*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन*
मित्रांनो,
काल खूप दिवसानंतर रेल्वेचा भोंगा ऐकला ज्याला "सायरन"असे म्हणतात.आमच्या लहानपणी सर्व भुसावळकर जनतेच्या जीवनाचा हा भोंगा अविभाज्य अंग असायचा. डी.एस.ऑफिस(आताचे डी.आर.एम.ऑफिस) च्या छतावर हा बसविलेला आहे आणि आवाज इतका मोठा आहे की संपूर्ण शहरात सहज ऐकू यायचा,आता शहर खूप वाढल्यामुळं माहीत नाही सगळीकडे ऐकू येत असेल की नाही ते. सकाळी आठ,दुपारी चार आणि रात्री बारा अशा तीन वेळा हा भोंगा वाजत असे. रेल्वेच्या बहुतेक ड्युट्या सकाळी आठ ते दुपारी चार,दुपारी चार ते रात्री बारा आणि रात्री बारा ते सकाळी आठ अशा असायच्या. सकाळच्या ड्युटीला मॉर्निंग म्हणायचे पण दुपार आणि रात्रीचीला चार-बारा आणि बारा-आठ असेच प्रचलित नाव होते. हे भोंगे अथवा सायरन्स या ठराविक वेळीच आणि एकदाच वाजायचे. एकावेळी एकापेक्षा जास्तीवेळा वाजले,तर त्याचा वेगळा अर्थ असायचा.
तीन वेळा वाजले याचा अर्थ भुसावळ स्टेशन किंवा यार्ड परिसरात गाडी किंवा डब्बा रुळावरून घसरलाय,डिरेलमेंट झालीय किंवा अपघात झालाय,पाच वेळा वाजले म्हणजे भुसावळ डिव्हिजन मध्ये हा प्रकार घडलाय आणि सात वेळा वाजले म्हणजे भुसावळ डिव्हिजनच्या बाहेर पण मध्य रेल्वेच्या कुठेतरी अपघात झालाय. सातपेक्षा जास्ती वाजले तर युद्धप्रसंगी विमान हल्ला होण्याची भीती असेल तर रात्री सर्व लाईट्स बंद करण्याची सूचना असायची ज्याला ब्लॅकआऊट् म्हणायचे,जेणेकरून शत्रूच्या विमानांस मानवी वस्ती दिसू नये. हा अनुभव माझ्या आठवणीत १९७१ च्या पाकिस्तान युद्धावेळी मी घेतलाय,त्यावेळी मी दहा वर्षांचा होतो.
तर हे एकापेक्षा जास्ती सायरन्स वाजले की माझे वडील,जे रेल्वे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते,तडक स्कुटर काढून रेल्वे दवाखान्याकडे रवाना व्हायचे.एक छोटी बॅग नेहेमी तयारच असायची,ती घेऊन. त्यात जुजबी कपडे,टॉवेल,ब्रश-पेस्ट आणि दाढीचे सामान असायचे. सर्व डॉक्टर्स आणि स्टाफ रेल्वे हॉस्पिटलला जमायचे,निवडक ८-१० डॉक्टर्स आणि तेवढेच सिस्टर्स आणि वार्ड बॉईज ची टीम रेल्वे स्टेशनवर जायची. प्लॅटफॉर्मवर दोन बोग्या असलेली Accident Relief Medical Equipment van,ARME उभी असायची. त्यात तपासणी खोल्या,ड्रेसिंग रूम्स,ऑपरेशन थिएटर,पेशंटसाठी दहा पलंग,सर्व औषधी,इंजेक्शने,सलाईनच्या बाटल्या, इमर्जन्सी फ्लड लाईट्स आणि जनरेटर,किचन आणि स्टाफसाठी रेस्ट रूम्सही असायच्या,असतात. इंजिनियरिंग,ऑपरेटिंग,सिग्नल्स,टेलिकम्युनिकेशन आणि कमर्शियल डिपार्टमेंटच्याही आपापल्या बोगीज तयार असायचा त्यात त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी असायचे,शिवाय मोठमोठ्या क्रेन्स,रेस्क्यू ऑपरेशन्स मध्ये लागणारी उपकरणे,गॅस वेल्डिंग,कटर्स वगैरे असणाऱ्या बोगीज सुद्धा असायच्या. ही एक मोठी गाडी एका स्पेशल इंजिन द्वारे शक्य तितक्या लवकर घटनास्थळी पोहोचायची. डी.एस.ऑफिस मध्ये या सर्वांवर नियंत्रण ठेवून त्यांना मार्गदर्शन करणारे उच्चपदस्थ अधिकारी असायचे.दुर्घटनेसंबंधी माहिती पत्रकार आणि रेडियोवर देण्यासाठी जनसंपर्क अधिकारी असायचा.
बरेचदा,स्टेशनवर आणि मुख्यालयात सर्व जमवाजमव झाली की समजायचं की ही नुसतीच तयारी कितपत आहे याची माहिती घेण्यास केलेली रंगीत तालीम आहे,ज्याला इंग्रजीत मॉक ड्रिल म्हणतात.
मित्रहो,हे सर्व सांगण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आजचा विषय,आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन,ज्यामध्ये विविध आपत्तींना तोंड देण्याची आपली तयारी या "मॉक ड्रिल" ने पाहिली जाते.
सद्ध्या कोव्हीडमुळे जगातील बरेचसे देश आणि आपला भारत आपत्ती व्यवस्थापनात उघडा पडलाय.या आपत्तीला तोंड देण्यास आपली वैद्यकीय यंत्रणा आणि व्यवस्थापनेतील त्रुटी ठळकपणे दिसतायत आणि दुर्दैवानं अपयशाचं खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडण्याची राजकारण्यांची चढाओढ सुरू आहे.असो.
तर आपत्ती म्हणजे काय?
अकल्पितरीत्या आलेले संकट म्हणजे आपत्ती!आपत्ती म्हणजे एखादी दुर्घटना ज्यामुळे समाजाच्या मोठ्या वर्गाच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होतात.ज्यामुळे मानवी जीवन,मालमत्ता,पैसा आणि पर्यावरण यांची अपरिमित हानी होते,इतकी की जी भरून काढणं आपल्या कुवतीच्या बाहेर असतं.
आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपात्कालीन परिस्थितीत लागणाऱ्या संसाधनांचे जबाबदारीपूर्वक,सांघिकरित्या,आणि मानवतेपूर्ण भावनेनी नियोजन करून पिडितांचे बचाव आणि पुनर्वसन करणे!
आपत्ती अचानक येते,कधीच वेळ ठरवून,पूर्वसूचना देऊन येत नाही,ती बेसावधपणे गाठते आणि म्हणूनच हाहा:कार माजवते.
आपण रोज रस्त्यावरील अपघात,आगीचे तांडव,भूकंप,पूर,वादळ,दहशतवादी हल्ले ई. बातम्या वर्तमानपत्रात वाचतो,टीव्हीवर पाहतो,फार वाईट झालं म्हणून हळहळतो आणि आपल्या आयुष्यात असं काही घडणार नाही असा गोड गैरसमज करून घेतो.आपण कुणाचंच कधी वाईट केलं नाही म्हणून अशी आपत्ती आपल्यावर का येणार,आणि आलीच,तर देव आहेच मला वाचवायला,मी रोज मनोभावे पूजा करतो त्याची,असं म्हणून शांतपणे झोपी जातो.
हे कितपत योग्य आहे?
आपत्तीला ना वेळ असते,ना तारीख,ना तिथी ना मुहूर्त,ना देश,ना जात,ना धर्म! मुंबईच्या १९९३,आणि २०११ च्या बॉम्बस्फोटांनी आणि २००५ च्या पूरानी अनेकांना नाहीसे केले,किल्लारीच्या भूकंपात अनेक जण जिवंत गाडले गेले,कुंभमेळ्याच्या चेंगराचेंगरीत हजारो दबून मेले,सुनामीच्या लाटेत लाखो वाहून गेले,अशा अनेक आपत्ती आहेत.जगातील एकंदर होणाऱ्या आपत्तीतील मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू भारतात होतात.मागच्या पंधरा-वीस वर्षांत आपल्या देशात १० मोठे भूकंप झाले,तर शंभरावर महापूर आलेत,तिनशेपेक्षा जास्त ठिकाणी तीव्र दुष्काळात मनुष्यहानी झाली.त्यात पुन्हा भर रोजच्याच अपघातांची आणि अतिरेकी हल्ल्यांची! मृत्यूची चाहूल माणसाला बेभान बनवते,हिंस्त्र बनवते,तितकेच निसर्गापुढे हतबलही! आपत्तीमुळे समाजाची,उद्योगाची आणि राष्ट्राची होणारी हानी पैश्याने मोजता येत नाही.आपत्तीतून सावरण्यासाठी प्रशिक्षित सुसज्ज टीम,यंत्रसामग्री,आर्थिक बाबी,यासर्वांचे सुसूत्र नियोजन करणारे आपत्ती व्यवस्थापन धोरण आवश्यक असते,ज्यामध्ये स्थानिक,प्रादेशिक,राष्ट्रीय आणि जागतिक संघटना सहभागी हव्यात.
हे झालं मोठ्या आपत्तीसंबंधी,ज्याची मुख्य जबाबदारी सरकारची आहे,पण आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या आपत्तींना तोंड देण्यास आपण कितपत तयार आहोत? घरातल्या सर्वांना एक प्रयोग म्हणून एकत्र बोलवा,त्यांना अशी एखादी काल्पनिक आपत्ती आली तर काय कराल असे विचारा,अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत. उत्तर ऐका........ अज्ञान आणि अनास्था पाहून भांबावून जाल.आपत्ती व्यवस्थापन संस्कृती रुजायची आहे हेच खरं.देशात आणि घरातही,प्रशिक्षण हाच उपाय आहे.
सुरुवात घरापासून करूया.घरात येऊ शकणाऱ्या आपत्तींची एक यादी करूया.
१.अचानक आग लागणे.
२.स्वयंपाकाचा गॅस लीक होणे
३.विद्युत उपकरणांचा शॉक लागणे.
४.अनवधानाने एखादी व्यक्ती घरात कोंडली जाणे.
५.घरातील लहान मूल नजरचुकीने रांगत दाराबाहेर जाणे व बाहेरच्या हौदात अथवा बाथरूममधील पाण्याने भरलेल्या बादलीत पडणे.
६.घरात चोर शिरणे.
७.भूकंप येणे.
८.अचानक लाईट जाणे.
९.शाळेतून लहान मुलांचे अपहरण होणे.
१०.घरातील मुख्य व्यक्तीचा अपघात किंवा आजाराने आकस्मिक मृत्यू होणे.
आता या आपत्तींचा सामना करण्यासाठी काय तयारी असावी ते पाहूया :
आग मुळात लागूच नये याची खबरदारी घेणे जरुरी आहे.
घरातील वायरिंग सदोष असल्यास ती बदलविणे, फायर रेझिस्टंट केबल,सर्किट ब्रेकर्स बसविणे (ELCB,MCB),स्वयंपाक करतांना शक्यतो सुती एप्रॉन घालणे म्हणजे पदर पेटणे वगैरे टळू शकेल.देवघरात देवापुढे समई अथवा तेलाची वात पेटवतांना वारा नाही याची काळजी घेणे,किंवा त्याऐवजी उत्तम म्हणजे इलेक्ट्रिकचा छोटा दिवा लावणे.आग लागल्यास घरात पाण्याचा साठा कुठे आहे याची माहिती सर्वांना हवी.आग विझवण्याचा एखादा स्प्रे(उदा.Ceasefire) घरात मोक्याच्या जागी टांगून ठेवावा आणि एकदा गच्चीवर एखादा कागद पेटवून तो स्प्रे मारून आग कशी विझवायची याचे प्रात्यक्षिक सर्वांनी घ्यावे. फायर फायटरचा फोन नंबर देशभर १०१ आहे,तो सर्वांना माहीत असावा.स्वयंपाकाचा गॅस वापरतांना शेगडी व रबरी नळ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच घ्याव्यात व वेळोवेळी त्या तपासून घ्याव्यात.सिलेंडर बदलवतांना रेग्युलेटर नीट कसे बसवायचे हे त्या तंत्रज्ञाकडून शिकून घ्यावे आणि ते जबाबदार व्यक्तीनेच बदलवावे. चुकून खोलीत गॅसचा वास येत असल्यास आधी सर्व दरवाजे-खिडक्या उघडाव्या.इलेक्ट्रिक लाईटची बटने सुरू अथवा बंद करू नये,तसे करतांना स्पार्क होतो व गॅस पेट घेऊ शकतो.सर्वप्रथम रेग्युलेटर बंद करून काढून टाकावे. गॅसने पेट घेतला असल्यास सर्वांनी ताबडतोब घराबाहेर पडावे,कारण पेटलेल्या सिलेंडरचा स्फोट होऊ शकतो.
घरातील सर्व विद्युत उपकरणे शक्यतो लहान मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवावीत. अर्थींग योग्य आहे की नाही ते वेळोवेळी तपासून घ्यावे.सर्व हेवी उपकरणांना उदा.टीव्ही,फ्रीज,मिक्सर,मायक्रोवेव्ह,वॉशिंग मशीन,एअर कंडिशनर तीन वायरी असलेली पिन असते,त्यात पॉझिटिव्ह,न्यूट्रल व अर्थींग अशा तीन वायरी असतात.करंट लीक झाल्यास तो अर्थींगच्या वायरीतून जमिनीत शिरतो व आपणास शॉक लागत नाही. कित्येक वायरमन याकडे दुर्लक्ष करून दोनच वायरी असलेल्या पिना बसवतात,असे करू देऊ नका. कोणत्याही व्यक्तीस शॉक बसला असल्यास तिला हात लावणे टाळावे,तो वापरत असलेल्या इलेक्ट्रिक अवजाराचे मुख्य बटन बोर्डवरून बंद करावे किंवा सरळ मेनस्विच बंद करावे.घरातील सर्वांना मेनस्विच कुठे आहे व तो चालू-बंद कसा करावा ते शिकवावे.
पाच वर्षांखालील मुलांना घरात एकटे कधीच सोडू नये.घराची मुख्य दारे-बाथरूमची दारे नेहेमीच बंद ठेवावीत.घरगडयासोबत मुलांना एकटे सोडू नये.आपल्या घरात व ऑफिस मध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचा पूर्ण तपशील फोटो व पत्त्यासहित नोंद करून ठेवावा आणि त्याची एक प्रत पोलीस स्टेशनला जमा करावी.पिना,सुया,चाकू, कात्र्या आदी घातक वस्तू आणि औषधे लहान मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवाव्यात.लहान मुलांकडूनही त्यांचे नाव,आई-वडिलांचे नाव,पत्ता,मोबाईल नंबर पाठ करून घावे.शाळेच्या दप्तरावरील लेबलवरही ही सर्व माहिती असावी. अनोळखी व्यक्तींसोबत कधीच शाळेतून घरी येऊ नये तसेच अनोळखी व्यक्तींनी दिलेला खाऊ,प्रसाद,पेढा कधीच न खाण्यास शिकवावे.शाळा सुटल्यावर घ्यायला कुणीच न आल्यास हेडमास्तरांच्या ऑफिस मध्ये जाऊन बसणे शिकवावे(एखादवेळी मुद्दाम त्याचे प्रात्यक्षिक घ्यावे) आगाऊपणा करून रस्ता ओलांडून समोरच्या टेलिफोन बूथ मधून फोन करण्याची सवय तर मुळीच नको,त्यात अपघाताची भीती जास्त असते.
राज्यातील वीज टंचाईमुळे अचानक वीज जाण्याची आपणास सवय आहे,आणि बहुतेक घरी इन्व्हर्टर्स असतात,त्यामुळे अचानक अंधार पडत नाही.परंतु झोपतांना उशाशी एक टॉर्च,किंवा आगपेटी आणि मेणबत्ती असावी.
रात्री झोपतांना सर्व दारे-खिडक्या व्यवस्थित बंद कराव्या.दरवाज्याच्या बाहेरील बाजूस कडी-कोयंडा असल्यास तो बाहेरून कुणी लावू नये म्हणून त्यास डमी कुलूप लावावे.आजकल बर्गलर अलार्म मिळतात,ते लावल्यास दरवाजा उघडण्याचा प्रयत्न चोरांनी केल्यास मोठी घंटी वाजते.चोर घरात शिरला असल्यास त्याच्याशी सामना करणे टाळावे कारण त्याच्याजवळ हत्यारे असू शकतात.अगदी प्रसंग आलाच तर स्वयंपाकघरातील चाकू-सुऱ्या किंवा तिखटाची पावडर कामी येऊ शकते डोळ्यात फेकायला.शक्यतो एखाद्या खोलीत स्वतःला बंद करून घेऊन पोलीस अथवा मित्रांना फोन करावा.(पोलिसांचा नंबर देशभर १०० आहे) चोर समोरासमोर आल्यास त्याच्या मागण्या मान्य करून किल्ल्या सुपूर्द करणे योग्य,शीर सलामत तो पगडी पचास! तसे जीव वाचविण्यासाठी परवाना काढून एखादे पिस्तुल-बंदूक घरी असली तर फारच छान,पण परवाना मिळणे फारच दुरापास्त आहे.असो.
आजकल तरुणांमध्ये हृदयरोगानी होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढलंय,तसेच अपघातांचेही आणि आता त्यात भर पडलीये करोनाची.म्हणून घरातल्या कर्त्या व्यक्तीचे लाईफ इन्शुरन्स आणि सर्वांचे मेडिक्लेम जरूर असावेच.जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन ने खास करोनाच्या इलाजासाठी तीन,सहा आणि नऊ महिन्याच्या पॉलीसिज आणल्यायत,अगदी थोडक्या रकमेत दोन ते तीन लाखांचं कव्हर मिळतं उपचारासाठी,अवश्य करावं प्रत्येकाचं. त्याचप्रमाणे लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम वेळेवर रिन्यू करणेही फार महत्वाचे आहे.(मी दहा वर्षांपासून नियमित हफ्ते भरत असून एका वर्षी फक्त आठ दिवस उशीर झाला, तेही चेक घाईत चुकीचा दिल्याने,त्यामुळे झालेल्या बायपास सर्जरीचा एक पैसाही मला ओरिएंटल इन्शुरन्स कम्पनीनी दिला नाही!) सर्व स्थावर मालमत्तांची कागदपत्रे,व्यवहारांची माहिती,बँक-पोस्ट ऑफिस ची पासबुकं,फिक्स डिपॉझिट रिसीट्स,विमा पावत्या, एका ठिकाणी असाव्यात आणि घरातील इतर व्यक्तींना त्याची माहिती असावी.
नेत्रदान,देहदान,त्वचादान ई. संकल्प केला असल्यास तेही सर्वांना सांगून ठेवावे. करोना झाल्यास आजाराईतकच जीवघेणं असतं ते म्हणजे एकटेपण,आणि त्यावेळी साथीला असतो तो फक्त तुमचा अँड्रॉईड मोबाईल फोन,ज्याद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबियांशी संपर्कात राहू शकता. घरातल्या जेष्ठ व्यक्तींना जर असला फोन वापरता येत नसेल तर ताबडतोब आत्तापासून त्यांची ट्युशन सुरू करा,कुणावर कधी वेळ येईल सांगता येत नाही.
शाळकरी मुलं, जेष्ठ नागरिक आणि सारखी फिरस्ती असलेल्या नोकरी व्यवसायातील तरुण मुले यांना सैनिकांच्या गळ्यात असतात तसे आयडेंटिफिकेशन बॅजेस द्यावेत. त्यावर फोटो,संपूर्ण नाव-पत्ता,जवळच्या नातेवाईकांचे फोन नंबर्स, रक्तगट,एखादा विशिष्ट आजार असल्यास त्याचा उल्लेख,रोज लागणाऱ्या औषधांची नावे आणि डोजेस,याशिवाय मेडिक्लेम पॉलिसीची माहिती असावी.
भूकंप आल्यास किंवा भूकंपाची शंका वाटल्यास घरातील सर्व मंडळींनी घराबाहेर पडून खुल्या रस्त्यावर यावे.झाडाच्या अथवा उंच इमारतीच्या आडोश्याने कधीच उभे राहू नये.आपल्या घरात एका सुरक्षित ठिकाणी एखाद्या बॅगेत आपली महत्वाची कागदपत्रे,बँक पासबुक्स,चेकबुक्स,क्रेडीट कार्ड्स,पास्पोर्ट्स,ड्रायविंग लायसन्स व थोडे पैसे ठेवावेत,आपात्कालीन परिस्थितीत ही बॅग उचलून लागलीच घराबाहेर पडता येते. प्रत्येक खोलीत सहज दिसेल आशा ठिकाणी सर्व महत्वाचे फोन नंबर्स लिहून ठेवावे,ती जागा सर्वांना माहीत असावी.
गाडीच्या आत एक हातोडी जरूर असावी,आपातस्थितीमध्ये खिडकीची काच फोडून बाहेर पडता येते(मुंबईच्या पुरात अनेक जण गाडीतून बाहेर न पडू शकल्याने गुदमरलेत)
तसेच गाडी पार्क केल्यावर सर्व दरवाजे लॉक जरूर करावेत,परवाच लहान मुलं खेळतांना एक मूल लपण्यासाठी उभ्या असलेल्या एका गाडीचं दार उघडून आत गेलं आणि दरवाजा पुन्हा उघडता न आल्याने वाढलेले तापमान आणि ऑक्सिजनची कमतरता यामुळे घुसमटून, होरपळून मरण पावल्याची घटना वाचली.
अजून एक गोष्ट,जी थोडी या विषयापासून दूर आहे पण महत्वाची आहे,मला इथे सांगायचीय,जी खरंतर माझ्या आईने पोटतिडीकेनं केलेली सूचना आहे बहिरेपण असलेल्या व्यक्तींसाठी. ज्यांना वयोमानानुसार बहिरेपण आलंय,आणि नजर छान आहे अशा व्यक्ती.कानात यंत्र घालण्याचा कंटाळा असतो,त्यानीही ठीक ऐकू येत नाही,बाकी सर्व प्रकृती उत्तम असते.टीव्ही पहायला,फिरायला आवडतं,पण ऐकू येत नाही म्हणून आवडीचे कार्यक्रम पाहूनही समजत नाहीत,आणि भीतीनं घरची मंडळी बाहेर फिरायला जाऊ देत नाहीत.म्हणून टीव्हीच्या सर्व चॅनल्स वर सिरियल्स मध्ये सबटायटल्स असावीत आणि जशी अंध व्यक्तींसाठी पांढरी काठी जगमान्य आहे तशी बाहिऱ्या व्यक्तींसाठी एक टोपी डिझाईन करावी ज्याने सर्वांना लगेच कळेल की ही व्यक्ती बहिरी आहे आणि ते नीट काळजी करतील. लवकरच अशी टोपी तयार करून तिचा प्रसार करणार आहोत नक्कीच!
अरे हो,एक अतिशय महत्वाची गोष्ट तर राहूनच गेली या गप्पांच्या नादात.ती म्हणजे घरातील प्रत्येक कमावत्या adult व्यक्तीनं आपलं इच्छापत्र करून ठेवावं.मी मुद्दाम मृत्युपत्र हा उल्लेख टाळतोय,भीती वाटते लोकांना की अरे बापरे,त्यांना असं वाटतं की मृत्युपत्र तेच लिहितात की ज्यांचा मृत्यू जवळ आलाय. मित्रांनो,मृत्यू हा अटळ आहे आणि त्याच्या येण्याची काळवेळ कुणालाच माहीत नाहीये. बहुतांश लोक स्वतःच्या मरणाला घाबरत नाहीत तर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती,म्हणजे बायको,मुलं,लहान बहीण-भाऊ,आणि आई-वडील यांची काळजी त्यांच्या पश्चात कोण करेल म्हणून चिंता करतात. तर यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत,त्या म्हणजे आयुर्विमा आणि इच्छापत्र! (Life insurance & Will.) अकाली मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची उणीव कुणीच भरून काढू शकत नाही,पण विम्याचे पैसे मिळाल्यास वारसांची आर्थिक जरूर नक्कीच भरून निघू शकते. आणि इच्छापत्र केले असल्यास प्रॉपर्टी/इस्टेट याची व्यवस्थित विल्हेवाट लागते आणि कौटुंबिक भांडणे टळतात.
इच्छापत्रामध्ये आपल्या सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तेचाउल्लेख करावा आणि कुणाकुणाला कशीकशी वाटण्यात यावी हे लिहावे. साध्या कागदावर लिहिले तरी चालते.सही किंवा अंगठा उमटवून दोन नात्यात नसलेल्या व्यक्तींच्या साक्षीदार म्हणून सह्या घ्याव्यात,आणि सुरक्षित जागी ठेवावे. हे कितीही वेळा बदलता येते आणि तारखेप्रमाणे शेवटचे ग्राह्य धरले जाते. इच्छापत्र हे दुय्यम निबंधक यांच्याकडे रजिस्टर करून सील करून त्यांच्याचकडे सेफ कस्टडीत ठेवता येते. याचसोबत इच्छापत्र करणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या निरोगी आहे असे स्पेशालिस्ट डॉक्टरचे सर्टिफिकेट असल्यास फारच चांगले.
तर मित्रांनो ही झाली आपल्या घरापासून आपत्ती व्यवस्थापनाची सुरुवात.घरोघरी अशीच तयारी असली तर गाव,राज्य आणि देशपातळीवरही आपण मोठ्या आपत्तींना तोंड देण्यास तयार असू कारण आपत्ती व्यवस्थापन संस्कृती मग रुजलेली असेल.
नमस्कार!🙏🙏

Comments
Post a Comment