Skip to main content

*कचोरी*

*कचोरी*

कचोरी हा खाद्यप्रकार कुठे उगम पावला कुणास ठाऊक,परंतु देशाच्या कान्याकोपऱ्यात मिळतो हे मात्र नक्की!
 कचोरीशी माझी पहिली गाठ(खरं तर तिची माझ्याशी!) पडली ती म्हणजे मी लहान असतांना आजोळी अकोल्याला जायचो भुसावळहून तेंव्हा शेगाव स्टेशनवर बाबा उतरून त्या खोमचेवाल्याकडून कचोऱ्या घ्यायचे.कोण गर्दी करायचे लोक ती कचोरी खरीदायला म्हणून सांगू,गाडी थांबणार इनमीन तीन मिनिटे,खोमचेवाले पाच आणि घेणारी मंडळी शेकडोनी.म्हणजे शेगाव प्लॅटफॉर्म यायच्या आधीच मंडळी दाराशी गर्दी करायची उतरायला.कचोऱ्या मिळाल्यावर कोण आत्मिक समाधान झळकायचं त्यांच्या चेहेऱ्यावर! त्यावेळी प्रत्येक गाडीच्या वेळी गरम कचोऱ्या आणायचे विकायला आणि अतिशय चविष्ट असायच्या त्या,रेल्वेनं पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे,देशभर घेऊन जायचे लोक. आता मात्र ती क्वालीटी राहिली नाही,थंड-गारगोटी झालेल्या कचोऱ्या असतात,आतमध्ये नावालाच मसाला असतो,सोबत कच्या हिरव्या मिरच्या देतात,परंतु आजही लोक तितक्याच श्रेद्धेनी त्या घेतात,असो.
त्यापेक्षा छान कचोऱ्या नांदुरा स्टेशनवर मिळतात.पांढरी गांधीटोपी आणि पिळदार मिश्या असलेल्या एका गृहस्थाचा स्टॉल आहे अप प्लॅटफॉर्मवर,तिथे चहाही खूप उत्कृष्ट मिळतो,आणि तो विक्रेता अभिमानानं ओरडत असतो : खाओ कचोरी,पियो चाय,हावरा से बम्बईतक नही मिलेगी कहीं! तशीच छान कचोरी मलकापूर स्टेशनवरही मिळते,दुपारी साडेचार वाजता साधारणतः महाराष्ट्र एक्सप्रेस येण्याच्या वेळी बनवतात,तसं,मलकापूर गावातली "दो भाई" हॉटेलातली कचोरी सुद्धा छान असते.(ही झाली जुनी गोष्ट,आताची सद्य परिस्थिती काय आहे यावर मलकापूर येथे स्थायिक माझा मित्र डॉ गजानन जाधव जास्त चांगला प्रकाश टाकेल!)
शेगाव कचोरी आता शेगावपेक्षा इतरच ठिकाणी जास्त मिळू लागलीय.आमच्या भुसावळला साधारणतः आठ-दहा वर्षांपूर्वी शेगाव कचोरी नावानी एक दुकान उघडले,आणि अशी वदंता होती,की कचोरीच्या आत भरायचा मसाला शेगावहून आणतात म्हणून!खूपच मस्त चव होती,आता तर मला वाटतं प्रत्येकच गावात शेगाव कचोरी नावांनी दुकानं आहेत,परवाच पुण्याला डेक्कनवर पाहिलं एक! लोक अजूनही भक्तिभावानं प्रसाद म्हणून खातात शेगाव कचोरी.(शेगावला आनंदसागर पार्क या भव्य वास्तूत मिळणारा दोन रुपयांचा मसाला चहा,तीन रुपयांची चविष्ट साबुदाणा खिचडी सुद्धा जरूर खावी असा आग्रह मी करीन)

समोसा,कचोरी आणि पाणीपुरी हे सर्व माझे अतिशय लाडके पदार्थ आणि ज्या गावी जाईन तिथले हे पदार्थ खाईनच,त्यावरून ठरतं त्या गावी पुन्हा (लवकर) जायचं की नाही ते! (आज आपला विषय कचोरी असल्यामुळे पाणीपुरी आणि समोसा याविषयी नंतर कधीतरी!)
आमच्या भुसावळलाही कचोरी खूप छान मिळते.वसंत टॉकीजसमोर एक बोंम्बे चौपाटी भेळ हाऊस आहे,सुरवाडेकाकांचे,तिथली कचोरी अफलातून असते.त्यातील मसाला एकतर अगदी ठासून भरला असतो,आणि त्याची थोडी आंबटसर चव असते.गरम काढण्याची वेळ म्हणचे सकाळी नऊ आणि संध्याकाळी सात वाजता.ती मात्र अक्षरशः तोंडात विरघळते! त्यासोबत तळलेली मिरची जरूर मागावी. त्यांची शेगाव कचोरीसुद्धा मस्त असते.भुसावळला आठवडे बाजारात "पाव्हण्याची"कचोरी प्रसिद्ध आहे.खान्देशात जावयाला पाव्हणा म्हणतात,या गृहस्थाचे नावच पाव्हणा पडले आहे.याची खासियत म्हणजे याची गाडी दुपारी एक वाजता लागते.साधारणतः साडेबारा वाजेपासूनच गिर्हाईकं समोरील टेबल-खुर्च्यांवर पंगतीसारखे बसलेले असतात.याचे वैशिष्ट्य म्हणजे गरम कचोरीला मध्ये छिद्र पाडून त्यात चिंचेची गोड चटणी आणि कापलेला कांदा-बारीक शेव टाकतात,मस्त लागते.आणि हो,दुपारी चारच्या आत गेलात तरच नशिबात असणार तुमच्या,नाहीतर दुसऱ्या दिवशी या,आणि मंगळवार बंद असतो बरंका ठेला!

या झाल्या आपल्या कन्व्हेन्शनल कचोऱ्या! आता याचे प्रकार आणि उप-प्रकार बरेच आहेत,त्यातला एक आमच्या भुसावळचाच पुन्हा,मधुमामाच्या डेअरीतला.विठ्ठल मंदिर वार्डातील या डेअरीत रोज संध्याकाळी पाच ते सात मिळते.या गोल छोट्या असतात आणि आतील सारण मस्त आंबटगोड असते,मुख्य म्हणचे या दोन-तीन दिवस टिकतातही.मी पुण्याला डॉ पुणतांबेकरांच्या गॅलक्सी हॉस्पिटलला शिकायला जायचो तेंव्हा दरवेळी मधुमामाच्या कचोऱ्या आवर्जून न्यायचो नाश्त्याला सर्वांना! ती कचोरी (आणि भरीत-भाकरी) म्हणजे माझी ओळख  होती,टेबलवर त्या कचोऱ्या दिसल्या,की सर्वजण ओळखायचे की आज भुसावळचे केळकर आलेले दिसतात!
जळगावला बालाजी स्विट्स येथे त्यांच्या बाजूच्या दुकानात सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत अव्याहतपणे कांदा कचोरी तयार होत असते(सोबत देशी तुपातल्या जिलबी आणि ईमरती पण,पण यो वेगळा विषय आहे) या कचोरीचं नाव जरी कांदा कचोरी असलं तरी त्याच्या सारणात कांदा आणि बटाटा दोन्ही असतात.ही पण छान आणि नेहेमीपेक्षा हटके लागते.यासोबतही तळलेल्या मिरच्या आणि चिंचेची गोड चटणी मस्त लागते.

या व्हरायटीज सोडल्या तर बाकीच्या खऱ्या अर्थानं कचोऱ्या नाहीतच.यामध्ये हल्दीराम आणि तत्सम कंपनीच्या मिळणाऱ्या (आणि जगाच्या अंतापर्यंत टिकाऊ असणाऱ्या) कोरड्या कचोऱ्या शामिल आहेत.आजकल तिथे दही-कचोरी नावाची डिश मिळते,त्यात इतकं गोड दही आणि बारीक शेव,चटणी असते की कचोरी आपली ओरिजनल चवच हरवून बसते!

तर या मंडळी भुसावळला,तुम्हाला भुसावळ-जळगाव-मलकापूर-नांदुरा, सर्व कचोऱ्या खिलवतो!


Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात,निव

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने होणारा प्रस

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनकरराव ३ वर