर्थोचे दोन युनिट्स फक्त,त्यामुळे एक दिवसाआड ओपीडी आणि ओटी! ओपीडीच्या दिवशी सकाळी आठ पासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठपर्यंत येण्याऱ्या सर्व केसेस त्या युनिटच्या लोकांनी पहायच्या.ओपीडी चालायची सकाळी आठपासून दोन वाजेपर्यंत,नंतर बॉसचा राउंड,साडेतीन-चार वाजेपासून इमर्जन्सी मायनर सर्जरीज(अनेस्थेशीया देऊन फ्रॅक्चर सेट करणे,प्लास्टर घालणे,जखमा शिवणे ई.) नंतर संध्याकाळी सात वाजेपासून वार्डमध्ये नवीन अडमिशन्स चे केस नोट्स तयार करणे, ट्रक्शन लावणे,उद्याच्या ऑपरेशन्स ची लिस्ट तयार करणे,त्यांच्या सर्व रक्ताच्या तपासण्या,एक्स रे,ईसीजी,नीट लावून ठेवणे,अनेस्थेटीस्ट चा फिटनेस घेणे,रक्ताच्या बाटल्या अरेंज करणे. ही कामे होताहोता सिनियर रेसिडेंट चा राउंड : मग या सर्व घडामोडींची माहिती त्याला देणे, काही महत्वाची ड्रेसिंग्स त्याला दाखविणे ई.
मग कॅज्युअल्टी ची ड्युटी सुरू,चित्रविचित्र अपघात,भांडणे,मारामाऱ्या,दारुडे,त्यांना टाके घालणे,प्लास्टर लावणे,काही तातडीची ऑपरेशन्स हा प्रकार रात्रभर चालायचा!
आठ वाजले सकाळचे की आनंद,आता चोवीस तास या प्रकारापासून सुटका. पण हा आनंद औट घटकेचा असायचा कारण हा ओटी डे : आठ वाजेपासून ऑपरेशन्स सुरू,ते दुपारी चार वाजेपर्यंत.मग पुन्हा बॉसचा राउंड,त्यानंतर मेजर सर्जरीच्या पेशन्ट्सची आयसीयूत देखभाल,नातेवाईकांचे समुपदेशन,रक्त अरेंज करणे वगैरे. जमल्यास होस्टेलवर जाऊन थोडी झप्पी मारायची कारण नऊ-साडेनऊला सिनियर रेसिडेंटचा राउंड आणि ड्रेसिंग्स! झोपायला रात्रीचे बारा-एक वाजवायचे,पुन्हा सकाळी पाचला उठून सहा वाजता वार्डमध्ये हजर रहावे लागायचे.

त्यावेळी मनुष्यबळ किती कमी होते बघा,आमच्या युनिट मध्ये फक्त चार जण: डॉ गेडाम सर(युनिट हेड) डॉ राजन चांडक(चीफ रेसिडेंट) डॉ सजल मित्रा(सिनियर रेसिडेंट) आणि मी,ज्युनियर रेसिडेंट(त्या काळचा हाऊस ऑफिसर). ही सर्व देवमाणसं मिळाली, मला कधीच ज्युनियरची वागणूक दिली नाही,सर्व कामं माझ्या बरोबरीनं केलीत,ऑर्थोचे सर्व बारकावे समजावले,ऑपरेशन्स शिकवली,करून घेतलीत,माझ्या पोटापाण्याची काळजी घेतली,इतकी की,कधीकधी रात्री दोन वाजता चांडक-मित्रा सरांनी मला रेल्वे स्टेशनवर नेऊन दुधपाव खाऊ घातलाय!

तर यासर्व गडबडीत जेवण्यास वेळ कधी नीट मिळायचाच नाही.घर नागपूरलाच असल्यामुळे आजी सकाळ-संध्याकाळ घरचा डबा पाठवायची,डबेवाला तो रूमच्या कडीला लटकावून निघून जायचा,आम्ही पोहोचेपर्यंत तो बहुधा रिकामाच सापडायचा! (आजी इतकी सुगरण होती की आजूबाजूच्या मुलांनी वार वाटून घेतले होते म्हणे माझा डबा खाण्याचे,असे नंतर कळले!) बरेचदा मेसमध्ये किंवा मेडिकल चौकात जे मिळेल ते खाऊन भागवावे लागे!

आता आपली गाडी पुन्हा मुळपदावर-पोह्यांवर!
मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या मजल्यावर ओटी डी च्या मागे आणि गायनिक वार्ड एकोणीसच्या समोर मातृसेवा संघाने चालवलेले एक छोटेसे कँटीन होते,एक वयस्कर मावशी चालवायच्या ते.रोज सकाळी त्या छान पोहे करायच्या आणि दुपारी कचोरी,(लिमिटेड स्टॉक असायचा यांचा) चहा मात्र दिवसभर सुरू असायचा.ओटीच्या दिवशी अकराच्या सुमारास आम्ही ओटीत कचोरी-चहा मागवायचो तिथून,कधी नशिबात असेल तर मिळायचं थोडं काही, नाहीतर सर्जरीचे रेसिडेंटस मारून द्यायचे डल्ला! त्या मातृसेवा कँटीनच्या मावशींना (नाव नाही आठवत,पण चेहरा पक्का आठवतोय,का सांगू,तर त्यांच्या नजरेत वात्सल्य आणि प्रेम ओसंडून वाहत असायचं!) त्या मावशी रोज माझ्यासाठी एक प्लेट भरून पोहे कागदात बांधून लपवून ठेवायच्या,मला जेंव्हा वेळ होईल तेंव्हा मी जाऊन ते खायचो. काय सांगू मित्रांनो,दुनियेतील कितीही भारी फाईव्ह स्टार हॉटेल मधल्या डिशपेक्षा ते थंड पोहे मला अधिक भावायचे.(काळाच्या ओघात नागपूर दुरावलं,त्या मावशी वारल्याचं मध्यंतरी कुणीतरी सांगितलं आणि त्या दिवशी मी एका खोलीत जाऊन अर्धा तास मनसोक्त रडलो होतो)

त्यामुळे पोह्यांचं एक अनन्यसाधारण महत्व माझ्या आयुष्यात आहे आणि तेही,थंड पोह्यांचं! त्यामुळे आयतागायत कधीही आई किंवा सुजातानी पोहे केले, की हमखास थोडे वेगळे काढून ठेवले जातात,मी ओपीडी आटपली की संध्याकाळी ते खातो.

मात्र,पहिल्याच घासाला त्या मावशीच्या आठवणीनं टचकन डोळ्यात पाणी येतं,घास अडकतो घशात आणि आई किंवा सुजाताचा मायेचा हात फिरला डोक्यावरून की मगच उतरतो खाली!

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनक...